आई, वडील आणि काका यांचे विज्ञानावरील प्रेम मुंबईच्या गोरेगावातील वाढलेल्या विदिता वैद्य यांना संशोधन क्षेत्रात घेऊन आले. ‘जे काम करशील ते मनापासून कर आणि त्यात उच्चतम यश मिळव’ या पालकांनी दिलेल्या कानमंत्राला धरून काम करणाऱ्या विदिता यांना यंदाचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे.

वि दिता यांचे वडील डॉ. अशोक वैद्य आणि आई डॉ. रमा वैद्य हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर. त्यांचे वडील हे गोगाव येथील ‘सीबा-गायगी संशोधन संस्थेत’ कामाला होते. तेथेच विदिता यांचे लहानपण गेले. विज्ञानाचे बाळकडू तिला घरातूनच मिळाले. त्यांचे काका डॉ. अखिल वैद्य हे आण्विक जीवशास्त्रातील संशोधक होते. यामुळे त्यांच्या घरातील वातावरण हे नेहमी विज्ञानमयी असावयाचे. या वातावरणात लहानाचे मोठे झालेल्या विदिता यांनाही विज्ञानाची आवड निर्माण होऊ लागली. विदिता यांचे शालेय शिक्षण अंधेरीतील लेडी विसांजी शाळेत झाले. दहावीनंतर त्यांनी रुईया महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासून वृक्षवल्ली, साप, बेडूक यांच्यात रमणाऱ्या विदिता यांनी बारावीनंतर लाइफ सायन्सेसमध्ये पदवी शिक्षण घ्यावयाचे ठरविले. यामुळे त्यांनी झेविअर्स महाविद्यालयात बीएस्सीसाठी प्रवेश घेतला. १९९१ मध्ये त्यांनी अव्वल स्थान पटकावत लाइफ सायन्सेसमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांना ज्या विषयावर संशोधन करावयाचे होते त्याची सोय तेव्हा भारतात नव्हती. मग त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी मेंदू विज्ञानात प्रा. रॉनल डय़ुमेन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. पुढे पोस्ट डॉक्टरेटसाठी त्यांनी फ्रीडन येथे आणि नंतर ऑक्सफर्ड येथे शिक्षण पूर्ण केले. सुट्टीत जेव्हा मुंबईत यायचे त्या वेळेस मुंबईत येऊनच काम करावयाचे असे मनात ठरविले होते. त्यानुसार मला २००० मध्ये मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत संधी मिळाली. तेव्हापासून मी तेथे काम करत असल्याचे विदिता यांनी स्पष्ट केले. टीआयएफआरमध्ये त्यांनी आपल्या भावना कशा तयार होतात, आपण ज्या ठिकाणी राहिलो, ज्या वातावरणात वाढलो त्याचा आपल्या मेंदूच्या हालचालींवर काय परिणाम होतो याचे संशोधन करण्यास सुरुवात केली. सखोल अभ्यासानंतर मिळालेल्या निरीक्षणांकडे जगाचे लक्ष वेधले. याचबरोबर सध्या नैराश्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मात्र त्यावर उपचार नाहीत. जे उपचार मानसोपचारतज्ज्ञांकडे आहेत, त्याचा परिणाम होण्यास एक महिना ते एक वर्षांचा कालावधी लागतो. हा काळ एक आठवडय़ावर आणण्यातही विदिता यांना यश मिळाले आहे. याचे प्राथमिक संशोधन झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर आपल्या भावना मेंदूत कशा प्रकारे तयार होतात या अवघड प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम विदिता यांचे सुरू आहे. त्यांच्या या संशोधनामुळे मेंदू विज्ञानातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळून वैद्यकीय विज्ञानालाही त्याचा फायदा होणार आहे. आपल्या कामासाठी सासू-सासरे याचबरोबर घरातील इतर सर्व सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे विदिता सांगतात. त्यांचे आतापर्यंत ५० हून अधिक संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय संशोधन मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. याचबरोबर त्यांनी इतर वैज्ञानिक लिखाणही केले आहे.
-विदिता वैद्य टीआयएफआर, मुंबई</strong>