पुढच्यास ठेच, मागचा शहाणा हा नियम बहुधा प्रशासकीय यंत्रणांना मान्यच नसावा. तसे असते तर २६ जुलैच्या प्रलयकारी पावसानंतर वेगाने नागरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्हय़ाच्या विकासाचा निश्चित असा आराखडा एव्हाना तयार झाला असता आणि काही कठोर उपाययोजनाही आखल्या गेल्या असत्या. प्रत्यक्षात मागील दहा वर्षांत ठाणे आणि नव्याने निर्माण झालेल्या पालघर अशा दोन्ही जिल्हय़ांमधील प्रमुख शहरांचे आणि त्यालगत असलेल्या गावांचे भूमाफियांकडून अक्षरश: लचके तोडले जात आहेत. मागील दहा वर्षांत थोडीथोडकी नव्हे, तर ७५ हजारांहून अधिक बेकायदा बांधकामांचे इमले ठाणे, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, मुंब्रा, टिटवाळा यांसारख्या पट्टय़ात उभे राहिले आहे. या शहरांना लागून असलेल्या गावांमधील इंचन् इंच जमिनीवर बेकायदा चाळी, इमारतींचे पेव फुटले आहे. खाडीकिनारी तिवरांची अक्षरश: कत्तल सुरू आहे. किनारा बुजवून तेथेही बांधकामे केली जात आहेत. याच भागात यापूर्वी उभी राहिलेली बांधकामे एव्हाना धोकादायक ठरू लागली असून अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तितकाच गंभीर बनला आहे. एकंदरीत २६ जुलैनंतर ठाण्याची परिस्थिती केव्हाच हाताबाहेर गेली आहे.
ठाणे जिल्हय़ातील प्रमुख शहरांच्या वेशीला खेटून असलेल्या गावांचा भूमाफियांनी कब्जा केल्यामुळे आसपासच्या शहरांनाही आता पुराच्या पाण्याचा धोका दिसू लागला आहे. कल्याणलगत असलेल्या टिटवाळा शहराने २६ जुलैचा अपवाद वगळला तर कधीही पूर अनुभवला नव्हता. विस्तीर्ण अशा मोकळ्या जमिनींमुळे पाण्याचा निचरा होण्यास येथे भरपूर वाव असायचा. मागील पाच वर्षांत येथील परिस्थिती पूर्णत: पालटली आहे. जागोजागी बेकायदा चाळी उभ्या राहील्या आहेत. हे प्रमाण इतके वाढले आहे की, दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसात टिटवाळ्यात अनेक भागांत कंबरेभर पाणी तुंबले. कल्याण-डोंबिवली महापालिकेशी उभा दावा मांडत काही वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या डोंबिवलीलगतच्या २७ गावांमध्ये आता पाणी तुंबू लागले आहे. गेल्या दशकभरात ५० हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. नवी मुंबईतून बाहेर पडलेल्या ठाण्यालगतच्या १५ गावांमध्ये काही वेगळे चित्र नाही. येथील मोकळ्या जागा, गुरचरण जमिनी अक्षरश: गिळल्या जाऊ लागल्या आहेत. कल्याण, बदलापूरलगत घर असावे यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांना या भागातील बेकायदा घरांचे हे अनधिकृत बेट खुणावू लागले आहे.
खाडी गिळली जातेय..
ठाणे, पालघर जिल्हय़ाला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. २६ जुलैच्या पावसात पाण्याचा निचरा करण्यात या खाडीची मोठी साथ लाभली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत खाडीकिनारा गिळला जात आहे. २६ जुलैच्या प्रलयानंतर मुंब्रा, कळव्याच्या खाडीतील बेसुमार रेती उपसा थांबवा, अशी मागणी जोर धरू लागली होती. या उपशामुळे मध्य रेल्वेच्या मार्गाला धोका असल्याचे पर्यावरणप्रेमी अक्षरश: घसा कोरडा करून सांगत आहेत. मात्र, अपवादात्मक कारवाया सोडल्या तर मुंब्य्राच्या खाडीत ड्रेझर लावून सुरू असलेला उपसा अद्याप सुरूच आहे. २६ जुलैसारखा पाऊस पुन्हा पडला तर मध्य रेल्वेच्या मार्गाचे काही खरे नाही, अशी भीती प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही व्यक्त करतात. तरीही रेतीमाफियांचा धुडगूस सुरूच आहे.