एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये आतापासूनच गदारोळ सुरू झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. कोटय़वधी रुपयांच्या सौर घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री उम्मन चंडी व ऊर्जामंत्री आर्यदन मोहम्मद यांच्यावरच थेट आरोप झाल्याने विरोधकांना संधीच मिळाली आहे. यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली यात शंकाच नाही. राज्यातील प्रमुख विरोधी असलेल्या डाव्या आघाडीने १२ ऑगस्ट २०१३ मध्ये तब्ब्ल ३० तास केरळच्या सचिवालयाला घेराव घातला होता. आताही त्यांनी आंदोलनाची व्याप्ती वाढवली आहे. नैतिकतेच्या आधारावर खुर्ची सोडावी अशी मागणी भाजपने केली आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी या घोटाळ्यात सहभागाचे आरोप फेटाळले असले तरी चंडी यांच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांवर झालेले आरोप. त्यातून या कर्मचाऱ्यांची झालेली अटक पाहता या प्रकरणाचे गांभीर्य वाढते. सत्तेतून संपत्ती कशी सहज येते हे त्याचेच उदाहरण. आता या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू आहे. चौकशीसाठी न्यायिक आयोग नेमण्यात आला आहे. चंडी यांची या आयोगापुढे ११ तास चौकशी झाली. एखाद्या न्यायिक आयोगापुढे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हजर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रकरण नेमके काय ?
बिजू रामकृष्णन आणि सरिता नायर यांनी २०१३ साली टीम सोलर नावाची कंपनी सुरू केली. सौर संयंत्र बसवणे, व्यवसायात भागीदार करणे अशी प्रलोभने त्यांनी दाखवली. त्यासाठी दोन महिलांचा वापर करून राजकीय नेत्यांशी घसट वाढवली. इतकेच काय मुख्यमंत्री कार्यालयातील लोकांशीदेखील त्यांनी संपर्क वाढवल्याचा आरोप आहे. अनेक बडय़ा धेंडांकडून त्यांनी आगाऊ रकमा गोळा केल्या, त्यांना बोगस पत्रे दिली. नंतर त्यातील एका ठेवीदाराने तक्रार केल्यावर हा घोटाळा उघड झाला आहे. बिजू तसेच सरिता नायरसह पाच जणांना सुरुवातीला अटक करण्यात आली. यात मुख्यमंत्री कार्यालयातील टोनी जोसेफ, फिरोज, तसेच एक अभिनेत्री यांचा त्यात समावेश होता. मुख्यमंत्री कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप झाल्यावर त्यांना निलंबित केल्याने चंडी यांची कोंडी झाली. तसेच कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांनी सरिताला अनेक वेळा दूरध्वनी केले व बनावट पत्रे अदा केल्याचा ठपका आहे. तसेच व्यावसायिक श्रीधरन नायरने सरितासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. सरिताने चंडी यांना १ कोटी ९० लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप न्यायिक आयोगापुढील चौकशीत केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुत्रालाही तिने गोवल्याने सौर घोटाळा व्याप्ती वाढली आहे. आपले मुख्यमंत्री-पुत्राबरोबर केवळ व्यावसायिक संबंध होते. अन्य एका महिलेचे घनिष्ठ संबंध होते असे सांगताना त्याचे स्वरूप सांगितलेले नाही. मात्र त्या महिलेला घेऊन चंडीपुत्राने आखातात पर्यटन केले. त्याची दोन छायाचित्रे टी. रामकृष्ण या मंत्र्यांकडे असून, त्या आधारेच घोटाळ्यातील सहआरोपी बिजू हा चंडी यांच्यावरच ते दबावतंत्राचा वापर करत असल्याचा सरिताचा दावा आहे.
सरिताची कारकीर्द
मध्य केरळमधील चेंगलुर येथे एका मध्यमवर्गीय नायर कुटुंबात जन्म. सोमशेखरन व इंदिरा या दाम्पत्याचे दुसरे अपत्य. तरुणपणीच सरिताच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अबोल असली तरी अभ्यासात हुशार होती. वयाच्या १८व्या वर्षी विवाहबद्ध झाली. विवाहानंतर विमान देखभाल व तंत्रज्ञानात पदविका घेतली. मात्र तिचा विवाह फार काळ टिकला नाही. मुलाच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे लग्न मोडले.२००५ मध्ये ती बिजू रामकृष्णनच्या संपर्कात आली. सरिताला २००५ मध्ये एका घोटाळ्यात अटक झाली होती. बिजूने सरिताशी विवाह करण्यासाठी पत्नी रश्मीची २००६ मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्या म्हणून या घटनेची नोंद केली होती. मात्र सौर घोटाळा उघडकीस आल्यावर चंडी सरकारने या प्रकरणाचा नव्याने तपास केल्यावर बिजूला हत्येप्रकरणी अटक झाली. राज्यातील शेकडो बार बंद केल्याने मद्यसम्राटांच्या दबाव गटाचे हे षड्यंत्र असल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचे चंडी यांचे म्हणणे आहे. कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या दूरध्वनींचा माझा थेट संबंध नाही. श्रीधरन नायरला वैयक्तिक स्वरूपात भेटल्याचा इन्कार मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
सौर घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जी. शिवरंजन यांच्या नेतृत्वात आयोग नेमण्यात आला आहे. मुख्यमंत्री चंडी यांचीही नुकतीच अनेक तास चौकशी झालीप्
पुढे काय होणार..
मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतमाकपप्रणीत डाव्या आघाडीची घोडदौड, त्यातच राज्यात भाजपने इळवा समाजाच्या प्रमुख संघटनेला हाताशी धरून आखलेली रणनीती यामुळे सत्ताधाऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. चंडी यांच्यावर एफआयआर दाखल झाल्याने त्यांच्यावर राजीनाम्यासाठी पूर्वीपासूनच दबाव आहे. आगामी निवडणुकीत सत्ताधारी आघाडीची कसोटी आहे.

हृषीकेश देशपांडे
hrishikeshdeshpande@expressindia.com