‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याची ओळख करून देत ‘लोकसत्ता’ने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यंदाचे हे या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. यंदाही गणेशोत्सवादरम्यान अशाच काही उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांची वाचकांना ओळख करून देण्यात आली. त्यात फासेपारधी मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या तरुणाची संस्था, समाजाने वाळीत टाकलेल्या एड्सग्रस्तांच्या संगोपनासाठी खस्ता खाणारी संस्था यांपासून कला, संगीत, वाचन आणि प्राण्यांच्या माध्यमातून मानवसेवा अशा विविधांगी क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांचा समावेश होता. या संस्थांच्या कार्याला समाजातील दानशूरांचे पाठबळ लाभावे यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांकडे सुरू झाला आहे. पुन्हा एकदा या संस्थांची थोडक्यात ओळख..

दिलासा केअर सेंटर

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Divorce tendency of financially capable women
सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

सतीश शिवाजी जगताप हे दिलासा केअर सेंटरचे जन्मदाते. सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज हे मूळ गाव असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील जगताप आज नाशिकमध्ये व्याधिग्रस्त अशा ७० जणांचे पालकत्व यशस्वीपणे पार पाडत आहेत. सुधारणा झालेले शेकडो जण पुन्हा आपआपल्या कुटुंबात रमले आहेत. तब्येत व्यवस्थित झालेल्या रुग्णांना नातेवाईकांनी परत घरी नेणे आणि नवीन रुग्णांनी दिलासामध्ये येणे हे चक्र सातत्याने सुरू राहात असल्याने संस्थेतील रुग्णांची संख्या कायम बदलत असते. आजारी, मनोरुग्ण, व्यसनग्रस्त, अपंग असे सर्वच प्रकारचे रुग्ण या ठिकाणी पाहावयास मिळतात. संस्थेचा महिन्याचा सर्व खर्च साडेतीन लाखांच्या घरात जातो. संस्थेस शासकीय अनुदान नसताना नाशिक रन, नसती उठाठेव, कालिका माता ट्रस्ट, मिडास टच, इनरव्हील क्लब, लायन्स क्लब यांसारख्या संस्था, अल्कॉन, मायलॉन, वासन टोयोटा, महिंद्र या कंपन्यांकडून विविध स्वरूपात मिळणाऱ्या मदतीमुळे आर्थिक बोजा काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते. परंतु तरीही संस्थेचे कार्य आणि होणारा खर्च यांचा मेळ बसणे अवघड होते.

धनादेश या नावाने काढा : दिलासा प्रतिष्ठान (Dilasa Pratishthan)

संस्थेचा पॅन : AABTD6144K

 

अ‍ॅनिमल एन्जल्स फाऊंडेशन

एरवी ज्या कुत्र्याला आपण हाड्हूड् करतो त्याच कुत्र्याला प्रशिक्षण दिले तर तो आपल्या अनेक मानसिक आजारांवर उत्तम उपाय ठरू शकतो. हेच लक्षात घेऊन अ‍ॅनिमल एन्जल्स फाऊंडेशन या संस्थेने कुत्र्यांना प्रशिक्षण देऊन विविध उपक्रम सुरू केले. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेची गरज आणि उपयुक्तता हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागली असून संस्थेकडे येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कुत्र्यामध्ये मानवी भावभावना समजून घेण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळे प्रशिक्षित कुत्रे ज्या वेळी मानसिकरीत्या खचलेल्या किंवा आजारी लोकांच्या संपर्कात येतात, त्या वेळी त्यांची मनस्थिती कुत्र्यांना समजलेली असते, याला ‘अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी’, असे म्हणतात. काही वेळा काही मुले वाचताना अडखळतात, लिहिताना त्यांच्या चुका होतात. अशा वेळी अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपीद्वारे त्या मुलांचा आत्मविश्वास वाढवला जातो. अ‍ॅनिमल एन्जल्स फाऊंडेशनने आतापर्यंत अशा अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे. फाऊंडेशनचे कार्यकर्ते अधिकाधिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी त्यांना आर्थिक मदतही केली आहे. प्रशिक्षित कुत्र्यांचे पालकत्वही काही कुटुंबांनी स्वीकारले आहे. संस्थेने काही महिन्यांपूर्वी बेंगळुरू आणि दिल्ली या शहरांमध्ये सुरू केलेल्या कामाला आकार देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ही थेरपी, हे काम अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचणेही आवश्यक आहे.

धनादेश या नावाने काढा : अ‍ॅनिमल एन्जल्स फाऊंडेशन (Animal Angels Foundation)

संस्थेचा पॅन : AADTA4032H

 

 

श्री सरस्वती वाचनालय

कुठलीही भाषा ही तिच्या वापरावर टिकून राहते. बेळगावसारख्या सीमाभागातही तिथल्या जनतेने मराठीशी आपली नाळ या नात्यातूनच आजवर टिकवून ठेवली आहे. तर या नात्याला अधिक शाश्वत करण्याचे काम बेळगावातील श्री सरस्वती वाचनालयाकडून सुरू आहे. तब्बल १४२ वर्षांपासून वाचनालयाचे काम अव्याहतपणे सुरू आहे. वाचनालयाच्या इमारतीची सर्व दालने पुस्तकांनी भरलेली. तब्बल ३८ हजार ग्रंथांचा संग्रह. यातील बहुसंख्य मराठी असले तरी जोडीने कानडी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी भाषेतीलही अनेक दुर्मीळ ग्रंथ इथे आहेत. या साऱ्या संग्रहातील तब्बल तीन हजारांहून अधिक ग्रंथ वा हस्तलिखिते ही शंभरहून अधिक वर्षे जुनी आहेत. वाचनालयाची हीच खरी बौद्धिक संपत्ती. वैदिक वाङ्मयापासून ते विविध चरित्रांपर्यंत आणि व्याकरणापासून ते औषधनिर्माणशास्त्रापर्यंत अशा विस्तीर्ण परिक्षेत्रातील हा खजिना. परंतु संस्थेच्या या यशाला भविष्य पोखरणाऱ्या चिंतेचीही मोठी किनार आहे. हा ज्ञानयज्ञ आजतागायत केवळ लोकाश्रयावर तेवतो आहे. संस्थेला कुठलेही ठोस उत्पन्न नाही. त्यामुळे संस्थेला गरज आहे मदतीच्या हातांची.

धनादेश या नावाने काढा : श्री सरस्वती वाचनालय, शहापूर, बेळगाव (Shree Saraswati Vachnalay, Shahapur, Belgaum),

संस्थेचा पॅन : AAAAS7889J

 

प्रश्नचिन्ह आश्रमशाळा

भटक्या-विमुक्त जातीतील फासेपारधी समाज कायमच भटके जीवन जगणारा. पाली व बेडय़ांवर वास्तव्य करणारा हा समाज. जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासेपारधी समाजाकडे बघितलं जातं. उकिरडय़ावरचं जगणं नशिबी आलेल्या समाजाला त्यांच्यातीलच मतीन भोसले या तरुणानं अंधकाराच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा परिषदेतल्या शाळेतील नोकरीचा त्याग करून त्याने भीषण आर्थिक दैन्यावस्था, गरिबी, गुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेल्या कुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही निवासी शाळा सुरू केली. सध्या या शाळेत वर्ग १ ते १० पर्यंत २८८ मुले आणि १५९ मुली, असे एकूण ४४७ विद्यार्थी शिकत आहेत. शाळेच्या गरजा खूप आहेत मात्र त्यासाठी लागणारे धन कमी पडत आहे. अनेक संस्था, दानशूर व्यक्ती या शाळेच्या मदतीसाठी पुढे येत आहेत पण या शाळेचा आवाका मोठा आहे. मुलांना निवासी शाळेतल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मदतीची गरज आहे.

धनादेश या नावाने काढा : आदिवासी फासेपारधी सुधार समिती (Adivasi Fasepardhi Sudhar Samiti)

संस्थेचा पॅन : AADTA0072D

 

आपलं घर..

पुण्यात असलेलं ‘आपलं घर’ हे सेवाभावी काम म्हणजे सेवेच्या अनेक कार्याची मालिकाच आहे. ‘आपलं घर’ केवळ नावापुरतंच नाही, तर ते प्रत्येकाला खरोखरच ‘आपलं’ वाटेल असा प्रयत्न इथे सदोदित असतो. निसर्गरम्य परिसर, कमालीची स्वच्छता, आपलेपणा, साधेपणातील सौंदर्य, पर्यावरणपूरक प्रकल्प, पाण्याचा पुनर्वापर, पर्जन्यजलसंधारण प्रकल्प, फळा-फुलांची सुंदर बाग, ओल्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर करणारा प्रकल्प, अशी वैशिष्टय़े या घराची आहेत. ‘आपलं घर’च्या वारजे आणि डोणजे प्रकल्पात मिळून आता ५८ मुलं-मुली आणि दहा आजी-आजोबा आहेत. २९ सेवक आहेत. एक अद्ययावत रुग्णालय चालवलं जात आहे, एक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू आहे आणि फिरता दवाखाना रोज खेडय़ापाडय़ांमध्ये उपचारांसाठी जात आहे. मूळ नागपूरचे असलेल्या विजय फळणीकर यांनी या संस्थेची स्थापना केली आहे.

धनादेश या नावाने काढा : स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन (Late Vaibhav Phalnikar Memorial Foundation)

संस्थेचा पॅन : AAATL4233G

 

पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान

रत्नागिरी जिल्ह्य़ात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भैयाजी काणे यांच्या वाचनात पूर्वाचलमधील परिस्थिती आली. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधता येणे शक्य आहे, यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे १९७१ मध्ये मणिपूरमध्ये भैयाजी दाखल झाले. तिथे त्यांनी एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. दरम्यानच्या काळात सर्व प्रदेश पालथा घालून स्थानिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. त्यातूनच पुढे १९८६ मध्ये पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली. प्रतिष्ठानतर्फे मणिपूरमध्ये तीन शाळा सध्या सुरू आहेत. या तीनही शाळांमध्ये किमान दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. कारण त्यामुळे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. या शाळा पूर्णपणे विनाअनुदानित तत्त्वावर चालविल्या जातात. भारत-म्यानमार सीमेवरील प्रदेशातील वाढती घुसखोरी आणि दुर्गमता यामुळे या प्रदेशातील शाळांचे व्यवस्थापन हे प्रतिष्ठानच्या पुढील मोठे आव्हान आहे.

धनादेश या नावाने काढा : पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान (Purv Seema Vikas Pratishthan)

संस्थेचा पॅन : aabtp4934D

 

गानवर्धन

संगीत ही नित्य विकास पावणारी कला आहे. ही कला कोणी आत्मसात करून तर कोणी श्रवण करून परमानंद मिळवीत असतो. या उत्तुंग कलेचा सर्वागीण विकास व्हावा, गायन-वादन-नृत्य या शास्त्रीय संगीताच्या तिन्ही उपांगांचा समाजात सांगीतिक प्रबोधनासह सुयोग्य प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर १९७८ रोजी ‘गानवर्धन’ संस्थेची स्थापना केली. ‘गानवर्धन’ संस्थेने आतापर्यंत बाराशेहून अधिक कलाकारांना जाणकार रसिकांसमोर आपली कला आजमावण्याची संधी दिली आहे. संगीत सभांमध्ये कला सादरीकरणाबरोबरच संगीत साधकांमध्ये वैचारिक प्रगल्भता यावी या उद्देशाने संगीत शिबिरे, शास्त्रीय संगीतातील विशिष्ट विषयांची प्रयोजने, अखिल भारतीय गायन-वादन-नृत्य स्पर्धा, नामवंत गायकांची स्वानुभवी सप्रयोग व्याख्याने असे अभिनव आणि शैक्षणिक उपक्रमही संस्थेने आयोजित केले आहेत.

धनादेश या नावाने काढा : गानवर्धन (Gaanwardhan)

संस्थेचा पॅन : AAATG5612Q

 

गुरुप्रसाद ट्रस्ट

डॉ. देवदत्त गोरे यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एचआयव्हीबाधितांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या टिळक आळीमध्ये डॉ. गोरे वैद्यकीय व्यवसाय करत असत. त्यांच्याकडे या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण यायचे. त्यांच्यासाठी औषधोपचार खर्चिक होते. अनेकांची तशी आर्थिक परिस्थिती नसायची. या आजाराला असलेले हे आर्थिक-सामाजिक पदर लक्षात घेऊन डॉक्टरांनी २००३ मध्ये गुरुप्रसाद ट्रस्ट या नावाने स्वयंसेवी संस्था स्थापन केली. सध्या संस्थेकडे रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या दोन हजार ३६५ एचआयव्हीबाधित व्यक्तींची नोंदणी झाली असून त्यामध्ये सुमारे पन्नास टक्के महिला आहेत आणि त्यांच्यापैकी बहुसंख्य विधवा आहेत. ही परिस्थिती अतिशय भयानक आहे. स्वत:चा कोणताही अपराध नसताना केवळ नवऱ्याकडून हा आजार संक्रमित झालेल्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या नशिबी अनेकदा परित्यक्तेचं जिणं येतं. अशा महिलांना उपचारांबरोबरच मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आधार देण्याचं अतिशय अवघड काम संस्थेचे कार्यकर्ते करत आहेत. ‘गुरुप्रसाद’चे कार्यकर्ते एक दशकापेक्षा जास्त काळ अबोलपणे हे काम करत आले आहेत. या वाटचालीत काहीवेळा शंका-कुशंका, संशय आणि क्वचितप्रसंगी अवहेलनाही त्यांच्या वाटय़ाला आली. परंतु तरीही त्यांनी सत्कर्माची कास सोडली नाही. आता त्यांचं लक्ष्य आहे या न मागितलेल्या दुखण्याची शिकार झालेल्या भावी पिढीचं जीवन उजळवण्याचं आणि त्यासाठी त्यांना साथ हवी आहे उदार हितचिंतकांची!

धनादेश या नावाने काढा : गुरुप्रसाद (Guruprasad)

संस्थेचा पॅन : AAATG5854G 

 

साकार

औरंगाबादेतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सविता पानट यांनी ‘साकार’ या संस्थेची स्थापना केली. ‘साकार’ हे काही टाकून दिलेल्या मुलांना सांभाळ करणारे वसतिगृह नाही. या मुलांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, यासाठी पालकांनी मूल दत्तक घ्यावे, हा संदेश देणारी ही संस्था आहे. एका वेळी ‘साकार’मध्ये २०-२२ मुले असतात. बहुतेकांचे वय पाळण्यातले. त्यामुळे लंगोटापासून ते दुधापर्यंतचे सगळे काही करणे मोठे जिकिरीचे काम. एखाद्या घरात एक लहान मूल असेल तर सगळे घर कामाला लागलेले असते. इथे एका वेळी २०-२२ जण. त्यामुळे सर्वाचा सांभाळ करताना आयांची मोठी कसरत सुरू असते. टाकून दिलेली अनेक चिमुकली मुले ‘साकार’च्या प्रयत्नांमुळे विदेशात दत्तक गेली आहेत. जी मुले दत्तक गेली नाहीत. त्यांचा सांभाळ करताना त्यांच्या नामकरणापासून ते त्यांच्या गणवेशापर्यंतची सगळी तयारी संस्थेत केली जाते. जी मुले गतिमंद आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी दायींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेत २५ कर्मचारी काम करत आहेत. त्यातील आयांना दरवर्षी दोनदा प्रशिक्षण दिले जाते. हे सगळे करताना जाणवणारी आर्थिक चणचण मोठी असते. संस्थेची स्वत:ची इमारत झाली तर दर महिन्याला द्यावे लागणारे ३० हजार रुपयांचे भाडे वाचणार तर आहेच, शिवाय संस्थेच्या इतरही आर्थिक गरजा भागणार आहेत.

धनादेश या नावाने काढा : साकार (Sakar)

संस्थेचा पॅन : AAGTS1368F

 

जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय

१ मे १९६० रोजी नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. या वस्तुसंग्रहालयात ऐतिहासिक कागदपत्रे, विविध घराण्यांची ऐतिहासिक दप्तरे आहेत. ही संख्या काही हजारांत आहे. ही कागदपत्रे व वस्तूंचे जतन, ऐतिहासिक संशोधन, इतिहासतज्ज्ञांच्या सभा घेणे, त्रमासिक-नियतकालिकाचे प्रकाशन, इतिहास संशोधकांना साहित्य पुरवणे, अशी कामे वस्तुसंग्रहालयामार्फत सुरू आहेत. योग्य व्यवस्थेअभावी बरीचशी कागदपत्रे फडक्यात गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. अशी हजारो ‘गाठोडी’ येथे आहेत. या वस्तुसंग्रहालयात असंख्य महत्त्वाच्या वस्तू आहेत. दहा हजारांपेक्षाही अधिक कागदपत्रे, दस्तऐवज संस्थेकडे आहे. इतिहासविषयक जुन्या व दुर्मीळ पुस्तकांचा मोठा संग्रह, अतिशय जुन्या पोथ्या संस्थेत आहेत. दिवंगत इतिहासप्रेमी तथा ज्येष्ठ अभ्यासक सुरेश जोशी यांनी या वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीसाठी उभे आयुष्य वेचले. आर्थिक चणचण ही वस्तुसंग्रहालयाच्या पाचवीला पुजली आहे. गेली वर्षांनुवर्षे अडीच कर्मचारी काम करतात. त्यांचाही पगार म्हणाल तर, जेमतेम चार आकडी. तो देणाऱ्याला लाज वाटावी, अशीच स्थिती आहे.

धनादेश या नावाने काढा : हिस्टॉरिकल म्युझियम, अहमदनगर (Historical Museum, Ahmednagar)

संस्थेचा पॅन : उपलब्ध नाही

 

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०५३६
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००