जीएम तंत्रज्ञान आणि अमेरिकन संकरित वाणामुळे कापूस आयात करणारा आपला देश जगातील सर्वात मोठा निर्यातदार आणि उत्पादक झाला. मात्र नागपूर येथील मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेने आठ सुधारित देशी वाण तयार केले असून ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र याच संस्थेच्या केशव क्रांती यांनी शोधलेल्या वाणामुळे पूर्वी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने आता या ‘क्रांती’च्या कच्छपी लागणे धोकादायक ठरू शकते, हे सुचवणारा लेख.

सुधारित देशी वाणासंबंधी विवेक देशपांडे यांची बातमी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये १२ मे रोजी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीनुसार कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी नागपूरच्या मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेने (यापुढे थोडक्यात ‘संस्था’) आठ सुधारित देशी वाण तयार केले आहेत. हे सरळ वाण असल्याने पुन्हा बियाणे घेण्याची गरज नाही. कपाशीची प्रत मूळ देशी वाणापेक्षा चांगली आहे, असा दावा संस्थेचे संचालक केशव क्रांती यांनी केला आहे. १९४७ साली देशातील ९८ टक्के क्षेत्रात देशी कापसाचे वाण केले जात होते. मात्र पुढे देशी वाणाच्या क्षेत्रात सातत्याने घट होत गेली. २००२ मध्ये बीटी वाण आले, तेव्हा केवळ २५ टक्के क्षेत्र देशी वाणाखाली होते. तर आज फक्त २ टक्के क्षेत्र देशी वाणाखाली आहे. देशी वाणाचे क्षेत्र कमी झाले. याला अनेक कारणे होती. त्याचे एकरी उत्पादन अत्यंत कमी होते. त्याचा कापूस भरड, तंतूची लांबी कमी आणि कमी मजबूत होता. आधुनिक सूतगिरण्यांना लांब तंतू असलेला, तलम आणि जास्त ताकदीच्या कपाशीची गरज असते. देशी वाणाचा कापूस फक्त हातमागावर तयार होणाऱ्या कापडासाठीच वापरला जात असे. त्यामुळे मागणी कमी, गुणवत्ता कमी, दर कमी आणि एकरी उत्पादकता कमी. यामुळे देशी वाणाऐवजी संकरित वाणाकडे शेतकरी वळाले. २००२ मध्ये बीटी येण्यापूर्वीच ७५ टक्के शेतकरी संकरित वाण करीत होते. आता ९८ टक्के करतात. कारण बीटीमुळे संकरित वाण अधिक फायदेशीर व कमी खर्चाचे झाले.

तथापि केशव क्रांती यांना पावसावलंबी शेतीसाठी संकरित कपाशीचे वाण योग्य वाटत नाही. याचे कारण संकरित वाणाचे बियाणे महाग असते. प्रत्येक वर्षी नवे विकत घ्यावे लागते. तसेच पिकाचा कालावधी जास्त असल्याने रोग व किडीला बळी पडते. म्हणून संस्थेने आणि विविध राज्यांतील कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन ‘अखिल भारतीय समन्वयी कापूस संशोधन प्रकल्प’ हाती घेतला. जगात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पारंपरिक स्थानिक वाणाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे केशव क्रांती म्हणतात. या प्रयोगाला जीएम तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या सेवाभावी संस्था, डावे व उजवे विरोधक यांचा पाठिंबा असणे स्वाभाविक आहे. कारण बीटी वाणाचे फायदे इतके उघड आणि स्पष्ट  आहेत. ते शेतकऱ्यांना हवे आहेत. जादा किंमत देऊनही बीटी वाणाचे बियाणे घेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. त्यामुळे जीएम विरोधकांची मोठी पंचाईत होते.

संस्थेच्या पुढाकाराने आठ नवे सुधारित देशी वाण तयार केले आहेत. २०१५-१६ हंगामात त्याच्या व्यापक चाचण्या झाल्या आहेत. यापुढे ४ वष्रे विविध भागांत शेतचाचण्या झाल्यानंतर सदर वाण लागवडीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. सर्वसाधारण पद्धतीने एकरी २० हजार रोपे लावतात. त्यापासून एकरी ५ ते ७ क्विंटल इतके उत्पादन मिळते. मात्र दाट रोप लागण पद्धतीने ५५ हजार रोपे एकरी लावल्यास ७ ते ८ क्विंटल इतके उत्पादन येते. हे उत्पादन अमेरिकन हायब्रीड बीटी वाणाइतकेच असल्याचा दावा केशव क्रांती करतात. याशिवाय देशी वाणाच्या पिकाचा कालावधी फक्त ५ ते ६ महिन्यांचा आहे. या उलट संकरित बीटी वाणाला ८ महिने लागतात. यामुळे देशी वाण पावसाच्या उपलब्ध ओलाव्यात, कमी कालावधीत जास्त उत्पन्न देते. या शिवाय कमी कालावधीमुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.

जुन्या देशी वाणाच्या तुलनेने नव्या सुधारित देशी वाणाच्या कपाशीची गुणवत्ताही खूप चांगली आहे. हे सर्व वाचून, ‘आहे मनोहर तरी..’ असे मला वाटू लागले. देशी वाणाच्या डीएनएमध्ये केशव क्रांती यांनी काय सुधारणा केल्या जेणेकरून देशी वाणाच्या गुणधर्मामध्ये एवढे क्रांतिकारी बदल घडून आले? हे सर्व खरे असेल तर चांगलेच आहे. पण नसेल तर.. पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केशव क्रांती यांनी २००९ मध्ये बीटी बिकानेरी नरमा आणि २०१० साली बीटी नांदेड ४४ हे संकरित वाण मोठा गाजावाजा करून वितरित केले होते. हे दोन्ही वाण पूर्णपणे अयशस्वी ठरले. अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. केवळ एका वर्षांत हे बियाणे बाजारातून गायब झाले. शिवाय नवा बीटी जनुक शोधल्याचा केशव क्रांती यांचा दावा खोटा असल्याचेही सिद्ध झाले.

कृषी विद्यापीठात देशी सरळ वाणात सुधारणा करण्याचे प्रयोग गेली ११२ वष्रे सुरू आहेत. बऱ्याच वेळा ‘नवे सर्वगुणसंपन्न देशी वाण’ सापडल्याचा दावा संशोधकांनी केला होता. तरीही हे वाण शेतकऱ्यांना आणि या वाणाचा कापूस बाजारपेठेला पसंत पडला नाही. म्हणून हे सुधारित देशी वाण मागे पडले. बीटी येण्यापूर्वीच अमेरिकन संकरित वाणाने ७५ टक्के क्षेत्र व्यापले होते. बीटी कापूस वाणाचा खर्च जास्त येतो. कोरडवाहू शेतकऱ्यांना हा खर्च जास्त वाटतो. म्हणून कोरडवाहू कापूस शेतकरी आत्महत्या करीत आहेत असा समज पद्धतशीरपणे खोटा प्रचार करून समाजात रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बीटीमुळे तंत्रज्ञानाच्या रॉयल्टीमुळे एकरी ३०० रुपये जादा खर्च येतो. त्या तंत्रज्ञानामुळे होणारा फायदा अनेक पटीने जास्त होतो. तरीही एकरी ३०० रुपये जादा खर्च झाला म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असे म्हणणे योग्य नाही. नापिकीने सर्वच पीक गेल्याने आत्महत्या होतात. पाणी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात. त्याचा बीटी कापसाशी संबंध जोडणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश आहे. बीटी कापसाचे, तंत्रज्ञानाचे नाही.

केशव क्रांती यांनी देशी कपाशीच्या गुणवत्तेत खूप सुधारणा केल्याचा दावा केला आहे. पण ही सुधारणा फक्त देशी वाणाच्या तुलनेतच आहे. त्यांच्या सुधारणा खऱ्या आहेत हे मान्य केले तरीही हे वाण बाजारपेठेला मान्य होणारे नाही. ते म्हणतात जुन्या वाणाची तलमता ७ ते ८ मायक्रोनीर होती तर नव्या सुधारित देशी वाणात ४.५ ते ५ इतकी झाली आहे. हे खरे असेल तर ही गुणवत्तासुद्धा बाजारपेठेला मान्य नाही. भारतातील सर्व आधुनिक सूत गिरण्यांना ३.५ ते ४ मायक्रोनीरचा कापूसच लागतो. त्यामुळे या सुधारित देशी वाणाला देशात ग्राहक नाही, हे केशव क्रांती आणि कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी लक्षात घेतले पाहिजे.

देशी वाणाची एकरी रोप संख्या वाढवली तर उत्पादन वाढेल असे केशव क्रांती म्हणतात. रोप संख्या तिप्पट केल्यास बियाणांचा खर्चही तिप्पट होतो. तेव्हा बियाणाच्या किमतीतील बचतही कमी होते. शिवाय एकरी उत्पादकताही कमी होते. त्यामुळे या बियाणाचे आकर्षण शेतकऱ्यांना का वाटावे? शिवाय सुधारित देशी वाणाच्या कापसात झालेली सुधारणा ही जुन्या देशी वाणाच्या तुलनेत आहे. त्याची तुलना अमेरिकन वाणाशी केली नाही. देशी व अमेरिकन वाणात होणार फायदे-तोटे लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी संकरित अमेरिकन वाण स्वीकारले होते. त्यात काही फार मोठा बदल झाला आहे वाटत नाही. तरीही केशव क्रांती यांनी केवळ एक फिल्ड ट्रायल घेऊन केलेली घोषणा संशयास्पद वाटते. आता यशाचे श्रेय घेऊ पाहणारे केशव क्रांती ४-५ वर्षांनी अपयश सिद्ध झाल्यानंतर त्यांची जबाबदारी घेण्यासाठी संस्थेत नसतील. त्यामुळे केशव क्रांती यांचे काम वैज्ञानिक तथ्यावर आधारित कमी आणि राजकीय हेतूसाठी जास्त आहे असे वाटते.

सरकारच्या धोरणांनी व्यथित होऊन मोन्सॅटोचे भारतातील प्रमुख अधिकारी शिल्पा दिवेकर यांनी भारतातील व्यवसायाचा फेरविचार करावा लागेल असे मत व्यक्त  केले आहे. त्यांनी तसा काही निर्णय घेतलाच तर भारतीय संशोधकांनी पर्यायी स्वस्त, जास्त प्रभावी, जास्त उपयोगी संशोधन तयार केले आहे, हे सांगण्यासाठीच प्रसिद्धीची घाई केशव क्रांती यांना झाली आहे. केशव क्रांती यांच्या संशोधनाच्या दाव्यावर विश्वास ठेवून केंद्र सरकारने मोन्सॅटोला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असेल तर ते तोंडघशी पडतील. शेतकऱ्यांचे आणि देशाचे न भरून येणारे नुकसान होईल. २००२ मध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आणलेल्या दबावामुळे बीटी तंत्रज्ञान कापसात आले. कापूस उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती झाली. कापूस आयात करणारा देश जगातील सर्वात मोठा निर्यातदार आणि उत्पादक झाला. जीएम तंत्रज्ञान आणि अमेरिकन संकरित वाणाने ही क्रांती केली. याचे श्रेय त्यांना देऊन कौतुक करण्याऐवजी दोघांनाही हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. या आचरटपणामुळे कापूस उत्पादनापासून कापड उद्योगात झालेली ‘मेक इन इंडिया’ धोक्यात येणार आहे. पण वैचारिक अंधत्व आलेल्या सरकारला त्याची तमा नाही. अशा स्थितीत लोकांनी भयभीत होऊ नये म्हणून केशव क्रांतीच्या बोगस घोषणांनी कदाचित लोकांना दिलासा मिळेलही. पण विज्ञानाशी दुश्मनी करून देशाचे भले होईल काय?

 

– अजित नरदे 
लेखक कृषी तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत.
narde.ajit@gmail.com