कसदार साहित्याची मेजवानी देण्याची परंपरा जपणाऱ्या कालनिर्णयने यंदाच्या दिवाळी अंकात व्यक्तिचित्रणावर भर दिला आहे. बंगालच्या वादग्रस्त फाळणीमुळे भारतामध्ये बदनाम झालेल्या लॉर्ड कर्झन या व्हाइसरॉयने आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या रचनात्मक कार्याचा वेध अरविंद गणचारी यांनी घेतला आहे. मकबूल फिदा हुसेनच्या विक्षिप्तपणाचा वेध रघुवीर कुल यांनी घेतला असून डॉ. अभिधा धुमटकर यांनी डॉ. शंकर आबाजी भिसे या अवलिया संशोधकाचा करून दिलेला परिचय वाचनीय ठरला आहे. अंकातील लेख विभागाची श्रीमंती रामदास भटकळ, दीपक घैसास, विनय सहस्रबुद्धे, डॉ. विद्याधर ओगले, मोहन देशमुख, सुहास फडके, अनिल शिदोरे यांसारख्या दिग्गज लेखकांनी वाढविली आहे. राजकीय व्यक्ती असे का वागतात? किंवा एखादा व्यक्ती राजकारणात गेल्यावर का बिघडतो? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी विनय सहस्रबुद्धे यांचा ‘राजकारण्यांची कैफियत’ हा लेख वाचायलाच हवा या गटातला आहे. याशिवाय स्पर्धेच्या माध्यमातून निवडलेल्या तीन कथा, प्रशांत कुलकर्णी यांचा विनोदी लेख, तसेच मामांजीच्या विनोदांची अंकात ठिकठिकाणी केलेली पेरणी यामुळे या अंकातील प्रत्येक पान हे वाचनीय बनले आहे.
संपादक – जयराज साळगावकर, पृष्ठे- २४०, किंमत- १०० रु.
आरंभ
विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रेरणादायी आणि उद्बोधक मुलाखतींनी सजलेल्या दैनिक ‘धावते नवनगर’चा ‘आरंभ’ दीपावली विशेषांक वाचनीय आणि उत्तम निर्मितिमूल्य असलेला अंक आहे. या अंकात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, मनोरंजन आणि वेगवेगळ्या धाटणीच्या लेखांचा समावेश केला आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या कविता आणि त्यांची मुलाखत वाचकांना खूप काही सांगून जाणारी आहे. प्रकाश आमटे यांचा ‘लोकबिरादरी’ हा प्रकल्प नेमका काय आहे, याची माहिती त्यांच्या विस्तृत मुलाखतीतून उपलब्ध होते. सुनील बर्वेदेखील या दिवाळी अंकाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘आई’ या शब्दाचा अर्थ जिच्याकडून शिकता येईल अशा वात्सल्यसिंधू सिंधुताई सकपाळ, रंगभूमीवरील कलाकारांना प्रकाशझोतात आणणारे दिलीप मढकईकर यांचे लेख अंकात शब्दांकित करण्यात आले आहेत. आकर्षक छायाचित्र आणि बोलकी रेखाटणे वाचकांना खिळवून ठेवतात. अशोक गुप्ते, विद्याधर रिसबूड, मधुकरराव अडेलकर यांचे लेखही वाचकांना उत्तम खाद्य ठरावेत. तळवलकर्सचे मधुकर तळवलकर, प्रभाकर वाईरकर, नाटय़कर्मी संतोष पवार, मसलमॅन सुहास खामकर यांनी त्यांच्या आयुष्यात यशाचं शिखर गाठण्यासाठी केलेली धडपड वाचनीय आहे. एव्हरेस्टला गवसणी घालणाऱ्या गिरिप्रेमी संस्थेचे सचिव उमेश झिरपे यांच्या ‘मिशन एव्हरेस्ट २०१२’ चा वृत्तान्त मराठी माणसाचा मानिबदू ठरला आहे.
संपादन- सचिन अडसूळ, दीपक सोनावणे, पृष्ठे- १६० किंमत- ८० रुपये