पं. अजय पोहनकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक

भा रताचा पहिला अंतराळवीर होण्याचा बहुमान मिळालेले विंग कमांडर राकेश शर्मा यांनी अंतराळातून उच्चारलेले ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ हे वाक्य गौरवाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे.

भारत आणि रशिया या देशांच्या अवकाश संशोधन कार्यक्रमांतर्गत शर्मा यांना भारताचा पहिला अंतराळवीर होण्याची संधी मिळाली. अंतराळ प्रवासात असतानाच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि वरून भारत कसा दिसतो, असा प्रश्न शर्मा यांना केला. तेव्हा शर्मा यांनी क्षणाचाही विलंब न लावता इंदिरा गांधी यांना ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ असे उत्तर दिले.

२ एप्रिल १९८४ रोजी घडलेली ही घटना आणि प्रसंग माझ्यासाठी आणि तमाम भारतीयांसाठीही नक्कीच अभिमानाचा आहे. आजच्या प्रमाणे प्रसारमाध्यमांची संख्या तेव्हा नव्हती. माझ्या आठवणीप्रमाणे दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात हे दृश्य दाखविले गेले. आकाशवाणीवरूनही त्याचे प्रसारण केले गेले.  शर्मा यांचे ते उद्गार आजही अंगावर रोमांच उभे करतात. तो क्षण विसरू शकत नाही.

विविध राष्ट्रांशी स्नेहभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील लहान-मोठय़ा राष्ट्रांना भेट देऊन त्या त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधत आहेत. इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. या सगळ्यांतून मोदी त्या त्या देशांशी आणि राष्ट्रप्रमुखांशी राजकीय, सामाजिक, व्यापार-उद्योग, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रांत सलोख्याचे, सौहार्दाचे नाते नव्याने जोडत आहेत. या सगळ्याचा देशाला नक्कीच फायदा होणार असून भविष्यात त्यातून काही क्रांतिकारक घडू शकते. मोदी यांचा हा संवादही देशासाठी गौरवास्पद क्षण आहे.