वेळेचे व्यवस्थापन, सततचे प्रयत्न, शिस्त.. आधुनिक जगात यशस्वी होण्यासाठी हे मूलमंत्र आहेत, यावर आता प्रत्येकाचाच विश्वास बसला आहे. स्वत:च्या मुलाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी लहानपणापासूनच त्याच्यात हे सारे गुण एकवटवण्याचा प्रयत्न पालक करतात. पण जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांचे विचार मात्र याबाबतीत अगदीच वेगळे होते. अफाट प्रयोगांमुळे आधुनिक विज्ञानाची दिशाच बदलून टाकणाऱ्या या शास्त्रज्ञाची तर्कसंगत दृष्टिकोनाशी फारकत होती. आय नेव्हर कम अपॉन एनी ऑफ माय डिस्कव्हरी थ्रू द प्रोसेस ऑफ रॅशनल िथकिंग.. असे त्यांनी स्पष्टच म्हटलेय. आणि हे तर्कविसंगत विचार करण्यासाठी लागतो तो मोकळा वेळ. निरीक्षण, आकलन, कल्पनाशक्ती, स्वप्न.. या साऱ्यांचा उगम हा मोकळ्या वेळेत होतो.
निव्वळ शाळा एके शाळा हे समीकरण आता राहिलेले नाही. त्यासोबत एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीज गरजेच्या झाल्या आहेत. सर्व प्रकारच्या कलांमध्ये निपुण करण्यासाठी, गेला बाजार मुलांना तोंडओळख होण्यासाठी वर्षभरात वेगवेगळ्या शिकवणी वर्गाना पाठवले जाते. एप्रिलच्या मध्यापासून जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत मिळणारी दोन महिन्यांची सुट्टी ही तर पर्वणीच असते. वर्षभरात वेळ देता न आलेल्या शिकवणी वर्गाची यादी करून मग मुलाला – मुलीचा सकाळपासून रात्रीपर्यंतचा कार्यक्रम आखला जातो. आई-वडील नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असल्यास सुरक्षिततेच्याही प्रश्नातून हे सर्व घडते. मात्र या सर्व चांगल्या गोष्टींची मुलांना फार मोठी किंमत चुकवावी लागते, ती मोकळ्या वेळेची.
बोलणे, हसणे, पळणे.. या सर्वासाठी मोकळा वेळ आवश्यक असतो. सोशल मीडियावर नाही, तर प्रत्यक्षात मित्र-मत्रिणींशी गप्पांचा फड रंगवणे, भरपूर बोलणे, भरपूर ऐकणे, भरपूर हसणे यातून ऊर्जा मिळते. वर्षभरात शाळेतील अभ्यास, स्पर्धा यामुळे अर्धवट राहिलेली झोप, भूक, खेळणे यांची कमतरता भरून काढण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी उपयोगाची ठरते. पण यापेक्षाही मोकळा वेळ आवश्यक असतो तो कल्पनांचे पतंग आकाशात उंचच उंच नेण्यासाठी. मन पाखरू पाखरू, याची काय सांगू मात, आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात.. बहिणाबाईंच्या या ओळींचा अनुभव मोकळ्या वेळातच तर येऊ शकतो.  विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्यांना या मोकळ्या वेळेचे महत्त्व विचारून पाहा. त्यांच्या लहानपणी त्यांनी मोकळ्या वेळेत केलेल्या धम्माल मस्तीची आणि आनंदाची ठेव त्यांच्या आयुष्यभर सोबत आहे. याच वेळी केलेल्या विचारांमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत.
अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक अशा सर्वच क्षेत्रांत नाव कमावलेल्या मृणाल कुळकर्णी यांनाही हा मोकळा वेळ महत्त्वाचा वाटतो. लहानपणी आई-वडिलांनी आम्हाला स्वत:चा वेळ वापरण्याची संधी दिली आणि या संधीचा आम्ही कसा वापर करतो याकडेही लक्ष पुरवले. त्यामुळे मी माझ्या आवडत्या छंदांकडे वळले. चित्र काढली, ट्रेकिंग केले, पुस्तके वाचली. या वेळेत मी स्वत:च्या मनाचा शोध घेऊ शकले. काय आवडते, काय करायचे आहे, याचा स्वत:हून विचार करायला शिकले, असे मृणाल कुळकर्णी म्हणाल्या. माझ्या मुलालाही असाच मोकळा वेळ आम्ही देत आहोत. मुलाचा हात कुठपर्यंत धरायचा आणि कोणत्या क्षणानंतर त्याला स्वत:चे निर्णय घेऊ द्यायचे त्याचे तारतम्य पालकांनी पाळायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.
एम- इंडिकेटर या अॅप्लिकेशनमुळे प्रसिद्धीला आलेले सचिन टेकेंचे मतही असेच आहे. आई-वडिलांनी मला कधीच कोणत्याही शिबिराला घातले नाही. बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये सायकल घेऊन फिरायला जाणे, डोंगर चढणे असे उपद्व्याप मी मित्रांसोबत केले. कोणत्याची साचेबंद, तयार पॅकेजपेक्षा स्वत:च्या इच्छेप्रमाणे आम्ही आनंदाचा शोध घेत होतो, असे टेके म्हणाले.
नववीत शिकणाऱ्या एका मुलीचा किस्सा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितला. सर्व मित्र-मत्रिणींनी क्लास लावलाय. तिथे गेल्यावर शिकायला मिळते. मित्र-मत्रिणीही भेटतात, असे तिचे मत होते. याचा अर्थ तिला मोकळ्या वेळेची गंमत समजलेलीच नव्हती. या वेळेत काय करता येऊ शकते, याचा विचार, कल्पनाच तिच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या. हे जास्त गंभीर आहे, असे डॉ. शेट्टी म्हणाले. दोन-तीन तासांचे वर्ग ठीक आहेत. पण पालक मात्र या सुट्टीलाही शाळेचे एक्स्टेंशन करून विविध प्रकारच्या अभ्यासांमध्ये मुलांना गुंतवू पाहतात. आपली शैक्षणिक व्यवस्था ही निसर्गाच्या विरोधात आहे. त्यात मुलांची शारीरिक व मानसिक दमछाक होते. पाच हजार किलोमीटर धावल्यावर गाडीचेही ओव्हरहॉिलग करावे लागते. इथे तर सजीव मुलांचा प्रश्न आहे, असे मत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केले.
नोकरीच्या चक्रात अडकलेल्या आई-बाबांना मुलांकडे लक्ष द्यायला मिळत नसल्याचे छंदवर्गाची सोय उपयोगी पडते. मात्र ज्याच्या भवितव्यासाठी एवढा विचार केला जातो, त्याचे लहानपण, वेळेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते, याचा विचार केला आहे का? आठवडाभराच्या सहलीत केलेली मजा, उरलेल्या सुट्टीचा कोंडवाडा करण्याची मुभा देत नाही. मुलांना हसू, खेळू, बागडू द्या.. त्यांना मोकळा वेळ द्या.
– प्राजक्ता कासले

  हे लक्षात घ्या
*मुलांना दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ छंदवर्गामध्ये पाठवू नका.
*ते छंदवर्गच असू द्या. तिथे स्पर्धा नको.
*मुलांना हौस वाटेल, आनंद मिळेल, त्यांची आवड जोपासली जाईल, तिथेच पाठवा.
*घराजवळचे छंदवर्ग निवडा. उन्हातून फार वेळ जावे लागणार नाही, याची काळजी घ्या.
*आजूबाजूचे वातावरण असुरक्षित आहे. त्यामुळे या छंदवर्गात मुलाला शारीरिक, मानसिक छळाला सामोरे जावे लागणार नाही, याची खात्री करून घ्या.
*संस्थेचा नावलौकिक तपासून घ्या. पूर्वीच्या विद्यार्थ्यांचा अनुभव ऐका.
*बैठय़ा वर्गासोबत शारीरिक हालचाल होणाऱ्या वर्गाची निवड करा.
*फक्त मदानी खेळही निवडू नका. बुद्धिबळ, चित्रकला यांच्यासोबत खेळांचा वर्ग निवडा.
*किशोरवयीन मुलांकडे विशेष लक्ष द्या. या दोन महिन्यांच्या काळात ते वाईट संगतीत जाणार नाही, याची काळजी घ्या. बरेचदा याच संगतीत त्यांना ड्रग्जचा विळखा पडण्याची शक्यता असते.