* आपला इतिहास झाकलेला की भित्रा!
* एस. एल. भैरप्पा यांचा सवाल
गप्पांचे फड रंगविणे, हा मराठी माणसाचा प्रिय छंद. महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत इतिहास घडविण्याजोगे काम उभे राहिले, त्यात महत्त्वाचा वाटा अशा गप्पांच्या फडांचाही आहे. महाराष्ट्राचा हा स्वभावविशेष आजकालची समाजमाध्यमे, धकाधकीची जीवनशैली अशा कारणांमुळे बदलू लागला आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. गप्पाष्टकांच्या या परंपरेत पुनरपि प्राण फुंकण्याच्या हेतूने ‘लोकसत्ता’ने ‘लोकसत्ता गप्पा’ हा उपक्रम सुरू केला. त्याचे उद्घाटन झाले गेल्या २ एप्रिलला. तेही एस. एल. भैरप्पा यांच्यासारख्या मातब्बर साहित्यिक, विचारवंताच्या गप्पांनी. केवळ कन्नडच नव्हे तर जागतिक स्तरावर आपल्या लेखणीचा ठसा उमटविणाऱ्या भैरप्पा आणि साहित्य, नाटय़, चित्रपट, संगीत, कला आदी विविध क्षेत्रांतील दर्दी मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. भैरप्पा यांना विविध प्रश्न विचारत, त्यांच्याशी गप्पा मारत त्यांनी भैरप्पांची लेखनप्रक्रियेपासून साहित्यिकाला टाळताच न येणाऱ्या समाजकारण आणि राजकारण या विषयांपर्यंतची मते जाणून घेतली. भैरप्पा यांच्या बहुतांश कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी या श्रोते आणि भैरप्पा यांच्यातील दुवा बनल्या होत्या. त्यानंतर सुमारे दोन तास रंगलेल्या गप्पांचा हा संपादित अंश..

* उमा कुलकर्णी – तुमच्या संपूर्ण लेखनामागची प्रेरणा काय?
भैरप्पा – कन्नड वाचकांपेक्षाही मराठी वाचकांशी माझं अधिक जवळचं नातं आहे. मराठी वाचक भारतातला असो की परदेशातला, तो साहित्यप्रेमी आणि शास्त्रीय संगीताचाही प्रेमी आहे. माझी पहिली आवड शास्त्रीय संगीत आहे. शास्त्रीय संगीत माझं प्रेरणास्थान आहे. माझ्या कल्पनाशक्तीला शास्त्रीय संगीतामधूनच प्रेरणा मिळते. जेव्हा माझ्या लेखनात काही अडथळा येतो, विचार थांबतात तेव्हा शास्त्रीय संगीत ऐकल्यानंतर त्या विचारांना पुन्हा चालना मिळते. माझ्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा खूप मोठा संग्रह आहे. दोन-तीन तास ते संगीत ऐकल्यानंतर माझ्या कल्पना स्पष्ट होतात आणि याचमुळे मी मराठी वाचकांच्या अधिक जवळ आहे. त्यामुळे मराठी वाचकांशी संवाद साधण्याकरता आणि महाराष्ट्रात येण्यास नेहमीच उत्सुक असतो.
दक्षिण कर्नाटकातील एका खेडय़ातील गरीब कुटुंबातून मी आलो. अकरा वर्षांचा असताना माझी आई गेली, नंतर पंधराव्या वर्षी पाच वर्षांचा माझा भाऊ गमावला. माझ्या भावाचं पार्थिव मीच स्मशानापर्यंत नेलं. माझ्या एका लहान बहिणीचाही अकाली मृत्यू झाला. इथून माझ्या मनातील प्रश्नांना सुरुवात झाली. माणूस का मरतो, मृत्यूचा अर्थ काय असे प्रश्न माझ्या भोवती फेर धरू लागले. पुढे शिक्षणासाठी म्हैसूरला गेलो तेव्हा मनात उभे राहिलेले हे प्रश्न तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांना विचारले. त्यावर त्यांनी मला ‘कठोपनिषद’ या ग्रंथाचं भाषांतर वाचायला दिलं. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहेच. नचिकेत यमाकडे जातो तेव्हा यम त्याला तीन वर देतो. नचिकेत यमाला विचारतो, तू मृत्यूची देवता आहेस. तुला मृत्यू म्हणजे काय हे माहिती असेलच. मृत्यूनंतर आत्मा राहतो की त्याचा नाश होतो? वगैरे वगैरे. नचिकेतच्या प्रश्नांना यम जी उत्तरं देतो ती ‘कठोपनिषदा’त आहेत. प्राध्यापकांनी दिलेलं कन्नड भाषांतर मी वाचलं, पण मला काहीही कळलं नाही. हे त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले, हो, ते समजणं खरोखरच कठीण आहे. कठोपनिषदातील तत्त्वज्ञान तुला जाणून घ्यायचं असेल, तर तू एमएच्या अभ्यासासाठी ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घे. मी तो विषय घेतला, तेव्हा ‘फिलॉसॉफी बेक्स नो ब्रेड’ हे प्रसिद्ध वाक्य तुला माहिती नाही का? असा टोमणा मित्रांनी मला लगावला. त्यावर मी त्यांना ‘मी माझी बेकरी उभारेन आणि पोट भरेन’ असे प्रत्युत्तर दिलं. या विषयासह मला उपयोजित कला, साहित्य या विषयांतही आवड निर्माण झाली.
‘तत्त्वज्ञान’ विषय घेऊन मी एमए पूर्ण केलं आणि सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. पुढे पीएचडी केली. त्या वेळी ए. जी. जावडेकर हे माझे मार्गदर्शक होते. जावडेकर हे आर. डी. रानडे यांचे विद्यार्थी. रानडे हे स्वत: उच्चविद्याविभूषित व उच्च साधक होते. पीएचडीसाठी प्रबंध सादर केल्यानंतर पुढे मी मुलाखतीसाठी गेलो. तिथं पुन्हा नरवणे या मराठी प्राध्यापकांशी भेट झाली. ते म्हणाले, हा प्रबंध तू पूर्ण केला आहेस तर या विषयातच सातत्य राख. ‘नैतिक मूल्य आणि आजच्या जीवनातील मूल्य’ या विषयावर पुस्तक लिही. डी. लिट्. पदवीच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग होईल. मग त्या कामाला मी लागलो. या पुस्तकाच्या अगोदर मी ‘वंशवृक्ष’ या नावाने एक कादंबरी लिहिली होती. कर्नाटकातील प्रकाशकाने ती सुधारित करून द्यावी असं सुचविलं होतं. पण डी.लिट्.च्या कामात व्यग्र असल्याने ‘वंशवृक्ष’ विसरून गेलो. शेवटी प्रकाशकांनी, ‘आम्ही या कादंबरीबाबत घोषणा केली आहे, तरी तुम्ही ती का देत नाही’ असं चिडून पत्र लिहिलं. त्यामुळे ‘वंशवृक्ष’चं हस्तलिखित पुन्हा वाचायला, त्यात सुधारणा करायला सुरुवात केली. ते करत असताना हीच माझी खरी आवड आहे, हे माझ्या लक्षात आलं. माझी कल्पनाशक्ती, निर्मितीक्षमतेचा प्रवास याच दिशेने आहे. ती प्रबंध लेखनातून नाही, तर कादंबरी लेखनातूनच व्यक्त होऊ शकते. नाहीतरी प्रबंधात काय असतं? एक विचार घ्यायचा, त्याची दुसऱ्याशी पडताळणी करायची, दुसऱ्याची तिसऱ्याशी.. त्यामुळे प्रबंध लिहिला नाही तरी चालेल, पण निर्मितीमधील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी कादंबरी लेखन करायचं हे गंभीरपणे मनावर घेतलं. कादंबरी लेखनातील तांत्रिक बाबी आत्मसात केल्या आणि कादंबरीकार म्हणून सुरुवात केली. तत्त्वज्ञान या विषयात आपण सर्जनशील व सृजनात्मक काही करू शकत नाही. उपनिषदं, वेद हेही सृजनात्मक आहेत. ‘प्रकृती व पुरुष’ यावर लिहिणारे शंकराचार्य हे उत्तम तत्त्ववेत्तेच होते. त्यांच्यानंतर रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस होऊन गेले. मी तत्त्वज्ञान विषयाचा केवळ एक चांगला वाचक, शिक्षक होऊ शकतो, पण लेखक होऊ शकणार नाही आणि आपली सर्जनशीलता फक्त कादंबरी लेखनातूनच व्यक्त होऊ शकते हे मला कळले.
प्राध्यापक जावडेकर यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी डी.लिट्. सोडून दिल्याचं कळल्यानंतर ते माझ्यावर रागावले. काही जण बुद्धिमान असतात, पण ते अभ्यासू असतातच असं नाही. काही जण अभ्यासू असतात, पण ते बुद्धिमान असतीलच असं नाही. पण तू बुद्धिमानही आहेस आणि अभ्यासूही आहेस. पण ‘साहित्य’ नावाच्या दैत्याने आता तुझ्या मनात प्रवेश केला आहे. कादंबरी लेखन करणं सोडून द्यावं म्हणून त्यांनी मला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पुढे ‘वंशवृक्ष’ प्रकाशित झाली. हिंदीतही त्याचा अनुवाद झाला. तो मी त्यांना वाचायला दिला, तेव्हा ते मला म्हणाले, तुझ्यातील तत्त्वज्ञान संपलेलं नाही; तर या निमित्ताने तुझ्यातील तत्त्ववेत्त्याने कादंबरीकार म्हणून एक नवं रूप धारण केलं आहे. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाखेरीज तू कोणत्याही क्षेत्रात खोलवर जाऊ शकणार नाहीस. तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन ज्या साहित्याची निर्मिती केली जाते ते साहित्य शाश्वत ठरते. मी तत्त्वज्ञान विषयात काही लेखन करू शकलो नाही, पण माझ्या साहित्यातून उत्तम तत्त्वज्ञान निर्मिती होऊ शकते.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

Untitled-12

 

* प्रा. मोहिनी वर्दे – महाराष्ट्रात १९ व्या शतकात सामाजिक सुधारणांचे खंदे पुरस्कर्ते होऊन गेले, तसे त्या काळात कर्नाटकात कोण मंडळी होऊन गेली?
भैरप्पा – ठामपणाने अशी नावे नाही सांगता येणार. १९ आणि २० व्या शतकात उत्तर कर्नाटकावर प्रामुख्याने महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील खंदे पुरस्कर्ते आणि तत्त्ववेत्ते असलेले टिळक, आगरकर, धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक चळवळींना मदत करणारे शाहू महाराज यांचाच प्रभाव होता. दक्षिण कर्नाटकातल्या म्हैसूर राज्यात काही चांगले राजे-महाराजे होऊन गेले, त्यातील विश्वेवरय्या हे एक महत्त्वाचं नाव. त्यांच्या काळात शाळा, महाविद्यालयं सुरू झाली.

* जयराज साळगावकर- आपण मुळात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक. आपलं तत्त्वज्ञान साहित्यातून व्यक्त होतं. विचारवंत अमर्त्य सेन यांना ‘मध्व’ यांचं तत्त्वज्ञान योग्य वाटतं. पण इतरांना ते वाटतंच असं नाही. ‘मध्वाचार्य’ यांच्या ‘मध्व’ तत्त्वज्ञानाविषयी आपलं मत काय?
भैरप्पा – मी मध्वाचार्याविषयी फारच थोडे वाचले आहे. त्यामुळे, त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी फारशी माहिती नाही.

* सुहास बहुलकर – आपल्या ‘पर्व’ या कादंबरीत आपण युद्धाचं वर्णन केलं आहे. गंगा आणि आसपासचा प्रदेश, हवामान, भौगोलिक परिस्थिती याचीही माहिती येते. आपण याचा अभ्यास केला की प्रत्यक्ष अनुभवातून ते लिहिलं?
भैरप्पा- थोडा अनुभव आणि जास्त कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेच्या जोरावर ते लिहिले आहे. ‘पर्व’च्या लेखनापूर्वी युद्धविषयक बहुतांश साहित्य मी वाचलं. सैन्यदलातील अधिकारी पदावरील व्यक्तींची चरित्रं वाचली. हिटलरचं ‘गॅस चेंबर’, आफ्रिकन युद्धं आणि बरंच काही वाचलं, अभ्यासलं. त्या आधारे युद्धविषयक वर्णन केलं. लेखकाला केवळ कल्पनेने ते संपूर्ण चित्र, भावना वाचकांपुढे उभ्या करता आल्या पाहिजेत. ते करण्यात तो यशस्वी झाला तर ती खरी सर्जनशीलता असते. ‘पर्व’ वाचून सैन्यदलातून तुम्ही कधी निवृत्त झालात, असा प्रश्न काही सैन्यातील अधिकाऱ्यांनी मला विचारला होता!

* डॉ. मंजुनाथ – सध्या असहिष्णुता या विषयाबाबत खूप बोललं जात आहे. त्याविषयी काय सांगाल?
भैरप्पा – सहिष्णुता आणि असहिष्णुता हा राजकीय प्रश्न आहे. ‘पुरस्कार वापसी’ प्रकरणापासून हा विषय सुरू झाला. प्रसारमाध्यमातून त्याची चर्चा सुरू झाली. साहित्य अकादमीकडून दरवर्षी विविध प्रकारचे सुमारे पन्नास पुरस्कार दिले जातात. गेल्या साठ वर्षांपासून हे सुरू आहे. आता साठ गुणिले पन्नास करा! किती जणांनी पुरस्कार परत केले याची चर्चा प्रसारमाध्यमातून केली जाते. पण किती जण काही न बोलता शांत राहिले? किती जणांनी पुरस्कार परत केले नाहीत? याबाबत काहीच बोलले जात नाही. त्याचाही सर्व हिशेब दिला जावा, मगच सहिष्णुता आणि असहिष्णुता या विषयावर चर्चा करावी. ब्रिटिश, मोगल हे वर्चस्ववादी होते. ब्रिटिशांनी हिंदू-मुसलमान आणि उच्चवर्णीय व बहुजन यांच्यात फूट पाडली. यासाठीचे सरकारी नोकरीत कोण आहे, इंग्रजी भाषा कोणाला येते, हे निकष त्यांनी लावले. खरं तर ज्यांना संस्कृत, मराठी भाषा चांगल्या प्रकारे येत होती तेच लोक पुढे इंग्रजी भाषा शिकले. ब्रिटिशांच्या सेवेत लिपिक, कनिष्ठ अधिकारी म्हणून नोकरीला लागले. पण यावरून त्यांनी उच्चवर्णीय व बहुजन, अशिक्षित यांच्यात भेद निर्माण केला. खरं सांगायचे तर आर्थिक सत्ता ही तथाकथित उच्चवर्णीय म्हणविल्या जाणाऱ्यांकडे कधीच नव्हती. ती व्यवसाय, शेती, जमीन मालक या वर्गाकडेच होती. ब्रिटिशांनी जे तंत्र वापरलं त्याचाच वापर पुढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केला. हिंदू बहुसंख्य असल्याची भीती अल्पसंख्य असलेल्या मुसलमानांना दाखविली आणि ते तुमच्यावर सत्ता गाजवतील असं सांगत त्यांच्यापासून संरक्षण हवं असेल तर आमच्याकडे या, असं सांगितलं. त्याच वेळी हे उच्चवर्णीय तुमच्यावर सत्ता गाजवत असल्याचा बागुलबुवा बहुजनांच्या मनात निर्माण केला. त्याच्यापासून आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ, असं आश्वासन त्यांनाही दिलं. आजही याच तंत्राचा वापर सगळ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे या पाश्र्वभूमीवरही सहिष्णुता आणि असहिष्णुता तपासून पाहिली पाहिजे. पं. नेहरू यांचं नाव आम्ही विद्यापीठाला देऊ असं येथील कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी इंदिरा गांधी यांना सांगितलं आणि स्थापन केलेल्या विद्यापीठाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असं नाव दिलं. ते कम्युनिस्टांच्याच प्रभावाखाली आहे.
मी कोणत्याही हेतूने लेखन करत नाही. जे विचार मनात येतात ते कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेच्या आधारे शब्दबद्ध करतो. एका कादंबरीत एक विचार मांडला असेल, तर दुसऱ्या कादंबरीत त्याच्या विरोधीही विचार असू शकतो. पण कम्युनिस्ट जे आहेत ते प्रत्येक गोष्टीत ‘कम्युनिझम’च शोधतात. तुम्ही जे काही लिहाल त्यात कम्युनझिमचं दर्शन घडलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. सामाजिक शास्त्र, साहित्य याबाबतही त्यांनी तेच सुरू केलं आहे. याला पािठबा देणाऱ्यांच्याच नेमणुका त्यांनी या विद्यापीठात केल्या आहेत. जे लोक कम्युनिझमला मानत नाहीत त्यांच्या नेमणुका ते करत नाहीत. अटलबिहारी वाजपेयी हे उदारमतवादी आणि मवाळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या काळात हे सर्व चालून गेलं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्याच्या विरोधात कठोर पावलं उचलली आणि मग त्यातून त्याला ‘असहिष्णुता’ असं नाव दिलं गेलं. गेल्या पन्नास वर्षांत असहिष्णुता दिसली नाही ती आत्ताच कशी वाटायला लागली?

* अमृता सुभाष – ‘वंशवृक्ष’ ही कादंबरी कशी सुचली? लेखक म्हणून कधी काही सुचलं नाही, म्हणून लेखन प्रक्रिया थांबली आहे, असं कधी घडलं का?
भैरप्पा – या कादंबरीतील ‘श्रोत्री’ हे पात्र भारतातील लग्न परंपरेविषयी भाष्य करते. मुळात लग्नाचा उद्देश वंशवृद्धी हाच आहे. लग्न म्हणजे स्त्री-पुरुषाने एकत्र येऊन वंशवृद्धीसाठी केलेली व्यवस्था, असं भारतीय संस्कृती मानते. पाश्चात्त्य संस्कृतीत पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री अशीही लग्नं होतात, त्याला तिकडं मान्यता आहे. पण यातून वंशवृद्धी होणार नसेल तर त्याला लग्न का म्हणावं? या कादंबरीलेखनासाठी पां. वा. काणे यांनी लिहिलेले काही ग्रंथ वाचले, त्यांचा अभ्यास केला. ते वाचून माझी संकल्पना मी मांडली. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. हो कधी, कधी काही सुचलं नाही तर लेखन प्रक्रिया थांबते. अशा वेळी लेखणी खाली ठेवतो. बाहेर फिरायला जातो, संगीत ऐकतो आणि तात्पुरती लेखनविश्रांती घेऊन नंतर पुन्हा लेखन सुरू करतो.

* अर्जुन डांगळे – दलित साहित्य चळवळ व सामाजिक चळवळीविषयी काय सांगाल?
भैरप्पा – माझ्या ‘जा ओलांडूनी’ या कादंबरीत मी भारतातील जातप्रश्न मांडला आहे. ही कादंबरी अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. हे अनुवाद वाचून अनेकांनी जातीचा प्रश्न इतक्या खोलवर याआधी कोणीच हाताळला नसल्याचा अभिप्राय व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी दलित चळवळीचा विस्तार झाला आहे, तिथं या कादंबरीचं चांगलं स्वागत झालं आहे. मराठी दलित साहित्यिकांनाही ही कादंबरी आवडली असल्याचं ऐकलं आहे. त्यांचे प्रश्न यात मांडले गेल्याने त्यांना ती आपलीशी वाटली असावी. मात्र कर्नाटकातील दलितांना ही कादंबरी आवडली नाही.

* अभिराम भडकमकर – ‘आवरण’ या कादंबरीचं कर्नाटकात कसं स्वागत झालं?
भैरप्पा – पहिली आवृत्ती संपायला वेळ लागला. मात्र त्यापुढील सर्व आवृत्या पटापट संपल्या. वृत्तपत्रांतूनही त्याची चर्चा झाली. ‘आवरण’ही मी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांतील एक महत्त्वाची कादंबरी आहे. ही कादंबरी ८० टक्के वाचकांना आवडली, तर २० टक्के वाचक याच्या पूर्ण विरोधात आहेत. मी दोघांचंही स्वागत करतो. आपला इतिहास ू५ी१ी(िझाकलेला) की उ६ं१ (भित्रा) आहे? अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांना जे प्रश्न पडतात, मांडले जातात, ते आपल्याकडील प्रसारमाध्यमातून मांडले जात नाहीत. ‘सत्य सांगण्याचे धाडस’ हा ‘आवरण’ या कादंबरीचा मुख्य उद्देश होता. या कादंबरीच्या लेखनासाठी मी १३६ पुस्तकांचं वाचन व अभ्यास केला.

* किशोर कदम – ‘आवरण’ ही कादंबरी मला आवडली, त्याचा शेवट वाचून याचा पुढचा भाग आपल्या डोक्यात तयार आहे असं वाटतं, तसं आहे का?
भैरप्पा – या कादंबरीचा शेवट अर्धवट वाटतो असं मला अनेकांनी सांगितलं आहे. ही कादंबरी मी २००७ मध्ये लिहिली. जो शेवट मी केला आहे, त्यापेक्षा वेगळा काय शेवट मी करू शकणार होतो. कादंबरीचा शेवट अर्धवट सोडून दिल्यासारखा वाटतो हे मला मान्य आहे. त्याचा शेवट कोणताही केला असता, तर तो अवास्तव वाटला असता. पण तो अर्धवट ठेवल्याने तो वास्तववादी वाटतो, असं मला वाटतं. मात्र या कादंबरीचा दुसरा भागही लिहिला जाऊ शकतो. तो येईल की नाही हे मात्र मला माहीत नाही.

* अ‍ॅड्. जाई वैद्य – ‘पर्व’या कादंबरीत महाभारत दिसतं. महाभारत खरोखरच घडलं आहे का?
भैरप्पा – महाभारत खरं असून ते घडून गेलं असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यातला काही भाग पुढे त्यात घातला गेला असण्याची शक्यता आहे. महाभारताची कथा भारतातील जवळपास सर्वच भाषांमध्ये पोहचली आहे. महाभारतावर आधारित अनेक कविता, कथा, नाटकं नंतरच्या काळात आली आहेत. त्यात महाभारतातल्या अनेक मिथकांचा वापर केला गेला आहे. ही मिथकं किंवा या घटना आजच्या काळात मात्र नैतिकदृष्टय़ा मान्य होणार नाहीत. परंतु, यातील पात्रांचा वास्तवाशी मेळ घातल्यास महाभारताचं किंवा त्यातील पात्रांचं आकलन होण्यास मदत होते. त्या दृष्टिकोनातूनच ‘पर्व’चं लिखाण झालं आहे.

* अजित भुरे – आपले समकालीन साहित्य व साहित्यिकांविषयी आपलं काय मत आहे?
भैरप्पा – जे विशिष्ट जातीयवादी किंवा विचारांच्या दृष्टिकोनातून लिहितात त्यांना माझं लिखाण आवडत नाही. माझं लिखाण हे केवळ साहित्यमूल्यांची जोपासना करणारं असतं. मलाही विशिष्ट विचारसरणींतून लिहिलं गेलेलं साहित्य भावत नाही. पात्रांच्या मनाचा सखोल अभ्यास करायला मला आवडतो. दुसरं म्हणजे असं ठरावीक विचारसरणीतून लिहिलेलं साहित्य काळाच्या कसोटीवरही टिकत नाही. ‘वंशवृक्ष’ ही तद्दन भारतीय पाश्र्वभूमीवर लिहिली गेलेली कादंबरी परदेशी वाचकांनाही भावली आहे. क्रांती घडविणं हे साहित्याचे काम नाही. रस, ध्वनी, औचित्य ही मूलभूत साहित्याची तीन महत्त्वाची अंगं आहेत. पण, आपल्याकडील साहित्यिक वैचारिकतेत वाहत जातात. अशा प्रचारकी साहित्याला मूलभूत साहित्य म्हणता येत नाही.

* नीरजा – महाभारताप्रमाणे रामायणातील सूर-असूरांमधील युद्धाचीही नव्याने मांडणी करावीशी वाटते का?
भैरप्पा – रामायणाविषयी लिहिण्याचं माझ्या मनात आहे. ते लिहिताना पूर्णपणे नव्याने मांडणी करण्याचा माझा प्रयत्न असेल. ते विवेकी (रॅशनल) तसेच वास्तववादी असेल.

* मोनिका गजेंद्रगडकर – ‘मंद्र’ या कादंबरीत ‘शास्त्रीय संगीत’ हे एक पात्र म्हणून येतं. शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाचा वापर अशाप्रकारे सर्जनशील साहित्यासाठी करताना काही अडचणी येतात का?
भैरप्पा – नैतिक आणि सौंदर्य हे मूल्य असा कादंबरीचा विषय आहे. माझ्या प्रत्येक कादंबरीत मी तत्त्वज्ञानाचा शोध घेत असतो. वेगळी दिशा मिळेपर्यंत माझं समाधान होत नाही. जीवनात नैतिक मूल्यांबरोबरच इतर अनेक मूल्यंही तेवढीच महत्त्वाची आहेत. यात मला एका कलाकाराचं चरित्र मांडायचं होतं. त्यासाठी साहित्यिक, चित्रकार अशी पात्रं जाणीवपूर्वक घेतली नाहीत. संगीत हे सर्वसामान्यांशीही जोडलं गेलेलं असतं. मी दोन वर्षे संगीत शिकलो. पण षड्ज लावला की तो एक मिनिटापर्यंतच टिकायचा. नंतर तो खाली यायचा. ‘तुझी शक्ती तू वाचन आणि लेखनावर खर्च करतो म्हणून गळ्यातून उमटत नाही. बाकीचं सर्व काही थांबव तुला आपोआप साध्य होईल,’ असं मला संगीताच्या गुरूंनी सांगितलं. पुढे तबला शिकलो. माझा ठेका बरोबर होता, पण नाद निर्माण होत नव्हता. तर ‘मंद्र’मध्ये कला, कलाकार व जीवनमूल्यं या तीन घटकांचा विचार करण्यात आला आहे. मोहनलाल, मधुमिता ही पात्रं त्यातूनच निर्माण झाली आहेत. तसंच संगीतातील विविध रागांचं वर्णन वाचताना वाचकांना त्याची अनुभूती यावी अशाप्रकारे ते केलं आहे. त्यासाठी काही रागांचं विस्ताराने वर्णन केलं आहे. अनेक संगीतप्रेमींना ते आवडलं, पण काही जणांनी ते वाचून कंटाळा येतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

* ए. डी. सावंत – तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून मुंबई विद्यापीठाची उच्च पदवी मिळावी, यासाठी तुम्ही तरुणवयात प्रयत्न केले होते. ते अपूर्ण काम पूर्ण करण्याची इच्छा अजूनही आहे का?
भैरप्पा – आता तशी काही गरज उरलेली नाही. कारण मला सहा विद्यापीठांनी डि.लिट. देऊन गौरविलं आहे.

* दिलीप चावरे – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी काय भूमिका?
भैरप्पा – माझी कोणतीही भूमिका नाही. मुळात कादंबरी हा साहित्य प्रकार बंगाल व महाराष्ट्रातून कर्नाटकाला मिळाला आहे. कन्नड व मराठी भाषेतील साहित्य दोन्ही भाषेत अनुवादित होत आहेत. आणि पुढेही हे सुरू राहायला हवं. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांना दोन्ही भाषा येतात. त्यामुळे दोन्ही भाषांतील साहित्य त्यांना लिहायला आणि वाचायला मिळावं. गेली अनेक वर्षे कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुला-मुलींची लग्न होत आहेत. त्यामुळे आणखी वेगळं काय हवं आहे?

* उमा कुलकर्णी – धर्म आणि मूल्य यांविषयी काय वाटतं? ज्या नैतिक मूल्यांची आज चर्चा केली जात आहे, त्याचे आजच्या जागतिकीकरणात काही महत्त्व आहे का?
भैरप्पा – धर्मामध्ये विज्ञानाखेरीज दुसरं काहीही नाही. आपल्याकडे आयुर्वेद तसंच ‘पंचमहाभूतं’ ,‘त्रिगुण’ आदी अनेक संकल्पनांमधून ते आलेलं आहेच. आज विज्ञान प्रगत होत चाललं आहे. आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. निर्मिती करणं म्हणजे कार्यकारणभावाची मीमांसा करणं आहे. कारण आधी घडतं आणि मग त्याचे परिणाम दिसतात. विज्ञानाची प्रगती म्हणजे धर्माचा शेवट नाही..

किती जणांनी पुरस्कार परत केले याची चर्चा प्रसारमाध्यमातून केली जाते. पण किती जण काही न बोलता शांत राहिले? किती जणांनी पुरस्कार परत केले नाहीत? याबाबत काहीच बोलले जात नाही. त्याचाही सर्व हिशेब दिला जावा, मगच सहिष्णुता आणि असहिष्णुता या विषयावर चर्चा करावी.

आपला इतिहास कव्हर्ड (झाकलेला) आहे की कॉवर्ड (भित्रा) आहे? अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांना जे प्रश्न पडतात, मांडले जातात, ते आपल्याकडील प्रसारमाध्यमातून मांडले जात नाहीत.

जे विशिष्ट जातीयवादी किंवा विचारांच्या दृष्टीकोनातून लिहितात त्यांना माझं लिखाण आवडत नाही. माझं लिखाण हे केवळ साहित्यमूल्यांची जोपासना करणारं असते. मलाही विशिष्ट विचारसरणींतून लिहिलं गेलेलं साहित्य भावत नाही. पात्रांच्या मनाचा सखोल अभ्यास करायला मला आवडतो. दुसरं म्हणजे असं ठराविक विचारसरणीतून लिहिलेले साहित्य काळाच्या कसोटीवरही टिकत नाही.

महाभारतावर आधारित अनेक कविता, कथा, नाटकं नंतरच्या काळात आली आहेत. त्यात महाभारतीतल्या अनेक मिथकांचा वापर केला गेला आहे. ही मिथकं किंवा या घटना आजच्या काळात मात्र नैतिकदृष्टय़ा मान्य होणार नाहीत.

धर्मामध्ये विज्ञानाखेरीज दुसरं काहीही नाही. आपल्याकडे आयुर्वेद तसंच ‘पंचमहाभूतं’ ,‘त्रिगुण’ आदी अनेक संकल्पनांमधून ते आलेलं आहेच. आज विज्ञान प्रगत होत चाललं आहे. आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे.

मी कोणत्याही हेतूने लेखन करत नाही. जे विचार मनात येतात ते कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेच्या आधारे शब्दबद्ध करतो. एका कादंबरीत एक विचार मांडला असेल, तर दुसऱ्या कादंबरीत त्याच्या विरोधीही विचार असू शकतो. पण कम्युनिस्ट जे आहेत ते प्रत्येक गोष्टीत ‘कम्युनिझम’च शोधतात.

मुळात लग्नाचा उद्देश वंशवृद्धी हाच आहे. लग्न म्हणजे स्त्री-पुरुषाने एकत्र येऊन वंशवृद्धीसाठी केलेली व्यवस्था, असं भारतीय संस्कृती मानते. पाश्चात्य संस्कृतीत पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री अशी ही लग्नं होतात, त्याला तिकडं मान्यता आहे. पण यातून वंशवृद्धी होणार नसेल तर त्याला लग्न का म्हणावं?

 

लेखक आपल्या साहित्य, कलाकृतींतून नेहमीच व्यक्त होत असतो. मात्र जेव्हा तोच लेखक त्याच्या साहित्याविषयी मनमोकळेपणाने बोलतो, व्यक्त होतो, ते फार महत्त्वाचे असते. भरप्पांसारख्या थोर साहित्यिकाशी वाचकांना सहज गप्पा मारता येणे फार मोठा योग असल्याचे, मला वाटते. साहित्यिक, चित्रकार, कलावंत, गायक, दिग्दर्शक, प्रकाशक, प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमात एकत्र आले आणि आपणही त्यात सहभागी झालो, याचा फार आनंद आहे.
– फैयाज शेख, ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका

पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कवी, लेखक, नाटकवाल्यांचे अड्डे असायचे. तिथे वाद-संवाद होत असे. आता फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर काही चर्चा होत असते. परंतु यात थेट संवाद होत नाही. त्यामुळे असा थेट संवाद घडवून आणणारे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. भरप्पांसारख्या साहित्यिकांना ऐकणे महत्त्वाचे आहे. विविध मतांच्या लोकांशी चर्चा होत राहणे आज आवश्यक आहे.
– शफाअत खान, लेखक-नाटककार

वृत्तपत्रांनी साहित्यिकांना त्यांच्या वाचकांपर्यंत पोहोचवणे ही चांगली कल्पना आहे. या उपक्रमाला दाद दिली पाहिजे. भरप्पांसारखे चच्रेत असणारे लेखक यानिमित्ताने ऐकता आले. मराठी वाचकांना त्यांच्याबद्दल असणारे कुतूहल, त्यांच्या साहित्याचा अभ्यास आणि भरप्पांनी प्रश्नांना दिलेली समर्पक उत्तरे हा सर्व सुंदर अनुभव होता.
– रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ लेखक आणि नाटककार

भरप्पांबरोबर गप्पा ही फार समृद्ध करून देणारी भेट होती. ‘लोकसत्ता’ने आतापर्यंतच्या परंपरेला साजेसा उपक्रम सुरू करून वाचकांना पर्वणीच दिली आहे. भरप्पांसारख्या विविध भाषांमधील साहित्यिकांना यामुळे भेटता येईल. त्यांच्या साहित्याची प्रक्रिया समजायला मदत होईल. त्यामुळे इतर भाषेतील साहित्यिकांचे साहित्य वाचले जाईल.
– किशोर कदम, अभिनेता-कवी

निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवरांना, त्यांच्या कलाकृतींना आपण पाहत असतो. परंतु त्यांची विचारप्रक्रिया कशी चालते, ते जवळून कसे आहेत हे आपल्याला माहीत नसते. अशा उपक्रमांतून ते कळण्यास मदत होते. त्यामुळे मनमोकळ्या गप्पांची ही कल्पना अप्रतिम आहे. भरप्पांनी गप्पांमध्ये बोलताना लेखनातील मानवी मूल्यांच्या आग्रहाबाबत व्यक्त केलेले सकारात्मक मत मला महत्त्वाचे वाटते.
– अजित भुरे, नाटय़दिग्दर्शक-निर्माते

भारतीय पातळीवरच्या लेखकाला ‘गप्पा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकता आले. भैरप्पांचे साहित्य वाचले होते. त्यामुळे कधी त्यांना भेटतोय असे वाटायचे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे ते साध्य झाले, याचा आनंद आहे. कानडी साहित्यातात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या साहित्यिकांची संख्या अधिक आहे. मात्र जेव्हा त्यांनी ‘कादंबरी’ हा प्रकार आम्ही मराठीतून घेतल्याचे सांगितले, तेव्हा गंमत वाटली. असे अनेक लेखक यावेत व अशा प्रकारच्या साहित्यिक गप्पा होत राहाव्यात.
– अशोक नायगावकर, कवी

लोक आपल्या सामाजाविषयी, आसपासच्या लोकांविषयी काय विचार करतात, याची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. सध्या तर खूप गरज असल्याचे जाणवते. कारण आज माणूस फार एकारलेल्या पद्धतीने जीवन जगतोय. माणूस म्हणून आपली मूल्यात्मकता वाढवण्यासाठी असे संवाद व्हायला हवेत. मराठी माणसांसाठी हा उपक्रम सुरू राहायला हवा.
– सायली राजाध्यक्ष, लेखिका

भारतातील विविध भाषांतील श्रेष्ठ साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच मराठीतले श्रेष्ठ साहित्य इतर भाषेतील वाचकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. आपल्याकडे सगळ्या थोर आणि श्रेष्ठ कलाकृती आहेत. याची जाणीव भैरप्पांसारख्या लेखकाशी गप्पा मारताना होते. इतर देशातील साहित्याचे अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या घरात काय आहे, ते आधी बघण्याची गरज आहे. याचीच सुरुवात म्हणून ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम सुरू केला आहे, याचा फार आनंद आहे.
– विश्वास सोहनी, नाटय़दिग्दर्शक

भैरप्पांनी फार मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते माणूस म्हणून कसे आहेत, याची ओळख या गप्पांमधून झाली. त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांसाठी केलेला अभ्यास, लेखनाच्या परिपूर्णतेसाठी घेतलेली मेहनत याविषयी त्यांच्याकडून ऐकता आले. त्यांची सर्वच पुस्तके तातडीने वाचायला हवीत, असे वाटते आहे.
– सुनील बर्वे, अभिनेता-निर्माता

आम्ही काही वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणीवर भैरप्पांच्या ‘वंशवृक्ष’ कादंबरीचे अभिवाचन केले होते. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांना भेटता आल्याचा आनंद आहे. त्यांनी लेखकाला न सुचण्याच्या काळाविषयी सांगितले. काहीही न सुचण्याच्या काळात लेखकाने थांबावे, तो शांतपणा अनुभवावा असा सल्ला दिला. अशा स्थितीची लिहिणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती वाटत असते; परंतु भैरप्पांनी दिलेला सल्ला मला मोलाचा वाटतो.
– अमृता सुभाष, अभिनेत्री

‘गप्पा’सारख्या उपक्रमामुळे अनेक मंडळींचे बोलणे ऐकता येईल. अशा प्रकारच्या कार्यक्रमात भारतीय भाषेतील साहित्याची देवाणघेवाण होईल. जेणेकरून आमच्यासारखे वाचक समुद्ध होतील.
– सचिन खेडेकर, अभिनेता

भैरप्पांबरोबरच्या गप्पा मोकळेपणाने झाल्या. त्यांनी साहित्य, इतिहास तसेच सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेल्या मतांमधून त्यांना राजकारणात रस नसल्याचे जाणवले. हे फार चांगले वाटले. तसेच लेखकाच्या स्वातंत्र्याला ते महत्त्व देतात, हे जाणून घेता आले. या कार्यक्रमात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांमधून त्यांनी भैरप्पांचे साहित्य वाचले आहे, हे जाणवत होते. त्यामुळे कानडी व मराठी यांचा सुरेख संगमच या कार्यक्रमात झाला होता.
– डॉ. विजया वाड, ज्येष्ठ लेखिका

मराठीत भैरप्पांइतका आवाका असणारा लेखक नाही. त्यांच्या कादंबऱ्यांत मानवी नात्यांचा घेतलेला वेध विलक्षण आहे. महाभारताकडे पाहण्याचा अगदी वेगळा दृष्टिकोन त्यांनी दिला. त्यामुळे त्यांना जवळून ऐकण्याची फार उत्सुकता होती. या उपक्रमात साहित्याबरोबरच संगीत, चित्र, शिल्प या क्षेत्रांतील मान्यवरांना यापुढे ऐकण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे.
– सुहास बहुळकर, ज्येष्ठ चित्रकार

या कार्यक्रमात मराठी, कानडी आणि इंग्रजी अशा तीन भाषांत चाललेला संवाद फार सुंदर अनुभव देणारा होता. यात जागतिक साहित्य, प्रयोगशील कला, धर्म, असहिष्णुता, राजकारण, तत्वज्ञान आदी विविध विषयांवर भैरप्पांनी आपली मते व्यक्त केली. अशा उपक्रमातून येत्या काळात विविध क्षेत्रांतील व्यक्तींना ऐकायला आवडेल.
– शांता गोखले, ज्येष्ठ लेखिका

 

  • सहप्रायोजक ‘केसरी’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर एकेए आणि टेलिव्हिजन पार्टनर झी चोवीस असलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी चोवीस तासवरून केले जाणार आहे.

 

संकलन – शेखर जोशी, प्रसाद हावळे