दहा हजार मासेविक्रेत्यांकडून दिवसाला तब्बल पाच लाख किलोहून अधिक मासे मुंबईकरांच्या घरात येतात. समुद्रातील हे मासे किनाऱ्यावर आणण्याच्या पद्धतीत झपाटय़ाने बदल होत असले तरी स्थानिक बाजारात मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच खरेदी-विक्री होत आहे.  मॉलमधील प्लास्टिकच्या वेष्टनात मिळणारे मासे ग्राहकांना आकर्षित करून घेत असतानाच स्वच्छ व ताजे अन्न हा ग्राहकांचा हक्क  आहे, असे स्पष्ट करीत आता मांस-मासेविक्रेतेही एफडीएच्या अखत्यारीत येणार आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर मुंबईसह राज्याच्या प्रमुख भागांतील माशांच्या ग्राहकांपर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला मागोवा..

मुंबई म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातील माणसांसोबत आलेल्या त्यांच्या आहारविहाराचा मेिल्टग पॉइंट. दक्षिणेतील इडली, डोशापासून उत्तरेतील समोसा, पाणीपुरीपर्यंत ते अगदी जापनीज, चायनीज पदार्थही इथल्या स्थानिक स्वादात घोळून उपलब्ध होतात. याच मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचे एक अस्सल वैशिष्टय़ म्हणजे मासे. जगातील बहुतांश प्रमुख शहरे किनाऱ्यावर असली आणि सर्वच किनाऱ्यांवर मासे मिळत असले तरी शेकडो प्रकारचे मासे आणि त्याचे गुणिले दहा पदार्थ इतरत्र कुठे मिळण्याची शक्यता दुरापास्तच. माशांचा वास नको म्हणून एकीकडे सोसायटीतील घरे नाकारणारी लॉबी आहे, तर दुसरीकडे स्वयंपाकघरातील झणझणीत कालवणाच्या निव्वळ वासाने तरतरी येणारेही आहेत. कुरकुरीत भाजलेले बोंबील, मसाला भरलेले पापलेट, तळलेली सुरमई, घमघमीत कोळंबी बिर्याणी.. स्वयंपाकघरातून जेवणाच्या ताटापर्यंत होणारा माशांचा प्रवास जसा रंग, रूप, वासाचे अनोखे दालन खुले करून देतो तसाच समुद्रापासून घरापर्यंत माशांचा होणारा प्रवासही अतिशय मनोरंजक आहे.
 मुंबई आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पश्चिम किनारपट्टीवर रोज येणाऱ्या माशांची संख्या डोळ्यांना दिसली तरी मेंदूत गणित उतरायला वेळ लागतोच. वर्षभरात या संपूर्ण किनारपट्टीवर साधारण पाच लाख मेट्रिक टन मासा उतरतो. या माशातील ३५ हजार मेट्रिक टन वाटा एकटय़ा ससून डॉकचा. भाऊच्या धक्क्यावरही साधारण तेवढेच मासे उतरतात. यातील दीड लाख मेट्रिक टन मासे पूर्व आणि पश्चिमी देशांमध्ये जातात. याचाच अर्थ वर्षांला साधारण साडेतीन लाख मेट्रिक टन म्हणजे दिवसाला दहा मेट्रिक टन किंवा दहा लाख किलो मासे स्थानिक बाजारपेठेत येतात. त्यात अर्थातच मुंबईचा वाटा पन्नास टक्क्यांहून अधिक आहे.
कुलाबा, कफ परेड, जमशेदनगर, वरळी, माहीम, खारदांडा, मढ, मार्वे, मनोरी, भाटी, मालवणी, गोराई अशा किनाऱ्यांवरून कोळी बांधव मासेमारी करतात. संपूर्ण मुंबईत मासेमारीसाठी सुमारे २३ हजार होडय़ा समुद्रात जातात. त्यातील ११,८८६ मोठे ट्रॉलर आहेत. रात्री समुद्रावर जायचे आणि भल्या पहाटे मासे घेऊन किनाऱ्याला यायचे ही पद्धत मागे पडून जमाना झाला आहे. किनाऱ्याजवळ मासे सापडण्याचे कमी झालेले प्रमाण आणि मोठय़ा होडय़ांसाठी डिझेलचा वाढलेला खर्च यामुळे समुद्रात गेलेल्या लहान होडय़ा साधारण तीन ते चार दिवसांनी परततात. भाऊचा धक्का आणि ससून डॉकवर येणाऱ्या ट्रॉलरची रीत तर आणखीन न्यारी. खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेली जहाजे किनाऱ्यावर येतच नाहीत. इन्सॅट बी या उपग्रहावरून समुद्रातील माशांच्या थव्याची नेमकी माहिती अक्षांश-रेखांशासह पोहोचवली जात असल्याने एकाच वेळी टनावारी मासे जहाजात जमा होतात. या जहाजांना डिझेल आणि अन्नाचा पुरवठा करून त्यांच्यावरील मासे परत घेऊन येण्याची कामगिरी मदरशिपवर असते. या बलाढय़ जहाजावरून साधारण १५ दिवसांनी किनाऱ्यावर माशांचा डोंगर ओतला जातो. माशांचे प्रमाण वाढले की, व्यापाऱ्यांकडून बोलीची रक्कम कमी होत असल्याने समुद्रातच सॅटेलाइट फोनवरून कोकण किनारपट्टीवरील माशांची चौकशी करून त्याप्रमाणेच माल किनाऱ्यावर आणला जातो. जहाजावरच माशांची वर्गवारी केली जाते. त्यातील पापलेट, कोळंबी असा चांगला, दर्जेदार माल पश्चिमी देशांसाठी रवाना होतो. पूर्वेकडील चीन, तवान, कोरिया, इंडोनेशिया अशा देशांमध्ये चिरी, बघा, शेवंडी, तारली असा थोडा कमी किमतीचा माल दिला जातो.
इकडे स्थानिक बाजारात ससूनच्या धक्क्यावर, सीएसटी रेल्वे स्टेशनजवळ याशिवाय दादर, अंधेरी, मालाड अशा मोठय़ा बाजारपेठांमधून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोली लावून माल उचलायला सुरुवात होते. पापलेट, कोळंबी, सुरमई, हलवा, करली, घोळ, रावस, कोटय़ा, माकूल, ढोमा, शिंगाडा, कुपा, बांगडा, घोळ, बोंबील, मांदेली, तारली, कांता यांसारखे माशांचे शंभरेक प्रकार बाजारात असतात. सर्वच मासे एका दिवसात विकले जात नाहीत. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी माशांची किरकोळ विक्री तेजीत असते. याउलट मंगळवार, गुरुवार, सणाच्या दिवशी ही विक्री अध्र्याहून कमी होते. त्यामुळे या दिवशी माशांची घाऊक विक्रीही कमी होते. उरलेले मासे बर्फाच्या पेटय़ांमध्ये साठवले जातात. त्यासाठी प्रत्येक घाऊक विक्रेत्याकडे प्लास्टिकचे मोठे टब असतात. या लहान शीतगृहांमध्ये साधारण सहा ते सात दिवस मासे टिकतात.
काही वेळा विदेशांमध्ये नेलेले मासे कस्टम क्लिअरन्समुळे समुद्रातच अडकून पडतात. मासे साठवताना त्यातील ऑक्सिजन, ड्राय आइस यांचे प्रमाण कमी झाल्यास आयात करणाऱ्या देशाकडून नाकारले जातात. मग हेच मासे पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. काही टनांमध्ये असलेले हे मासे मग थेट बाजारात उतरवले जात नाहीत. शीतगृहांमध्ये इतर मासे साधारण वजा १४ अंश सेल्सिअस तापमानाला ठेवले जातात. मात्र बरेच दिवस उलटलेले हे मासे वजा २८ अंशांपर्यंत गोठवले जातात. असे मासे सहा महिने टिकतात. मात्र त्यांच्या रूपावर-चवीवर परिणाम होतोच.
घाऊक बाजारातून हे मासे किरकोळ बाजारात येतात. मुंबईत अशा प्रकारे १०४ बाजार आहेत. याशिवाय रस्त्याकडेलाही माशांचा बाजार भरतो. संपूर्ण मुंबईत सुमारे दहा हजार कोळी महिला तसेच उत्तर भारतीय या व्यवसायात आहेत. सकाळी घाऊक खरेदी करून आणलेले मासे टिकवण्यासाठी भाजीविक्रेत्यांप्रमाणे मासेविक्रीतही दर्जाप्रमाणे किमतीचा फरक पडतो. ग्राहकही त्याला परवडतील त्याप्रमाणे लहान-मोठे, कमी-अधिक दर्जाचे मासे नेतो. चांगले ग्राहक टिकवायचे असतील, तर खराब मासे विक्रीला न ठेवण्याची खबरदारी घेतली जाते. थोडा मऊ पडलेला मासा सुकवण्यासाठी ठेवला जातो, तर इतर मासे सरळ कचऱ्यातही जातात. मासे उत्तम दिसण्यासाठी त्यात रंग मिसळण्याचा प्रकारही सर्रास चालतो. मांदेली, बोंबील लाल रंगात बुडवून ठेवले जातात. खवल्यातून पांढरे पाणी आल्यास मासा ताजा असल्याची खूण पटते. त्यामुळे खवल्यांमध्ये पांढरा गम लावला जातो. हे रंग आणि गमची चाचणी अर्थातच केलेली नसते. त्याच वेळी माशांवरील शायिनग टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आरोग्यदृष्टय़ा चाचणी केलेली उत्पादनेही बाजारात मिळू लागली आहेत व त्याचा वापरही वाढतो आहे.
 विदेशात जात असलेल्या माशाला चांगला भाव मिळावा आणि व्यापार वाढावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यात सतत बदलही होत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर माशांच्या बाजारात गेल्या पन्नास वर्षांत तर म्हणावा असा फरक पडलेला नाही. बर्फाचा वापर वगळता मासेविक्रीची पारंपरिक पद्धत बदललेली नाही. मॉलमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले स्वच्छ, बिनवासाचे मासे उपलब्ध होऊ लागले असताना मासेबाजारात मात्र माशांवरील गळणाऱ्या पाण्यातून आणि मांजरांच्या उडय़ांमधून मार्ग काढावा लागतो. मच्छीच्या कचऱ्यामुळे येणाऱ्या वासामुळे तर मासेविक्रेत्याही त्रासतात. मात्र या वातावरणात बदल करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. मात्र बाजारीकरणाच्या जोरदार रेटय़ात ही स्थिती बदलण्याची घंटा वाजते आहे, हे निश्चित..

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी

२०११-१२
उत्पादन     ४,३३,६४४
निर्यात     १,५१,८६५
२०१२-१३
उत्पादन     ४,८९,३१३
निर्यात     १,४८,४८७

२०१३-१४
उत्पादन     ४,६७,४५८
निर्यात     १,४७,४११
(मेट्रिक टन)
अन्न व औषध प्रशासनाची भूमिका
राज्यातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक रहिवाशांच्या जेवणात मांसाहार असतो. मात्र शाकाहाराच्या दर्जाबाबत आग्रही असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत मांसाहाराची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. दूध, किराणा सामान, पदपथ विक्रेते, किरकोळ विक्रेते, मांस-मासेविक्रेते अशा अन्नाशी संबंधित सर्वच क्षेत्रांसाठी अन्न व औषध प्रशासन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वच्छ वातावरणात ताजे व आरोग्यदायी अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करायच्या बाबींचा त्यात समावेश असेल. अन्नपदार्थाचे पॅकिंग आणि दुकानातील मांडणीमध्ये आमूलाग्र बदल झाले असतानाच मासेविक्रीच्या पद्धतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. मासे विकत घेण्यासाठी अजूनही नाकावर रुमाल ठेवून आणि मासळीच्या पाण्यातून पाय घट्ट लावून चालतानाच माशांची पारख करावी लागते. बाजाराचे हे स्वरूप बदलण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यासाठी सर्वप्रथम मासेविक्रेत्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

डुप्लिकेट मासे आणि पापलेटचा साचा
स्वस्तात मिळणारा डुप्लिकेट माल मुंबईच्या बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. माशांच्या बाबतीतही हे डुप्लिकेट प्रकरण तेजीत आहे. हॉटेलमध्ये सुरमई, पापलेट, रावस समजून ताव मारले जाणारे मासे हे प्रत्यक्षात कमी चवदार आणि किमतीत तर अगदीच स्वस्त असतात.

बाजारात ४०० ते ५०० रुपये किलो विकली जाणारी सुरमई परवडणारी नसल्याने त्याच्याऐवजी कुपा मासा घेतला जातो. या माशाचा भाव  साधारण ७० रुपये किलो आहे. रावस हा अप्रतिम चवीच्या माशाऐवजी तसाच दिसणारा कोटय़ा हा मासा दिला जातो.
कोटय़ापेक्षा रावसची किंमत सात ते आठपटीने जास्त आहे. भारतातही कोटय़ा हा रावस नावाने विकण्याचा व्यापार जोरात सुरू आहे.
 
बोनलेस फिश म्हणून ओळखला जाणाऱ्या बूट या माशाचे मांस चक्क पापलेटच्या तुकडय़ाचा आकार दिलेल्या साच्यात बसवून ग्राहकांना फसवले जाते. कुठे ६०० रुपये किलोपासून सुरू होणारा पापलेटचा प्रवास, तर कुठे बूटची १२०-१३० रुपये किलोची वेसण; पण पापलेटच्या आकाराला भुलून ग्राहक पसे मोजायला झटकन तयार होतात.

सुकी मासळी
मार्वे, मढ, मनोरी, भाटी, मालवणी, गोराई अशा पश्चिम किनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने मासेमारी चालते. पावसानंतरचे ऑगस्ट ते नोव्हेंबर हे भरपूर माशांचे दिवस. पावसामुळे किनाऱ्यावरचे प्रदूषण कमी झाल्याने या काळात बारीक माशांचे थवेच्या थवे कोळ्याच्या जाळीत अल्लद येतात. जवळा, बोंबील, करदी, वाकरी, भोमा अशा माशांना एक-दोन दिवस वाळवले, की ते वर्ष-सहा महिने टिकतात. मढ आणि भाटी या गावांमध्येच रोज २५ ते ३० टन मासे सुकवले जातात. इतर ठिकाणीही कमीजास्त प्रमाणात मासे सुकवण्याचे काम चालते. पूर्वी शेणाने सारवलेल्या खळ्यात मासे वाळवण्याचे काम चालत असे. आता त्याची जागा सिमेंट काँक्रीटच्या मैदानाने घेतलेली आहे. ऊन आणि वारा चांगला असला, तर दिवसभरात मासे सुकतात. नाही तर आणखी एखाद दिवस वाळवावे लागतात. गेल्या काही वर्षांत बर्फात मासे टिकवण्याची पद्धत वाढली असल्याने मासे सुकवण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. शिवाय माशांच्या विक्रीसाठी पाच-सहा महिने लागत असल्याने यात मासेमारी संघटनांनाही गुंतवणूक करणे जोखमीचे जाते. मात्र द्राक्ष तसेच भाताच्या शेतीसाठी खत म्हणून सुके मासे वापरले जात असल्याने या माशांना वेगळी बाजारपेठ खुणावते आहे.

शिळे मासे धोकादायकच
वर्षांनुवर्षे सोडल्या जात असलेल्या रसायनांमुळे तसेच सांडपाण्यामुळे मुंबईच्या किनाऱ्याजवळील पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्यात तग धरलेल्या माशांमध्ये काही प्रमाणात ही रसायने जातात. त्याचप्रमाणे काही शिंपले किंवा माशांचे प्रकारही विषारी असतात.

यासंबंधी कोळी महिलांना माहिती देण्यासाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन केंद्राने गेल्या वर्षी कार्यशाळा घेतली होती. बांगडा, सुरमई, कुपा या स्कॉम्ब्रॉइड जातीच्या माशांमध्ये हिस्टडीन हे अमिनो आम्ल असते. हे मासे शिळे होताना या आम्लाचे हिस्टामाइनमध्ये रूपांतर होते.

त्यामुळे अनेकांचे पोट बिघडते, ओठावर-हातावर सूज येते, लाल पुरळ उठते. ताजे असल्यास या माशांचा त्रास होत नाही, मात्र बर्फात ठेवलेल्या ताज्या व शिळ्या माशांमधील फरक सहसा लक्षात येत नाही. माही, तारल्या, पेडवे हे सागरीजीवही शिळे झाल्यास त्रास देतात. शिवल्यासारख्या कवचधारी जीवांमधूनही पोट बिघडते.

यामुळे शरीरात गेलेल्या विषाचे प्रमाण अधिक असेल तर भरकटल्याप्रमाणे वाटणे, श्वसनास त्रास होण्यासारखे प्रकार घडतात. वेळीच उपचार न झाल्यास जिवावरही बेतू शकते. आपल्याकडे मासे खाताना डोके व पोट काढून टाकले जाते. उरलेले मांस व त्यावरील चरबीचा पातळ थर त्रासदायक ठरत नाही. शिवाय हे मासे नीट शिजवून खाल्ले जात असल्याने माशांमुळे खूप त्रास झाल्याचे दिसत नाही. मात्र शिळे मासे ग्राहकांपर्यंत न पोहोचण्याची व्यवस्था राबवायला हवी.

(मच्छीमारांचे ज्येष्ठ नेते रामदास संधे, किरण कोळी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेचे माजी प्रमुख संशोधक डॉ. विनय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार)
कोकणात कोटय़वधींची उलाढाल
महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारा म्हणजे मत्स्य संपत्तीचा जणू खजिनाच! या खजिन्यात हर प्रकारचे मासे आढळतात. स्वाभाविकपणे इथे दरवर्षी घाऊक व्यापारातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. पण त्याचबरोबर या कोकण किनारपट्टीवरच्या लहानमोठी गावं आणि शहरांमध्ये असलेला किरकोळ ग्राहकही या उलाढालीचा हिस्सा असतो.
रत्नागिरी जिल्ह्यात शहराजवळ असलेली मिरकरवाडय़ाची जेटी हे या उलाढालीचे जिल्ह्यातलं मुख्य केंद्र. सुरमई, पापलेट, सरंगा, झिंगा, कुर्ली, रेणवी, बांगडा, तारली इत्यादी हर प्रकारचे मासे इथे या काळात उपलब्ध असतात. उत्पन्न ‘बंपर’ असेल तर सुरमई अडीचशे-तीनशे रुपये किलोपर्यंत किंवा पापलेट हजार-बाराशे रुपयांपर्यंत मिळू शकते. पण या मार्केटपेक्षाही संध्याकाळी बोटी ‘माल’ घेऊन येतात तेव्हा जेटीवरच्या बाजारातही किरकोळ दराने ताजी मच्छी मिळते. शहरातल्या मच्छी मार्केटमधले व्यापारी इथे होणाऱ्या लिलावात या माशांची खरेदी करतात आणि दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये येणाऱ्या किरकोळ गिऱ्हाइकांना चढय़ा भावाने विकतात. जाणकार व खवय्ये मंडळी मात्र जेटीवरच्या या किरकोळ बाजारातच हौसेने खरेदी करतात. मार्केटमध्ये नगावर किंवा वाटे घातलेली मच्छी घ्यावी लागते, पण या ठिकाणी वजनावरही मच्छी मिळू शकते. घाटावरून येणाऱ्या पाहुणे मंडळींना इथला मासा घरी घेऊन जायचं असेल तर या बाजारात बर्फ घातलेल्या थर्मोकोलच्या बॅग मिळतात.  शहरालगतच्या ग्रामीण भागातही इथून टोपल्यांमधून मासे नेऊन विक्री केली जाते.  रत्नागिरीप्रमाणेच जिल्ह्यात हर्णे, वेलदूर, नाटे इत्यादी ठिकाणीही अशा प्रकारे माशांचा घाऊक व किरकोळ व्यापार चालतो. पण या दोन्ही प्रकारांत स्वाभाविकपणे रत्नागिरी ‘जंक्शन’ मानलं जातं. एक काळ असा होता की, मटण न परवडणारा माणूस मच्छी खात असे. पण काळाच्या ओघात मच्छीचेही भाव मटणाच्या जवळपास गेले आहेत. त्यातही खिशात पैसे खुळखुळत असतील तर सुरमई, पापलेट, कोळंबी, कुर्लीची खरेदी होते. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असलेला माणूस बोयर, कानट, कांटा, काचू यासारख्या खाडीतल्या माशांवर समाधान मानतो. अधूनमधून मत्स्य दुष्काळाची हाकाटी होते. अन्य क्षेत्रातील महागाईच्या झळा इथेही जाणवू लागल्या आहेत. तरीसुद्धा ही चंदेरी संपत्ती मत्स्याहारींची भूक आणि जिभेचे चोचले पुरवत आहे.
– सतीश कामत
कोकणात कोटय़वधींची उलाढाल
महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारा म्हणजे मत्स्य संपत्तीचा जणू खजिनाच! या खजिन्यात हर प्रकारचे मासे आढळतात. स्वाभाविकपणे इथे दरवर्षी घाऊक व्यापारातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. पण त्याचबरोबर या कोकण किनारपट्टीवरच्या लहानमोठी गावं आणि शहरांमध्ये असलेला किरकोळ ग्राहकही या उलाढालीचा हिस्सा असतो.
रत्नागिरी जिल्ह्यात शहराजवळ असलेली मिरकरवाडय़ाची जेटी हे या उलाढालीचे जिल्ह्यातलं मुख्य केंद्र. सुरमई, पापलेट, सरंगा, झिंगा, कुर्ली, रेणवी, बांगडा, तारली इत्यादी हर प्रकारचे मासे इथे या काळात उपलब्ध असतात. उत्पन्न ‘बंपर’ असेल तर सुरमई अडीचशे-तीनशे रुपये किलोपर्यंत किंवा पापलेट हजार-बाराशे रुपयांपर्यंत मिळू शकते. पण या मार्केटपेक्षाही संध्याकाळी बोटी ‘माल’ घेऊन येतात तेव्हा जेटीवरच्या बाजारातही किरकोळ दराने ताजी मच्छी मिळते. शहरातल्या मच्छी मार्केटमधले व्यापारी इथे होणाऱ्या लिलावात या माशांची खरेदी करतात आणि दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये येणाऱ्या किरकोळ गिऱ्हाइकांना चढय़ा भावाने विकतात. जाणकार व खवय्ये मंडळी मात्र जेटीवरच्या या किरकोळ बाजारातच हौसेने खरेदी करतात. मार्केटमध्ये नगावर किंवा वाटे घातलेली मच्छी घ्यावी लागते, पण या ठिकाणी वजनावरही मच्छी मिळू शकते. घाटावरून येणाऱ्या पाहुणे मंडळींना इथला मासा घरी घेऊन जायचं असेल तर या बाजारात बर्फ घातलेल्या थर्मोकोलच्या बॅग मिळतात.  शहरालगतच्या ग्रामीण भागातही इथून टोपल्यांमधून मासे नेऊन विक्री केली जाते.  रत्नागिरीप्रमाणेच जिल्ह्यात हर्णे, वेलदूर, नाटे इत्यादी ठिकाणीही अशा प्रकारे माशांचा घाऊक व किरकोळ व्यापार चालतो. पण या दोन्ही प्रकारांत स्वाभाविकपणे रत्नागिरी ‘जंक्शन’ मानलं जातं. एक काळ असा होता की, मटण न परवडणारा माणूस मच्छी खात असे. पण काळाच्या ओघात मच्छीचेही भाव मटणाच्या जवळपास गेले आहेत. त्यातही खिशात पैसे खुळखुळत असतील तर सुरमई, पापलेट, कोळंबी, कुर्लीची खरेदी होते. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असलेला माणूस बोयर, कानट, कांटा, काचू यासारख्या खाडीतल्या माशांवर समाधान मानतो. अधूनमधून मत्स्य दुष्काळाची हाकाटी होते. अन्य क्षेत्रातील महागाईच्या झळा इथेही जाणवू लागल्या आहेत. तरीसुद्धा ही चंदेरी संपत्ती मत्स्याहारींची भूक आणि जिभेचे चोचले पुरवत आहे.
सतीश कामत

विदर्भात मागणी कमीच..
विदर्भात इतर मांसांच्या तुलनेत मासे खाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गरजेच्या तुलनेत मासे उत्पादन कमी होत आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी हैदराबाद आणि कोलकाता येथून विदर्भात मासे आणले जातात. विदर्भात  मासेविक्रीतील एका दिवसाची सरासरी उलाढाल दोन कोटी रुपये एवढी आहे.
विदर्भातील गोडय़ा पाण्यातील माशांची मागणी संपूर्ण देशात असली तरी उत्पादन कमी होत असल्याने ते अन्यत्र पाठवले जात नाहीत. विदर्भात ४ लाख ५० हजार हेक्टरमध्ये मासे उत्पादन घेतले जाते. जवळपास एका वर्षांचे उत्पन्न ७९ हजार ८०२ मेट्रिक टन एवढे आहे. मच्छीमार मासे पकडून ते जिल्हास्तरीय बाजारात आणतात. नागपुरातील भालदारपुरा येथे विदर्भातील सर्वात मोठा बाजार आहे. मोठे दलाल या मच्छीमारांकडून मासे खरेदी करतात. त्यानंतर ते मासे लहान दलाल व विक्रेते खरेदी करतात.  सर्वाधिक मासे गोसीखुर्द प्रकल्प, वडगाव येथील रामा, नांद आणि पेंच धरणातून प्राप्त होतात. या धरणातीलच मासे विदर्भातील इतर जिल्ह्य़ांत पाठवले जातात. या व्यवसायात ५ लाख मच्छीमार गुंतले आहेत.  सध्या डॉक्टर मासे खाण्यास सांगत असल्याने मासे खाण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याची माहिती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी  दिली.  मासे खाण्याकडे लोकांचा कल वाढावा यासाठी संपूर्ण विदर्भात मासे खाद्य मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
-सुनील तिजारे

पुणे, नाशकात बाजारात तेजी
कॉस्मोपॉलिटन होत असलेल्या पुणे आणि नाशकात आता माशांची मागणीही वाढत आहे. माशांकडे पुणेकर अजूनही तिरकस नजरेने पाहत असले तरी पुण्यात वाढत चाललेल्या ‘परप्रांतीयां’च्या लोकसंख्येमुळे माशांचा बाजार हळूहळू जोर धरतो आहे. नाशकातही वेगळे चित्र नाही.
पुण्यात गोडय़ा पाण्यातले आणि समुद्रातले असे दोन्ही प्रकारचे मासे चांगले खपतात. पापलेट, हलवा, सुरमई, कोळंबी, बांगडा, रावस, तारली, खेकडे, तिसऱ्या, रऊ, कटला हे मासे येथे लोकप्रिय आहेत. सर्वच माशांची आवक दररोज होते, अशी माहिती माशांचे व्यापारी अनिल सुपेकर यांनी दिली. पुण्यात माशांसाठी खास गल्ल्या नाहीत, मात्र खडकी, कॅम्प, गणेश पेठ, गंजपेठ, विश्रांतवाडी, पर्वती, शुक्रवार पेठ येथे रस्त्यावर भाजीविक्रेत्यांप्रमाणे मासेविक्री होते.
नाशकात भद्रकाली मच्छीबाजार हे माशांच्या खरेदीचे मुख्य ठिकाण आहे. तेथून हे मासे मग रस्तोरस्तीचे किरकोळ विक्रेते घेऊन जातात. दिवसाला मुख्य बाजारात साधारण दोन हजार किलो मासे येतात. हे मासे प्रामुख्याने मुंबईतूनच येतात. स्थानिक नद्या, धरणांमधील मासेही बाजारात येतात, मात्र त्यांना विशेष उठाव नसतो. वाम, पापलेट, सुरमई, कोळंबी, बोंबील, रावस या माशांना मागणी असते. असे साधारण ३५ ते ४० प्रकारचे मासे नाशकात पाहायला मिळतात. तारलीसारखा मासा १०० रुपये किलो तर कापरी पापलेटची  किंमत १४०० रुपये किलोपर्यंत जाते.  मुंबईतून रोज ताजे मासे येत असल्याने मासे साठवण्याची विशेष गरज भासत नाही. मात्र एखाद-दोन दिवसांसाठी बर्फाच्या पेटय़ांचा उपयोग केला जातो. भद्रकाली मच्छीबाजारात स्थानिक प्रशासनाने मच्छीविक्रेत्यांना शेड बांधून दिली आहे.
– संपदा सोवनी, अनिकेत साठय़े