साहित्य, संगीत आणि कला या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या प्रथितयश व्यक्तींना अधिक जवळून समजून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे पहिले पुष्प ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भरप्पा यांच्यासह, तर दुसरे पुष्प पं. सत्यशील देशपांडे यांच्यासह रंगले होते. शनिवारी ‘जी ५ए’ या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जावेद अख्तर यांच्यासह मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी निमंत्रित मान्यवरांना मिळाली..

हिरव्या रंगाच्या मेंदीच्या जवळ जाणाऱ्या छटेशी स्पर्धा करणारा त्यांचा कुर्ता.. खाली पांढरीशुभ्र सुरवार.. अत्यंत व्यवस्थितपणे िवचरूनही तेवढय़ाच व्यवस्थितपणे विस्कटलेले आणि हृदयाशी साठवलेल्या अनेक अनुभवांची साक्ष देणारे पांढरे-शुभ्र केस.. पायात काळ्या रंगाचा जोडा.. चेहऱ्यावर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर टवटवी आणणारं हास्य आणि सोबतीला अत्तराच्या फायासारखा मिठ्ठास उर्दूमिश्रित िहदी भाषेचा आदबशीर गंध.. प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक, गीतकार, विचारवंत आणि माजी खासदार जावेद अख्तर ‘लोकसत्ता गप्पा’च्या मंचावर आले आणि उपस्थितांच्या मनात शेर चमकून गेला..

‘उनका आना ही बज्म को रोशन कर गया

शमा तो बस परवानों के लिए जलती रहीं..’

मुंबईच्या गिरणी साम्राज्याची साक्ष देणाऱ्या महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल आणि लक्ष्मी मिल या गिरण्यांच्या परिसरात नव्याने उभ्या राहिलेल्या ‘जी५ए’ या छोटेखानी, तरीही आलिशान सभागृहात ‘लोकसत्ता गप्पां’च्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतील मान्यवर निमंत्रितांची लगबग शनिवारी सकाळी सुरू झाली. एखाद्या संगीताच्या मफलीसाठी ‘तयार’ होऊन यावे, त्याप्रमाणेच या ‘गप्पां’च्या मफलीसाठीही हे मान्यवर तयार होऊन आले होते. जावेद अख्तर यांच्या मर्मबंधातली नेमकी ठेव जाणून कवी सौमित्र यांनी त्यांना पहिलाच प्रश्न गजल या काव्यप्रकाराबद्दल विचारला आणि मफल सुरू झाली तीच गजल या काव्यप्रकाराच्या व्याकरणासह! रदीफ, मतला अशा सगळ्या शब्दांच्या व्याख्या सोदाहरण देत त्यांनी गजल हा काव्यप्रकार आणि िहदी चित्रपटसृष्टीतील त्याचे महत्त्व सांगितले.

खुमासदार शैलीत एका वाक्यात समोरच्या व्यक्तीची टोपी उडवणे, हजरजबाबीपणा, मध्येच सद्य:स्थितीवरील मार्मिक आणि गंभीर भाष्य, विचार करायला लावणारी मते अशा विविध पलूंमुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर एका वेगळ्याच उंचीला जाऊन पोहोचला. लेखन करताना मध्येच अडायला होते का, सलीम-जावेद असे जोडीने काम करण्याचा अनुभव, सध्याच्या गाण्यांचा दर्जा, अशा अनेक गोष्टींवर अख्तरसाहेब बोलत होते आणि एखाद्या फॉर्मात असलेल्या फलंदाजाची फलंदाजी बघण्यासारखा आनंद उपस्थितांना मिळत होता. ‘काव्य हे अत्यंत निखळ गणित आहे’, ‘चित्रपटांनी समाज नाही, तर समाजाने चित्रपटांना बिघडवले’, ‘श्रद्धा आणि मूर्खपणा यात तसूभरही फरक नाही’, ‘मुलांना त्यांचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांचा जोडीदार निवडण्याचा मूर्खपणा करू नका’ अशा एकापेक्षा एक परखड मतांच्या फैरी झडल्या आणि यशस्वी पटकथा-संवाद लेखक, गीतकार, कवी यांच्या पलीकडे जात माणूस म्हणजे जावेद अख्तर यांची ओळख सर्वच श्रोत्यांना झाली. गजलेच्या व्याख्येपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाची अखेरही जावेद अख्तर यांनी त्यांच्या दोन कवितांनी केली.

untitled-8

untitled-9

untitled-10