‘अंतराळ आपल्याला दुसरी संधी देणार नाही..’ यामुळे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हायचा निर्धार घेऊनच आयआयटी मुंबईने विकसित केलेल्या ‘प्रथम’ या उपग्रह प्रकल्पाची सध्याची प्रमुख मानवी धवन हिने दोन वर्षांपासून अखेरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्या चमूला जोडून ठेवले होते. त्याच नेतृत्वाचे हे यश असल्याची भावना आयआयटी मुंबईत सोमवारी प्रथमच्या प्रक्षेपणानंतर जाणवत होती.

नऊ वर्षांपासून आयआयटी मुंबईतील विद्यार्थी या प्रकल्पावर काम करत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण संपले की ते प्रकल्पाच्या समितीमधून बाहेर पडत असे, मात्र प्रकल्पाशी तितक्याच आत्मीयतेने जोडलेले असायचे. असे सर्व आजी-माजी विद्यार्थी सोमवारी सकाळपासून आयआयटी संकुलातील व्हीएमसीसीमध्ये जमले होते. इस्रोवरून याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. यानातील विविध उपग्रहांची माहिती देत असताना प्रथमची माहिती समोर येताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. उड्डाणीसाठी आता तीन मिनिटे उरली होती. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाबरोबरच थोडी भीतीही जाणवत होती. अखेर दहा सेकंद असताना श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर आहोत असे भासावे अशी उलटी गणती उपस्थित विद्यार्थ्यांनी सुरू केली आणि यान अंतराळाच्या दिशेने झेपावले. यान झेपावतातच आयआयटीचा परिसर विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने दुमदुमून गेला. नऊ वाजून बारा मिनिटांनी झेपावलेले हे यान साडेनऊच्या सुमारास अंतराळात प्रवास करू लागले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पुन्हा एकदा ११ वाजून २६ मिनिटांनी जल्लोष झाला तो उपग्रह निश्चित ठिकाणी उतरविण्यात आल्यानंतरचा. सध्या अमेरिकेत असलेले या प्रकल्पाच्या माजी चमूतील काही विद्यार्थी व सध्या प्रकल्पाची संकल्पना मांडणारे शशांक तामसकर आणि सप्तर्षी बंडोपाध्याय हे सर्व सॅन फ्रॅन्सिस्को येथे एकत्र येऊन  हा जल्लोष अनुभवत होते. आयआयटीमधील प्राध्यापक व संस्थेचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. प्रथमच्या चमूने आयआयटी मुंबईला भेट म्हणून ‘प्रथम’ या उपग्रहाची प्रतिकृती दिली.

प्रथमचा तपशील

  • वजन- १०.१५ किलोग्रॅम
  • आकार- ३०.५ सेमी बाय ३३.५ सेमी बाय ४६.६ सेमी
  • उद्देश- वातावरणातील विद्युत परमाणू मोजणे. हे समजल्यानंतर त्यामुळे जीपीएस प्रणालीत येणारे अडथळे दूर करणे शक्य होणार आहे.

घटनाक्रम

  • ऑगस्ट ते ऑक्टोबर २००७- आयआयटी मुंबईत संकल्पना मांडणे.
  • ऑगस्ट ते सप्टेंबर २००८- संकल्पनात्मक रचनेचे काम पूर्ण.
  • सप्टेंबर २००९- इस्रोसोबत सामंजस्य करार.
  • डिसेंबर २००९- प्राथमिक रचनेचे काम पूर्ण.
  • ऑगस्ट ते सप्टेंबर २०१०- तपशीलवार रचनेचे काम पूर्ण.
  • एप्रिल २०१२- उपग्रहाच्या कामकाजाचे परीक्षण.
  • मार्च २०१४- सामंजस्य कराराला मुदतवाढ.
  • १ ते ३१ डिसेंबर २०१४- विविध चाचण्या.
  • २०१५- इस्रोपासून विविध स्तरांवरील विविध चाचण्या पूर्ण केल्या.

यापूर्वी प्रक्षेपित झालेले विद्यार्थी उपग्रह

  • अनुसॅट- इस्रोने प्रक्षेपित केलेला चेन्नई येथील अन्ना विद्यापीठाचा हा पहिला विद्यार्थी उपग्रह. या उपग्रहाचे प्रक्षेपण २० एप्रिल २००९ मध्ये करण्यात आले होते. दोन वर्षांची मुदत असलेल्या या ३८ किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाने तब्बल एक वर्ष अधिक काम केले. या उपग्रहाच्या माध्यमातून अनेक निरीक्षणे नोंदविण्यात आली असून याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अंतराळ अभ्यासासाठी होत आहे.
  • स्टुडसॅट- १२ जुलै २०१० रोजी इस्रोने हैद्राबाद आणि बेंगळुरू येथील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या स्टुडसॅटचे प्रक्षेपण केले. हा उपग्रह अवघ्या ९५० ग्रॅमचा होता. याच्या माध्यमातून भूपृष्ठावरील विविध छायाचित्रे टिपण्याचे काम करण्यात आले.
  • एसआरएमसॅट- एसआरएम विद्यापीठाने विकसित केलेल्या या उपग्रहाचे प्रक्षेपण इस्रोने १२ ऑक्टोबर २०११ रोजी केले. या उपग्रहाच्या माध्यमतून वातावरणातील कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनच्या पातळीची नोंद करण्यात आली आहे.
  • जुग्नू- आयआयटी कानपूर येथील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचे प्रक्षेपण १२ ऑक्टोबर २०११ रोजी करण्यात आले. तीन किलो वजनाच्या या उपग्रहाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी आवश्यक माहिती जमविण्यात आली. याचबरोबर आपत्ती निरीक्षणही करण्यात आले.
  • सत्यभामासॅट- चेन्नई येथील सत्यभामा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचे प्रक्षेपण २२ जून २०१६ रोजी करण्यात आले. बाष्प, कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि हायड्रोजन फ्लुराइड अशा हरित गृह वायूंचा तपशील गोळा करण्याचे काम या उपग्रहाच्या माध्यमातून सुरू आहे.
  • स्वयम- पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचे प्रक्षेपणही २२ जून २०१६ रोजी करण्यात आले. हॅम रेडिओ कम्युनिटीला जोडण्याचे काम या उपग्रहाच्या माध्यमातून सुरू आहे.

उपग्रहाचे प्रक्षेपण होणे हे जितके महत्त्वाचे होते तितकेच महत्त्वाचे त्याच्याशी संपर्क होणे आहे. उड्डाण झाल्यानंतर ठरलेल्या वेळेत हा उपग्रह कक्षेत उतरविण्यात आला. पुढे तो स्थिरावण्यासाठी चार ते पाच तास जाणार असून सोमवारी रात्री उशिरा तो भारतावरून फिरत असताना त्यातून संदेश मिळेल. हा संदेश मिळण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. चार महिने या उपग्रहावर काम केल्यानंतरच पुढे नवीन काय करायचे हे निश्चित केले जाईल.

रत्नेश मिश्रा, प्रकल्पप्रमुख

हा प्रकल्प यशस्वी करायचाच या उद्देशानेच पहिल्यापासून काम सुरू होते. तेच काम आम्हीही सुरू ठेवले आणि सोमवारी त्याचे प्रक्षेपण झाले आणि यशाचा पहिला टप्पा आहे. अजून तीन टप्पे पार करायचे असून ते झाल्यावरच प्रकल्पाला १०० टक्के यश मिळाल्याचे आम्ही मानू.

मानवी धवन, प्रकल्पप्रमुख

या प्रकल्पात सहभागी आजी-माजी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. या विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आज आयआयटी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असताना मला सातत्याने इस्रोमधून संपर्क केला जात होता व मुलांच्या कामाचे कौतुक केले जात होते. विद्यार्थ्यांनी असेच काम यापुढेही सुरू ठेवावे व ‘प्रथम’नंतरही संस्थेचे आणखी काही उपग्रह अवकाशात झेपवावेत.

डॉ. देवांग खक्कर, संचालक, आयआयटी