केदारनाथच्या आपत्तीचे खापर कोणावर ना कोणावर फोडले जात आहे. तिथले हवामान, भूरचना-भूशास्त्र, वनस्पती आवरणातील बदल, जमीनवापरातील बदल हे लक्षात घेतल्याशिवाय त्याच्या कारणापर्यंतच पोहोचता येणार नाही. खरंतर आपण ही आपत्ती घडण्याची तयारी करूनच ठेवली होती. तिथे पडलेल्या मोठय़ा पावसाने केवळ एका ठिणगीचे काम केले.
केदारनाथ परिसरात आलेला पूर, त्यामुळे झालेले जीवित-आर्थिक नुकसान यामुळे या आपत्तीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याची कारणमीमांसा केली जात आहे आणि कोणावर ना कोणावर खापर फोडले जात आहे. तिथे झालेली ढगफुटी, नदीपात्रात झालेली अतिक्रमणे, हिमालयात उभे राहत असलेले विद्युत प्रकल्प-धरणे, बेसुमार जंगलतोड की ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम..? जो तो आपापल्या परीने या आपत्तीची कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिथले हवामान, भूरचना-भूशास्त्र, वनस्पती आवरणात झालेले बदल आणि जमीनवापराच्या पद्धतीत झालेले बदल हे लक्षात घेतल्याशिवाय नेमक्या कारणापर्यंत पोहोचता येणार नाही. भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी (निवृत्त) माधव गोगटे यांनी अलीकडेच केदारनाथ अभयारण्य व गंगोत्री राष्ट्रीय उद्यान यांची सद्यस्थिती व त्यांचे व्यवस्थापन कसे करायला हवे, यावर विस्तृत अभ्यास केला. त्यांनी सरकारसाठी तयार केलेला अहवाल, गोगटे तसेच, त्या भागात अभ्यास केलेले भूशास्त्रज्ञ व हवामानशास्त्रज्ञ यांच्याशी केलेल्या चर्चेतून या आपत्तीच्या कारणांचा नेमकेपणाने अंदाज येतो.
आपत्तीप्रवण भूरचना
केदारनाथ व परिसराची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे, साधारणत: ३५८१ मीटर. याचा समावेश होतो हिमालयाच्या शिवालिक पर्वतरांगेमध्ये. या शिवालिक पर्वतरांगा मुळातच परावलंबी. हिमालयाची निर्मिती होत असताना पर्वतांची झीज झाली. त्यातून खाली आलेले खडक-गाळ तळाशी जमा झाले. त्यांचे एकत्रीकरण झाले व हा भागच पुन्हा वर आला. त्याचेच शिवालिक पर्वतरांगा बनल्या आहेत. त्यांची निर्मिती अशी असल्याने हे डोंगर व त्यातील खडक मुळातच ठिसूळ आहेत, झीज होण्यास अनुकूल आहेत. या परिसराला आपत्तीप्रवण बनवणारी आणखी एक बाब म्हणजे हा परिसर भूकंपप्रवण आहे. त्यात इतर अनेक गोष्टींची भर पडली आहे.
ढगफुटी ही नियमित घटना
या परिसराच्या हवामानाबद्दल सांगायचे तर तिथे ढगफुटी होणे ही सामान्य बाब आहे. वाळवंट आणि पर्वतीय प्रदेशांमध्ये ढगफुटी वारंवार होत असते. केदारनाथ परिसरातील हवामानाचे आकडेसुद्धा याला पुष्टी देतात. तिथल्या उखीमठ तहसील कार्यालयातील नोंदी सांगतात की, तिथल्या पर्जन्याची वार्षिक सरासरी ३०९३ मिलिमीटर इतकी जास्त आहे. म्हणजे आपल्या कोकणापेक्षाही जास्त पाऊस! याशिवाय तिथे २००६ च्या जून महिन्यात तब्बल २०३५ मिलिमीटर पावसाची नोंद आहे, तर २०१० च्या ऑगस्टमध्ये १०१४ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. त्यामुळे कमी काळात जास्त पाऊस पडणे (म्हणजेच ढगफुटी) हे तिथे वरचेवर घडतच असते. पर्वतीय भागात अचानक मोठा पाऊस पडणे, त्यात वस्त्या वाहून जाणे, कुठेतरी गाळ साचून किंवा कडे कोसळून पाण्याचा प्रवाह अडणे, हा नैसर्गिकरीत्या बनलेला बंधारा फुटून प्रलय होणे हेही घडत असते.. त्यामुळे या वेळी काहीतरी आगळावेगळा पाऊस पडला, असेही म्हणता येत नाही. परिणामी, या घटनेमागे ग्लोबल वॉर्मिग असल्याची शक्यताही गळून पडते.
याच्या पलीकडे जाऊन धरणे-प्रकल्प यांच्याबद्दल बोलायचे तर हिमालयात असे प्रकल्प मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. पण त्याचा केदारनाथशी संबंध नाही. हे ठिकाणच ३५८१ मीटर म्हणजे तब्बल बारा हजार फूट उंचीवर आहे. ते वसले आहे मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर. त्याच्या वरच्या बाजूला कोणतेही धरण नाही. त्यामुळे धरणाचा केदारनाथशी संबंध पोहोचत नाही. पण पावसामुळे नद्या, ओढे, नाल्यांचे प्रवाह एकमेकांमध्ये मिसळतात आणि पुढे रौद्र रूप धारण करतात. त्यांच्यामुळे होणाऱ्या आपत्तीसाठी धरण फुटण्याची गरज असतेच असेही नाही.
नेमकी कारणे कोणती?
मग आताच्या आपत्तीमागे कोणती कारणे म्हणायची? आपत्तीप्रवण भूरचना व अचानक येणारा प्रचंड पाऊस याच्याबरोबरच इतरही काही कारणांचा मागोवा घ्यावा लागतो. त्यासाठी माधव गोगटे यांच्या अहवालाचा आधार घ्यावा लागतो. केदारनाथ हा सुमारे ९७५  चौरस किलोमीटरच्या अभयारण्याचा भाग आहे. त्यात कस्तुरीमृग, हिमबिबटय़ा, काही पक्षी व प्राणी संरक्षित आहेत. इतक्या उंचावर मोठे वृक्ष नाहीत. मात्र, तिथे झुडपे आणि हंगामी गवत वाढते. आधीच खडक ठिसूळ, त्यामुळे वनस्पती आवरण अतिशय महत्त्वाचे ठरते. मात्र, आता विविध कारणांमुळे हे आवरण कमी झाले आहे. त्याचबरोबर या डोंगरउतारावर रस्ते रुंद करणे, तिथे उतारावर टपऱ्या-वस्त्या वाढल्यामुळे तिथले उतार अधिक आपत्तीप्रवण बनले आहेत. हे का घडले? याचीही गोगटे यांच्या अहवालात चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी तिथे प्रचंड संख्येने येणाऱ्या पर्यटकांकडे आणि त्यांच्या एकूणच वागण्याकडे बोट दाखवले आहे.
केदारनाथ हा ज्याचा एक भाग आहे अशी चारधाम यात्रा पूर्वापार आहे. त्याला जाणाऱ्यांची संख्या पूर्वी बेताची होती. आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे, इतकेच नव्हे तर त्यात आता भाविकांपेक्षा उत्सवी पर्यटकांची संख्या वाढली आहे. आकडेवारीनुसार केदारनाथ अभयारण्यातून दरवर्षी तब्बल एक लाखाहून अधिक पर्यटक जा-ये करतात. हवामानाचा विचार करता ही यात्रा फारतर तीन महिने सुरू असते. म्हणजे इतक्या कमी काळात लाखभर पर्यटक! बहुतांश पर्यटक ‘लेज-कुरकुरे-पेप्सी’ वाले. त्यामुळे आरामात येणे, ‘मज्जा’ म्हणून हा यात्रा करणे, भरपूर पैसे खर्च करणे, जास्तीत जास्त गोष्टी वापरणे हे आलेच. त्याचा थेट ताण तिथल्या नैसर्गिक साधनांवर पडतो. एकच उदाहरण द्यायचे तर आता जास्तीत जस्त लोक वर जाण्यासाठी चालण्याऐवजी घोडे वापरतात, शिवाय सामान वाहून नेण्यासाठीही त्यांचा वापर होतो. त्यामुळे एकटय़ा केदारनाथला तब्बल पाच हजार घोडे आहेत. या घोडय़ांना खायला काय घालणार? मग त्याचा बोजा पडतो तो जंगलातील गवत, झुडपांवर. शिवाय इतक्या पर्यटकांच्या गरजा भागवायच्या (अर्थातच चांगले पैसे मिळतात म्हणून!) तर जंगलातील लाकूड लागतेच. इतकेच नव्हे तर लोकरीसाठी प्रसिद्ध असलेल्या पश्मिना सारख्या मेंढय़ांची चराईही याच गवतावर होत आली आहे. या साऱ्यांमुळे आता तिथले वनस्पती आवरण झपाटय़ाने घटले आहे. त्यामुळेच आधीच ठिसूळ असलेले खडक व सुटी माती आणखी मोकळी झाली. एखाद्या मोठय़ा पावसात झटकन वाहून जायला अगदी सज्ज!
पैसेवाले व आरायदायी पर्यटक आले म्हणजे रस्ते मोठे लागणार. नाहीतर यांच्या आलीशान गाडय़ा जाणार कशा? त्यांच्यासाठी लागणारे लेज, पेप्सी, बिसलेरी वरती नेण्यासाठीही रस्त्यांची गरज आहे. मग होत्या त्या वाटा रुंद झाल्या. आधीच हा ढासळणारा भाग. त्यात रस्ते रुंद केल्याने वरचा डोंगर ढासळण्यास आणखीच प्रवण बनला. त्यासाठी संरक्षक भिंती-कठडे करणे अपेक्षित होते, पण त्या जागी टपऱ्या, हॉटेल, धर्मशाळा उभ्या राहिल्या. जे डोंगर उतारावर तेच चित्र नदीच्या पात्रात! इतकेच नव्हे तर आता तिथे हेलिकॉप्टरने मंदिराजवळ पोहोचविणाऱ्या कंपन्यांची संख्या नऊ झाली आहे. त्यामुळे सतत हेलिकॉप्टर्सची घरघरही सुरू असते. लाखभरांचे असे चोचले पुरवायचे म्हटले की प्रचंड ताण वाढणार. तेच झाले.
त्यातच ऐशोआरामातील पर्यटक म्हटल्यावर त्याला तिथल्या खडतर हवामानाची माहिती असायचे कारण नाही, शिवाय सर्व सुविधा हाताशी असल्याने त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रश्नच नाही. अशा वेळी माणूस एखाद्या आपत्तीत सापडतो तेव्हा त्याच्यावर होणारा आघात प्रचंड असतो. तेच इथे घडले. ही बाब मोठय़ा प्रमाणात मनुष्यहानी होण्यास कारणीभूत ठरली.
वन्यजीवांना पोहोचणारा धोका
या परिणामांबरोबरच तिथले वन आणि वन्यजीवांवरही मोठे परिणाम झाले आहेत. विशेषत: घोडय़ांमुळे वन्यजीवांमध्ये संसर्ग पोहोचण्याची भीती वाढली. हेलिकॉप्टर्सच्या सततच्या फेऱ्यांमुळे वन्यजीवांच्या संख्येवर परिणाम झाला. इथे उन्हाळ्यात प्रजननासाठी स्थलांतरित पक्षी व प्राणी येत असतात. या गर्दी-गोंगाटामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला नसता तरच नवल! तिथल्या अभयारण्याच्या ९७५ चौरस किलोमीटरमागे अधिकारी व कर्मचारी आहेत केवळ २५. त्यात पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी. कोण, कुठे व कोणावर नियंत्रण ठेवणार?
हे परिणाम डोळ्यादेखत होत आहेत. तरीही ते रोखण्यासाठी आता एक प्रमुख अडथळा आहे तो या सर्व गोष्टींवर विकसित झालेल्या अर्थकारणाचा. गोगटे यांचा अहवाल सांगतो की, पर्यटक आणि त्यांचे सामान लादून नेणाऱ्या घोडय़ांपासून तिथे एका हंगामात (तीन महिने) तब्बल ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, तर हेलिकॉप्टरचा व्यवसाय आहे १२० कोटी रुपयांचा. असे ‘खोऱ्याने’ पैसे मिळत असताना हे सारे थांबवून पर्यावरण आणि सुरक्षेकडे लक्ष दिले जाईल का? हाही मुद्दा आता प्रमुख बनतो आहे.
या सर्व गोष्टी हेच सांगतात की या वर्षी फार वेगळे असे काहीही घडलेले नाही. आपण हळूहळू हे घडण्याची तयारी करूनच ठेवली होती. दारूगोळा तयारच होता. बस्स. एक ठिणगी पडायचा अवकाश होता. मोठय़ा पावसाने ते काम केले.. त्यातून उडालेला भडका आपण पाहातच आहोत!

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर