शाळांना सुट्टी पडली रे पडली की पालक छंद शिबिरांच्या शोधासाठी निघतात. पण समोरच्याने सांगायचे आणि आपण ऐकायचे असेच जर छंद शिबिरातही होत असेल तर? तर अशा शिबिरांसाठी भरलेले हजारो रुपये वाया घालविण्याबरोबरच मुलांचा हक्काचा मोकळा वेळही आपण हिसकावून घेतो. मुलांच्या सुट्टीचा कोंडवाडा करण्याऐवजी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे उडू-बागडू दिले तर ती अधिक समाधान पावतील. पण मग म्हणून छंद शिबिरे नकोतच का? तर असेही नाही. कारण जीवनाशी परस्परसंबंध जोडून देण्याचे काम छंद शिबिरे करतात. फक्त मुलाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी, त्याला ‘ऑलराऊंडर’ बनविण्याच्या नादापायी छंद शिबिरांच्या नावाखाली त्यांचे बालपण हिरावले जाऊ नये. म्हणूनच छंद शिबिरे आणि हवाहवासा मोकळा वेळ याचा ताळमेळ घालण्याचा हा प्रयत्न.

‘स्वच्छंद’ वर्ग
छंद म्हणजे खरे तर जीवन शिक्षण. थोडक्यात, आयुष्य अधिक समृद्धपणे जगण्याची दालने छंद खुली करून देत असतात. म्हणूनच मुलांचा सुट्टीतला मोकळा वेळ सत्कारणी लागावा, समूहामध्ये काम करण्याची सवय लागावी, जीवनकौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी त्यांना छंद शिबिरांमध्ये पाठविण्याचा पालकांचा आग्रह असतो. तो फारसा चुकीचाही नाही. कारण केवळ अभ्यास करून माणूस घडत नाही. कला, संस्कृती, साहित्य याचे इंजेक्शन थोडय़ाफार प्रमाणात टोचले तरी असंवेदनशीलतेचा आजार दूर व्हायला मदत होते. पण अनेकदा सुट्टीत मुले घरात त्रास देतात. त्यामुळे त्यांना कुठे तरी गुंतवायचे म्हणून छंद शिबिरांना धाडायच्या योजना सुट्टी लागण्याच्या आधीच पालकांच्या मनात तयार होऊ लागतात. पण छंद शिबिरांना पाठविण्यामागे अशी मानसिकता असू नये. त्यासाठी आधी आपल्या मुलाचा कल ओळखून त्याला कुठे पाठवायचे याचा विचार पालकांनी करायला हवा.
छंद शिबिरे ही विशेषकरून बौद्धिक, शारीरिक आणि सृजनात्मक अशी तीन प्रकारची असतात. त्यामुळे एकाच प्रकारच्या शिबिरांना पाठविण्याऐवजी मुलांचा कल ओळखून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या छंद शिबिरांना पाठविण्यातही काहीच हरकत नाही. फक्त त्यांच्यावर भरमसाट गोष्टी लादू नयेत.
आता तर छंद शिबिरांचे स्वरूपही बदलले आहे. उदाहरणार्थ, मुंबईच्या जवाहर बालभवन येथे सतारवादन, संगणक, संवादात्मक इंग्रजी, सृजनात्मक विज्ञान, सर्जनात्मक मराठी लेखन, मराठी लोककला असे नवनवीन विषय शिकविण्यात येत आहेत. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे तज्ज्ञ बोलावण्यात आले आहेत. बालभवनमध्ये ३७ वेगवेगळ्या प्रकारचे छंद वर्ग चालविले जातात. त्यात कोरियन मार्शल आर्ट, योग, बुद्धिबळ अशा किती तरी वर्गाचा समावेश आहे. इथे मुलांना घेऊन आलेल्या आयांचा रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे काम त्यांच्यासाठी मेहंदी, रांगोळी, दागिने बनविणे, आर्ट ऑफ लिव्हिंग या वर्गाच्या माध्यमातून केले जाते. या प्रकारचा प्रयोग खासगी वर्गानीही करायला हरकत नाही.
‘छंद शिबिरांच्या माध्यमातून ज्ञानरचनावादाची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. जे शाळेत वर्गात प्रत्यक्ष करायला मिळत नाही. विद्यार्थीसंख्येमुळे करायला शक्य होत नाही. अभ्यासाला शेवटी जीवनाशी जोडायचे आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहू नये यासाठी छंद शिबिरे असावीत. जीवन आणि शिक्षण यातली जी मधली दरी आहे ती छंद शिबिरे भरून काढतात,’ असे चर्नी रोडच्या ‘महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन’चे संचालक संदीप संगवे छंद शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगतात.
चांगले शिबीर कसे ओळखायचे याचेही काही मापदंड आहेत. ‘शिबिराचे शुल्क किती आहे, यावरून लोक त्याचा दर्जा ठरवितात किंवा कुठल्या आर्थिक गटातील मुले तिथे येतात, याचाही विचार पालक करतात. त्यावरून जावे की नाही हे ठरवितात. ही मानसिकता फारच घातक आहे. उलट वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी असलेल्या मुलांमध्ये आपल्या पाल्याला पाठवायला पाहिजे. तरच त्यांचे अनुभवविश्व समृद्ध व्हायला मदत होणार आहे,’ असे चित्रकार आणि चाइल्ड आर्ट फॅसिलिटेटर म्हणून काम करणाऱ्या आभा भागवत सांगतात.
छंद वर्ग निवडताना काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स त्यांनी दिल्या. उदाहरणार्थ शिबिरात नेमके काय शिकविले जाणार आहे, कोण शिकविणार आहे ते पालकांनी समजून घ्यावे. छंद वर्ग प्रक्रिया, कृतीवर आधारित असावा. नाही तर इतक्या वस्तू मुले घरी घेऊन जातात यावर त्या शिबिराचे यशापयश तोलण्याचा प्रकार होतो. पण त्यातून मुलांना डोक्याला काही खाद्य मिळत नाही. अनेकदा असे होते की, शिबिरांमध्ये मुले शांत बसत नाहीत. पण एकदा का प्रक्रिया किंवा कृतीवर आधारित काही कार्यक्रम सुरू केला की मुले शांतपणे बसून ते करू लागतात. संयोजकांनी जो काही कार्यक्रम आखला आहे, तो मुलाचे वय गृहीत धरून तयार केलेला असावा. तसेच संयोजक मुलांच्या कलाने शिकविणारे आहेत का ते पाहावे. लहान मुलांना मनाविरुद्ध  पाठविणे पालकांनीही बंद करावे. अगदी लहान मुलांना ‘काही तरी’ करायला आवडते. त्यामुळे चित्रकला, मूर्तीकला, शिल्पकला अशा हातांना काम देणाऱ्या कृती त्यांना अधिक भावतात. तर मोठय़ा मुलांना नृत्यासारख्या समूहासोबत करावयाच्या कृती आवडतात. याचे भान पालकांनी ठेवायला हवे. अनेकदा छंद वर्गाचे आयोजन कप्पेबंद असेत. विज्ञान वेगळे, कला वेगळी, गणित वेगळे, खेळ वेगळा असे कप्पेबंद प्रकार केले जातात. तर तेही करणे चुकीचे आहे, असे आभा भागवत यांना वाटते. अर्थात या कला आणि विज्ञानाचा मेळ घालून कृती कार्यक्रम विकसित करण्याचे प्रयोग सुरू आहेत. ते फक्त किती जमत आहेत ते पालकांनी पाहावे, असे त्या सुचवितात. ‘आम्ही चित्रकलेकरिता भाज्यांचे रंग तयार करतो. ते आम्ही मुलांसोबत बसूनच करतो. त्यांच्या हाताला जेव्हा या गोष्टींचा स्पर्श होतो तेव्हा ते अधिक अर्थपूर्ण होते. त्या पलीकडे वेगळे काही मुलांना सुचू शकेल, वेगळी प्रक्रिया अनुभवता येऊ शकेल, काही तरी ‘रॉ’ करता येईल, अशा गोष्टी होतायत का हे पालकांनी तपासावे. शंभरात एखाद्या मुलाला नसतो चित्रकलेत रस. पण पालक घालतात म्हणून ते बिचारे बसते काहीबाही काढत. मग असे करण्याऐवजी त्याला खेळाची आवड असेल तर त्याला निश्चितपणे तिथे पाठवावे,’ असे त्या सुचवितात.
अर्थात छंदांचे हे जग केवळ शहरी किंवा निमशहरी भागापुरतेच मर्यादित आहे का? उलट ग्रामीण भागातील मुलांचे छंदांचे अवकाश किती तरी मोठे असते, असे आभा भागवत यांना वाटते. त्यांना सुट्टीत काय करावे असा प्रश्नच पडत नाही. मुले शेतात किती तरी वेळ खेळू शकतात. साधे झाडावर चढणे, त्यांच्या पारंब्यांना लोंबकळणे असे किती तरी चाळे करण्यातून मुले खूप काही शिकत असतात. म्हणजेच काय, तर छंद वर्गाबरोबरच स्वच्छंदपणे मामाच्या गावी रमण्यातही अनुभवसंपन्नतेची हमी आहे. त्यासाठी गरज आहे ती फक्त मुलांचा कल कुणीकडे आहे तो ओळखण्याची!
– रेश्मा शिवडेकर

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही
Loksatta Chaturang mother father career job Psychological effects on children themselves
मुलांना हवेत आई आणि बाबा!
Womens Health why facial hair growth increase and What is the solution on it
स्त्री आरोग्य : तुमच्या चेहऱ्यावर आहेत त्रासदायक केस?

शिबिरात जायचे नसेल तर..
छंद शिबिरांना पाठविण्याऐवजी घरच्या घरी वेळ देऊनही पालकांना मुलांमध्ये अनेक छंद जोपासता येऊ शकतील. आपल्या इच्छा त्यांच्यावर न लादता त्यांच्या कलाने अनेक गोष्टी पालकांना मुलांसोबत करता येऊ शकतील. सोसायटीमधील इतर पालकांना एकत्र घेऊनही काही उपक्रम राबविता येऊ शकतील.  मुलाची कलेकडे ओढ असेल तर त्याचे वेगवेगळे पैलू अनुभवायला द्यावे.
******
मुलांसमोर बसून काम करण्याचा अनुभव पालकांनाही आनंद देणारा असतो. त्यासाठी थोडा वेळ मुलांसोबत बसून ते काय करते आहे, हे समजून घेतले तर त्याचा कल समजू शकतो. पालकांनी ती नजर विकसित केली पाहिजे. ‘माझ्या चार वर्षांच्या मुलाला कातरकाम आवडते, हे माझ्या लक्षात आले. म्हणून त्याला भरपूर कागद आणि कातर देते. त्याला ते करताना इतके काही सुचते की ते पाहूनच गंमत वाटते. पाण्यात मुलांना खेळायला द्यावे. रंग द्यावे.  त्यामुळे मुले  समाधानी आणि शांत होतात ’ असे आभाताई आपला  अनुभव सांगताना म्हणाल्या.
******
सध्या टेलिव्हिजन, संगणक, मोबाइल आणि व्हिडीओ गेम यातच मुले मन रमविताना दिसतात. त्यासाठी घरात मुलांना आवडतील अशी पुस्तके ठेवली तर ती त्यांना नक्कीच चाळावीशी वाटतील. आपण ती पुस्तके चाळू लागलो की मुलेही आपोआप त्यात डोकवायला येतात. त्यांच्यासोबत ती पुस्तके वाचा. घरात अंगतपंगत करून जेवायला बसण्यातही मुलांना आनंद मिळतो. आधी बाहुला-बाहुलीची लग्ने होत होती. तसा काही कार्यक्रम इतर मुलांसोबतही साजरा करता येऊ शकतो, असे ‘बालभवन’चे संदीप संगवे सुचवितात.
******
‘सहाच्या खालच्या वयाच्या मुलांना आम्ही बालभवनमध्ये घेतच नाही. त्यांचे पालक आलेच तर त्यांना सुट्टी मनसोक्त उपभोगू द्या. त्यांना मॉलमध्ये नेऊ नका. पण समुद्रकिनाऱ्यांवर, नातेवाईकांकडे, किल्ल्यांवर अवश्य न्या, असे आम्ही सांगतो. टेकडय़ांवरही मुले रमतात. तेथील झाडांवर दोन-दोन तास खेळतात. अशा ठिकाणी दगड-मातीच्या मूर्ती तयार करणे, चित्रे काढणे हेदेखील खूप मनोरंजनात्मक असते.