इं टरनेट, वेबसाइट नामक घटना शेकडो वर्षे लांब असताना ‘वाईट साईट पाहू नये’ हा कुणी तरी सांगितलेला सुविचार. सरकारने तो भलताच मनावर घेतला. एकाएकी अनेक कामुकस्थळांवर बंदी घालण्यात आली. एकाएकी त्यातील काही स्थळांवरील बंदी मागेही घेण्यात आली आणि गुपचूप गुपचूप ती सुरूच ठेवण्यात आली. सारीच मौज. जागतिकीकरणाआधीपासून पोर्नपसाऱ्याची अडगळ भारतीय मनामनांत कशी झिरपली त्याचा सांगोवांगीचा इतिहास आणि एकूणच या दर्शनमात्र पिढीची विविधांगी दास्तान.. त्या सरकारी बंदीच्या खेळानिमित्ताने..

टप्पा १ : १९८० ते ९२
जागतिकीकरणाआधीपासून देशामध्ये कुठली जागतिक गोष्ट सहज उपलब्ध होती तर ती म्हणजे पोर्न – कामुकचलत चित्रफिती. ८०च्या दशकात अमेरिकेत ‘हॅण्डी कॅमऱ्या’द्वारे ‘होम व्हिडिओ’ उद्योगाला सुरुवात झाली. तेथून आखाती देशांमार्गे भारतीय बाजारपेठेमध्ये छुप्या मार्गाने सहज पोर्नच्या ‘व्हीएचएस’ भारतात दाखल होत असत. फ्रेन्च पोर्नोग्राफिक सिनेमा इम्मॅन्युएल (१९७४) याने या दशकामध्ये धुमाकूळ घातला होता. देशाला व्हीसीआर आणि व्हीसीपीचे वेड याच दशकात वाढीस लागले. या काळात व्हिडीओ, टीव्ही भाडेतत्त्वावर देणाऱ्या घटकांना मोठा व्यवसाय करून देणारा भाग होता तो पोर्न व्हीएचएसचा. मुंबईतील फोर्ट परिसर अमेरिकी व युरोपीय व्हीएचएसचे आगर असल्याचे, त्या काळात या उद्योगात काम करणाऱ्या व नंतर सीडी- डीव्हीडीच्या व्यवसायात उतरलेल्या इरफान या फोर्टमधील विक्रेत्याने सांगितले. सीडी-डीव्हीडी काळात जितका आर्थिक फायदा झाला नसेल, तेवढा व्हीएचएस काळात झाल्याचे तो सांगतो.

टप्पा २ : १९९२ ते १९९९
जागतिकीकरणानंतर चोरीछुपे चालणाऱ्या या व्यवहाराला गती लाभली. लोकांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आणि व्हीसीआर, व्हीसीपीची, रंगीत टीव्हीची स्वप्ने सत्यात अवतरायला लागली. आधी व्हिडीओ पार्लरविक्रेत्यांच्या फोर्टमधील असलेल्या गर्दीत पोर्न व्हीएचएसच्या सर्वसामान्य ग्राहकांमुळे आणखी वाढ झाली. पुरवठय़ाहून अधिक मागणी वाढू लागली. पण ही मागणी एका विशिष्ट काळापर्यंत टोकाला गेली आणि लगेचच खाली आली.
उपग्रह वाहिन्या आणि केबलक्रांतीमुळे घराघरांमध्ये अनियंत्रित परदेशी वाहिन्यांचा सुळसुळाट वाढला. त्यातच शनिवारी रात्री दूरदर्शनच्या दुसऱ्या वाहिनीवरून सॉफ्ट पोर्न दर्जाचे सिनेमे झळकू लागले. स्थानिक केबल ऑपरेटर्सनी विकेण्ड मनोरंजनाचा अतिरिक्त रतीब घालण्यास सुरुवात केली आणि शहरांमध्ये ‘निद्रानाशा’चा विकार वाढला. या काळातच टीव्ही, केबलमधील स्वैराचारावर बंदी घालण्याची मागणी राजकीय आणि सामाजिक स्तरांतून होऊ लागली. काही प्रमाणात केबलवरचा पोर्न सुळसुळाट कमी झाला. परदेशी वाहिन्यांवर चित्रपट कातरून दाखविण्याचे नियमन सुरू झाले. मात्र या नियंत्रणाचा उपयोग शून्य करणारे संगणक आणि इंटरनेट तोवर घराघरांत दाखल झाले. सायबर कॅफेची एक निराळी संस्कृती अल्पकाळासाठी फोफावली.

टप्पा ३ : १९९९ ते २००४
संगणक घरोघरी दाखल होत असले, तरी इंटरनेटची किंमत भरमसाट होती. तुलनेत सायबर कॅफेतील तासाचे दर कमी होते. त्यामुळे व्हिडिओ गेम आणि पोर्न या दोन गोष्टींसाठी सायबर कॅफेकडे तरुणांचा ओढा वाढला. पोर्न क्लिप्स आणि नग्न छायाचित्रांचा प्रचार आणि प्रसार संगणकामुळे सोपा होत होता. दरवर्षी अर्थसंकल्पामधून या काळात संगणकाचे सुटे भाग स्वस्त होण्याची तरतूद केली जात होती आणि संगणकाची किंमत मध्यमवर्गीय कुटुंबात परवडण्याजोगी झाली होती. या काळात सीडी उद्योग प्राथमिक स्वरूपात होता. पण सीडी रायटर जेव्हा संगणकाला लागला तेव्हा चित्रपट पायरसीसोबत पूरक म्हणून पोर्न पायरसी सुरू व्हायला लागली. घरगुती संगणक वाढल्यानंतर सीडीच्या अधिकृत आणि अनधिकृत उद्योगाला बळ मिळाले. सायबर संस्कृती लयाला जाण्यास येथे सुरुवात झाली. व्हिडीओ गेम आणि पोर्न डेकस्टॉपवर घरात पाहणे सोपे झाले.

टप्पा ४ : २००५ ते २००९
सीडी पायरसी उद्योग राज्यातील नाक्यानाक्यांवर विसावण्यामागे हिंदी, इंग्रजी चित्रपटांची सीडी विक्री महत्त्वाची नव्हती. या सीडीजव्यतिरिक्त त्यांच्याकडे असणाऱ्या सॉफ्ट आणि हार्डकोअर पोर्नविक्रीमध्ये खरी अर्थभरारी होती. सीडी-डीव्हीडी प्लेअर, पोर्टेबल सीडी प्लेअर यांची विक्री या काळात सर्वाधिक होती. शयनगृहामध्ये सॉफ्ट-हार्डकोअर सीडी-डीव्हीडी पाहणे अगदी स्वस्तातला मामला झाला. पेनड्राइव्ह बाजारपेठेत आल्यानंतर मात्र हे साधन मूल्यहीन झाले. या काळात सरकारी पातळीवर पोर्नपायरसी रोखण्याचे अनंत प्रयत्न झाले. मात्र पळवाटा काढत पोर्न प्रसार जोमाने होत राहिला. इंटरनेट पुरवठादार कंपन्यांनी स्पर्धा करीत ग्राहकांना अधिकाधिक वेगाचे इंटरनेट स्वस्तात पुरविण्यास सुरुवात केली.  २००८ काळापर्यंत इंटरनेटची ब्रॉडबॅण्ड सेवा सामान्यांच्या आवाक्यात आली. त्यानंतर सीडी उद्योगाला उतरती कळा लागली. तोपर्यंत मोफत पोर्न उपलब्ध करून देणाऱ्या लाखो साइट्सचा पर्याय भारतीय दर्शनमात्र पिढीला मिळाला.

टप्पा ५ : २००९ ते आजपर्यंतचा काळ
मध्यमवर्गासाठी पोर्न ही सवयीची गोष्ट करण्यात या काळाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हाय स्पीड इंटरनेट, मोफत साइट्सची भरभरून निर्मिती झाली. पोर्नस्टार्स फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत जाण्याच्या घटनांना मिळणारी प्रसिद्धी, अमेरिकेत या व्यवसायाने हॉलीवूडच्या व्यवसायावर केलेली मात आणि पोर्नसेलिब्रिटींच्या पुस्तकांना बेस्टसेलर यादीमध्ये मिळणारे स्थान यांचे प्रमाण सातत्याने वाढू लागले. जेना जेम्सन या पोर्नस्टारने आपल्या आत्मचरित्राने आधीच खळबळ उडवून दिली होती. त्यात अनेक लोकप्रिय पोर्नस्टार्स आपल्या जीवनाची कहाणी घेऊन पुस्तक व्यवहारात धनवान होत होते. पॉल थॉमस अ‍ॅण्डरसनचा पोर्न उद्योगाला गंभीर कहाणीचा विषय करणारा ‘बुगी नाइट्स’ (१९९९) हा चित्रपट या काळातला कल्टहीट सिनेमा होता. चक पाल्हानिकने पोर्न उद्योगावर टाकलेल्या क्ष-किरणांची कादंबरी ‘स्नफ’ या कालावधीत लोकप्रिय झाली. पोर्नस्टार्सना मुख्य प्रवाहात सेलिब्रेटींचे रूप आले. पोर्नस्टार्सचे हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात येणे-जाणे सामान्य घटना झाली. बॉलीवूडमध्ये सनी लिओनचे आगमन, आपल्याकडच्या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोजमध्ये पामेला अ‍ॅण्डरसन या सॉफ्टकोअर पोर्नस्टारचे आगमन हे बदलत्या सांस्कृतिक विचारांचे लक्षण होते. अमेरिकेच्या सन फर्नाडो व्हॅलीमध्ये होणाऱ्या या उद्योगाशी निगडित बित्तंबातम्यांशी भारतीय तरुण आज परिचित आहे.
ग्लोबलायझेशनच्या परिणामांचे हे अज्ञात परंतु वास्तव रूप आहे. त्यामुळे पोर्न बंदी किंवा कोणतीही कारवाई या दर्शनमात्र उरलेल्या पिढीला रोखू शकत नाही, ही या पिढीची खरी दास्तान आहे.
लेखन/ माहिती संकलन :  पंकज भोसले, नीरज पंडित, राजेन्द्र येवलेकर, उमेश जाधव