केकी मूस या अवलियाची ही दुनिया! कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकाराने आपले सारे आयुष्य तिच्या साधनेत घालवले.
ही कलंदर व्यक्ती तब्बल ४८ वर्षे एखाददुसरा अपवाद वगळता आपल्या घरातून बाहेरदेखील पडली नाही. या चक्रावणाऱ्या आत्मकैदेत जगरहाटी विसरलेल्या या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’!
‘केकी मूस’ हे नाव प्रथम ऐकणाऱ्याला गूढ-कुतूहलाचे वाटते. या नावामागे मोठे विश्व दडल्याची भावना होते. या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला, की मग या गूढ अंतरंगाची खोली किती खोल-रुंद आहे याचाही साक्षात्कार होतो. कलेच्या प्रांतातील या गंधर्वाचा शोध घेतच अनेकांची पावले चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगतच्या त्या दगडी बंगलीत शिरतात आणि या दंतकथेचा भाग बनून जातात.
कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस या अवलियाची ही दुनिया! मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत २ ऑक्टोबर १९१२ रोजी हा कलायोगी जन्माला आला. लहानपणापासूनच कलेच्या आवडीमुळे परंपरागत ऐश्वर्याचे सारे मार्ग सोडत त्यांनी कलेचा हा ‘भणंग’ मार्ग स्वीकारला. मुंबईच्याच विल्सन कॉलेजमधून कलेची पदवी आणि पुढे लंडनमधून उच्चशिक्षण घेतले. देशोदेशीच्या कला पाहिल्या, कलाकारांना भेटले. मग या साऱ्या शिदोरीवर १९३८ मध्ये त्यांनी थेट चाळीसगावातील आपले वडिलोपार्जित घर गाठले आणि एकलव्याच्या निष्ठेने कलेची आराधना सुरू केली. कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकाराने उर्वरित सारे आयुष्य इथे तिच्या साधनेत घालवले. ही कलंदर व्यक्ती पुढची तब्बल ४८ वर्षे एखाददुसरा अपवाद वगळता आपल्या घरातून बाहेरदेखील पडली नाही. या चक्रावणाऱ्या आत्मकैदेत जगरहाटी विसरलेल्या या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’!
मूस यांना या विश्वात जी जी म्हणून कला आहे, त्या साऱ्यांची आस होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्रण, मूर्तिकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन..काय काय म्हणून नव्हते. यातूनच चाळीसगावातील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयघन अशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातच या सर्व कलाकृतींचे एक संग्रहालय थाटण्यात आले. एका सर्जनशील कलाकाराच्या या स्मृती जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’तर्फे केले जात आहे.
रेम्ब्रा रीट्रीट! केकी मूस यांच्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे हे नाव आत शिरताच कलेशी नाते जोडते. विश्वाविख्यात कलाकार रेम्ब्रा हा केकी मूस यांचा आदर्श! कलेच्या प्रांतातील त्याचे अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू आपला जन्म झाला, ही मूस यांची धारणा होती. आत शिरताच भोवतीने सर्वत्र शिल्पं, चित्रे, छायाचित्रे आदी कलाकृती दिसू लागतात. चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंगे! या साऱ्या दालनात तीच अधिक भरून राहिलेली आहेत. हे सुंदर जग आणि चराचरात सामावलेले सौंदर्य चित्रातून रेखाटावे आणि छायाचित्रातून प्रकट करावे, या ध्यासातून त्यांनी आयुष्यभर त्यांचा कुंचला आणि कॅमेरा चालवला. या दोन प्रतिभांनीच मूस यांना जगविख्यात केले.
चाळीसगावात आल्यावर प्रथम त्यांनी चित्रे रंगवायला घेतली. मूस यांनी उभे केलेले शेक्सपीअर कॉटेज, जहांगीर- नूरजहॉँ, उमर खय्याम, वादळवारा असे हे एकेक देखावे आजही पाहताना गुंतवून टाकतात. छायाचित्रण तर मूस यांचा जणू श्वासच! या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, दृश्य आणि भाव त्यांनी आपल्या छायाचित्रांमधून जिवंत केले. यातही व्यक्तिचित्र, कल्पनाचित्र, प्राण्यांचे भावविश्व हे त्यांचे खास विषय.
कल्पनाचित्रांचा खेळ असलेली ‘टेबल टॉप फोटोग्राफी’ हा त्यांचा एक अफलातून प्रकार! मनातले एखादे चित्र उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने उभे करावे, त्याला प्रकाशयोजना, त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या साऱ्या दृश्याचे छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावे!
केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काडय़ा यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला. या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. झाले, भल्याभल्यांना या चित्रातून जागोजागीचा ‘विंटर’ दिसू लागला. यात खुद्द पंडित नेहरूदेखील होते. हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढेच म्हणाले, ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मि. मूस, टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर?’  ‘ऑफ डय़ूटी’ आणि ‘अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर’ ही दोन छायाचित्रेही अशीच मूस यांच्यातील सर्जनशील मन दाखवणारी. ‘ऑफ डय़ूटी’मध्ये जवानाचा एक बूट दाखवला असून, त्याच्यात एक हसरी बाहुली खोचलेली आहे. बाहुलीतून जणू तो बूटच हसत आहे. दिवसभर त्या जवानाबरोबर ‘डय़ूटी’ करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसे वाटते, आनंद होतो. पहिल्यात हा आनंद, तर दुसऱ्यात ती भीती! ‘मृत्यूचे भय’ दाखवणारे हे छायाचित्र! आजारी आईला मोसंबीचा ज्यूस देताना मूस यांना ही जाणीव स्पर्शून गेली. एक मोसंबी कापून त्याचा ज्यूस (अंत) होत असताना बाजूच्या मोसंब्यांच्या मनात काय भाव उमटत असतील, याचेच भय त्यांनी या फळांवर चित्रित केले. ..क्षुल्लक फळांमधून चराचरांतील प्रत्येकाच्या जीवन-मरणाचे दर्शन घडविणाऱ्या या छायाचित्राने मूस यांना पुढे जागतिक कीर्ती मिळवून दिली.
मूस यांच्या संग्रहालयात व्यक्तिचित्रेही आहेत. त्यांच्या स्टुडिओला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवराचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडित महादेवशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, ना. ह. आपटे, ना. सी. फडके, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, बाबा आमटे अशी इथे एक मोठी शंृखलाच उभी राहते. यात काही ‘असामान्य’ असे सामान्य चेहरेही आहेत. एका फासेपारधी स्त्रीचा चेहरा असाच सतत लक्ष वेधत असतो. या वृद्ध, कृश महिलेच्या चेहऱ्यात त्यांना साऱ्या जगाचे दु:ख जसे दिसले, तसेच त्या शेकडो सुरकुत्यांमधून जगण्याची दुर्दम्य इच्छाही जाणवली. या वृद्धेच्या काढलेल्या छायाचित्रांना पुढे जगभर प्रसिद्धी मिळाली.
मूस यांनी शिल्प, मूर्ती, माती, काष्ठशिल्प, ओरिगामी आदी कलाप्रकारही हाताळले. यांच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयात आहेत.  मूस यांच्या नजरेत आलेल्या अनेक लाकूड-फांद्यांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्व बहाल केले. त्यांच्या बंगल्याच्या आवारातील सुकलेल्या एका बोरीच्या खोडात त्यांना असाच एक चेहरा दिसला. मूळ खोडातून वर निघालेल्या या चार फांद्यांना त्यांनी हव्या त्या आकारात छाटले आणि त्यांच्यात साखळय़ा अडकवल्या; यातूनच तयार झाली ती ‘इटर्नल बाँडेज’ नावाची एक अफलातून कलाकृती! स्त्री-पुरुष ही एकाच सृष्टीची एकमेकांना बांधून ठेवणारी निर्मिती, इथपासून ते ‘त्या’ हातांकडून परमेश्वराच्या होणाऱ्या प्रार्थनेपर्यंत असे अनेक अर्थ या कलाकृतीतून ध्वनित होत गेले.  पंडित नेहरू या कलाकृतींच्या ओढीने इथपर्यंत आले आणि सारे कार्यक्रम रद्द करत दिवसभर रमले. तर इथे सतत येणारे बाबा आमटे जाताना ‘इथे मी माझा आत्मा ठेवून जात आहे’ असे म्हणाले.
मूस नावाच्या व्यक्तिमत्त्वातील हाच आगळा माणूस, चतुरस्र कलाकार आणि त्यांच्या या शेकडो कलाकृती जतन करण्याचे काम ‘मूस प्रतिष्ठान’तर्फे सुरू आहे. गेली २५ वर्षे ही मंडळी तुटपुंज्या उत्पन्नावर या साऱ्या ठेव्याचा सांभाळ करत आहेत. त्यांना ना शासनाची मदत ना कुठला आर्थिक हातभार. अडचणी अनंत आहेत आणि आव्हाने रोजची आहेत. संग्रहालयाची इमारत असलेले मूस यांचे ब्रिटिशकालीन घर १०५ वर्षांचे वृद्ध झालेले आहे. छत गळते आहे, भिंतींना तडे गेले आहेत आणि या स्थितीत दालनांतील कलाकृती जणू अंग चोरून उभ्या आहेत. मोठा पाऊस सुरू झाला, की सगळय़ा विश्वस्तांचा मुक्काम संग्रहालयात हलतो.  मूस यांच्या घराचे स्मारक आणि संग्रहालयासाठी अद्ययावत इमारतीची उभारणी हे या संस्थेचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न आहे. थकलेली इमारत, अपुरी जागा, अशास्त्रीय मांडणी, अन्य यंत्रणा-सुविधांचा अभाव या साऱ्यांतूनही हे कलादालन रोज उघडते आणि तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून असंख्य कलाकारही रोज चाळीसगावचा पत्ता शोधत इथपर्यंत येतात. समाजाची ही ओढच एके दिवशी या ठेव्याला मदतीचे हात बहाल करेल असा आशावाद या संस्थेला वाटतो.
संस्थेपर्यंत कसे जाल?
कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान ही संस्था जळगाव जिल्हय़ातील चाळीसगाव शहरातील रेल्वेस्थानकाच्या पश्चिम बाजूलगत आहे.
कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान
केकी मूस या जगविख्यात कलाकाराने निर्माण केलेल्या शेकडो दुर्मीळ कलाकृतींचे जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’तर्फे गेली पंचवीस वर्षे निरलसतेने सुरू आहे; परंतु अपुरा निधी आणि संग्रहालयाच्या थकलेल्या इमारतीमुळे संस्थेपुढे सध्या मोठे संकट निर्माण झाले आहे. या कलाकृतींना ऊर्जितावस्था देण्यासाठी संस्थेला समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.
चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंगे! ‘मूस आर्ट गॅलरी’त तीच अधिक भरून राहिलेली आहेत. हे सुंदर जग आणि चराचरांत सामावलेले सौंदर्य चित्रातून रेखाटावे आणि छायाचित्रातून प्रकट करावे, या ध्यासातून त्यांनी आयुष्यभर त्यांचा कुंचला आणि कॅमेरा चालवला. या दोन प्रतिभांनीच मूस यांना जगप्रसिद्ध केले.
केकी मूस यांनी आयुष्यभर कलानिर्मितीशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्यांची कला सातासमुद्रापार गेली. तिला अनेक मानसन्मानही मिळाले, पण या मान, सन्मान, पुरस्कार, नाव, प्रसिद्धी, पैसा आणि मुख्य म्हणजे बाजार या साऱ्यांपासून ते दूर राहिले. कुंचला आणि कॅमेऱ्यातून वेळ मिळताच ते सतारीवर बसायचे. या संवेदनशील कलाकाराचा सहवास सर्वानाच हवाहवासा वाटायचा.
आईचे प्रेम वात्सल्याचे प्रतीक आहे तर केकी मूस यांची जिवंत कला जीवनाचे गमक आहे. – साने गुरुजी
केकी मूस यांच्या कलासागरात चिंब भिजलो. त्यांच्या कुंचल्यात सदैव स्वानंद आहे. – पु. ल. देशपांडे
धनादेश या नावाने काढावेत
धनादेश ‘कलामहर्षी
केकी मूस प्रतिष्ठान’
(संस्था ८० जी कलमाखाली पात्र नाही)

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती