‘‘जुलै ते ऑक्टोबर..दिल्लीत कायम असेच होत राहणार. इतकी अस्वच्छता इथे आहे, लोकांमध्ये जागृती नाही आणि विषाणूच्या संसर्गाला पूरक हवामान असताना डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवताप थैमान घालणारच. त्यामुळे ज्यांना दिल्लीत राहायचे आहे, त्यांना या विषाणूंना तोंड देण्याइतपत प्रतिकारशक्ती निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही..’’

दिल्लीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमचंद्र भट सांगत होते. म्हटले तर हा वैद्यकीय सल्ला आहे आणि म्हटले तर एका वैद्यकीय तज्ज्ञाची असमर्थता, असहायता आणि अपरिहार्यता. दिल्लीतील या ‘साथीच्या रोगांच्या हंगामा’मधील प्रत्येक रुग्णालयांमधील गर्दी पाहिली की डॉ. भट यांच्या निरीक्षणाची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. दिल्लीबाहेरच्यांना दिल्ली म्हटले की ‘लुटेन्स दिल्ली’ आठवते. प्रशस्त रस्ते, दुतर्फा हिरवळ, ऐन उन्हाळ्यात सावली देणारी मोठमोठाली झाडे, सारे काही आखीव-रेखीव.. पण या नवी दिल्लीच्या बाहेर नुसते पाऊल टाकले तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, इतके अस्वच्छतेचे आगार आहे ही दिल्ली. विशेषत: बाह्य़ दिल्ली. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान यांना लागून असलेली दिल्ली. सीलमपूर, संजय कॅम्प, त्रिलोकपुरी, जहाँगीरपुरी, सुलतानपुरी, भोगल, खिचडीपूर एक्स्टेंशन, संगम विहार, सीमापुरी, वजिराबाद, रोहिणी, तिमारपूर, खोडा वस्ती यांसारख्या असंख्य ठिकाणी पाऊल ठेवले तरी गुदमरल्याशिवाय राहत नाही. हे सारे परिसर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागांतील स्थलांतरितांनी गजबजलेले आहेत. पाचवीला पुजलेली गरिबी, पाणी- शौचालये- आरोग्य या मूलभूत सोयी-सुविधांचा पूर्णपणे अभाव यामुळे संसर्गजन्य रोगांना तिथे अतिशय पूरकस्थिती आहे. त्यातच उत्तर भारतामध्ये व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेची मानके खूप खालच्या दर्जाची आहेत. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे दिल्ली आजारी पडली आहे.. डेंग्यू, चिकुनगुन्या, हिवतापाच्या दहशतीखाली आहे.. कदाचित अतिशयोक्ती वाटेल; पण प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा रुग्णालयामधील गर्दी पाहिली तर तथ्य नक्की वाटेल.

मागील वर्षी सुमारे १५ हजार जणांना डेंग्यूची बाधा झाली होती. ६० जणांना जीव गमवावा लागला. म्हणजे सुमारे १२ कोटीच्या महाराष्ट्रात फक्त पाच हजार जणांना बाधा व २३ जणांचा मृत्यू झाला असताना, सुमारे एक कोटी लोकसंख्येच्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या तिप्पट रुग्णसंख्या आणि बळींची संख्या दुप्पट होती. यंदा तसेच चित्र आहे. यावरून स्थितीची कल्पना येऊ शकते. विशेष म्हणजे, दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या अनेक नामवंत वैद्यकीय संस्था असतानाही एवढी भयावह स्थिती आहे.

एकीकडे मुळातच आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला असताना यंदा त्यात भर पडली केंद्र व अरविंद केजरीवाल सरकारमधील संघर्षांची. आरोग्य हा विषय दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येतो. तरीदेखील प्रत्येक बाबीसाठी केंद्राकडे बोट दाखविण्याच्या नादामध्ये केजरीवाल सरकार यंदा ढिम्म राहिले आणि परिस्थिती हाताबाहेर जायला लागली.  या सर्व प्रकारावर जोरदार टीका झाल्याने आता केंद्र व दिल्ली सरकारने राजकारण बाजूला ठेवल्यासारखे दिसते आहे. यथेच्छ चिखलफेक केल्यानंतर का होईना, राजकीय पक्षांना परिस्थितीचे गांभीर्य समजले आहे.  हा झाला तात्पुरता दिलासा. पण खरी लढाई अस्वच्छतेशी आहे. दिल्ली म्हणजे अस्वच्छतेचे आगार आहे. जोपर्यंत एकमेकांविरुद्ध राजकीय संघर्ष करम्ण्याऐवजी अस्वच्छतेविरुद्ध ‘जंग’ पुकारली जात नाही, तोपर्यंत ‘नेमेची येतो संसर्गजन्य रोगांचा हंगाम’ असे म्हणण्याची वेळ दिल्लीकरांवर कायमच येणार आहे.

डेंग्यूची दंतकथा

पपईच्या पानाचा रस सकाळी उपाशीपोटी घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्स वाढतात. किवी आणि ड्रॅगन हे फळ खाल्ल्यामुळेही प्लेटलेट्स वाढतात असा सर्वसामान्यांमध्ये समज आहे. मात्र याला कुठलाही वैद्यकीय आधार नसून पपई, किवी किंवा तत्सम फळांमुळे डेंग्यू बरा होतो हे सिद्ध झालेले नाही. रूग्णांमध्ये हा समज वाढीस लागला असला तरी याचा शरीरावर घातक परिणाम होत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डेंग्यूसाठी नेमके उपचार उपलब्ध नाहीत. प्रतिबंधात्मक उपाय तसेच आजार झाल्यास द्रवपदार्थ आणि पोषक आहार हाच मूलमंत्र आहे.

 

– संकलन ठिकठिकाणचे प्रतिनिधी