सर्वच शाखांच्या शासकीय व खासगी महाविद्यालयांमुळे कराड व उपनगरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखावर आहे. परिणामी गुणवत्ता आणि दर्जा यांचा कस इथे लागतो. त्यात शिस्त, उज्ज्वल यशाची परंपरा, प्रज्ञेचे सवरेत्कृष्ट संस्कारपीठ अशी ख्याती कायम राखणाऱ्या कन्या प्रशालेचा इतिहास सुवर्ण अक्षरांनीच लिहिला जावा असा आहे.

‘सर्वहि तपस्या साध्यम्।’ या ध्येयाने प्रेरित असलेली ‘स्वर्गीय रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला’ म्हणजे प्रज्ञेचे संस्कारपीठच. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांची चिरंतन स्मृती जपली जावी, यासाठी कराडमधील काही जाणकार मंडळी एकत्र आली आणि ‘कराड शिक्षण मंडळा’ची स्थापना होऊन टिळक हायस्कूल सुरू झाले. यानंतर मुलींच्या शिक्षणाची वेगळी सोय व्हावी, असा विचार पुढे येऊन संस्थेकडून १९४० मध्ये कन्याशाळा स्थापली गेली. पुढे या शाळेचे ‘स्वर्गीय रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला’ असे नामकरण झाले.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…

५४ विभाग

विद्यार्थिनींच्या उमलत्या अंतर्मनाला प्रयोगशाळेचे स्वरूप देऊन शिक्षण, संस्कार, सद्विचार, राष्ट्राभिमान अन् गुणवत्तेतून चांगले ते सर्व देण्याचा प्रयत्न इथे होतो. विद्यार्थिनींचा सर्वागीण विकास साधण्याची जबाबदारीच जणू कन्याशाळा पार पाडत असल्याचे सुखद चित्र आहे. सध्या शाळेत वेगवेगळे तब्बल ५४ विभाग स्थापण्यात आले आहेत. त्या माध्यमातून नित्याने किमान एक उपक्रम वा कार्यक्रम आयोजिला जातो. त्यामुळे उपक्रम व कार्यक्रम राबवणारी शाळा म्हणूनही कन्याशाळेची विशेष ओळख आहे. केवळ लिहिणे, वाचणे आणि बोलणे इतकेच शिकवणे म्हणजे शाळा हे या प्रशालेत सीमित नसून, विद्यार्थिनींचे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारातून अवघे जीवन सार्थकी लागावे यासाठी प्रशालेच्या शिक्षकवर्गाची तळमळ दिसून येते.

इथे प्रार्थना, समूहगीत, परिपाठ हे नित्याचे आहेच; पण याचबरोबर कथा, काव्य, नाटय़, निबंध, लघुकथा, चरित्रे, नियतकालिके, वक्तृत्व, गीतापाठ, यशवंतराव चव्हाणांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’चे वाचन आदी विविधांगी सादरीकरण केले जाते. समाजसेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, विज्ञानछंद मंडळ, सहली, प्रकल्प वाङ्मय मंडळ, इंग्लिश क्लब, क्रीडा सप्ताह, स्वच्छ शाळा-सुंदर शाळा, भारतीय सण, साहित्य, कला, संस्कृती, मानवता इत्यादी अंगांनी विविध उपक्रम व कार्यक्रमांतून विद्यार्थिनींना उत्स्फूर्तपणे सहभागी करून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. बुद्धीचा उत्तरोत्तर विकास होऊन विद्यार्थिनींचे कोवळे मन अधिकाधिक सजग करीत त्यांच्या जीवनाला सकारात्मक अशी दिशा देण्याचे कार्य घडते आहे. याचबरोबर मुख्याध्यापिका मंजिरी ढवळेबाईंच्या प्रेरणेने अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात

पुरस्कारांची शिखरे

शालाबाह्य़ उपक्रम, कार्यक्रम आणि परीक्षांचे आयोजनही करण्यात शाळा अग्रेसर असते. शाळेची क्रीडा क्षेत्रातील कामगिरीदेखील गौरवास्पद आहे. सीमा लाड या विद्यार्थिनीने शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे. पायल खाडे हिने आंतरराष्ट्रीय स्पध्रेत सहभाग नोंदवला आहे. शुभदा शिखरे ही शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. समृद्धी कुलकर्णी या विद्यार्थिनीने तर सलग ५१ तास स्केटिंग करून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये वर्णी साधली आहे. धावणे, पोहणे, दोरउडय़ा अशा वैयक्तिक तसेच खो-खो, कबड्डी यांसारख्या सांघिक क्रीडा प्रकारांत शाळेचे संघ राष्ट्रीय पातळीपर्यंत यश संपादन करून आहेत. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी क्रीडा विभाग सातत्याने प्रयत्नशील असतो. त्यातून अनेक विद्यार्थिनींनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी मारलेली आहे. मैदानी खेळांची पथके- झांज, लेझीम, लाठीकाठी, रोप मल्लखांब, मानवी मनोरे, योगासने, बरची, टिपरी नृत्य, एरोबिक्स या पथकांना नानाविध संमेलने, शोभायात्रांमधून अग्रेसर राहण्याचा मान मिळणे हे कन्या प्रशालेचे वैशिष्टय़ आहे.

विद्यार्थिनींच्या भाषिक क्षमतांच्या विकासाबरोबरच इतरांच्या भावना, विचार समजून घेता याव्यात यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कथा स्पर्धा, काव्यपूर्ती स्पर्धा, वादविवाद, परिसंवाद, चर्चासत्रे, मुलाखती, नामवंत वक्त्यांची व्याख्याने अशा कार्यक्रमांबरोबरच मंगळागौरीची पारंपरिक गीते, खेळ, भोंडला, स्नेहबंध, रंगपंचमी, रक्षाबंधन असे सणही साजरे होतात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘कुसुमांजली’ हा त्यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम उपस्थितांत चिरस्मरणीय ठरून गेला आहे. छात्र प्रबोधिनीतर्फे आयोजिलेल्या ‘तुम्हीच व्हा संपादक’ या हस्तलिखितास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

गाईड या विभागातर्फे ‘खरी कमाई’ या उपक्रमांतर्गत प्रशालेने जिल्हास्तरीय पारितोषिक मिळवले. या व अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थिनींची मने श्रमदान व समाजकार्यासाठी घडवली जातात.

कलांचा त्रिवेणी संगम

प्रशालेत नवीन सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रथा आहे. त्यात एका विषयावर आधारित नृत्य, नाटय़, संगीताचा आविष्कार, गाणं स्त्री मनाचं, लोकसंगीत ते शोकसंगीत, किलबिलाट, ऋतुगंध, वंदे मातरम्, कान्हा, मोरया, सा रे ग म प, बोलावा विठ्ठल व राजा शिवछत्रपती आदी विषयांवर हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. दर्जेदार संगीत, नृत्य, नाटय़ यांच्या त्रिवेणी संगमामुळे संपूर्ण कराडकरांच्या उत्सुकतेचे कार्यक्रमही गाजले आहेत. आजवर प्रशालेमध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर, गिरीश ओक, तारा भवाळकर, जयंतराव टिळक, स्नेहलता देशमुख, अश्विनी धोंगडे, नसिम हुरजूक अशा अनेक मान्यवरांनी प्रशालेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांच्याकडून शाळेची प्रशंसा झाली आहे. गुणवत्ता, शिस्त, संस्कार, उपक्रमशीलता, रचनावादी शिक्षण, सामाजिक जाणिवांचे संचित यामुळे लाहोटी कन्या प्रशालेचा लौकिक व प्रगती उत्तरोत्तर वृद्धिंगतच होत राहील यात शंका वाटत नाही.

 

विजय पाटील

– संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com