केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर यंदा  सरकारी पात़ळीवर तसेच संघ आणि संलग्न संघटनांनी ज्या पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी केली त्याचे अनेकांना कोडे पडले  आहे. ज्या विचारांना बाबासाहेबांनी विरोध केला ते विचार या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांनी सोडून दिले आहेत का? तसे नसेल तर आंबेडकरी विचार सोडून त्यांना फक्त आंबेडकर का हवे आहेत, हा खरा व  मूलभूत प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? गांधीविरोधक आंबेडकर काँग्रेसला हवेहवेसे का वाटतात? मार्क्‍सवादविरोधी आंबेडकरांना साम्यवाद्यांना जवळ करावे, असे का वाटते? हिंदू धर्माचा त्याग केलेले आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूजनीय का वाटू लागले आहेत? देशभरात ज्या वेगळ्या पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली, विशेषत: त्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि त्याच्या संलग्न संघटनांचा उत्साही सहभाग लक्षात घेतल्यानंतर हे प्रश्न निर्माण झाले आहेत. आंबेडकर जयंतीनिमित्त संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ व ‘पांचजन्य’चे विशेषांक काढण्यात आले. त्याला आवर्जून केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य व दलित समाजातील एक विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांना निमंत्रित करण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या विशेष पुढाकारातून आणि साहित्य अकादमीला पुढे करून देशभरातील निवडक दलित साहित्यिकांचे दिल्लीत चर्चासत्र घेण्यात आले. त्यासाठी रातोरात विमान प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. एके काळी धर्मव्यवस्थेविरुद्ध मूठ आवळून उभे राहणारे ज.वि. पवार, अर्जुन डांगळे यांच्यासारख्या आघाडीच्या साहित्यिकांनी त्याला हजेरी लावली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने व्याख्यानमाला आयोजित केली, तेथेही नरेंद्र जाधव यांना प्रमुख वक्त्याचा मान देण्यात आला. राज्यातील भाजप सरकारनेही त्यात काही कसूर ठेवली नाही. गेट वे ऑफ इंडियावर आंबेडकर जयंतीचा उत्सव घडवून आणला. आंबेडकर जयंती साजरी करण्यात संघ परिवाराने घेतलेली आघाडी आश्चर्यचकित करायला लावणारी होती.
आंबेडकरांनी हिंदू धर्म नाकारला म्हणून दीक्षाभूमी जन्माला आली. हिंदू धर्म नाकारलेले आंबेडकर व बौद्ध धम्माचा स्वीकार केलेले आंबेडकर हिंदुत्वासाठी झटणाऱ्या, झगडणाऱ्या संघ परिवाराला मान्य आहेत का?      
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव करतो, त्याहीपेक्षा भारतात सामाजिक परिवर्तनाचा सैद्धांतिक लढा त्यांनी उभा केला, त्याबद्दल त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला जातो. कोणताही महापुरुष कुणाची खासगी मालमत्ता असत नाही. आंबेडकरही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे आंबेडकरांची कुणी जयंती साजरी केली, तर त्यात वावगे काय, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. तो योग्यच आहे; परंतु इथे पुन्हा प्रश्न निर्माण होतो, की ज्या विचारांना बाबासाहेबांनी विरोध केला ते विचार वरील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांनी सोडून दिले आहेत का? तसे नसेल तर आंबेडकरी विचार सोडून त्यांना फक्त आंबेडकर का हवे आहेत? हाच खरा व मूलभूत प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर आणि त्यांचे सामाजिक क्रांतीचे नेमके विचार काय आहेत, हे थोडक्यात जाणून घेणे आवश्यक आहे.
बाबासाहेब आंबेडकरांची मूळ लढाई भारतातील जातिव्यवस्थेविरुद्ध होती. जात ही माणसासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी विनाशकारी मानसिकता आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यांना जातिव्यवस्थेबद्दल प्रचंड घृणा होती. एका जातीचा समूह  दुसऱ्या जातीच्या समूहाला गुलामासारखी वागणूक देतो, ती व्यवस्था नेस्तनाबूद करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम इतिहासाचे उत्खनन सुरू केले. भारतात जाती नेमक्या कशा जन्माला आल्या, त्या हजारो वर्षे का टिकल्या, त्यांना कुणी पोसले आणि ती भारतीय समाजाच्या रक्तात इतकी कशी मुरली, मेंदूत कशी भिनली, याचा त्यांनी शोध घेतला. अफाट अभ्यास, चिंतन, मनन आणि तर्काच्या आधारावर भारतीय इतिहासाची त्यांनी नव्याने मांडणी केली, तो इतिहास संघ परिवाराला मान्य आहे का, असा पहिला प्रश्न उपस्थित होतो.
प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती याचा शोध घेत त्यांनी प्रचलित इतिहासाला धक्का देणारा नवा इतिहास रेखाटला. भारताचा इतिहास हा बहुतांश मुस्लीम आक्रमणावर, त्यांच्या जुलमी राजवटीवर अधिक केंद्रित झाला आहे. बाबासाहेबांना हा इतिहास फारच वरवरचा वाटतो आणि तो तसा खराही नाही, असे त्यांचे मत होते. मौर्य व गुप्त या दोन राजघराण्यांच्या संघर्षांत भारतीय इतिहासाची मुळे ते शोधतात आणि मग भारताचा इतिहास म्हणजे दुसरेतिसरे काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मीनिझम यांच्यातील प्राणघातक संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास, असा निष्कर्ष त्यांनी काढला. भारतात समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचा विचार देणाऱ्या बौद्ध धर्माचा उदय ही क्रांती होती आणि बौद्ध धर्माचा पाडाव व चातुर्वण्र्य व्यवस्थेचा जन्म ही प्रतिक्रांती होती, अशी त्यांनी मांडणी केली. या प्रतिक्रांतीचा नायक कोण, त्यांनी कोणकोणती शस्त्रे व शास्त्रे वापरली, याची अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध चिकित्सा त्यांनी केली आहे. त्यावर आधारित त्यांनी काही अनुमान काढले, काही भाष्य केले. मुसलमानांनी हिंदू भारतावर आक्रमण केले हे खरे, परंतु त्याआधी ब्राह्मण्यवादी विचाराने बौद्ध भारतावर आक्रमण केले होते. इसवी सनपूर्व १८५ च्या दरम्यान मौर्य घराण्यातील बौद्ध राजाचा पुष्यमित्राने केलेला खून आणि बळकावलेले राज्य ही प्रतिक्रांती होती. त्या घटनेच्या जवळपासच्या कालखंडात बौद्ध धर्माला पराभूत करण्यासाठी रामायण, महाभारत, भगवद्गीता, मनुस्मृती व पुराणे रचण्यात आली, असे आंबेडकरांचे मत आहे. या प्रतिक्रांतीने भारतीय समाजाची उभी-आडवी विभागणी करणारी चातुर्वण्र्य व्यवस्था जन्माला घातली, त्याविरोधात आंबेडकरांचा लढा होता. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणाऱ्या संघ परिवाराला त्यांनी मांडलेला हा इतिहास मान्य आहे का? बुद्धिझम विरुद्ध ब्राह्मीनिझम हाच भारताचा इतिहास आहे, याबद्दल संघ परिवाराचे काय मत आहे? बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी शस्त्राबरोबर ज्या शास्त्रांचा आधार घेतला गेला, त्या धर्मशास्त्रांनाही प्रतिक्रांतीच्या गुन्हय़ाबद्दल आंबेडकरांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, त्याबद्दल संघ परिवाराला काय वाटते आणि शेवटी इतिहासाचे उत्खनन करून बौद्ध विचारांच्या म्हणजे क्रांतीच्या बाजूने उभे राहणारे आंबेडकर संघ परिवाराला मान्य आहेत का?
माणसाचे माणूसपणच हिरावून घेणारी, समाज आणि देश दुबळा करणारी जातिव्यवस्था ही डॉ. आंबेडकरांच्या चिंतेचा, चिंतनाचा व लढय़ाचा विषय होता. ते केवळ इतिहासाचे उत्खनन करून थांबले नाहीत, तर पुढे त्यांनी चातुर्वण्र्य व्यवस्था व जातिव्यवस्थेच्या समूळ उच्चाटनाचीही मांडणी केली. ‘जातिप्रथेचे विध्वंसन’ या नावाने त्यांनी जातिअंताचा जाहीरनामा मांडला. भारतातील जातिप्रथा ही एकाच वंशाच्या लोकांचे सामाजिक विभाजन आहे. हिंदू केवळ जातींचे समूह नाहीत, तर स्वत:पुरते व स्वत:च्या स्वार्थी ध्येयापुरते जगणारे युद्धखोर गट आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक जात हा युद्धखोर गट असेल, तर हा समाज एकसंध कसा होणार, हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. ही लढाई सोपी नाही, याची कल्पना त्यांना होती. स्वराज्यासाठीची लढाई तुम्हाला राष्ट्राला बरोबर घेऊन लढता येते, परंतु जातिव्यवस्थेविरुद्धची लढाई तुम्हाला तुमच्या स्वत:च्या राष्ट्राशी लढावी लागते, हे आंबेडकरांचे उद्गार सामाजिक परिवर्तनाची लढाई किती अवघड व जोखमीची होती, याचा आजच्या संदर्भातही प्रत्यय आणून देणारे आहेत. ही जातिव्यवस्था संपवायची कशी, याचाही मार्ग त्यांनी सांगितला. डॉ. आंबेडकर म्हणतात, जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही, तर त्यांच्यात जातीची कल्पना बिंबवणारा धर्म त्याला जबाबदार आहे. त्यांना जातीचा धर्म शिकवणारी शास्त्रे कारणीभूत आहेत. भारतातील जातिव्यवस्था नष्ट करण्याचा आंतरजातीय विवाह हा एक उपाय झाला, परंतु तो पुरेसा नाही. हिंदू हे समाजरचनेचे पावित्र्य मानतात, जातीला दैवी आधार आहे. ज्यामुळे जातीला अधिकार बहाल केले आहेत, त्या पावित्र्याचा व दैवीकरणाचा नाश केला पाहिजे. याचाच दुसरा अर्थ धर्मशास्त्रांच्या पावित्र्याचा व प्रामाण्याचा नाश करावा लागेल. शास्त्राच्या पावित्र्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा जातिअंताचा मार्ग आहे. राममंदिराचा वाद अजून संपला नसताना आणि आता भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी जोर धरत असताना जातिव्यवस्थेचा आधार असलेल्या धर्मग्रंथांचे, शास्त्रांचे पावित्र्य व प्रामाण्य आणि त्यावरील श्रद्धाच नष्ट करायला सांगणारे आंबेडकर संघ परिवाराला स्वीकारार्ह आहेत का?
डॉ. आंबेडकरांनी जातिअंताचा जाहीरनामा मांडला. तेवढय़ावर ते थांबले नाहीत, त्यांनी जातिव्यवस्थेचा आधार असलेला हिंदू धर्मच नाकारला. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्याला धम्मक्रांती म्हटले जाते. आता संघ परिवार त्यावर म्हणेल, बुद्धाला आम्ही परके मानतच नाही. परंतु बुद्धाला विष्णूचा अवतार मानणे आंबेडकरांना थोतांड वाटते. भाजपचे ज्येष्ठ नेते व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी त्यांनी संघभूमी व दीक्षाभूमी माझे प्रेरणास्थान आहे, असे उद्गार काढले होते. हा किती विरोधाभास आहे. आंबेडकरांनी हिंदू धर्म नाकारला म्हणून दीक्षाभूमी जन्माला आली. हिंदू धर्म नाकारलेले आंबेडकर व बौद्ध धम्माचा स्वीकार केलेले आंबेडकर हिंदुत्वासाठी झटणाऱ्या-झगडणाऱ्या संघ परिवाराला मान्य आहेत का?        

prakash ambedkar uddhav thackeray sharad pawar
“फुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून…”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना टोला; जागावाटपावर म्हणाले…
secularism in india conception of secularism in indian constitution
संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
BJP is creating rifts between castes and religions says Aditya Thackeray
भाजपा हे जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे- आदित्य ठाकरे