चुकांचे.. प्रायश्चित! विद्यमान अभूतपूर्व, केंद्र सरकार अचानक.. भयानक.. धक्कादायक.. निर्णय घेण्यात निष्णात आहे. सर्जिकल स्ट्राइक, बलुचिस्तानचा मुद्दा, निश्चलनीकरण आणि बुधवारचा अर्थसंकल्प, सरकारचे हे सारे निर्णय फसल्यात जमा आहेत. चांगल्या दिवसांचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने जनतेवर वाईट दिवस आणले. संपूर्ण देशाला नोटाबंदीमुळे अक्षरश: रस्त्यावर आणले. संपूर्ण देशात अर्थकल्लोळ निर्माण झाला. अर्थकल्लोळात अर्थ-निरक्षर, हैराण, परेशान, जनतेला बुधवारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘शिळ्या ताकाला नवीन फोडणी’ होय. अर्थक्रांतीत नव्हे तर अर्थभ्रांतील होरपळलेल्या जनतेच्या जखमांवर मलम लावण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. मात्र यामुळे या खोल जखमा भरतील का? हा अनुत्तरित सवाल आहे! परकीय गुंतवणूक मंडळ बरखास्ती, स्वस्त घरबांधणी क्षेत्रास पायाभूत क्षेत्राचा दर्जा, रेल्वेचे स्वावलंबन, मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत, संरक्षण, आरोग्य, सामाजिक व कृषी क्षेत्रासाठीच्या थोडय़ाफार तरतुदी वगळता हा अर्थसंकल्प जनतेचा अपेक्षाभंग करणाराच आहे. जनतेला काही देण्याऐवजी सरकारला बरेच श्रेय देण्याची घाई वित्तमंत्र्यांनी केलेली दिसते. जागतिक वेगवान अर्थव्यवस्थेत भारताचा सहावा क्रमांक लागतो, हे २०१३-१४चे जुनेच मेडल वित्तमंत्र्यांनी ‘ऑलिम्पिक गोल्ड’ मेडलसारखे मोठय़ा अभिमानाने मिरवले! वेळोवेळी सरकारकडून घायाळ झालेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. काही प्रमाणात सरकारचे ‘लज्जारक्षण’ या अर्थसंकल्पाने झाले आहे हे अर्धसत्य मान्य करावेच लागते, पण यामुळे सरकारच्या अपराधी धोरणांचे शुद्धीकरण होईल का? ‘जो बूंद से गई, वो हौद से नहीं आती’ हेच खरे मानणे योग्य ठरेल! बुधवारच्या ‘अवकाळी’ अर्थसंकल्पात तरुणाईला रोजगारनिर्मितीचे गाजर दाखविले आहे. सत्तेत येण्यापूर्वीदेखील मोदी सरकारने हेच गाजर दाखविले होते, मात्र सत्ताप्राप्तीनंतर सरकारला याचे स्वाभाविक विस्मरण झाले. दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मितीचे आमिष दाखवणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात पाच लाखांपेक्षा कमीच रोजगारनिर्मिती करून सरकार ‘नापास’ झाल्याचे सिद्ध केले आहे. रोजगाराच्या या गाजराचे आता ‘गाजर-गवत’ झाले आहे. कृषी उत्पादन वाढवण्यात अपयश, सिंचन क्षेत्रातील प्रकल्पांचे अपूर्णत्व, मनरेगा बजेट वाढीत अपयश, राष्ट्रीय महामार्गातील १०,००० कि.मी. उद्दिष्टे असताना केवळ ४०२१ कि.मी. शेळीच्या शेपटाइतकेच उद्दिष्टे साध्य केले आहे; तरी विद्यमान सरकारने सर्वच क्षेत्रांत कशी भरीव कामगिरी केली आहे याचे श्रेय वित्तमंत्र्यांनी स्वत:च्या भाळेवर लाटले आहे. हीच तर खरी ‘मॅन ऑफ दि मोमेंट’ची गंमत आहे. कळीचे मुद्दे उकरून काढण्यात पटाईत केंद्र सरकारमधील चाणाक्ष वित्तमंत्र्यांनी ९२ वर्षांची परंपरा मोडीत रेल्वे अर्थसंकल्पाला मुख्य अर्थसंकल्पात गुंडाळले. वित्तमंत्र्यांनी निश्चलीकरणावर मौन बाळगणेच योग्य मानले. नोटाबंदीच्या फायद्या-तोटय़ाचा, काळ्या पशाचा हिशोब मात्र छप्पन इंची छाती असणाऱ्या सरकारने उघडला नाही. पहिल्या अर्थसंकल्पातील अनेक विषयाकडे जाणून-बुजून डोळेझाक केली आहे. ज्या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘बरा’ असे केले जात आहे त्यातील उद्घोषणांबाबत उद्या लबाडी होणार नाही कशावरून? या अर्थसंकल्पाने सरळ सरळ जनतेला वेडय़ात काढले आहे. काहीही न करता खूप काही केल्याचा आभास निर्माण केला आहे. राजकीय पक्षांच्या देणग्यांवर दोन हजारांची मर्यादा! किती महान निर्णय! देणगीदारांच्या संख्येचे काय? उद्या आपोआपच दात्यांची संख्या वर्तमान देशभक्ताप्रमाणे वाढली तर कोणाला आश्चर्य वाटता कामा नये! हे सगळे न समजण्याइतके वित्तमंत्री नादान आहेत का? शेतकरी आणि ग्रामीण जनतेला काही तरी दिल्यासारखे बुधवारच्या अर्थसंकल्पात केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेविषयी सरकारला एवढी सहानुभूती असती तर शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत सरकार मुके आणि बहिरे झाले नसते. चलनगोंधळामुळे शेतीमालाचे भाव कोसळले, पिकले पण योग्य भावात विकले नाही, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कामगारवर्गाला तर या अर्थसंकल्पात गावकुसाबाहेर ठेवण्यात आले आहे.

‘पोपटपंची’ विद्यमान केंद्र सरकारने दोन वर्षांत १८८७  आश्वासनांची उधळण केली, त्यातील ५५२ आश्वासनांची पूर्तता केली, ३९२ आश्वासने रद्द केली, ८९३ आश्वासने कागदावरच राहून गेली तर ५० आश्वासने ‘अज्ञातवासात’ गेली. यावरून या सरकारची खरी ‘ओळख’ पटते. जनतेलाही याची आता सवय झाली आहे. बुधवारच्या अर्थसंकल्पात सर्वाना खूश ठेवण्याच्या नादात सर्वाची नाराजी झाली आहे. आपणच निवडून दिलेले सरकार एवढे ‘जाच’ करेल असे जनतेला कधीच वाटले नाही, पण यूपीए असो की एनडीए सारे एकाच माळेचे मणी हे जनतेला कळून चुकले आहे. बुधवारचा अर्थसंकल्प म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून दोन-अडीच वर्षांत विद्यमान केंद्र सरकारने जे पाप केले आहे.. ज्या चुका केल्या आहेत हा अर्थसंकल्प त्या अक्षम्य चुकांचे प्रायश्चित आहे.. प्रायश्चित बस्स्.. अन्य काही नाही!!

(वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ)