राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षीयांचा एक उमेदवार असावा, यासाठी सुरू झालेल्या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांचेही नाव होते ते मागे पडले. गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावावर सहमती होणार, अशी चिन्हे असताना काँग्रेसने दाद दिली नाही. गांधी, आंबेडकर यांची काँग्रेसला अ‍ॅलर्जी आहे, ती का?

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार शोधण्यासाठी २२ जूनला झालेल्या विरोधी पक्षाच्या बठकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी प्रकाश आंबेडकरांचे नाव सुचवले होते. सत्ताधारी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर करून दलित उमेदवाराची दावेदारी केल्याने विरोधी पक्षांनाही दलित उमेदवार शोधणं भाग पडलं होतं. सोनिया गांधींच्या सूचनेनुसार शरद पवार यांनी तीन नावांचा प्रस्ताव मांडला, त्यातून प्रकाश आंबेडकरांचं नाव वगळलं गेलं. मीरा कुमार, सुशीलकुमार शिंदे आणि भालचंद्र मुणगेकर ही ती तीन नावं होती. प्रकाश आंबेडकर यांचं नाव या तिघांपेक्षा तगडं होतं. तुलनेने ते वयाने लहान आहेत. म्हणून नाव गाळलं गेलं काय? उत्तर नाही असं आहे. प्रकाश आंबेडकरांचं नाव चच्रेत येऊ न देण्याची दक्षता काँग्रेसच्या श्रेष्ठींनी घेतली होती.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते जरूर आहेत, पण त्यांच्या निर्णयाची शक्ती काँग्रेसमधल्या ‘श्रेष्ठीं’कडेच राहिली आहे. या ‘श्रेष्ठीं’ना आंबेडकर नावाचीच अ‍ॅलर्जी आहे. काँग्रेस जरी गांधी-नेहरूंची आणि नेहरू-गांधींची मानली गेली असली तरी काँग्रेसमधल्या श्रेष्ठी नावाच्या जमातीने काँग्रेसमधल्या सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रवाह नेहमीच सशक्त ठेवला आहे. देशाला सर्वोत्तम संविधान देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण देणाऱ्या काँग्रेसने हिंदू कोड बिलाच्या बंडानंतर त्यांना दोनदा पराभूत केलं. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पहिले राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला. पण मसुदा समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. आंबेडकरांना त्याच काँग्रसने उपराष्ट्रपतिपद देण्याची संधी मात्र स्वत:हून गमावली असं निरीक्षण डॉ. गोपाळकृष्ण गांधी या महात्माजींच्या नातवाने नोंदवून ठेवलं आहे. आंबेडकरांची उपेक्षा करणाऱ्या काँग्रेसमधल्या सॉफ्ट हिंदुत्वाने सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती केलं.

डॉ. आंबेडकर यांचा संघर्ष हिंदू धर्मातल्या ब्राह्मण्याच्या विरोधात होता. बाह्मणांच्या नव्हे. महाडच्या समता संगरात ब्राह्मणांची साथ नको म्हणणाऱ्या जेधे, जवळकर या ब्राह्मणेतर पक्षाच्या नेत्यांचा विरोध त्यांनी अव्हेरला. सहस्रबुद्धे यांच्या हाताने मनुस्मृतीची होळी केली. चिटणीस, टिपणीस, चित्रे यांच्यासारखे कायस्थ बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले. तसेच महाराष्ट्रातले अनेक ब्राह्मणही आंबेडकरांच्या बाजूने उभे होते. पण काँग्रेसमधल्या ब्राह्मणीकल प्रवाहाने हिंदू कोड बिलाला विरोध केला. तर कायस्थ राजेंद्र प्रसादांनी विरोधकांना साथ दिल्याने नेहरूंनाही काही पावलं मागे यावं लागलं. त्याच ‘श्रेष्ठी’परंपरेने प्रकाश आंबेडकर यांचंही नाव अडवलं तर त्यात नवल ते काय? डॉ. आंबेडकरांचं स्मारक मोठं करण्यासाठी काँग्रेसने स्वत:हून कधी पावलं उचलली? इंदू मिलची जमीन द्यायला एवढा वेळ का काढला? डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी जनता दल आणि व्ही. पी. सिंग यांना सत्तेवर यावं लागलं.

लढण्यासाठीसुद्धा प्रकाश आंबेडकरांचा किंवा अगदी भालचंद्र मुणगेकरांचा विचार काँग्रेसने का केला नव्हता? मीरा कुमार या काही आंबेडकरवादी नव्हेत. किंबहुना आंबेडकरांना पर्याय म्हणून काँग्रेस ‘श्रेष्ठीं’नी बळ दिलेल्या जगजीवन राम यांच्या परंपरेतल्या त्या आहेत. सोनिया गांधींनी बाबासाहेबांचं नाव जितक्यांदा घेतलं असेल तितक्यांदा मीरा कुमार यांनी कधी घेतलं होतं काय? कोविंद यांचा रा. स्व. संघाशी कधी संबंध नव्हता. ते मोरारजी देसाई यांचे सचिव होते. १९९० मध्ये ते भाजपच्या संपर्कात आले. भाजपच्या सोशल इंजिनीअरिंगची गरज म्हणून. कोविंद यांनी बाबासाहेबांचं ऋण तरी जाहीरपणे राज्यसभेत मान्य केलं आहे. मीरा कुमार यांनी?

‘श्रेष्ठींची’ ही काँग्रेस नितीशकुमारांना आता आरोपीच्या िपजऱ्यात उभे करत आहे. सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतिपदाचा उमेदवार एकमताने ठरवावा, यासाठी सर्वात पहिला पुढाकार घेतला तो नितीशकुमार यांनीच. मोदी आणि भाजपच्या विरोधात सशक्त पर्याय उभे करण्यासाठी राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही विरोधकांना एकत्र येण्याची मोठी संधी आहे आणि ती आपण जिंकू शकतो या विश्वासाने आणि निर्धाराने नितीशकुमार सर्वप्रथम काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटले. येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांना भेटले. नावं अनेक चच्रेत होती. गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावावर सर्वसहमती झाली. गोपाळकृष्ण गांधी हे एक नाव सर्व विरोधकांना जोडू शकेल. भाजपपुढे आव्हान निर्माण करू शकेल आणि विरोधकांच्या विजयाची सुरुवात करू शकेल. हा विश्वास व निर्धार घेऊन नितीशकुमार गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला समर्थन मागत होते. सीताराम येचुरी आणि त्यांचा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट अगदी उघडपणे आणि मन:पूर्वक गोपाळकृष्ण गांधींच्या नावाचा पुरस्कार करत होते. पण काँग्रेसने त्यांना अखेपर्यंत झुलवत ठेवलं. गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावात काय कमी होतं? पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख. निवृत्त सनदी अधिकारी आणि दक्षिण आफ्रिकेतील भारताचे माजी राजदूत. विख्यात विद्वान. गांधी आणि आंबेडकरी विचारांचे साक्षेपी अभ्यासक. पण काँग्रेसला त्यांच्या नावाची अ‍ॅलर्जी आहे. कारण ते महात्मा गांधींचे नातू आहेत.

काँग्रेसमधल्या श्रेष्ठींना गांधी-नेहरूंची नव्हे, नेहरू-गांधींची विरासत मान्य आहे. नेहरू अन् इंदिरा गांधी या परंपरेला गोपाळकृष्ण गांधी अडचणीचे आहेत. फाळणीच्या विरोधात गांधी छातीचा कोट करून उभे होते, तेव्हाच काँग्रेस नेतृत्वाला गांधी अडचणीचे वाटत होते. संविधान सभेवर डॉ. आंबेडकरांना  काँग्रेसने निवडून दिलं नाही, त्यांना बंगालमधून निवडून यावं लागलं. याची सल महात्माजींनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण संविधान दिल्यानंतरही काँग्रेसमधल्या श्रेष्ठींनी १९५२ आणि १९५४ च्या निवडणुकीत आंबेडकरांच्या पराभवासाठी सारी शिकस्त केली. १९५२च्या निवडणुकीतील पातकाचं परिमार्जन कम्युनिस्ट पक्षाने, पश्चिम बंगालमध्ये गोपाळकृष्ण गांधींना राज्यपाल म्हणून बोलावून करून घेतलं. सीताराम येचुरी त्यापुढे जाऊन गोपाळकृष्ण गांधींसाठी प्रयत्नात होते.

चेन्नईला करुणानिधींच्या सत्काराच्या निमित्ताने ३ जूनला जमलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या अनौपचारिक बठकीत गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला सर्वानीच मान्यता दिली होती. हे नाव आधी जाहीर करा, काँग्रेसशी बोलून घ्या असं स्वत: नितीशकुमार यांनी येचुरी यांना सांगितलं होतं. झालं उलटंच. काँग्रेसने दाद दिली नाही. दरम्यान, मोदींनी विरोधी पक्षांशी बोलणी करण्यास जेटली, नायडूंची कमिटी नेमली. काँग्रेसने विरोधी पक्षांच्या सहमतीचं नाव पुढे करण्याऐवजी भाजपलाच त्यांचा उमेदवार जाहीर करण्याचा आग्रह धरला. हे धक्कादायक होतं. मोदी-शहांनी ही संधी घेतली. रतन टाटा ते अमिताभ बच्चन अशी सर्व नावं बाजूला सारत रामनाथ कोविंद याचं नाव त्यांनी जाहीर केलं. रतन टाटा हे सरसंघचालकांना रेशीम बागेत जाऊन भेटून आले होते. त्यामुळे विरोधी पक्ष गाफील राहिला हे म्हणण्यापेक्षा काँग्रेसने ही संधी जाणीवपूर्वक दिली का? भाजपच्या सापळ्यात सर्व विरोधी पक्षांना काँग्रेसने ढकलून दिलं.

नेहरू कुटुंबातली सर्व नावं देशाला माहीत आहेत. गांधीजींची मुलं, नातवंडं कुठं आहेत हे देशवासीयांना क्वचितच माहीत असेल. गोपाळकृष्ण, राजमोहन, अरुण, इला गांधी या साऱ्यांनी त्याची तमा कधी बाळगली नाही. आपापल्या क्षेत्रात निरलसपणे ते काम करत राहिले आहेत. गांधींच्या मनातली सल आजही बाळगून असलेले हे तीन नातूू आंबेडकरी विचारांच्या बाजूने आपलं झुकतं माप देतात. इला दक्षिण आफ्रिकेत मंडेलांच्या सहकारी बनतात. तुरुंगात जातात. दरबानचा गांधी आश्रम जाळला गेला, तेव्हा वर्णभेदाची शिकार झालेल्या आफ्रिकेतल्या झुलुंचं काय चुकलं? अशा शब्दात तिथल्या भारतीयांच्या वागणुकीवर गांधींचे नातू अरुण गांधी यांनी कोरडे ओढले होते. गोपाळकृष्ण गांधी यांनी काँग्रेसच्या अशाच वागणुकीवर आपल्या लेखातून अनेकदा कोरडे ओढले आहेत.

काँग्रेसला आंबेडकर किंवा गांधी कशासाठी हवेत, या प्रश्नाचं उत्तर याहून आणखी स्पष्ट काय असायला हवं. इतकी प्रखर टीका काँग्रेसश्रेष्ठींना पटणार कशी? आंबेडकरांच्या पराभवाची सल यशवंतराव चव्हाणांच्याही मनात होती. महाराष्ट्रात त्यांनी दादासाहेब गायकवाडांशी म्हणून समझोता केला. फुले, शाहू, आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख बनवली. काँग्रेसश्रेष्ठींना ते अजूनही जमलेलं नाही.

गांधी आणि आंबेडकर यांच्यात स्वतंत्र मतदारसंघावरून झालेला संघर्ष हा इतिहास आहे. त्या संघर्षांचं ओझं घेऊन नव्हे तर गांधी आणि आंबेडकर यांच्या समन्वयातूनच पुढे वाटचाल करावी लागेल. गांधींच्या मनात जी सल होती तिच्याशी प्रामाणिक राहत गोपाळकृष्ण गांधी अधिक आंबेडकरवादी होतात. रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर झाल्यानंतर म्हणूनच ते विरोधी पक्षांचा उमेदवार होण्यास विनम्रपणे नकार देतात. त्याचप्रमाणे पराभवासाठी मीरा कुमार किंवा प्रकाश आंबेडकर यांचा बळी देणं नितीशकुमार यांनी अमान्य केलं.

संघ, भाजप आणि मोदींच्या राजकारणाला पर्याय काँग्रेसकेंद्रित राजकारण होऊ शकत नाही. पण गोवा, मणिपूरनंतरची राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतल्या विजयाची शक्यता काँग्रेसने गमावली की जाणीवपूर्वक घालवली?

कपिल पाटील

kapilhpatil@gmail.com