दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या! हा तपशील सोडला तरी, दोघींचे अभ्यासविषय सारखेच आणि समाजाबद्दल आस्थाही सारखी. दलित चळवळ आणि डॉ. आंबेडकरांचे याबाबतीतील कार्य ही अभ्यासाची शाखा म्हणून उभी करण्यामागे एलिनॉर यांचे प्रयत्न होते आणि या शाखेच्या त्या आद्य प्रणेत्याच होत्या, असे निर्विवाद नमूद करणारी ही आदरांजली..

Untitled-7
एलिनॉर झेलियट गेल्या. महाराष्ट्रभरातल्या दलितांच्या घरांत डोकावू शकणारा त्यांचा हसरा चेहरा आता कधीच दिसणार नाही. त्या इतिहासकार होत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्ता ओळखून त्यास अभ्यासविषय बनविणाऱ्या पहिल्याच होत्या. इतिहासातील त्यांचे सैद्धान्तिक कार्य समाजाचा तळगाळ पाहणारे होते आणि यासाठी समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विद्याशाखांचे परिप्रेक्ष्य त्यांनी एकत्रित केल्यामुळे त्यांचे संशोधनकार्य आंतरविद्याशाखीय होते. ६ जून रोजी झालेले त्यांचे निधन ही दलित चळवळीची हानी आहे; तसेच दलित चळवळ, जातिव्यवस्था, बौद्ध तत्त्वज्ञान या क्षेत्रांतील संशोधनविश्वाचे आणि एकंदर ‘सबाल्टर्न स्टडीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभ्यासशाखेचेही ते मोठे नुकसान आहे. जगभरात माझ्यासारख्या अनेक अभ्यासकांना त्यांनी संशोधनाची प्रेरणा दिली, माझ्यासारख्या अनेकांनी त्यांचे संशोधन पायाभूत मानून तेथून सुरुवात केली, त्यामुळे आम्हां सर्वाचेही ते अपरिमित नुकसान आहे. जन्मतारीख ७ ऑक्टोबर १९२६, म्हणजे अगदी वयाची एकोणनव्वदी गाठेपर्यंत जगून एलिनॉर गेल्या. त्यांच्या आठवणी अर्थातच आमच्यात राहतील, दलितांमध्ये राहतील, दलित चळवळ किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये एकंदर भारतात आणि खासकरून महाराष्ट्रात राहतीलच राहतील.
कार्यरत आयुष्यात त्यांनी महत्त्वाची पुस्तके लिहिली, संपादित केली आणि अनेक अभ्यासलेख लिहिले. त्यांची पुस्तके- उदाहरणार्थ, ‘आंबेडकर्स वर्ल्ड : द मेकिंग ऑफ बाबासाहेब अ‍ॅण्ड द दलित मूव्हमेंट’, ‘अनटचेबल सेंट्स : अ‍ॅन इंडियन फिनॉमिनन (संपादित)’, ‘ फ्रॉम अनटचेबल टु दलित : एसेज ऑन आंबेडकर्स मूव्हमेंट’, ‘एक्स्पिरियन्स ऑफ हिंदुइझम : एसेज ऑन रिलिजन इन महाराष्ट्र’ (मॅक्सिन बर्नसन यांच्यासह संपादन).. अशा ग्रंथांतून दलित आणि आंबेडकरी अभ्यासशाखेच्या एक संस्थापक म्हणून एलिनॉर यांच्या महत्तेची साक्ष मिळत राहते. या चळवळींच्या अभ्यासाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला न्याय मिळावा, यासाठी एलिनॉर यांचे कार्य पायाभूत ठरले आहे. आज अनेक विद्यापीठांत ‘आंबेडकर अध्यासन’ असते किंवा दलित स्टडीज हा वेगळा विद्यापीठीय विभाग असलेला दिसतो, त्यामागची मूलभूत आणि बीजरूप प्रेरणा एलिनॉरच.
एलिनॉर यांचे योगदान अनेक पातळ्यांवरचे आहे. पहिले योगदान म्हणजे त्यांनी वापरलेली ‘सहभागिता संशोधना’वर (पार्टिसिपेटरी रीसर्च) आधारलेली नवी संशोधन पद्धती (मेथडॉलॉजी), ज्यात संशोधक दलित चळवळ आणि दलित जीवनानुभव यांचा जणू भागच होऊन जातात. तळागाळाच्या जनसमूहांतील स्त्री-पुरुषांचे मन जाणले नाही, त्यांच्यातील चैतन्य आणि यांची दृष्टी यांकडे पाहिले नाही; तर दलित चळवळ कोणत्या दृष्टिकोनांमुळे आणि कोणत्या द्रष्टेपणामुळे सुरू झाली आणि या चळवळीची स्वसंवेद्यता- स्वत:कडे पाहण्याची या चळवळीची समज- कशी आहे, हे संशोधकाला खऱ्या अर्थाने अभ्यासताच येणार नाही. दुसरे असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण दलित दृष्टिकोनातून जर वाचले नाही, जातिउन्मूलन सिद्धान्ताकडे पिढय़ान्पिढय़ा जातिप्रथेच्या चरकात पिचलेल्यांच्या आवेगातून पाहिले नाही, तर अभ्यासकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरही उमगणार नाहीत आणि डॉ. आंबेडकरांनी ज्या चळवळीचे नेतृत्व केले ती चळवळही समजणार नाही. संशोधन करणारी व्यक्ती बौद्धच असेल असे नाही, पण या संशोधकाचा दृष्टिकोन करुणा, मेत्ता आणि प्रज्ञा यांतून घडलेला असला पाहिजे. एलिनॉर यांच्याकडे हे सर्व होते. याच दृष्टिकोनामुळे त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या पिढीतल्या आणि येणाऱ्या पिढय़ांतील संशोधकांना बुद्धांच्या ‘अत्त दीप भव’नुसार मार्गशोधाची प्रेरणा कशी मिळावी हे कळू शकेल. एलिनॉर यांच्या लिखाणाने वाचक संमोहित होत नसे, वाचकावर हे लिखाण अंमल गाजवत नसे; तर जुन्या अभ्यासकांच्या खांद्यांवर उभे राहून त्यांनी पाहिले त्याच्या पुढले पाहावे, त्यांच्यावर सकारात्मक टीकाही करावी अशी उमेद हे लिखाण नक्कीच देत असे. पूर्वकालीन अस्पृश्य संतांच्या काव्याचा अभ्यास करताना केवळ वरवर शब्दांकडे पाहू नका, शब्दांच्या मागचा जातिउन्मूलनाचा आशयही पाहा, अशी दृष्टी एलिनॉर यांनी दिली. या संतांची अंतस्थ तळमळ त्यातून उमगली. एलिनॉर यांनी अभ्यासलेले असे संत हे विशेषत: महाराष्ट्रीय होते. सर्वजातीय संतांमध्ये वंचित जातींतून आलेल्या संतांचा आणि स्त्रियांचाही समावेश आपल्याला दिसतो, त्या साऱ्यांनी मिळून भक्तिमार्गाच्या धार्मिकतेपलीकडचा एक संवाद एकमेकांशी आणि समाजाशी केला. ‘अनुभव मंटप’ स्थापनेद्वारे बसवण्णा यांनी अशा संवादाची सुरुवात दक्षिणेत करून दिली होती. या संतांनी आपापल्या रचनांतून एकमेकांशी केवळ संवादच नव्हे तर एकमेकांच्या रचनांची सकारात्मक समीक्षाही केली आणि यातूनच संतांचा प्रवाह समृद्ध होत गेला; त्यातून जातिप्रथा उन्मूलनाचे काम झाले आहे, याकडे एलिनॉर यांनी लक्ष वेधले. यातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखीनेही रविदासांना (संत रोहिदास) असलेली दु:खमुक्त, जातिमुक्त, भेदभावमुक्त, करमुक्तअशा समता-नगरीची आस अभ्यासणारे ‘सीकिंग बेगमपुरा’ हे पुस्तक लिहिले.
एलिनॉर इतक्या सहज, इतक्या अहंमुक्त वागत की, समोरची व्यक्ती चळवळीतली असो वा अभ्यासक- ‘एवढय़ा मोठय़ा संशोधकबाई माझ्याशी बोलताहेत’ असे दडपण समोरच्यांवर न येता संवाद होऊ शके. दलित वस्त्यांमध्ये, शहरी झोपडपट्टय़ांमध्ये अगदी सहज वावरून लोकांमध्ये मिसळल्यामुळे, लोकांची मने त्यांना विनासायास वाचता येत. चांगले संशोधक- समाजअभ्यासक होण्यासाठीचा हा गुण फार कमी जणांत असतो. ‘मेकिंग ऑफ बाबासाहेब अ‍ॅण्ड द दलित मूव्हमेंट’ हे पहिले पुस्तक लिहिताना (त्यासाठी पीएच. डी.चे संशोधन करताना) त्यांची ही अभ्यास पद्धत तयार झाली, यामागे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वाटाही निश्चितच आहे. याच अभ्यास-दृष्टीमुळे, बाबासाहेब आणि दलित चळवळ या दोहोंचा इतिहासातून विकसित होत गेलेल्या परिप्रेक्ष्यातून विचार करण्यावर न थांबता, ही चळवळ कशी बदलत गेली आणि त्यामुळे पुन्हा तिच्या परिप्रेक्ष्याची ऐतिहासिकता काळानुरूप कशी पालटत गेली, हे त्या अभ्यासू शकल्या. बुद्धांच्या ‘अनिच्च’ तत्त्वाप्रमाणे- काहीही स्थावर नाही, कायमचे काहीच नाही, सारे बदलते आहे, या दृष्टिकोनाप्रमाणे- त्यांची संशोधनदृष्टी होती.
माझ्यासारख्या अनेकांच्या वतीने एलिनॉर यांना आदरांजली वाहताना असे वाटते की, आपण नेहमी एलिनॉरकडून शिकत राहिले पाहिजे, तरच एलिनॉर शरीराने आपल्यात नसल्या तरी आपल्या कामामधून त्यांना अमरत्व मिळत राहील.

swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?

– गेल ऑम्वेट