विधिनिषेधशून्य आणि वावदूकया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

उशिरा का होईना, पण सामंजस्याने सीरियातील पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारी रशिया यांच्यातील संबंध जास्तच ताणले गेले आहेत. या दोघांच्या, विशेषत: अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणांमुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात २०११ मध्ये सुरू झालेल्या निदर्शनांना आज जवळपास साडेपाच वष्रे लोटली आहेत. या काळात अिहसक ते िहसक आणि आता यादवीकडे असा या आंदोलनाचा प्रवास झाला आहे. सीरियन सरकार, एक हजारांहून अधिक दहशतवादी टोळ्या, ‘अल-कायदा’, ‘जब्हत फतेह अल-शम’, ‘इसिस’, ‘हेजबोल्लाह’ या दहशतवादी संघटना आणि इराण, तुर्कस्तान, रशिया आणि अमेरिका या सगळ्यांनी मिळून ही वेळ आणली आहे. आपापसांतील समर्थन आणि विरोधाच्या जिवावर हा भडका उडाला आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपापल्या समर्थक गटांना रसद पुरवणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरोव यांनी आणि अर्थात त्यांच्या अध्यक्षांनी चच्रेचा बराच काथ्याकूट करून गेल्या महिन्यात सात दिवसांचा शस्त्रसंधी लागू केला. हा करार किती काळ टिकणार याबद्दल शंका असतानाच, जेमतेम दोन दिवस शांततेत घालविल्यावर सर्व घटकांनी पुन्हा हातात बंदुका घेऊन रोजची हाणामारी सुरू केली आहे. एक-एक गाव, उपनगर आणि शहरावरून असद सरकार आणि त्यांचे विरोधक यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. राजधानी दमास्कसबरोबरच होम्स आणि हमा ही दोन शहरे असद सरकारकडे आहेत. सध्याच्या घडीला अलेप्पो या सीरियातील सर्वात मोठय़ा आणि आर्थिक, व्यापारीदृष्टय़ा  महत्त्वाच्या शहरांसाठी रस्सीखेच सुरू आहे. अलेप्पोचा ताबा आता असद विरोधकांकडे आहे. सीरियातील समस्यांचा अभ्यास करता, अलेप्पो शहर जो राखेल त्या गटाचे पारडे जड होईल, असे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे अलेप्पोसाठीच या गटांचा आटापिटा सुरू आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात सीरियाचे ६९ सनिक मारले गेल्यामुळे सीरियन सरकार आणि त्याला पािठबा देणारा रशिया यांनी शस्त्रसंधी धुडकावून अलेप्पोमध्ये अडकलेल्या सुमारे तीन लाख नागरिकांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पाठवलेल्या मदत-साहित्यावर हवाई हल्ला करून ते खाक केले. यात मदतकार्य करणारे २० जण मारले गेले. उशिरा का होईना, पण सामंजस्याने हा पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यातील संबंध जरा जास्तच ताणले गेले आहेत. अमेरिकेने रशियासोबत सीरियाच्या प्रश्नावर आता बोलणी थांबवली आहे, तर रशियाने २००० मध्ये अमेरिकेसोबत केलेल्या कराराला केराची टोपली दाखवली आहे. अमेरिका-रशिया आपल्याकडील प्रत्येकी ३४ टन प्लुटोनियम नष्ट करतील, असा हा करार होता. ३४ टन म्हणजे सुमारे १७ हजार अणुबॉम्ब तयार करण्यासाठी लागणारा दारूगोळा! त्यामुळे एकमेकांना अटकाव करू पाहणारे अमेरिका-रशिया आता बेधडकपणे आपले धोरण सीरियात रेटत आहेत. या रेटय़ात गेल्या काही दिवसांत हजारो नागरिक अलेप्पोत मरण पावले आहेत. लहान मुले आणि स्त्रियांची संख्या त्यात अधिक आहे. अलेप्पोत जाणारी सर्व मदत असद सरकारने रोखून धरल्याने वा खाक केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. उपासमारी, इमारतींचे सांगाडे, पाण्याची वानवा, बॉम्बवर्षांव झालेली रुग्णालये आणि मृतदेहांमुळे पसरणारी रोगराई याचे फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांतून बाहेर येणारे चित्र मन हेलावून सोडणारे आहे. अलेप्पोनंतर हे देश इराकमधील मोसुल आणि त्यानंतर सीरियातील रक्का या ‘इसिस’च्या ताब्यातील दोन महत्त्वाच्या शहरांकडे आपला मोर्चा वळवतील. किंचित अस्ताकडे कललेली ‘इसिस’ या दोन शहरांसाठी आपली सर्व ताकद खर्ची करेल असे दिसते. प्रसंगी त्यांच्याकडून रासायनिक हल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे. अलेप्पोपेक्षा जास्त रक्तपात आणि अडकलेल्या सामान्य नागरिकांची मनुष्यहानी मोसुल आणि रक्कामध्ये घडेल. साम-दाम-दंड-भेद वापरून आपले सिंहासन वाचवणारे असद आणि त्यांना खाली खेचू पाहणारे त्यांचे विरोधक यांच्यातील या िहसक सुंदोपसंदीत सामान्य प्रजा अक्षरश: होरपळून निघत आहे. विरोधकांमध्ये फूट पाडून आपली खुर्ची बळकट करणारे असद पुढील काळाचा विचार करता स्वत:च्या राजकीय वाटेवर सुरुंग पेरत आहेत. या एका प्रश्नामुळे पश्चिम आशियातील सर्व देशांचा, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक धोरणांचा बाज बदलला आहे. त्याबरोबरच १९७०च्या दशकातील शीतयुद्ध संपवून आता छुपे शीतयुद्ध घडवून आणत असलेली अमेरिका आणि रशिया हे त्यांनीच पेटवलेल्या या आगीत ओढले गेले आहेत. बराक ओबामांची सीरियाच्या प्रश्नावर झालेली सपशेल नामुष्की त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या मानगुटीवर बसणार आहे. युद्धखोर समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन हे हा प्रश्न कसा हाताळतात यावर जागतिक शांतता आणि घडू-बिघडू पाहणारे आंतरराष्ट्रीय संबंध अवलंबून आहेत. सरतेशेवटी अमेरिका आणि रशियाला एकमेकांशी जुळवून घेऊन यावर तोडगा काढण्याशिवाय पर्याय नाही. आता ते चच्रेचा घोळ घालत बसतात की आपले लष्करी सामथ्र्य छुप्या पद्धतीने लादतात हे बघावे लागेल. या दोघांच्या किंबहुना अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणांमुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे. त्याबद्दल या दोन देशांनी काही संवेदना दाखवणे त्यांच्या तुच्छतावादात बसत नाही. दुसऱ्याच्या मांडवात आणि तिसऱ्याच्या सारीपाटात अमेरिका आणि रशियाचा हा रुसण्या-फुगण्याचा संसार चालू आहे. त्याला प्रचंड अशा अर्थकारणाची गडद किनार आहे. चर्चा फिसकटते तिथे भांडण आणि िहसाचार सुरू होतो, या राज्यशास्त्राच्या प्राथमिक तत्त्वाचे प्रत्यक्ष प्रयोग सीरियातील यादवीत सुरू आहेत. सीरिया आणि पश्चिम आशियाच्या दुर्दैवाने आता या प्रयोगाची दीर्घाकाकडे वाटचाल होत आहे. चर्चा करून हा वाद तात्पुरता मिटूही शकेल. राखेखालचा हा विस्तव मात्र पुढील बरीच वष्रे नक्कीच विझणार नाही.

(एम. एल. डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले)