कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या अनेक भागांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतीपासून दुग्ध व्यवसायावर याचे दूरगामी  परिणाम संभवतात. मात्र सत्ताधाऱ्यांना या स्थितीचे काहीही वाटत नाही, हे जास्त गंभीर आहे..

मराठवाडा हा २०१४ व १५ मध्ये दुष्काळाचा केंद्रबिंदू होता. आता हेच केंद्र दक्षिणेकडे सरकत असल्याचे चित्र आहे. विशेषत: जुना म्हैसूर विभाग, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग तसेच केरळ व तामिळनाडूकडे पावसाने पाठ फिरवली आहे. २०१६ मध्ये कर्नाटकच्या दक्षिणेकडे नैर्ऋ त्य मान्सूनमध्ये (जून ते सप्टेंबर) २२ टक्के कमी पाऊस पडला होता. तर कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हेच प्रमाण २१ टक्के इतके राहिले. केरळमध्ये याहून परिस्थिती वाईट होती. तेथे सरासरीच्या ३४ टक्के इतका कमी पाऊस होता. तामिळनाडू व पुद्दुचेरीत हे प्रमाण २० टक्क्यांवर होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात या भागात नेहमी चांगला पाऊस पडतो. मात्र त्यानेही पाठ फिरवली हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. या पावसाचे प्रमाण अनुक्रमे उणे ७०, ६३ व ६२ इतके कमी होते. या वेळीही त्याची पुनरावृत्ती होणार अशी चिंता आहे. देशभरात मोसमी पावसाच्या कालावधीत प्रत्येक ठिकाणानुसार सरासरी ३४३.४ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. या वर्षी १९ जुलैपर्यंतचा विचार केला तर देशभरात मोसमी पाऊस हा सर्वसाधारण आहे. सरासरीच्या एक टक्का जादा म्हणजे ३३८.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. देशवासीयांसाठी पावसाच्या दृष्टीने ही समाधानाची बाब असताना कर्नाटकमध्ये मात्र आतापर्यंत तरी आशादायी स्थिती नाही. कर्नाटकच्या दक्षिण भागात आतापर्यंत पावसाचे प्रमाण उणे ३३ टक्के इतके तर किनारपट्टी भागात हीच तूट अकरा टक्क्यांपर्यंत आहे. केरळमध्ये उणे २४ तर तामिळनाडूत १९ टक्के पाऊस अपुरा आहे.

पावसाने ओढ दिल्याने धरणांतील पाणीसाठा तळाला गेला आहे. कर्नाटकमध्ये कावेरी खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठय़ाबाबत चिंताजनक स्थिती आहे. मंडय़ा जिल्ह्य़ातील कृष्णराज्य सागर, हसनमधील हेमवती, म्हैसूरमधील काबिनी व कोडगूमधील हरंगाई या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठा कमी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गेल्या वर्षी कर्नाटक सरकारला कृष्ण राज सागर व काबिनीमधून तामिळनाडूच्या सीमेवरील सालेम जिल्ह्य़ातील मेत्तूर धरणात पाणी सोडावे लागले. त्यानंतर म्हैसूर व मंडय़ा जिल्ह्य़ात हिंसक निदर्शने झाली. आंदोलनाचे लोण बेंगळूरुपर्यंत पोहोचले होते. बेंगळूरु-म्हैसूर द्रुतगती मार्गावर तामिळनाडूतील नोंदणी क्रमांक असलेली वाहने कन्नड गटांनी जाळली होती. या शिवाय तामिळनाडूतील हॉटेल व्यावसायिक व इतर व्यापारी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले होते. या वर्षी तर अपुऱ्या पावसाने चिंता आणखी वाढली आहे.

राजकारणाची मात्र भर

सततच्या दुष्काळाने धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यात आता कर्नाटक विधानसभा निवडणूक आठ महिन्यांत होणे अपेक्षित आहे. लाभासाठी राजकीय वातावरण आतापासूनच तापले आहे. बेंगळूरु मेट्रो स्थानकांमध्ये हिंदीमध्ये असलेले सर्व फलक हटविण्याची मागणी कन्नड गटांनी केली आहे. तसेच सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने राज्याचा स्वतंत्र ध्वज असावा काय, हे अभ्यासण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. आता हे सारे राजकारण सुरू असतानाच पुढील आठवडय़ासाठी हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे तोही फारसा आशादायी नाही. त्यामुळे चिंतेचे ढग अधिक दाटले आहेत. कर्नाटकच्या दक्षिण भागात काही ठिकाणी येत्या एक-दोन दिवसांत पाऊस, हा त्यातल्या त्यात दिलासा देणारा अंदाज असला तरी पावसाची तूट भरून निघणे कठीण आहे, असे हवामान खात्याचे अधिकारी मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले.

एकीकडे कर्नाटकमधील प्रमुख धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठय़ाने चिंता वाढविली असताना तामिळनाडूतही तशीच स्थिती आहे. तेथील मेत्तूर, भविनसागर (इरोड), वैगई (थेनी) किंवा अलियार तसेच कोइम्बतूर जिल्ह्य़ांतील शोलयार या धरणांमध्ये समाधानकारक पाणी नाही. भविनसागरचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नीलगिरी जिल्ह्य़ात अपुरा पाऊस पडला आहे किंवा पश्चिम घाटावरील अनिमलाई टेकडय़ांत अलियार व शोलयार यांच्या पाणलोट क्षेत्रात वरुणराजा रुसलेलाच आहे.

मेत्तूर धरणात कृष्णराय सागर किंवा कबानीतून पाणी येते. मात्र या धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे केरळमधील वायनाड जिल्हा. थोडक्यात पावसासाठी ही राज्ये एकमेकांवर अवलंबून आहेत. केरळच्या मुलापेरीयार धरणाच्या पाण्यावर तामिळनाडूच्या दक्षिणकेडील थेनी, दिंडीगुल, मदुराई, शिवगंगा व रामनाथपूरम या जिल्ह्य़ांतील शेतीला पाणी पुरवले जाते. थेनीतील वैगणी धरणातही तेथूनच पाणी जाते. तीच स्थिती केरळच्या पलक्कड जिल्ह्य़ातील परंबिकुलम धरणाची आहे. पश्चिम तामिळनाडूतील कोइम्बतूर-इरोड पट्टा त्यावर अवलंबून आहे. परंबिकुलम व मुलापेरियार या धरणांची देखभाल तामिळनाडूकडून केली जाते. त्याचा परिणाम म्हणजे केरळ-तामिळनाडू यांच्यात पाणीतंटा निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतील एका राज्यात पाऊस पडल्यास दुसऱ्या राज्यातील धरणसाठय़ावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मोसमी पावसाने दगा दिल्याने तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचा दक्षिण व किनारपट्टीचा भाग सलग दुसऱ्या वर्षी संकटात आहे.

सत्ताधाऱ्यांवर ठपका

अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती. जे सत्तेत आहेत त्यांना परिस्थितीचे गांभीर्य जाणवत नाही अशा शब्दांत आपली नाराजी कोइम्बतूर येथील सखी शुगरचे एम. मणिक्कम यांनी व्यक्त केली. तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन केले, मात्र सरकारला त्यानेही जाग आली नाही. अपुऱ्या पावसाने कर्नाटक व तामिळनाडूतील उसाला फटका बसणार आहे. या शिवाय दूध उत्पादनही घटणार आहे. त्याचा परिणाम कर्नाटकमधील म्हैसूर-मंडय़ा-बेंगळूरु व कोलार पट्टय़ातील दूध खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांवर होईल. टंचाईमुळे जनावरांना पाणी कुठून आणायचे ही चिंता सतावतेय. त्यामुळे तामिळनाडूतील दुग्ध व्यवसायही संकटात सापडला आहे. त्याचबरोबर कर्नाटकमधील बेल्लारी, दावणगिरी, हावेरी, चित्रदुर्ग या जिल्ह्य़ांमध्ये मका पिकवला जातो. अपुऱ्या पावसाने त्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे एकूणच वरुणराजा रुसल्याने दक्षिणेत चिंता भेडसावतेय.