नरेंद्र मोदी यांना एक तपभर अमेरिकेत प्रवेशबंदी होती. त्याच देशाला मोदी आज स्वागतार्ह वाटत आहेत. २०१४ मध्ये मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर बराक ओबामा यांनी स्वत: मोदी यांना फोन करून अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले. मग त्यांच्या व्हिसाचे प्रकरणही निकाली निघाले. मोदी यांनीही पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर आपला पहिला परदेश दौरा केला तो अमेरिकेचाच.. मोदी यांची अमेरिका नावाची जुनी व्याधीज्या शल्यचिकित्सकाने कौशल्याने दूर केली ते होते डॉ. भारत बराई! अमेरिकेतील एक निष्णात कर्करोगतज्ज्ञ. अफाट कर्तृत्व असलेल्या या आगळ्यावेगळ्या डॉक्टरांविषयी..

अमेरिकेतल्या आताच्या निवडणुकीत या देशातल्या यहुदींप्रमाणे.. म्हणजे ज्यू.. इथल्या भारतीयांनाही चांगलंच महत्त्व आलंय. त्याचं श्रेय जसं इथे येऊन राहिलेल्या भारतीयांना आहे तसंच, किंबहुना अधिक, या भारतीयांना एकत्र आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत दणक्यात केलेल्या उत्सवांनादेखील आहे. त्याला आता एक वर्ष झालं. पण त्या उत्सवांची चर्चा अमेरिकेत अजूनही सुरू आहे. फक्त त्यात थोडासा बदल झालाय इतकंच.

तो म्हणजे त्या उत्सवांची आठवण करून देत अमेरिकी अधिकारी, व्यापारी, उद्योजक विचारू लागलेत.. इज ही रिअली डुइंग समिथग ऑन द ग्राऊंड? राजनतिक अधिकारी, बँकर्स, अन्य देशांचे राजदूत, व्यावसायिक वगरेंकडून हा प्रश्न मी अमेरिकेत गेल्या काही दिवसांत किमान डझनभर वेळा तरी झेलला. या प्रश्नाला तूर्त तरी मौनासारखं दुसरं सुयोग्य उत्तर नाही. पण या आपल्या उत्तरापेक्षा त्यांना भारताविषयी, मोदींविषयी प्रश्न पडू लागलेत, हे अधिक महत्त्वाचं. ज्या देशानं जवळपास एक तपभर त्यांना प्रवेशबंदी केली होती, त्या देशाला मोदी असे अचानक स्वागतार्ह कसे वाटू लागले?

२ एप्रिल २०१४ या दिवशी या परिवर्तनाला सुरुवात झाली. त्या दिवशी शिकागोत अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्या महत्त्वाच्या निवडक व्यक्तींना जेवायला बोलावलं होतं. त्यात एक होते डॉ. भारत बराई. अमेरिकेतले सध्याचे अत्यंत आघाडीचे कर्करोग शल्यक. मूळचे भारतीय. गुजरातमधले. मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय. म्हणजे अगदी नरेंद्रभाईंशी सहकुटुंब परिचय असलेले. याआधी मोदी कोणीही नव्हते त्या वेळी अमेरिकेत आले की ते बराई यांच्या घरीच उतरायचे. ते, मुरली मनोहर जोशी हे त्या वेळचे नेहमीचे पाहुणे. त्यामुळे त्यांचा मोदींशी उत्तम परिचय.

तितकाच डॉक्टरांचा उत्तम परिचय बराक ओबामा यांच्याशीदेखील. कारण बराक राजकारणात लहानाचे मोठे झाले शिकागोत. या शहराजवळच्या इंडियानात डॉ. बराई यांचं मोठं रुग्णालय आहे. शिकागो आणि परिसरात डॉ. बराई यांचं चांगलंच वजन आहे. तसे अमेरिकेत अनेक भारतीय डॉक्टर आहेत. पण बराई त्यांच्यापेक्षा वरचे ठरतात. न्यूयॉर्कला स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याजवळ अमेरिकेतल्या स्थलांतरितांची कहाणी सांगणारं वस्तुसंग्रहालय आहे. तिथे बराई यांच्यावर एक प्रकरण आहे. अमेरिकेतला आदर्श स्थलांतरित म्हणून. एक साधा वैद्यकीय उमेदवार.. इंटर्न.. म्हणून अमेरिकेत आलेला हा भारतीय तरुण आज कुठल्या कुठे गेलाय असं त्यात म्हटलंय. तेव्हा अमेरिकेतल्या प्रतिष्ठित शल्यकांत त्यांची गणना होते. आणि वैद्यकांची नोंदणी करणाऱ्या सरकारी यंत्रणेचे ते प्रमुख आहेत. शिकागो, इंडियाना परिसरातल्या २४ हजार डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांवर त्यांची स्वाक्षरी आहे. आणि शिकागो परिसरात तर ते डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे पाठीराखे म्हणून ओळखले जातात. त्या पक्षासाठी निधिसंकलनात आघाडीवर असतात. त्यामुळे ओबामा यांच्या खास निमंत्रितांत ते होते. त्या अनौपचारिक गप्पांत ओबामा यांनी भारत-अमेरिका संबंध सुधारण्यात त्यांना कसा रस आहे, अशा अर्थाचं विधान केलं.

डॉ. बराई यांनी ती संधी साधली आणि म्हणाले.. मि. प्रेसिडेंट पण भारताच्या आगामी पंतप्रधानाला तर अमेरिका साधा व्हिसासुद्धा द्यायला तयार नाही? मग कसे सुधारणार हे संबंध? ओबामा म्हणाले.. डॉक आय डोंट नो व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट. डॉ. बराई म्हणाले, नंतर बोलू. ओबामा यांनी भोजनानंतर डॉ. बराई यांना हात धरून बाजूला नेलं आणि विचारलं.. तुझा नक्की मुद्दा काय आहे?

डॉ. बराई यांनी मग सर्व कथा सांगितली. २००२च्या दंगली, गोध्रा हत्याकांड वगरे. वर म्हणाले, अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग यांची हत्या झाली तेव्हाही दंगली झाल्याच होत्या. आताही कृष्णवर्णीयांच्या मुद्दय़ांवरनं अमेरिकेत दंगली होतच असतात. त्या होणं वाईट हे मान्य. पण तरीही होतात. इथेही आणि भारतातही. परत भारतात तर अमेरिकी पोलिसांइतकी आधुनिक व्यवस्थाही नाही. त्यामुळे त्या आटोक्यात आणायला वेळ लागला. त्यासाठी मोदी यांना किती काळ शिक्षा देणार?

ही चर्चा डॉ. बराई यांनी त्याच रात्री नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातली. कारण आपण ओबामा यांना भेटायला जातोय, त्या वेळी तुमच्या व्हिसाचा मुद्दा काढायचा ना, असं त्यांनी आधीच मोदी यांना विचारून घेतलं होतं. मोदी यांची अर्थातच अनुमती होती. त्या वेळी ते इकडे भारतात निवडणुकीच्या प्रचारात होते. तरीही मोदी यांनी डॉ. बराई यांना वेळ दिला. त्याच आठवडय़ात मग डॉ. बराई भारतात रवाना झाले. मोदी यांना भेटायला. पुढच्याच आठवडय़ात ते अमेरिकेत परतले.

२१ एप्रिलच्या भेटीत ओबामा यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालायचं आश्वासन दिलंच होतं. आता प्रत्यक्ष काय होणार ते पाहायचं होतं. त्या वेळी भारतात निवडणुका ऐन तोंडावर होत्या आणि पंतप्रधानपदी मोदी येणार हे निश्चित झालं होतं. त्याचा उल्लेख करून ओबामा यांनी निवडणूक निकाल जाहीर झाले की मी स्वत: मोदींना अभिनंदनाचा दूरध्वनी करून आमंत्रण देईन, असाही शब्द दिला होता.

त्यांनी तो पाळला. इतकंच नाही तर व्हाइट हाऊसमधल्या अधिकाऱ्यांना मोदींचं व्हिसा प्रकरण पुन्हा नव्याने तपासायचे आदेश दिले. ही कामगिरी त्यांनी सोपवली अतुल केशप या परराष्ट्र खात्यातल्या एका सचिवाकडे. आता हे अतुल अमेरिकेचे श्रीलंकेतले राजदूत आहेत. त्यांनी मग सातत्याने डॉ. बराई यांच्याकडे मोदी यांच्या व्हिसा प्रकरणाचा पाठपुरावा केला.

ते प्रकरण मिटेपर्यंत भारतात निवडणुका झाल्या होत्या. निवडणुकांच्या दिवशी डॉ. बराई हे सहकुटुंब मोदी यांच्या समवेत होते. मोदींनी त्यांना सांगितलं, २१ मे रोजी आपण दिल्लीत भेटायचं. तोपर्यंत मोदी यांनी सरकार स्थापनेची तयारी केली होती. २१ मे रोजी त्यांची डॉ. बराई यांच्याशी चर्चा झाली. मोदींनी पहिला दौरा अमेरिकेचाच करायला हवा.. असा डॉ. बराई यांचा आग्रह होता. मोदींनापण ती इच्छा होतीच. ते म्हणाले.. आपणो देश पण कई पण छे.. आपला देश पण काही तरी आहे.. हे अमेरिकेला दाखवून द्यायला हवं.

मोदींना असं तीव्रपणे वाटत होतं कारण त्या आधी दोन वेळा त्यांना अमेरिका दौरे सरकारनं व्हिसाच नाकारल्यानं रद्द करावे लागले होते. ही बाब त्यांना अत्यंत जिव्हारी लागली होती. २००५ साली त्यांचा मेडिसन गार्डनमध्ये मोठा मेळावा होणार होता. रविवार होता तो. त्याच्या आधी शुक्रवारी डॉ. बराई यांना सरकारनं कळवलं, मोदींना व्हिसा दिला जाणार नाही. डॉ. बराई यांनी तरीही तो मेळावा रद्द केला नाही. कारण मोदींशी थेट संवादाची संधी अशी जाहिरात करून त्यांनी मेळाव्याला समर्थक मिळवले होते. अमेरिकेतनं दूरदूरवरून भारतीय या मेळाव्यासाठी येणार होते. त्यामुळे तो रद्द करणं अयोग्य होतं. त्यांनी मग शक्कल लढवली.

डॉ. बराई म्हणाले, मी अमेरिकेनंच विकसित केलेलं तंत्रज्ञान वापरून अमेरिकेच्याच नाकावर टिच्चून हा मेळावा भरवला. हे तंत्रज्ञान म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्स. मोदी गांधीनगरात आपल्या कार्यालयात बसून होते आणि इकडे न्यूयॉर्कला आपल्या पाठिराख्यांशी संवाद साधत होते. त्यानंतर डॉ. बराई आणि त्यांचे सहकारी दर वर्षी अमेरिकेत गुजरात दिन साजरा करू लागले. मोदी त्यांत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत. २०१३ सालच्या मेळाव्यात तर कहर झाला. मोदी यांनी एकाच वेळी डझनभर शहरांतल्या मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातनं संवाद साधला. पण तरीही त्यांना अमेरिकेचा व्हिसा नाही हे शल्य होतंच. त्याच वर्षी, म्हणजे २०१३ साली, मोदी यांच्या अमेरिका जखमेवर मीठ चोळलं गेलं.

झालं असं की इथल्या प्रख्यात व्हॉर्टन बिझनेस स्कूलनं मोदी यांना व्याख्यानाचं आमंत्रण दिलं. वास्तविक तेव्हाही मोदी यांच्याकडे व्हिसा नव्हताच. पण हे सगळं आपण करून देऊ अशी हमी या निमंत्रणामागे असलेल्या बडय़ा भारतीय उद्योगपतीनं दिली. त्यामुळे मोदी हो म्हणाले. पण व्याख्यानाच्या आदल्या दिवशी मोदी यांना व्हिसा मिळणार नाही, हे स्पष्ट झालं. भारतात ही बातमी झळकली आणि मोदी यांचा चांगलाच हिरमोड झाला. निदर्शनांना घाबरून व्हॉर्टननंच मोदी यांचं निमंत्रण मागे घेतलं. या उद्योगपतीचा प्रभाव व्हॉर्टनचं मतपरिवर्तन करू शकला नाही.

गौतम अदानी हे या उद्योगपतीचं नाव.

तर या प्रकरणाशी डॉ. बराई यांचा काहीच संबंध नव्हता. कारण अदानी आणि कंपूनं डॉ. बराई आणि अन्यांना त्यात सहभागी करून घेतलंच नव्हतं. तेव्हा पंतप्रधानपदी आल्यावर मोदी हे डॉ. बराई यांच्या अमेरिका भेटीच्या आग्रहाचा नव्यानं विचार करू लागले. त्यांच्या मनात अमेरिकेला नाही तरी आपणो देश कई पण छे.. हे दाखवून द्यायची इच्छा होतीच. तेव्हा मोदींनी निमंत्रण स्वीकारलं. साक्षात व्हाइट हाऊसमधनंच सूत्रं हालल्यानं व्हिसाचा प्रश्न सुटला होताच. डॉ. बराई पुढच्या तयारीला लागले.

न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क परिसरातली सगळी स्टेडियम्स त्यांनी मोदी यांच्या संभाव्य कार्यक्रमासाठी पाहिली. पसंत पडलं न्यूयॉर्कचं मॅडिसन स्क्वेअर. क्षमता २० हजारांची. त्यांना असंच काही तरी भव्य हवं होतं. जागा नक्की झाली. पण आयोजक तयार होईनात. म्हणाले, आधी १,६५,००० डॉलरची  (२०१४ मधील दरानुसार- १० कोटी ४२ लाख ४७ हजार रुपये) अनामत रक्कम भरा.. मग विचार करू. ही अनामत रक्कम परतफेडीच्या बोलीवर नव्हती. म्हणजे कार्यक्रम रद्द झाला तर पसे गेले. डॉ. बराई म्हणतात, त्या वेळी मोदींच्या दौऱ्याची प्राथमिक तयारीही झाली नव्हती.. म्हणजे स्थानिक स्वागत समिती वगरेसुद्धा स्थापन व्हायची होती. तेव्हा पसे तरी कोणाकडे मागणार? जमा करत बसायला वेळही नव्हता आणि आयोजक तर त्या खेरीज स्टेडियम बुक करायलाही तयार नाहीत. शेवटी इतकी प्रचंड रक्कम डॉ. बराई यांनी स्वत:च्या खिशातनं भरली.

कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. सुरुवातीला स्थानिक भारतीयांचं, म्हणजे न्यूयॉर्कमधल्या, मानपानाचं नाटय़ झालं. डॉ. बराई म्हणाले, मी ठाम भूमिका घेतली नरेंद्रभाईंबरोबर व्यासपीठावर कोणीही मिरवायला जाणार नाही. म्हणजे मीपण नसेन. त्यांनी हे सांगितल्यावर बाकीचे शांत झाले. कारण मोदींच्या प्रकाशात अनेकांना झळकायची इच्छा होती. कोणालाच ती संधी नाही म्हटल्यावर सगळ्यांनाच बरं वाटलं. मग आला कार्यकर्त्यांचा मुद्दा. डॉ. बराई यांनी त्यासाठी स्वामीनारायण मंदिराशी संपर्क साधला. त्या वेळी मंदिराचे प्रमुख स्वामी हयात होते. ते म्हणाले, काळजी करू नकोस, हवे तितके कार्यकत्रे देतो. मग मुद्दा खर्चाचा. कार्यक्रमाला साधारण १२ लाख डॉलर इतका खर्च येईल, असं नक्की झालं. सुरुवातीला काही इतके पसे कोणाकडेच नव्हते. मग डॉ. बराई यांनी तांपा इथले दुसरे असेच मोठे डॉक्टर किरण पटेल यांच्याशी संपर्क साधला. डॉ. बराई यांची टिप्पणी : डॉ. पटेल माझ्या किती तरी पट श्रीमंत आहेत. डॉ. बराई यांच्या टिप्पणीवर डॉ. पटेल म्हणाले, सुरुवातीला आपण ही रक्कम अर्धी अर्धी आगाऊ उचल म्हणून देऊ या. आणि पसे जमले की नंतर परत घेऊ या. ते तितके जमले नाहीत तर..? या दोघा डॉक्टरांनी ठरवलं जमतील तितके जमतील. नाही तितके जमले तर तो खड्डा आपल्या खिशातनं रक्कम भरून बुजवायचा.

प्रत्यक्षात निधिसंकलन सुरू केल्यावर १८ लाख डॉलर जमले. कार्यक्रमाला खर्च आला १५ लाख डॉलर. उरलेले तीन लाख डॉलर मग नरेंद्र  मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला देणगी म्हणून दिले गेले.

ते नंतर. त्या वेळी हा कार्यक्रम जमेल तितक्या प्रचंड प्रमाणात साजरा करायचं या मंडळींनी ठरवलं. त्यासाठी तोपर्यंत कधीही न घडलेला उद्योगही त्यांनी केला. तो म्हणजे टाइम स्क्वेअरमधल्या भिंतींच्या प्रचंड पडद्यावर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं. एरवी या भिंतींवर मोठमोठय़ा कंपन्यांच्या जाहिराती झळकत असतात. त्या दिवशी नरेंद्र मोदी झळकले. त्यासाठी आयोजकांनी उपग्रहाची सेवा तात्पुरती भाडय़ानं घेऊन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं. स्टेडियममध्ये ४० बाय ४० फुटांचा भव्य मंच उभारला गेला. आकाशातनं रंगीबेरंगी फुगे पडतील अशी व्यवस्था केली. तेवढय़ा फुग्यांसाठी म्हणून आयोजकांनी १८ हजार डॉलर मोजले.

रविवार, २७ सप्टेंबर २०१४चा तो कार्यक्रम किती यशस्वी झाला ते आता नव्यानं सांगायची गरज नाही. भारतात टीव्हीवर प्राइम टाइमच्या सुमुहूर्तावर तो दिसेल अशीच त्याची वेळ निवडली. जगभरातही तो दिसला. इतकंच नाही तर अमेरिकी सेनेटचे, काँग्रेसचे असे मिळून ४० सदस्य समारंभाला हजर होते. या सर्वाना मोदी यांच्या व्यासपीठावर नेऊन भारत आणि अमेरिका संबंधातल्या नव्या पर्वाचा उदय आयोजकांनी जाहीर केला. परत मोदी यांचं आपणो देश पण कई पण छे.. हे दाखवून देण्याचं स्वप्नही साकार झालं.

..इंडियानातल्या रुग्णालयातल्या आपल्या कार्यालयात ही यशोगाथा सांगताना डॉ. बराई यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आजही लपत नव्हतं. मोदी यांची अमेरिका नावाची जुनी व्याधी डॉ. बराई यांच्या शस्त्रक्रियेनं दूर झाली होती. कायमची.

 

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter @girishkuber