देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा हे देव, संत वा धार्मिक गुरू नसल्याने त्यांची पूजा करता येणार नाही, असा ठराव रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत नुकताच मंजूर करण्यात आला. यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून बलसाडमधील एका
मंदिरातून तर साईबाबांची मूर्ती लगेच हलवण्यात आल्याने साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
आज हे संकट धर्मसंसदीय आहे. उद्या त्याचे स्वरूप आणखी वेगळेही असू शकेल. या वादाची ही चिकित्सा..
शंकराचार्य स्वत:ला जगद्गुरू असे विशेषण लावतात. त्यांचे विश्व फार छोटे असते. देशात असलेल्या एकूण पन्नास शंकराचार्यापकी एक आहेत द्वारकेचे व जोशी मठाचे संयुक्त पीठाधीश. त्यांचे नाव स्वामी स्वरूपानंद! वैचारिक मतमतांतरे वाढून समाजात फूट पडत असताना ती थांबविण्यासाठी आदि शंकराचार्यानी भारतभर पदयात्रा केली, वैचारिक मंथन केले. अनेक विद्वानांबरोबर अखंड वादविवाद केला.
‘आपल्या’हिंदू धर्मावरील संकट
प्रत्येक विचारप्रवाहातील तथ्यांश समजून घेतला. सगळ्या तथ्यांची एकत्र बेरीज केली. बौद्ध व अन्य मतांचा लघुत्तम साधारण विभाजक काढून नव्या ‘अद्वैत तत्त्वज्ञाना’ची मांडणी केली. मोक्ष ही संकल्पना वेद काळात नव्हती. ती संकल्पना बौद्ध मतामधून शंकराचार्यानी स्वीकारली. देशात एकात्मता निर्माण करण्यासाठी अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. चार दिशेला त्यांनी चार पीठे स्थापन केली. त्यानंतर ते कांची येथे वास्तव्य करू लागले. कांची हे पाचवे पीठ. प्रत्येक पीठाच्या आधिपत्याखाली काही मठ असतात. कधी कधी मठाधिपती स्वत:ला पीठाधीश समजू लागतात. अशा प्रकारे स्वत:ला शंकराचार्य म्हणविणारी ४०-५० मंडळी देशात आहेत. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे शंकराचार्याच्या समूहातील मोठे नाव. अनेक धार्मिक पंडितांनी (त्यात पुण्याचे पं. वसंत गाडगीळ होते.) त्यांना विनंती केली की, ‘‘आपण द्वारकापीठाचे प्रमुख म्हणून काम करा. जोशी मठाच्या पीठावर मांडी घालून बसण्याचा तुम्हाला धार्मिक वा नैतिक अधिकार नाही.’’ पण स्वामी स्वरूपानंदांना मालमत्तेचा मोह सुटत नाही. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून ते अनेक विधाने करून समाजात फूट पाडत आहेत. मोदी सरकारला सतत अडचणीत आणत आहेत. िहदुत्ववाद्यांना सत्ता मिळाल्यामुळे त्यांना शंकराचार्य व धर्मसंसदेला सोडता येत नाही अन् जवळही करता येत नाही. बाबरी मस्जिद पाडण्यापूर्वी संघपरिवार शंकराचार्य, बरागी, साधू, महंत यांना जवळ करून उचकवीत असे. भोळ्याभाबडय़ा िहदू लोकांना भगवे कपडे पाहिले की धार्मिक भावनेचे उधाण येते. ते पवित्र लोक आहेत असा गरसमज होतो. बिहारमध्ये एक प्रथा होती. गुन्हा करायचा, नंतर फरार व्हायचे आणि शेवटी बरागी व्हायचे. पोलिसांनी पकडले व नाव विचारले की उत्तर द्यायचे, ‘‘आम्ही भगवे वस्त्र परिधान केले आहे. संन्यास घेतला आहे. पूर्वाश्रमीचे स्मरण करण्याचा आम्हास अधिकार नाही. आमचे पूर्वीचे नाव, गाव, धंदा, व्यवसाय सांगणार नाही.’’
साईबाबा होते तरी कोण?
िहदू धर्माच्या मान्यतेनुसार सत्पुरुष कोणाला म्हणावे हे निश्चित केलेले आहे. जो स्वार्थातून मुक्त झाला आहे, ज्याला कशाचाही लोभ उरलेला नाही. ज्याने अहंकार, क्रोध, मत्सर, इ. दुर्गुणांवर मात केली आहे, अशा माणसाला महापुरुष मानतात. हे शंकराचार्य स्वत: लोभी तर आहेतच, पण साईबाबांच्या मत्सराने ते ग्रस्त आहेत. ‘धर्मसंसद’ हा त्यांचा एक खुळखुळा आहे. संघपरिवाराने धर्मसंसद नावाचा एक अजब प्राणी जन्माला घातला. शंकराचार्य या धर्मसंसदेचे प्रमुख पीठाधीश असतील हे नक्की केले. धर्मसंसद हा शब्द आद्य शंकराचार्याच्या प्रतिपादनात कोठेही आढळत नाही. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांतही धर्मसंसदेचा उल्लेख नाही. म्हणजे धर्मसंसद हे प्रकरण धर्मसंमत नसून पूर्णत: राजकीय आहे. धर्म व संसद या दोन शब्दांचा हा समास आहे. यात धर्म नाही आणि संसदही नाही. हे दोन्ही शब्द केवळ चित्ताकर्षक म्हणून वापरले आहेत. संघपरिवाराला लोकशाही प्रणाली मनापासून मान्य नाही. संसद ही लोकशाहीमध्ये सर्वोच्च व पवित्र गोष्ट असते. त्या संसदेला कमी लेखण्यासाठी ही नकली संसद निर्माण करण्यात आली आहे. धर्म व लोकशाही या दोन्हीचे धर्मसंसद हे विडंबन आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ‘साईबाबा ना देव, ना संत, ना गुरू आहेत. िहदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती फोडून बाहेर फेकून दिल्या पाहिजेत. िहदू पुरुषांनी दोन विवाह केले पाहिजेत. आपला वंश झपाटय़ाने वाढविला पाहिजे. म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढेल.’ शंकराचार्यानी प्रथम आव्हान दिले की, साईभक्तांनी जाहीर वादविवाद करायला समोर यावे. छत्तीसगढमधील कवर्धा येथे भरलेल्या धर्मसंसदेच्या व्यासपीठावर आपली बाजू मांडण्यासाठी साईभक्तांचे प्रतिनिधी आले होते. पण शंकराचार्याच्या शिष्यांनी गुंडगिरी करून त्यांना व्यासपीठावरून ढकलून दिले. भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे. धर्मसंसदेत मात्र भगवी वस्त्रे परिधान करून गुंडगिरी झाली. याला ‘भगवी गुंडगिरी’ असे म्हणता येईल.
भारतीय राज्यघटनेनुसार शंकराचार्य स्वरूपानंद हे एक सामान्य भारतीय आहेत. ते व त्यांची धर्मसंसद ही कालबाहय़, निर्थक व निरुपयोगी वस्तू आहे. साईबाबा देव आहेत की संत आहेत हे ठरविण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला? त्यांच्या विधानामुळे ते अटक ओढवून घेतील. मंदिरामध्ये जाऊन साईबाबांची मूर्ती बाहेर काढण्यासाठी ते धुडगूस घालणार, मारामाऱ्या करणार. त्यामुळे ते कायद्याच्या जाळ्यात सापडणार. राज ठाकरे जसा दम देतात की, ‘मला अटक करण्याची पोलिसांनी िहमत दाखवावी. परिणामांचा विचार करावा.’ माझे अलाणेफलाणे अनुयायी आहेत. ते कायदा हातात घेतील. त्याच शैलीत शंकराचार्य दम देत आहेत की, ‘मी कोटय़वधी िहदूंचा जन्मसिद्ध मालक आहे. माझ्यावर कारवाई केल्यास िहदू पेटून उठतील. जाळपोळ करतील. देश अस्थिर होईल. अर्थात, ही त्यांची वल्गना पोकळ आहे. सामान्य िहदू भोळा असेल, पण शंकराचार्याच्या गरवर्तनाला साथ देईल इतका तो मूर्ख नाही. प्राचीन काळात लोकशाही व्यवस्था ही संकल्पना उदयाला आली नव्हती. धर्मसंसद ही अलीकडच्या काळातील धर्मात घुसडलेली संकल्पना आहे. या धर्मसंसदेतील बरागी, साधू, संत, महंत यांना आपले प्रतिनिधी म्हणून कुणी निवडलेले नाही. िहदूंच्या मतदानातून धर्मसंसदेचे सभासद निवडून येत नाहीत. या मंडळींचे स्वत:चे आखाडे असतात. म्हणजे त्यांच्याकडे ‘मसल पॉवर’ असते. ते खतरनाक मारामाऱ्या करू शकतात. म्हणून ते भारतीयांचे भवितव्य ठरवू शकत नाहीत. शासन धार्मिक जनप्रक्षोभाला घाबरते. त्यांना कायदा लागू केला, धार्मिक पदावरील लोकांवर कारवाई केली तर जनक्षोभ होईल अशा भ्रमात सरकार असते. कुंभमेळ्यात साधू-बरागी, भगवे-नागवे यांचे एकत्र झालेले सामथ्र्य दिसते. त्यांची संख्या पाहून सरकारवर दबाव येतो.
साईबाबांवर शंकराचार्य का बरसतात? याचा शोध घेतल्यानंतर कळते की, त्यांना साईबाबांचा मत्सर वाटत असावा. साईबाबा तर फकीर होते. श्रद्धा व सबुरी हा त्यांचा मंत्र होता. ते म्हणत, सबका मालिक एक है. म्हणजे ते अद्वैतवादी होते. त्यांचा एकच संदेश होता. ते म्हणत, ‘सबका भला होगा।’ सगळ्यांचे कल्याण व्हावे, मंगल व्हावे अशी ते अहोरात्र शुभकामना करीत. त्यांच्या संदेशामुळे सर्व धर्मातील असंख्य नागरिक त्यांच्याशी आध्यात्मिक पातळीवर जोडले गेले आहेत. साईबाबांच्या अनुयायांइतके शंकराचार्याचे अनुयायी नाहीत. लाखो भक्त साईबाबांच्या पायावर धन ठेवतात. सर्वत्र त्यांच्या मंदिरांची संख्या वाढू लागली आहे. साईबाबा हे शंकराचार्याना स्वत:च्या स्थानाला धोकादायक वाटतात. भारतीयांचा मूळ स्वभाव अद्वैतवादी आहे. त्याला सर्व धर्मीयांबरोबर एकत्र राहायला आवडते. अिहसा त्याला प्रिय आहे. त्याला बळेबळे िहदुत्ववादी बनवून, इतर धर्मीयांचा द्वेष शिकवून शंकराचार्याच्या चंगूलखाली आणायचा उपद्व्याप पाहून ‘हे अति होत आहे,’ असे म्हणावेसे वाटते.
आद्य शंकराचार्यानी आध्यात्मिक, वैचारिक व धार्मिक ऐक्य निर्माण करून भारतीयांमध्ये एकजूट घडवून आणली. त्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाला विरोध करणारे त्या काळातील सनातनी ब्राह्मण होते. बौद्ध मताला सनातन धर्माशी जोडून घेतले म्हणून त्यांच्यावर तत्कालीन नंबुद्री ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला होता. त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर ते शव स्मशानात घेऊन जाण्यासाठी त्यांचे स्वजातीय आले नाहीत. धो-धो पाऊस पडत होता. त्या परिस्थितीत आद्य शंकराचार्यानी आईच्या प्रेताचे तीन तुकडे केले. एकेक तुकडा स्वत:च्या खांद्यावर तीन हेलपाटे घालून स्मशानात वाहून नेला. केरळमधील वर्तमानकाळातील नंबुद्री मात्र आपल्या पूर्वजांचे चुकले हे कबूल करतात. आद्य शंकराचार्याना झालेल्या मानसिक क्लेशाचे स्मरण म्हणून ते वयोवृद्ध माणसांच्या निधनानंतर त्या शवावर खडूने तीन रेघा मारतात. अशा प्रकारे ते आद्य शंकराचार्याना मानवंदना देतात. आता काळ बदलला आहे. आद्य शंकराचार्य आज हयात असते तर स्वामी स्वरूपानंद सरस्वतींच्या धर्मसंसदेने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत केला असता.
धर्मसंसदेत हिंदूंनी दोन लग्ने करावीत असा ठराव संमत करता करता राहून गेला. शंकराचार्याना हिंदू वंश वेगाने वाढवायचा आहे. हिंदू धर्म मानणाऱ्या स्त्रियांनी आपल्याला सवत आणणाऱ्या शंकराचार्याना धडा शिकविला पाहिजे. शंकराचार्याच्या गादीवर एखाद्या विद्वान महिलेला स्थानापन्न करावे अशा मागणीसाठी हिंदू महिलांनी जोरदार सत्याग्रही आंदोलन करायला हवे. ‘या पदावर एखादा संस्कृत भाषेत तज्ज्ञ असलेला दलित बसविण्याची हिंदुधर्मीयांची तयारी असेल तर मी धर्मातराचा विचार सोडून देईन,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या मते, शंकराचार्याचे पद ब्राह्मणी विचारसरणीचे व त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आहे. हिंदू धर्माचे रक्षण करणे हे त्यांचे ध्येय वा कर्तव्य नाही.