ऐन उत्सवांच्या तोंडावर न्यायालयाने नागरिकांच्या हिताची भूमिका घेत महत्त्वाचे निकाल दिले. परंतु, न्यायालयाची भूमिका आमच्या धर्माचे आचरण करण्याच्या, उत्सव साजरे करण्याच्या अधिकारावर गदा आणत असल्याचा कांगावा करत काहीजणांनी त्या विरोधात दंड थोपटले आहेत. प्रश्न उत्सव अथवा महाआरती-नमाज पठणाच्या निमित्ताने रस्ते अडवून वाहतुकीला अटकाव करण्याचा असो वा छाती व मेंदू दडपवून टाकणाऱ्या डीजेंचा असो. सामाजिक स्वास्थ्याशी निगडित असलेले हे प्रश्न कुठल्याही पक्षासाठी अस्मितेचे कसे काय ठरू शकतात? सर्वधर्मीय उत्सवांत वाढत असलेल्या उन्मादाला आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्याची वेळ आता आली आहे.

महाराष्ट्रात श्रावणसरींबरोबर चाहूल लागते ती उत्सवांची. उत्सवांचा रतीब नागपंचमीपासून जो सुरू होतो तो गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी असा सुरूच असतो. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या कॉस्मोपॉलिटीन शहरात तर जितक्या जातीपंथाचे लोक तितके सण-उत्सव. त्यामुळे, सणांच्या उत्साहाबरोबरच उच्छाद, उन्मादाची आणि विकृतीकरणाची सीमाही पराकोटीची. मुंबई-पुणे-ठाण्याचा हा कित्ता आता इतर लहानमोठय़ा शहरांमधूनही गिरवला जाऊ लागल्याने तिथले सामाजिक आरोग्यही धोक्यात येऊ लागले आहे.
‘मॅक्सिमम’ उन्माद
सतराशेसाठ जातीपंथांमुळे मुंबईसारख्या ‘मॅक्सिमम’ शहराला सणावाराच्या काळात त्रासही तितकाच सहन करावा लागतो. मुंबईत सणांच्या उन्मादाला सुरुवात होते ती नारळी पौर्णिमेने. समुद्रकिनाऱ्यांवर उसळणारी गर्दी विकृतींचेच दर्शन घडवू लागली आहे. त्यानंतर येणाऱ्या गोकुळाष्टमीत तर उन्माद, विकृती, उच्छाद या सगळ्याचाच रंग मिसळलेला. एकेकाळी दहीहंडीचा खेळ दुपारी चारच्या सुमारास आटोपलेला असायचा. पण आता दहीकाल्याच्या आदल्या दिवसापासून म्हणजे जन्माष्टमीपासूनच उच्छाद सुरू होतो.
मोठय़ा रकमांच्या पारितोषिकासाठी नऊ-दहा थराची दहीहंडी फोडण्याचा अट्टहास लहान-मोठी गोविंदा पथके करतात. सराव नसल्याने कोसळून गोविंदा जायबंदी होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अनेकांचा मृत्यूही ओढवला आहे. अगदी वरच्या थरासाठी चिमुकल्या मुला-मुलींच्या जीवाशी खेळ केला जातो. त्यात लाखो रुपयांची पारितोषिके जाहीर करून दिवसभर गोविंदांना झुंजवत ठेवणाऱ्या राजकारण्याची संख्या कमी नाही. आयोजनाच्या निमित्ताने जाहिरातदार, प्रायोजकांकडून गोळा केल्या जाणाऱ्या बक्कळ पैशांच्या हिशेबाचा पत्ताच नाही. वाहतुकीचा बोजवारा, मद्यधुंद तरुणांचा स्वैरसंचार, महिलांची छेडछाड असे मुंबईला वेठीस धरणारे प्रकार घडू लागले आहेत.
गणेशोत्सवालाही याची बाधा झाल्याने नवसाला पावणाऱ्या गणपतींच्या जाहिरातबाजीला चांगलाच ऊत आला आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये होणारे हेवेदावे, भांडणे, मारामाऱ्या यातच दहा दिवस निघून जातात. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने गणेशाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचे वातावरण बधिर ठेवणे, हे गणेशोत्सवाचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्या ११ हजारांवर तर घरच्या गणपतींची संख्या पावणेदोन लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे, सर्वाधिक प्रदूषण करणारा सण असेदेखील गणेशोत्सवाचे वर्णन करता येईल.
रमजान, ईद मिलाद, मोहरम, बडी रात यांमुळेही अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आता गोंधळी उत्सवांमध्ये भर पडली आहे ती छटपूजेची. वर्षभर साजऱ्या होणाऱ्या या गोंधळी उत्सवांमुळे मुंबईची प्रकृती मात्र अधिकच बिघडू लागली आहे.
‘अतिक्रमणवादी’ नेत्यांचे ठाणे
उत्सवांचा झगमगाट उभा करण्यासाठी रस्ते, चौक अडवून ठाणेकरांचे अतोनात हाल करायचे आणि यथेच्छपणे स्वतला मिरवून घ्यायचे, असा राजकीय असंस्कृतपणा ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून रूढ झाला आहे. असे उत्सव साजरे केले आणि त्यात स्वतची छबी झळकावली म्हणजे आपला निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला अशा आविर्भावात वावरणाऱ्या येथील राजकीय नेत्यांनी कायदे, नियमांची अनेक वर्षांपासून पायमल्ली चालवली आहे.
ठाणे पोलीस दलात सहपोलीस आयुक्तपदी काम करणारे व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी उत्सवांच्या आडून चालणाऱ्या या दादागिरीस गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान लगाम घालण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातील सत्ताधीशांपुढे त्यांचेही काही चालेनासे झाले. ठाणे महापालिकेमार्फत रस्त्याच्या एक तृतीयांश जागेवर गणेशोत्सवाचे मंडप उभारण्याची अधिकृत परवानगी दिली जाते. खरे तर अशा प्रकारची परवानगी द्यावी का हा मूळ प्रश्न असताना परवानगीपेक्षा अधिक जागेवर मंडप उभारून रस्ते उभारणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. ठाण्याचे सत्ताधीश म्हणविणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातील प्रमुख चौक अडवून गणपती, नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्याचा पायंडा पाडल्यामुळे या पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवत इतर राजकीय पक्षांनीही उत्सवातील अतिक्रमणाची ही ‘परंपरा’ सुरूच ठेवली आहे.
ठाण्यातील रस्ते मुळात अरुंद असल्यामुळे अनेक ठिकाणी या रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव नाही. वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. तरीही रस्ते अडवून उत्सव साजरे करण्यात येत असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू लागल्याचे चित्र आहे.
पाचपाखाडीत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रछायेखाली साजरा होणारा, घोडबंदर आणि चंदनवाडी भागात शिवसेनेच्या नेत्यांशी संबंधित असलेल्या मंडळांचा रस्ता अडवून साजरा होणारा गणेशोत्सव, घोडबंदरमधील खेवरा सर्कल, ठाणे शहर, वागळे, कोपरी, कळवा आणि मुंब्रा परिसरातील अनेक गणेश मंडळे अशा प्रकारे मंडप उभारत असल्याचे दिसून येते. याशिवाय, खासदार राजन विचारे यांचा तलावपाळी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा टेंभीनाका, आव्हाडांचा ओपन हाऊसमधील, रवींद्र फाटक यांचा रहेजा परिसरातील दहीहंडी उत्सवांकरिता रस्ता अडविण्यात येतो.
या उत्सवांच्या निमित्ताने आवाजाची पातळी ओलांडून ध्वनी प्रदूषण होत असल्याचे दिसूनही पोलिसांकडून कारवाई होताना दिसून येत नाही. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी गेल्या वर्षी याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. ध्वनिवर्धक ठेकेदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून आवाजाची पातळी पाळावी वा कारवाईला तयार राहावे, असे आदेश त्यांनी काढले. उत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही, पण नियम पाळण्यात गैर काय, हे लक्ष्मीनारायण यांचे म्हणणे होते. मात्र, या प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत नसलेली मंडळी लोकभावना आणि धार्मिकतेचा रंग लावत त्यांची कोंडी करू पाहत होते. हा नियम जाचक वाटू लागल्याने या विरोधात ठेकेदारांनी दहीहंडी मंडळांना ध्वनिक्षेपक न पुरविण्याचा निर्णय घेतला होता. तरीही काही दिग्गज पुढाऱ्यांच्या मंडळांनी डीजेंचा दणदणाट करून उत्सव साजरा केला. यावेळी सुमारे २२ मंडळांनी आवाजाची पातळी ओलांडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे.
कोकणात ‘साखरचौथी’ गणेशोत्सवाचे प्रस्थ
कोकणात शिमगा, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, दहीहंडी उत्सव, गावदेवतांच्या यात्रा, गुढीपाढव्याच्या शोभायात्रा, दग्र्याचे उरूस, मोहरम मिरवणूक, जैन धर्मातील पर्युषण पर्व, आंबेडकर जयंतीनिमित्ताने आयोजित सर्वधर्मीय कार्यक्रमांना अलीकडच्या काळात उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. कोकणात घराघरात गणपती असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव फारसा साजरा केला जात नसे. पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी उत्तर कोकणात अलीकडच्या काळात साखरचौथीच्या गणेशोत्सवांचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव संपल्यावर वद्य चतुर्थीला या गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. कुठे दीड दिवस, कुठे तीन दिवस तर कुठे पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला आहे. रस्त्यालगत मोठे सभामंडप, आकर्षक रोषणाई, भव्यदिव्य विसर्जन मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम ही या गणेशोत्सवाची ओळख बनली आहे. कुठलेही धार्मिक अधिष्ठान नसताना केवळ सामाजिक अधिष्ठानाच्या जोरावर या गणेशोत्सवाला साजरा करण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत साखरचौथी गणेशोत्सव मंडळांची संख्या ४५०-५०० च्या घरात गेली आहेत.
अलीकडच्या काळात मुस्लीम समाजातही हा कल पाहायला मिळत आहे. ऊरुसामध्ये भव्यता कशी येईल यासाठी चढाओढ सुरू असते. कव्वाल्यांच्या जंगी सामने, स्पर्धा, यात्रांचे आयोजन असे प्रकार वाढले आहेत. मोहरमच्या निमित्ताने मोठमोठय़ा मिरवणुका काढण्याकडे कल दिसतो.
हे कमी म्हणून की काय रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत गावागावातून नवदाम्पत्यांच्या वाजत गाजत मिरवणुका जातात. यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाते. वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना याचा त्रासही होतो. अनेकदा याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस तक्रारदाराचे नाव संबधितांकडे उघड करीत असल्याने तक्रारदाराला सार्वजनिक रोषाला सामोर जावे लागते.
पुण्यात उत्सवकाळात रस्ताबंदी
दहीहंडीच्या दिवशी गल्लीगल्लीत आणि चौकाचौकात कर्णकटू स्पीकरच्या भिंती उभ्या राहिल्या की, पुणेकरांच्या अंगी उत्सव संचारू लागतो. दहीहंडी हा ‘ट्रेलर’ असतो आणि मग खरी ‘उत्सवप्रियता’ दिसते ती गणेशोत्सवात. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, गोवा येथील ‘डीजें’ना आमंत्रण असते. दुपारपासूनच दारू ढोसून डीजेंच्या तालावर रात्री उशिरापर्यंत होणारे नाचकाम हे पुण्याच्या दहीहंडीचे चित्र आहे. शिवाय महिलांची दहीहंडी, युवतींची दहीहंडी असे नवे थिल्लर आणि बीभत्स ‘आयाम’ आता पुणेरी दहीहंडीला लाभले आहेत.
दहीहंडीनंतर हजारो मंडळे पुण्यातले बहुतेक सर्व रस्ते उत्सवाच्या महिना-पंधरा दिवस आधीच मंडप घालून अडवतात. रस्त्यांच्या रुंदीच्या प्रमाणात मंडपाची लांबी-रुंदी किती हवी याची आदर्श नियमावली महापालिकेकडे आहे. मात्र तिचे पालन करणारे मंडळ चुकूनही सापडणार नाही. या मंडपांमुळे उत्सवाचे सर्व दिवस वाहतुकीचा जो काही बट्टय़ाबोळ होतो तो तमाम पुणेकरांना निमूटपणे सहन करावा लागतो. शिवाय उत्सवानंतरही मंडपांचे साहित्य, मंडळांचे रथ आणि भव्य सजावटी हे सर्व पुढे कित्येक दिवस रस्त्यांवरच पडून असते.
नागपूरमध्ये चौकाचौकात मंडप
धार्मिक उत्सवाच्या काळात रस्त्यावर मंडप उभारून वाहतुकीची कोंडी करण्याचा इतर महानगरात घडणारा प्रकार नागपूरसह विदर्भातही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तक्रार आल्याशिवाय कारवाई केली जात नसल्याने हा प्रकार बिनबोभाटपणे चालतो आणि वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषणासारख्या समस्यांना निमूटपणे सहन करण्याशिवाय सामान्य नागरिकांपुढे पर्याय नसतो.
विदर्भात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती उत्सव, ईदच्या महिन्यात हा प्रकार प्रामुख्याने दिसून येतो. नागपूर शहरातील रामदासपेठ, महाल, इतवारा, खामला, रामनगर, अभ्यंकरनगर, शहीद चौक, वर्धमानगर, नंदनवन, सक्करदरा चौक, केळीबाग मार्ग, धंतोली आदी ठिकाणी गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सव काळात रस्त्यावर देखावे करण्यासाठी, मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चक्क चौकाचौकात मंडप उभारले जातात. भव्यदिव्य प्रवेशद्वारामुळे निम्मा रस्ता बंद होतो.
उत्तर महाराष्ट्रात उन्मादच अधिक
नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार हे चारही जिल्हे तसे उत्सवप्रिय. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रंगपंचमी, ईद, आंबेडकर जयंती, बालयेशू जयंती असे सर्व जाती-धर्माचे उत्सव दणक्यात साजरे केले जातात. १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचा थाट आणि बाजही काही औरच. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांची कार्यशैली रस्ता आपल्या मालकीचा असल्यासारखी होते. त्यांचा ताबा घेऊन भलेमोठे मंडप उभारण्यापासून वीजचोरीपर्यंत असे त्यांचे उद्योग सहज खपवून घेतले जातात. नवरात्रोत्सवात यापेक्षा वेगळे काही घडत नाही. आसपासच्या रहिवाशांच्या कानाचे पडदे फाटतील असा डीजेचा आवाज असतो. नाशिक रोडमधील आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत रात्री दीड-दोन वाजेपर्यंत वाद्ये वाजविण्यास मुभा मिळते. मालेगावमधील छोटय़ा-मोठय़ा ५० ते ६० मशिदीतून एकाचवेळी दिवस-रात्र होणारे अजाण त्याच धाटणीचे. या सर्व ठिकाणी ध्वनिप्रदूषण होत असले तरी कारवाई झाल्याचे मात्र ऐकिवात नाही. गणेशोत्सव मिरवणुकीत याच उच्छादातून जातीय दंगलींना निमंत्रण मिळाल्याची उदाहरणे आहेत. जयंती व उत्सवासाठी वारंवार नाइलाजास्तव द्याव्या लागणाऱ्या वर्गणीने व्यापारी व नागरिकही हैराण झाले आहेत. धुळ्यात मोहंमद पैगंबर जयंतीच्या दिवशी मुस्लीमधर्मीय मिरवणूक काढून त्याची पुनरावृत्ती करतात.
रंगपंचमीच्या दिवशी पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून नाशिकमध्ये धांगडधिंगा घातला जातो. कॉलेज रोड, गंगापूर रोड असे काही रस्ते सामान्य वाहनधारकांसाठी बंद होऊन जातात. सामुदायिक नमाज पठणावेळी वाहतुकीवर असेच र्निबध लादले जातात. हिंदू धर्मीयांच्या कुंभमेळ्यात कोटय़वधी भाविक सहभागी होणार असल्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचे काय होईल, हे सांगता येणे अवघडच.
वाहतूक अडथळय़ात वराती व मिरवणुकांचा जोर
रस्त्यांवरील कार्यक्रमांमुळे वाहतुकीला अडथळा झाला, तर तक्रार करायची असते, अशी सवय मराठवाडय़ात नाही. तक्रारीचा कागद नाही म्हणून सरकारी यंत्रणा निर्ढावल्यासारखे सारे काही आलबेल आहे, असे सांगायला मोकळी आहे. भर रस्त्यात गणपतीचा शामियाना असतो, तशीच संदल मिरवणुकाही असतात. पण त्याचा वाहतुकीला त्रास होतो आहे याचे कोणाला काही देणेघेणेच नसते. उत्सवी वातावरणात अशी तक्रार करणाऱ्याला मानसिक रोगी ठरवायलाही अनेक जण तयार होतील. पण औरंगाबादसह मराठवाडय़ात विवाहानंतर काढली जाणारी वरातही अशीच भव्यदिव्य काढण्याची पद्धत आहे. वरात श्रीमंताची असेल तर डोक्यावर विजेचे दिवे देऊन नाच-गाणे चाललेले असते. मोठय़ा आवाजात गाणी वाजतात. सगळे वऱ्हाड खूश असते. कोणी टोकणारा नसतो. अलीकडेच औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही नियम घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू झाल्याने हा त्रास कमी झाला असला, तरी सार्वजनिक उत्सवाच्या काळात आणि वऱ्हाडाच्या उत्साहात सूचना किती दिवस अमलात येतील, याविषयी शंकाही आहेत

न्यायालय काय म्हणते..

उत्सवकाळात ध्वनिप्रदूषण आणि रस्ते आणि वाहतुकीची होणारी दयनीय अवस्था याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे निकाल दिले आहेत. त्यानिमित्ताने न्यायालयाने आपल्या निकालात नेमके म्हटले तरी काय ..

> उत्सव वा ते साजरे करण्याच्या विरोधात आम्ही नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर गदा न आणता सण साजरे केले जावे. प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण वातावरण उपलब्ध होणे हे जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी आवश्यक आहे.
> रहदारीचे रस्ते, रुग्णालय परिसर, रेल्वे स्थानकांबाहेर परिसर, बस-टॅक्सी वा रिक्षा स्टॅण्ड, शिक्षण संस्था आदी परिसरांत उत्सव काळात सर्रासपणे मंडप उभारले जाऊ नये. पालिकांनी मंडपांना परवानगी देताना ही बाब प्रामुख्याने लक्षात ठेवावी. तसेच वाहतूक नियमांचे आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्सव आयोजकांवर कारवाई करावी.
> धर्माचे आचरण करणे हा मूलभूत अधिकार आहे, परंतु धार्मिकदृष्टय़ा महत्त्व असलेल्या जागेचा अपवाद वगळता कुठेही धार्मिक कार्यक्रम करणे हे काही मूलभूत अधिकारांत मोडत नाही.
> चांगले व खड्डेमुक्त रस्ते आणि पदपथ उपलब्ध होणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यांच्या या अधिकाराचे उल्लंघन केले जात असेल किंवा त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत असेल तर भरपाई मागण्याचाही अधिकार आहे. नागरिकांना या सुविधा उपलब्ध करून देणे ही पालिकेसह सरकारची कायदेशीर व घटनात्मक जबाबदारी आहे.

‘केंद्रीय ध्वनी नियंत्रण नियमा’नुसार निवासी भागात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेस ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल इतकी ध्वनीची मर्यादा आहे. आवाजाच्या प्रदूषणाचा थेट आरोग्याशी संबंध आहे. याबाबत ‘जागतिक आरोग्य संघटने’ने १९८५ मध्येच इशारा दिला होता. आवाजामुळे झोपेच्या सवयी बिघडतात, डोके दुखते, ताण वाढतो, त्यामुळे हृदयाचे ठोके जलद पडतात, मोठय़ा आवाजात सतत काम करणाऱ्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो, परंतु आपल्याकडे ध्वनीविषयक र्निबधांचे सर्रास उल्लंघन होते.
‘आवाज’ फाऊंडेशनतर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात केवळ गणेशोत्सवातच नाही तर ईद-ए-मिलाद आणि माहीम यात्रेदरम्यान काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतही सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. या अहवालात २००३ सालापासून उत्सवकाळातील ध्वनिप्रदूषणाबाबतचा तपशील नमूद करण्यात आला आहे. त्यात गेल्या तीन वर्षांच्या माहितीवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार सर्वाधिक ध्वनिप्रदूषण हे गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि माहीम जत्रेच्या वेळी एकाच वेळी अनेक ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यामुळे होते. या अहवालानुसार २०१३ मध्ये आवाजाची पातळी १२१.८ डेसिबल होती. २०१२ मध्ये गणेशोत्सवादरम्यान ढोल-ताशांमुळे ध्वनीची पातळी १२१.४ डेसिबल एवढय़ापर्यंत पोहोचल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर २०१३ मध्ये गणेशोत्सवादरम्यान ध्वनीची पातळी ११३.७ डेसिबलपर्यंत, बँजोमुळे ११९.९ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. याशिवाय मिरवणुकीत वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे २०१४ मध्ये ही पातळी १३२.४ डेसिबल, तर २०१४ मध्ये १२५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, माहीम जत्रेत सर्वाधिक ध्वनिप्रदूषण!

प्रतिक्रिया 

उत्सव हवे पण..
रस्त्यांवर साजरे होणारे उत्सव आणि ध्वनिप्रदूषण याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हायलाच हवी. पुण्यातील परिस्थिती अशी आहे की सर्व ‘माननीयां’चेच (नगरसेवक) मंडळांवर वर्चस्व आहे. त्यामुळे नियम तेच बनवतात आणि तेच मोडतात. नियमांच्या उल्लंघनाबाबत कोणाला तरी शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच हे प्रकार थांबतील.
मेज. जन. (निवृत्त) एस. सी. एन. जठार ( नागरी चेतना मंच)

उत्सव अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे
उन्मादाचा कैफ चढलेल्यांकडून सर्वसामान्यांचे खच्चीकरण केले जाते. कोणताही उत्सव घडत नाही. काही टोळकी ती त्यांच्या पद्धतीने घडवून आणतात. धर्माची भीती घालून साजरे केले जाणारे हे उत्सव अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत. या घडामोडीत मध्यमवर्ग मौन बाळगणे पसंत करतो. उत्सवांमधून राजकीय पाठबळाने गावगुंड तयार होतात. शासनाने अशा उत्सवांवर सरसकट बंदी घालायला हवी.
 डॉ. वृन्दा भार्गवे, प्राध्यापक, नाशिक

हाही त्रास हिंदूंनाच
रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरास बंदी अथवा मंडप बंदीसारखा निर्णय घेतल्यानंतर हिंदू मंडळींच्या भावना दुखावतात. पण काही व्यक्ती एकत्र येऊन गणपतीसाठी भर रस्त्यात मंडप बांधतात तेव्हा तेथून जाणाऱ्या-येणाऱ्या हजारो हिंदूंनाच त्याचा त्रास होतो याचा ते विचार करीत नाहीत. आता सर्वच सण परंपरा हरवून बसले आहेत. परंपरेची जागा स्पर्धा आणि बाजारूपणाने घेतली आहे. उत्सवांमध्ये नवी परंपरा रुजू पाहात असून याला राजकारणी जबाबदार आहेत.
 स्वाती पाटील, अध्यक्ष, लोकसेवा सामाजिक प्रतिष्ठान

यंत्रणा सक्षम हवी
नुसते कायदे करून काही होत नाही तर त्यावर अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम असावी लागते. रस्त्यावरील मंडपाबाबत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने हा प्रश्न निर्माण होतो.
 अ‍ॅड. अनिल किलोर, प्रमुख, जनमंच

उत्सव हवेतच!
उत्सव दरवर्षीप्रमाणे पार पडावा यासाठी मंडळांना मदत करा, तसे धोरण तयार करा अशी विनंती आम्ही राज्य सरकारला करणार आहोत. मुळात हा उत्सव रस्त्यावर सुरू झाला. तो रस्त्यावरचाच उत्सव आहे. त्यामुळे तो रस्त्यावरच साजरा व्हायला पाहिजे.
 अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

बेकायदा काम करीत नाही..
उत्सव साजरा करताना आम्ही सर्व नियमांचे पालन करतो. पालिकेकडून पाहणी केल्याशिवाय मंडळांना परवानगी दिली जात नाही. त्यातही ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचा भंग केला तर मंडळांना दंड केला जातो. थोडक्यात, आम्ही कुठलेही बेकायदेशीर काम करीत नाही. नियमांच्या उल्लंघनाचा प्रश्न हा मुंबईपेक्षाही ठाण्यात जास्त आहे.
 अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

परंपरा सुरूच राहील !
उत्सवी मंडळाचे मत यापेक्षा थोडे वेगळे आहे. न्यायालयाच्या आदेशाचा प्रत्येकानेच आदर करणे आवश्यक आहे. पण न्यायालयानेही धार्मिक उत्सवाचा, लोकांच्या भावनेचा विचार करणे आवश्यक आहे. उत्सवाची परंपरा ही शेकडो वर्षांपासून सुरू असून ती सुरूच राहणार आहे.
 संजय खुळे, प्रमुख, इतवारी नवयुवक मंडळ

संकलन – रेश्मा शिवडेकर. सहभाग – जयेश सामंत (ठाणे), प्रसाद रावकर, प्राजक्ता कदम (मुंबई), हर्षद कशाळकर (अलिबाग), अनिकेत साठे (नासिक),अभिजित घोरपडे (पुणे), राम भाकरे (नागपूर) आणि सुहास सरदेशमुख (औरंगाबाद)