गावात भरलेल्या जत्रेत कोण मुलं जाऊन आलीत हे त्यांच्या हातातील पिपाणीवरून जसे समजते तसेच ज्यांच्या हातात इंडियन सायन्स काँग्रेसमधील सहभागाचे प्रमाणपत्र आहे ती मुले विज्ञानाच्या या जत्रेत सहभागी झाली होती हे समजायचं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवाचा विकास हा उदात्त हेतू समोर ठेवून १०२व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ची सुरुवात झाली. सुरुवातीपासून विविध वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या या परिषदेत सहभागी होऊन या विद्यार्थ्यांना विज्ञानाची भविष्यातील दिशा मिळाली, की विज्ञानाचा इतिहास समजला, की मुंबई दर्शन झाले, हा एक वेगळा संशोधनाचाच विषय ठरू शकतो.

कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीमध्ये १९१४मध्ये रसायनशास्त्रातील प्राध्यापक जे. एल. सिमॉन्सन आणि प्राध्यापक पी. एस. मॅकम्होन यांनी देशात विज्ञानामध्ये नेमके कोणते संशोधन सुरू आहे, देशातील वैज्ञानिकांना त्यांचे प्रबंध मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने पहिलीवहिली इंडियन सायन्स काँग्रेस आयोजित केली. या पहिल्या सायन्स काँग्रेसमध्ये देशातील १०५ वैज्ञानिक सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील भव्य प्रांगणात पार पडलेल्या १०२व्या सायन्स काँग्रेसमध्ये तब्बल १५ हजार विद्यार्थी, प्राध्यापक, वैज्ञानिक सहभागी झाले होते. म्हणजे विज्ञानाची जणू एक जत्राच भरली होती. विज्ञानासाठी एवढय़ा मोठय़ा संख्येने लोक उपस्थित राहण्याची ही देशातील पहिलीच वेळ असावी, कारण आजपर्यंतच्या सायन्स काँग्रेस किंवा इतर वैज्ञानिक परिषदांमध्ये एवढी उपस्थिती कधीच पाहायला मिळाली नव्हती. विज्ञानासाठी एवढे जण एकत्र आले, ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे विज्ञानप्रेमींना वाटू लागले. मात्र उपस्थितांना विज्ञानाबरोबरच भारतीय इतिहासाचे अजब वैज्ञानिक किस्सेही ऐकावे लागले.
वादाचे विज्ञान
सायन्स काँग्रेस सुरू होण्यापासून यात चर्चेत येणाऱ्या विषयांवर जागतिक पातळीवर चर्चा रंगली. नासातील एका वैज्ञानिकाने या परिषदेत ‘संस्कृतमधील प्राचीन विज्ञान’ या विषयावरील परिसंवादातील ‘प्राचीन भारतीय हवाई उड्डाण तंत्रज्ञान’ या विषयाला कोणताच वैज्ञानिक आधार नसल्याने तो या विज्ञानविषयक परिषदेत समाविष्ट करण्यावरच नासामधील एका भारतीय संशोधकाने आक्षेप घेत थेट ऑनलाइन याचिकाही दाखल केली होती. या याचिकेला तब्बल २०० हून अधिक वैज्ञानिकांनीही पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर तरी हा विषय रद्द केला जाईल अशी अपेक्षा आयोजनातील विज्ञानमहर्षीकडून होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. यामुळे परिसंवादात आयोजित करण्यासाठी त्या-त्या विषयातील तज्ज्ञनेमले जातात आणि त्यांच्यावर परिसंवादांतर्गत येणारे उपविषय आणि त्यावर बोलणारे तज्ज्ञ नेमण्याची जबाबदारी असते. या जबाबदारीमध्ये सहसा आयोजक समितीमधील कुणी दखल घेत नाही. तरीही एखाद्या विषयावर जर कार्यक्रमापूर्वी आक्षेप घेतला गेला असेल आणि त्या आक्षेपाने विज्ञानाचे हित साध्य होणार असेल तर आयोजकांनी दखल घेऊन सुधारणा करणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही आणि म्हणूनच सायन्स काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी वादग्रस्त विषय परिसंवादात आला तेव्हा विमानाचा शोध राइट बंधूंनी लावल्याचा इतिहास आपल्याला ज्ञात असला तरी भारतात सात हजार वर्षांपूर्वी विमान अस्तित्वात होते. इतकेच नव्हे तर आताच्या विमानांपेक्षा किती तरी ‘अॅडव्हान्स’ आणि जंबो आकाराची असलेली ही विमाने उलटसुलट पद्धतीने उडण्याच्या करामतीही आकाशात करू शकत होती, असा खळबळजनक दावा ‘पायलट ट्रेनिंग सेंटर’चे निवृत्त प्राचार्य कॅप्टन आनंद बोडस यांनी केला; पण महर्षी भारद्वाजलिखित वेदकालीन संहितेचा आधार वगळता आपल्या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही भौतिक स्वरूपाचा पुरावा बोडस आणि त्यांच्या या विषयाच्या अभ्यासात सहकारी असलेल्या अमेया जाधव यांच्याकडे नाही. मग या विषयावरून वादाला तोंड फुटले. हा वाद रंगत असतानाच सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्या राजकारण्यांनीही पुराणकथांकडेच विशेष लक्ष पुरविले. यामुळेच ही सायन्स काँग्रेस वर्तमानकाळातील विज्ञानाची माहिती देतानाच भविष्यातील विज्ञानवेध घेणारी आहे, की आजपर्यंत न समजलेल्या ऐतिहासिक वैज्ञानिक घटनांची ओळख करून देणारी आहे असे वाटू लागले. याचबरोबर अनेक परिसंवादांमध्ये मतमतांतरेही ऐकावयास मिळत होती. हवामान बदलाच्या परिसंवादात दोन वक्त्यांच्या बोलण्यातील मतांतरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसंवादात एका वक्त्यांनी हवामान बदलाला मानवी उत्पातच कारणीभूत असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या वक्त्याने हे विधान अपूर्ण असून हवामान बदल ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे काही जुन्या उदाहरणांवरून पटवून दिले, तर काही सत्रांचे वक्ते अनुपस्थित राहिल्यानेही सत्रांच्या आयोजनात गडबड झाली. काही वक्त्यांनी आपले प्रेझेंटेशन रेकॉर्ड करून पाठविले होते, त्यामुळे त्या वक्त्यांची मते लोकांना कळली खरी; पण त्याच्यावरील प्रश्नोत्तरे मात्र होऊ शकली नाहीत.
वैज्ञानिक माहिती
विज्ञान परिषदेतील अनेक व्याख्याने म्हणजे जणू विकिपीडियाच होती. आजपर्यंत अमुक क्षेत्रात काय घडले याचीच माहिती दिली जात होती. अर्थात वैज्ञानिकांकडून काही मोठय़ा घोषणांची अपेक्षा नाहीच; पण भविष्यात विज्ञानातील हा अभ्यास आपल्याला कुठे घेऊन जाईल याबद्दलचा तपशील मात्र फारच कमी असल्याचे जाणवले. अर्थात ही माहितीही खूप अभ्यासपूर्ण होती. यामुळे नव्याने विज्ञान क्षेत्रात अभ्यास करणाऱ्यांना तसेच विज्ञान अभ्यासाशी संबंध नसलेले, पण विज्ञानाची आवड असलेल्यांना या माहितीचा खूप उपयोग झाला. गत वर्षांत सर्वच भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब ठरलेल्या मंगळयान मोहिमेविषयी वेगळे ऐकायला मिळेल, याचबरोबर माणसाच्या अंतराळ मोहिमेची अतिरिक्त माहिती मिळेल, अशी अपेक्षा अनेकांची होती. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या माहितीपेक्षा काही थोडा भाग वगळता इतर त्याच गोष्टींची पुनरावृत्ती याविषयी आयोजित मुलाखतीमध्ये दिसून आली.
व्याख्यानगृह रिकामेच
पाच दिवस रंगलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये चर्चेसाठी निवडण्यात आलेले विषय अभ्यासाच्या दृष्टीने खूप चांगले होते. यामुळे दिवसाला सहा ते आठ परिसंवाद, प्रबंध सादरीकरण, दोन ते तीन चर्चासत्रे असा भरगच्च कार्यक्रम सायन्स काँग्रेसमध्ये आखण्यात आला होता, तर काँग्रेसला नोंदणी असलेल्यांची संख्या एकूण १५ हजार इतकी होती. यातच आयत्या वेळी येणाऱ्या आगंतुकांचीही भर पडायची. यामुळे या व्याख्यानांना आणि परिसंवादांना किमान १०० जण तरी असणे अपेक्षित असायचे. मात्र अनेक चांगल्या परिसंवादांना सभागृहामध्ये जेमतेम ४० ते ५० जणांची उपस्थिती असायची.
मुंबईदर्शन महत्त्वाचे
प्रसारमाध्यम, काही विज्ञानप्रेमी यांनी या वादात रमलेले असताना सहभागी झालेल्या विद्यार्थी तसेच बहुतांश महाविद्यालयीन प्राध्यापकांना या चर्चेचा गंधही नव्हता. उद्घाटनाचा दिवस संपल्यावर देशातील विविध भागांतून सहभागी झालेले विद्यार्थी, प्राध्यापक मुंबईदर्शनच्या प्रवासाला रवाना झाले.
सायन्स काँग्रेसने काय दिले?
या सायन्स काँग्रेसने काय दिले याबाबत विविधांगांनी ऊहापोह होऊ शकतो. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रथमच विज्ञानासाठी देशातील विविध भागांतून एवढी मंडळी एकत्र आली. यामध्ये चर्चेसाठी निवडलेले विषय (अर्थात काही विषय वगळता) आणि संबंधित वक्त्यांनी त्यावर मांडलेले विचार हे नक्कीच अभ्यासपूर्ण होते, तर नोबेल विजेत्यांना ऐकणे ही मुंबईकरांसाठी यानिमित्ताने एक पर्वणीच ठरली. यामुळे व्याख्यानाचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा झाला. चर्चेला आलेल्या काही विषयांनी पुढची दिशाही दिली. यात भविष्यात कचरा व्यवस्थापन ही मोठी समस्या असेल, असा सूर समोर आला. यावर तोडगा काढण्यासाठी विविध पातळय़ांवर प्रयोग सुरू असल्याचे सांगण्यात आले, तर शिक्षणाविषयी पार पडलेल्या परिसंवादात शिक्षणातील अभ्यासक्रमांच्या बदलांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संपूर्ण विकास या संकल्पनेवर आधारित परिसंवादातही भविष्यात सरकारने उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. बहुतांश परिसंवादांमध्ये स्वच्छता अभियान आणि मेक इन इंडिया या दोन सरकारी मोहिमांवर विशेष चर्चा रंगली. मेक इन इंडियाबाबतीत बोलताना अनेकांनी परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादननिर्मिती करण्यासाठी स्थान देण्यापेक्षा देशी लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे परखड मत मांडले, तर संशोधनावरील सरकारी गुंतवणूक वाढवावी व ज्या कंपन्या संशोधनात गुंतवणूक करतात त्यांना सवलतही द्यावी, असेही नमूद करण्यात आले. पाच दिवस मुंबई विद्यापीठात रंगलेल्या या सायन्स काँग्रेसमध्ये अनेक चांगल्या विषयांवरही चर्चा झाली. त्यातील अनेक चांगल्या मुद्दय़ांवर काम होणेही गरजेचे आहे; पण आजपर्यंतची राजकीय इच्छाशक्ती पाहता हेही विचारमंथन जाडजूड कागदावर छापून उमटवले जाईल आणि वाचनालयात जागा मिळवेल असेच वाटते.

चांगल्या विषयांकडे दुर्लक्ष
मुंबईत पार पडलेली इंडियन सायन्स काँग्रेस अभ्यासात्मकदृष्टय़ा खूप चांगली होती. त्यातील अनेक विषय खरोखरीच वेगळे आणि महत्त्वपूर्ण होते; पण एका विषयाबद्दलच्या लहानशा निष्काळजीपणामुळे त्यावरून वाद झाला आणि साऱ्या सायन्स काँग्रेसमधील चांगल्या विषयांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत वाटते.
-प्रा. मयांक वाहिया, टीआयएफआर

नोबेल विजेत्यांचे मार्गदर्शन उत्तम
मुंबईच्या लोकांना देशभरच्या विज्ञानामध्ये काम करणाऱ्या चांगल्या लोकांची भाषणे ऐकायला मिळाली. विशेषत: गणितावर चांगल्या दर्जाची व्याख्याने झाली. तसेच नोबेल विजेत्यांचे मार्गदर्शन आणि इतर वैज्ञानिकांनी सादर केलेले प्रबंधही चांगले होते. शिक्षणाशी संबंधित परिसंवादातूनही चांगल्या बाबी समोर आल्या; पण प्राचीन भारताच्या विज्ञानाविषयी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादातून वाद उठला. या वादामुळे संपूर्ण सायन्स काँग्रेसच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे करणे चुकीचे ठरेल. चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये एक खंत लागली, ती म्हणजे अनेक कार्यक्रमांना उपस्थिती चांगली नव्हती. मुंबईत आलो म्हणजे फिरायला जायचे, ही भारतीय मानसिकता असल्याने अनेकांनी त्यात धन्यता मानल्याचे वाटते.
-डॉ. हेमचंद्र प्रधान, माजी संचालक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र

 नीरज पंडित