अ‍ॅपलप्रेमींसाठी सप्टेंबर महिना म्हणजे एक पर्वणीच असते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात अ‍ॅपल कंपनी नवे तंत्रज्ञान जगासमोर घेऊन येते आणि तंत्रप्रेमींना अधिकाधिक मोहात पाडते. या वर्षी कंपनीचा दहावा वर्धापन दिन असणार आहे. यामुळे आपल्या ग्राहकांना काही तरी खास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कंपनी सध्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर विशेष भर देत असल्याचे मुख्याधिकारी टिम कूक यांनी सांगितले. यानंतर अर्थविषयक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आयफोन ८सोबत कंपनी ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित चष्माही बाजारात आणणार आहे. तसे पाहायला गेले तर ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हे तंत्रज्ञान तसे जुनेच, आपण अनेकदा त्याचा वापरही केला आहे किंवा करत आहोत. मात्र त्यात सातत्याने नवसंशोधन होत असल्याने प्रत्येक वेळी त्याचे नवे रूप समोर येते. अ‍ॅपलच्या मुख्याधिकाऱ्यांच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा हे तंत्रज्ञान चर्चेत आले आहे. पाहू या काय आहे हे तंत्रज्ञान.

काय आहे हे तंत्रज्ञान

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Harsh Goenka shares video of new palm payment method in China Tech continues to simplify our lives
चीनमध्ये आता तळहात स्कॅन करून दिले जातात पैसे! ‘Palm Payment’चा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जगभरातील स्मार्टफोनधारकांना वेड लावणारा पोकेमॉन गो हा गेम उदाहरण म्हणून घेऊ या. या गेममुळे अँग्री बर्डस, कॅण्डी क्रश, टेम्पल रनसारखे मोबाइलमध्ये राज्य गाजविणारे गेम्स गेमच्या यादीतून बाहेर फेकले जात होते. संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या या गेममध्ये ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा वापर करण्यात आला होता. या गेमच्या माध्यमातून मोबाइलवर ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा मोठय़ा प्रमाणावर वापर झाला. यामुळेच पॉकेमॉन हा गेम त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे सर्वत्र लोकप्रिय झाला. असं तंत्रज्ञान ज्यामुळे आभासी वास्तव (व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी) आणि वास्तव जग (रिअ‍ॅलिटी) यांच्यातली दरी कमी झाली आहे. खरं तर या दोन्हींचा मेळ घालूनच हा गेम बनवण्यात आला आहे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. सोप्या शब्दात ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे काय सांगायचं झालं तर वास्तव जगावर आभासी वास्तवाच केलेलं अध्यारोपण (सुपरइम्पोज) असं म्हणता येईल. ग्राफिक्स, साऊंडचा वापर करून एक आभासी जग तयार करायचं आणि हे आभासी जग नंतर वास्तवातील जगासोबत किंवा आपल्या भोवतालच्या परिसराशी जोडून टाकायचं. उदाहरणार्थ- आपण राहतो त्या रस्त्यावर काही वाण्याची दुकानं आहे. आभासी जगामध्ये व्हच्र्युअली सोन्याच्या खाणी तयार केलेल्या आहेत. आता या खाणींची वाण्याच्या दुकानांसोबत अदलाबदल केली. त्यातून जी तयार झाली ती आहे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी. पॉकेमॉन गोमध्ये नेमके हेच केले.

तंत्रज्ञानाचा विकास

याचा पहिला वापर १९९२मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाने केला. अमेरिकन हवाई दलाच्या आर्मस्ट्राँग प्रयोगशाळेत ‘व्हच्र्युअल फिक्स्चर्स’ प्रणाली विकसित करण्यात आली. यानंतर हे तंत्रज्ञान दोन हजारच्या दशकात जगासमोर खुले झाले. यानंतर यामध्ये विविध संशोधन करण्यास सुरुवात झाली. या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांपैकी काही मोजक्या लोकांमध्ये प्रणव मिस्त्री हा एक भारतीय माणूसही आहे. त्याने २००९ एमआयटी मीडिया लॅबमध्ये सिक्स्थ सेन्स हा प्रकल्प तयार केला. हाताच्या बोटाचा कॅमेरा करून छायाचित्र टिपण्याच्या त्याच्या सादरीकरणामुळे एमआयटीच्या ‘टेड’ व्याख्यानमालेत उपस्थित सर्वच तंत्रपंडित भारावून गेले होते. या प्रयोगात कॅमेरा, एक छोटा प्रोजेक्टर, स्मार्टफोन आणि आरसा याच्या साह्याने एक उपकरण तयार करण्यात आले होते. ते छोटेखानी उपकरण गळय़ात अडकवून दोन्ही हाताचे पहिले बोट वा अंगठा यावर चार वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या लावण्यात आल्या होत्या. कॅमेरा आणि आरशाचा वापर करून भवतालच्या परिसराचे एक छायाचित्र टिपले जाते. हे छायाचित्र सोबत जोडलेल्या स्मार्टफोनमध्ये पाठवले जाते.

दैनंदिन जीवनातील वापर

मिस्त्रीच्या याच तंत्रज्ञानाचा वापर करून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा वापर करणारे अनेक अ‍ॅप्सही बाजारात आले आहेत. हे तंत्रज्ञान इतके पुढे गेले की वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या जाहिरातीचे छायाचित्र स्मार्टफोनवर घेऊन ते ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित अ‍ॅपमध्ये पाठविले तर त्याचा तपशील किंवा अगदी त्या जाहिरातीचा व्हिडीओदेखील आपल्याला पाहता येऊ शकतो. याचा वापर आता प्रत्यक्ष जीवनातही होऊ लागला आहे. नेदरलँडमध्ये लेयर या अ‍ॅपच्या माध्यमातून एखाद्या बििल्डगच्या दिशेने स्मार्टफोन धरून कॅमेरा सुरू केला की त्या बििल्डगमध्ये असणाऱ्या सर्व कार्यालयांची नावे स्क्रीनवर येतात. एवढेच नाही तर तिथे नोकरीसाठी जागा आहे का हेसुद्धा स्क्रीनवर दाखवले जाते. अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएसवर अशी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मॉलमधील गेमिंग झोनमध्ये खेळले जाणारे वेबकॅम आधारित फूटबॉल किंवा बास्केटबॉलसारखे गेम्स याच तंत्रज्ञानावर आधारित आहेत. इतकेच नव्हे तर लष्करातही याचा वापर होऊ लागला आहे. एरकॅन टेक्नॉलॉजी या कॅनेडियन कंपनी अमेरिकन लष्कराला या तंत्रज्ञानावर आधारित उपकरणेही विकली आहेत. यामध्ये शत्रुपक्षाच्या भागातील काही माहिती जवानाला थेट मिळू शकणार आहे. याचबरोबर सध्या काही मॉल्समध्ये किंवा ई-व्यापार संकेतस्थळांवर कपडय़ांच्या विभागात आभासी ट्रायल रूम्स दिसतात. या रूम्सही याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केलेल्या आहेत.

तंत्रज्ञानातील आव्हाने

हे तंत्रज्ञान झपाटय़ाने विकसित होत असले तरी यामध्ये अनेक आव्हाने आहेत, ज्यामुळे तंत्रपंडितांना आजही तंत्रज्ञान विकसित करताना झटावे लागत आहे. यातील सर्वात मोठे आव्हान हे जीपीएस प्रणालीची सक्षमता. जीपीएस प्रणालीमध्ये आपल्याला दाखविले जाणारे ठिकाण हे ३० फुटांच्या परिघातील असू शकते. याचबरोबर बंद खोलीत किंवा जास्त गर्दीच्या भागात ही प्रणाली प्रभावीपणे काम करू शकत नाही. याचबरोबर हे तंत्रज्ञान केवळ स्मार्टफोनवर वापरता येऊ शकत नाही. यासाठी वेगळी उपकरणे विकसित करणे आवश्यक ठरणार आहे. या दृष्टीने आता कंपन्या संशोधन करू लागल्या असून लवकरच या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दिवाणखाण्यातील प्रत्येक गोष्टीशी जोडला जाऊ शकणार आहे.

संकलन – नीरज पंडित

niraj.pandit@expressindia.com