वडिलांची नोकरी बदलीची असल्यामुळे सातत्याने प्रवास हा होताच, यामुळे मंदार यांचे शिक्षण वेगवेगळय़ा भागत झाले. मात्र त्यांचा शालेय जीवनातील महत्त्वाचा इयत्ता नववी आणि दहावीचा टप्पा पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत पार पडला. येथेच त्यांच्या मनात संशोधनाची बीजे रोवली गेली.

इयत्ता नववीमध्ये असताना त्यांच्या शाळेत पुणे विद्यापीठातील  प्रा. सतीश ओगले हे एका प्रयोगाचे सादरीकरण करण्याकरिता आले होते. त्यांचे सादरीकरण पूर्ण झाल्यावर आपणही वैज्ञानिक व्हायचे हे मंदार यांनी ठरविले. पुढे त्यांनी त्याच दृष्टीने शिक्षणक्रम निवडण्यास सुरुवात केली. दहावीनंतर पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी आयआयटी मुंबईत भौतिकशास्त्र अभियांत्रिकी या शाखेत प्रवेश घेतला. तेथे त्यांनी बी.टेक.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर पीएच.डी.साठी ते अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी सहा वष्रे कठोर मेहनत घेऊन पीएच.डी. पूर्ण केली. यानंतर पोस्ट डॉक्टरेटसाठी ते हार्वर्ड विद्यापीठात गेले. तेथील अनुभव संपादन करून त्यांनी मायदेशाची वाट धरली. जानेवारी २००६ मध्ये टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेत नोकरी स्वीकारली. येथे त्यांनी नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान या दोन्हींमधील दुवा म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या वैज्ञानिक संशोधनाची कास धरली. नोबेल पारितोषिकविजेत्या ग्राफिनच्या संशोधनावर ते काम करत आहेत. या संशोधनाचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सांधण्यासाठी होणार आहे. सध्या  वायर्सचा आकार लहान लहान होत चालला आहे. हा आकार किती जास्त लहान करता येईल आणि तो लहान केल्यावर त्यामध्ये कोणते गुणधर्म आढळतील याचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर सध्या विज्ञान क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध असून देशाची सेवा करत चांगले जीवन जगायची इच्छा असेल तर विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असेही मंदार यांनी स्पष्ट केले.