मुंबईत १९३८ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणाचे संकलन
साहित्यासाठी जीवन आहे की जीवनासाठी साहित्य? जर आपले राष्ट्रीय साहित्य आणि अशा सामुदायिक संमेलनात साहित्याचा सामूहिक ऊहापोह मुख्य कर्तव्य असणार, जर  आपले राष्ट्रीय साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे एक उपांगच काय ते असेल, तर राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्यचिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. अगदी कलेसाठी कलेचा जो कलावंत उपासक आहे वा साहित्यासाठीच साहित्याचा जो साहित्यिक भक्त आहे, त्याच्याविषयीही मला आदरच वाटेल. पण असे कलेसाठी कलेची उपासना करणारे साहित्यिक एखाद्या नाटय़गृहात नाटय़-नृत्य संगीताच्या भर रंगात अगदी दंगले असतानासुद्धा जर त्या नाटय़गृहास अकस्मात आग लागली तर कलेसाठी कलेला झिडकारून ते तत्क्षणी त्या आगीतून जीव बचावण्याच्याच मार्गास तडकाफडकी लागतील, की त्या संगीताचा तन्मय ताल धरीत तेथेच डुलत राहतील? त्याचप्रमाणे राष्ट्राच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची कथा काय? आपल्या राष्ट्राची आजची मृत्युंजय मात्रा म्हणजे त्याचे शस्त्रबळ, साहित्य नव्हे! जपानात प्रत्येक प्राथमिक शाळेत मुलामुलींना प्रथम सैनिकी शिक्षण सक्तीने देण्यात येते, अलंकारशास्त्राचे नंतर!
जपानच्या, रशियाच्या, मुस्लीम राष्ट्रांच्या बॉम्बफेकी वैमानिक हल्ल्याची आगलावी काळछाया ज्या मुंबईवर दाट पसरत चालली आहे, त्या मुंबईत या साहित्य संमेलनातील, नृत्यनाटय़संगीतात रंगून गेलो आहोत. ज्या मुंबईत गल्लोगल्लीत जीर्ण साहित्य, नव साहित्य, पुराण साहित्य, पुरोगामी साहित्य मंडळे थाटून राहिलेली आहेत, लक्षावधी तरुण-तरुणी एक आणा मालेपासून सोळा आणे मालेपर्यंतच्या कादंबऱ्या वाचण्यात गढून गेली आहेत, त्या मुंबईत म्हणण्यासारखा रायफल क्लब असा एकही नाही. सबंध मुंबई इलाख्यात सैनिक कॉलेज औषधालासुद्धा नाही.
आपले हे विस्तीर्ण भारतीय राष्ट्र आज जगतात निर्माल्यवत जे होऊन पडले आहे ते आपले साहित्य उणे म्हणून नव्हे- शस्त्रबळ उणे म्हणून! ही गोष्ट सगळ्या आधी, साहित्यिकहो, तुमच्या लक्षात आली पाहिजे! सगळ्यात साहित्यिकवर्गच सुज्ञ, विज्ञ असणार! म्हणून सगळ्या आधी तुम्ही गर्जून उठा की, आजच्या परिस्थितीत आमचे राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ! शास्त्रचर्चा नव्हे! जे थोडे साहित्य हवे ते तुम्ही-आम्ही जे चाळिशीच्या वर गेलेले लोक, ते काय ते हवे तर पुरवतील!  जे तरुण. ज्या तरुणी, जी पाठीचा कणा ताठ असलेली पुढची पिढी त्या साऱ्यांना माझा या साहित्यपदावरून हाच निर्वाणीचा आदेश आहे की, राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत! तरुणहो, आमच्या दुर्बल पिढीच्या देखोदेखी सुनीते नि कादंबऱ्या लिहिण्याकरिता लेखण्या सरसावू नका. तर त्या जपान, इटली, जर्मनी, इंग्रज, आयरिश तरुणांच्या देखोदेखी आधी बंदुका सरसावा!  राष्ट्रसंरक्षणार्थ प्रथम रायफल क्लबात घुसा, रडगाण्यांच्या नि रडकथांच्या साहित्यसंमेलनात नंतर, वेळ राहिल्यास.साहित्यिकांनीसुद्धा आज साहित्याच्या पोथ्या गुंडाळून सैन्याच्या शिबिराकडे वळले पाहिजे. कारण जे राष्ट्र खुरटे, दुबळे त्यांचे साहित्यिक खुरटे नि दुबळेच असणार. ज्या दुबळ्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते, त्याच्या साहित्यालाही कशी आग लागते ते तक्षशिलेला विचारा, नालंदेला विचारा. शिवरायांनी युगधर्म ओळखून सरस्वतीच्या रक्षणार्थच सरस्वतीकडे काही काळ पाठ फिरवून शुंभ-निशुंभ-मर्दिनीचीच उपासना केली, लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे! सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हास सांगतो की,  साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक! मी ज्या ज्या साहित्यसंमेलनात अध्यक्ष म्हणून गेलो, त्या त्या ठिकाणी जाताच शरीराच्या सनकडय़ा झालेली आमची तरुण मुले, मुली कोरीकरकरीत कोणती तरी कादंबरी, कथा, काव्य हातात घेऊन जेव्हा शेकडय़ांनी येता-जाता मला दिसत, त्यात दिवसरात्र तन्मय होताना आढळत, तेव्हा माझ्या हृदयाला खरोखरच चरका बसत आला. अध्यक्षपदी मान लाजेने खाली घालावी लागली. मी आपणास स्पष्टपणे सांगतो की, राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत साहित्याचे सापेक्ष महत्त्व तिय्यम आहे आणि तरुण पिढीचे पहिले कर्तव्य आहे सैनिक शिक्षण.  
पुढील दहा वर्षांत सुनीते रचणारा एकही तरुण नाही निघाला तरी चालेल, प्रत्यही साहित्य संमेलने न झाली तरी चालेल, पण दहा दहा हजार तरुण सैनिकांच्या वीरचमू आपल्या खांद्यावर नव्यातील नव्या रायफली टाकून, राष्ट्राच्या मार्गामार्गातून, शिबिराशिबिरातून टपटप करीत संचलन करताना दिसल्या पाहिजेत. ग्रंथालयाइतकी तरी, बौद्धिक कॉलेजाइतकी तरी नगरानगरातून सैनिकी कॉलेजे गजबजलेली आढळली पाहिजेत. मग अधूनमधून त्यांनी एखादी कादंबरी वा प्रेमकथा वाचली वा सुनीत लिहिले तरी चालेल. नेपोलियनही रणांगणावर करमणूक म्हणून शीळ वाजवी. दिल्लीच्या बादशहाची दाढी जाळून आल्यानंतर पहिले बाजीरावही मस्तानीच्या अंत:पुरात एखादे पान खाताना आढळत! पण जन्मभर नुसती झाडांची पानेच चघळणाऱ्या आणि तमाशातील तबलेच झडत राहिलेल्या दुसऱ्या बाजीरावाचे एक ब्रह्मावर्तच या राष्ट्राने बनावे, हे मला पाहवत नाही.
(मॅजेस्टिक प्रकाशन प्रकाशित ‘सावरकरांची निवडक भाषणे’ या पुस्तकावरून साभार.)
संकलन – शेखर जोशी

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.

Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Ramdas Athawale slams Sharad pawar tutari and vba prakash ambedkar
Video: “पवारांना मिळाली आहे तुतारी…”, रामदास आठवलेंची तुतारी आणि वंचितवर शीघ्रकविता
Gondwana University organized a Youth Literary Conference on 21st and 22nd February
साहित्य संमेलन ‘युवां’चे, सत्राध्यक्षपदी मात्र प्रौढांची निवड; गोंडवाना विद्यापीठाच्या युवा साहित्य संमेलनावर…
Sharad Pawar
मोदी मुमकिन नव्हे नामुमकिन; शरद पवार यांची टीका