मस्ती तेथे मातीया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

बाबासाहेब बॅरिस्टर होऊन परत आले हे कळताच त्यांचे कौतुक करावे म्हणून शाहू महाराज स्वत: त्यांच्या छोटय़ा घरी भेटण्यासाठी गेले. शाहू महाराजांना बघताच बाबासाहेब उद्गारले की, ‘‘राजे, आपण एक आज्ञा दिली असती तर मी स्वत: आपल्याला भेटायला आलो असतो, आपण ही तसदी का घेतलीत?’’ शाहू महाराजांचे त्या वेळचे शब्द फार बोलके होते, ‘‘बाबासाहेब, आम्ही परंपरांचे राजे; परंतु आपण ज्ञानाचे राजे!! ज्ञानाच्या भेटीसाठी परंपरा आली तर काय बिघडले?’’ एक राजरूपी जनसेवक आणि ज्ञानाचा एक विद्वान यांच्यातील हा संवाद खूप काही सांगून जातो. दुर्दैवाने याच शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच तत्त्वांना मूठमाती देण्याचे काम चालले आहे. सरकारी अधिकारी नावाचा ज्ञानाचा पंडित आणि लोकप्रतिनिधी म्हणून तोरा मिरवणारा (स्वयंघोषित) जनसेवक यांच्यातील वाढत चाललेली दरी समाजासाठी घातक ठरत आहे. लोकशाहीचे भक्कम बाळकडू आमच्या देशात सर्वाना लहानपणापासून मिळत आलेले आहे. लोकशाहीचा पाया म्हणजे या दोघांचा सकारात्मक समन्वय असतो; परंतु त्यांच्यातील छत्तीसचा आकडा आमच्या लोकशाहीचा पाया डळमळीत करतोय की काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे अथक परिश्रमाच्या जोरावर सरकारी सेवेत आलेले अधिकारी, तर दुसरीकडे लोकांची ‘मत’रूपी मने जिंकून आलेले प्रतिनिधी!! दोघेही घटक सन्मानास योग्य आहेत, यात कुणाचे दुमत नाही; परंतु त्यांना कुíनसात घालण्यासाठी आदेश काढावयाची वेळ येत असेल तर मात्र पाणी नक्कीच कुठे तरी मुरत आहे, कारण सन्मान हा केवळ आदेशांद्वारे मिळत नसतो, तर तो आपल्या कामांनी मिळवायचा असतो. आपल्या कामांनी हा सन्मान प्राप्त केलेले अनेक लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी महाराष्ट्राच्या मातीत झाले आहेत, किंबहुना आताही आहेत; पण सध्या चाललेला हा कल्लोळ आपलो लक्ष नक्कीच विचलित करतोय; पण राजकारणाचा बदललेला चेहरा खूप प्रश्न निर्माण करतोय. राज्यघटनेला आव्हान देतोय. घटनेपलीकडे जाऊन अधिकाऱ्यांची गळचेपी सुरू झाली. मोठय़ा शहरातल्या या घटना या माध्यमामुळे जरी समोर आल्या तरीही ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांची गळचेपी चालूच आहे. ‘समाजकारण’ हा एके काळी असलेला राजकारणाचा चेहरा आता गुंडागर्दीच्या आधिपत्याखाली आला आहे. जिथे सरकारी निधीचा वापर लोकोपयोगसाठी केला जायला हवा तिथे त्याचा काळाबाजार सुरूच राहतो. नगरसेवक होण्याआधी सायकल असणारे आमचे लोकप्रतिनिधी जनसेवक(?) ती टर्म संपेपर्यंत स्वत:च्या चारचाकी गाडीत फिरायला लागतात; पण समाजाच्या समस्या मात्र बदलत नाहीत. समाजबदलाचे व्रत घेऊन ज्ञानाचे विद्वान जेव्हा सरकारी अधिकारी म्हणून समोर येतात तेव्हा त्यांना अशाच प्रतिनिधींविरुद्ध लढा सुरू करावा लागतो; पण त्यांचा लढा तोकडा पडतो. ज्या संविधानाने लोकप्रतिनिधींना समाजात मानाचा दर्जा मिळवून दिला आहे, तोच प्रतिनिधी वर्ग संविधानाविरुद्ध उभा ठाकला आहे. आमचा समाज झोपी गेला आहे. याच झोपाळूपणामुळे राजकारणाने गेंडय़ाची कातडी धारण केली आहे. मोठमोठी कंत्राटे नातेवाईकाच्या खिशात घातली जातात. जनसामान्याला सर्व कळते, समजतेही, पण जाब विचारण्याची त्यांची हिंमत होत नाही. ‘काही करता येत नसले तर राजकारणात यायचे’ हा आधुनिक पायंडा! त्यातला घरातला कुणी या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवून बसला असेल तर मग काही बघायचे काम नाही. जनसामान्यांच्या पिळवणुकीचा हा वसा सुरू होतो, तसाच पुढेही चालूच राहतो. नोकरशहा वर्गाने कितीही केले तरी काहीही होऊ शकत नाही, कारण सरकारी अधिकार (अधिकारी नव्हे) हे राजकारणी लोकांच्या सत्तेच्या उन्मत्तापुढे गुडघे टेकवतातच. त्यात जनताजनार्दन फक्त गंमत म्हणून याकडे बघत असते. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध जो ठराव महानगरपालिकेने संमत केला त्याविरुद्ध मुंबापुरी या सनदी अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

लोकांचा पाठिंबा मिळाला की सरकारी अधिकारी अजून भक्कमपणे प्रतिनिधींच्या काळाबाजारापुढे तेवढय़ाच ताकदीने उभे राहतात; पण अशा किती ठिकाणी आमचे लोक आणि आमच्या लोकशाहीचा आत्मा असलेला समाज या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी भक्कम उभे राहतात? लोकशाहीत जेवढा लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा यांचा समन्वय महत्त्वाचा आहे त्याहून जास्त सर्वसामान्य जनतेची भूमिका निर्णायक आहे; पण ही भूमिका कुठे तरी कमी पडत आहे. घटनेचा बळी दिला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिथे कार्यक्षम अधिकारी आहेत तिथे समाज पाठीशी भक्कम उभा राहायला हवा. जिथे मतदारवर्ग आणि नोकरशहा सरकारी अधिकारी यांची युती होते तिथे लोकप्रतिनिधींच्या मस्तीची माती होतेच. समाजातील लोकांनी याकडे लक्ष द्यायला हवे. जिथे लोकप्रतिनिधी समाजसेवेचा नवा अध्याय लिहील तिथे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका आणि जिथे लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या मुळावर आघात करत असेल तिथे त्याच्या पाठीत धपाटा टाकायला मागेपुढे पाहू नका. जागी झालेली जनता नोकरशहा वर्गाला, लोकप्रतिनिधी वर्गाला बळकटी देणार आहे, पर्यायाने लोकशाहीला बळकटी मिळणार आहे. घटनेचा भंग कुणीही करत असेल तर तिथे आवाज उठवला गेलाच पाहिजे. हा आवाज उठवायचे काम फक्त आणि फक्त तुम्ही, आम्ही, आपण करू शकतो. फक्त गरज आहे ती झोपेतून जागे होण्याची!!

(सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे)