दोन मिनिटांत बनणारी मॅगी सध्या जणू राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. शहरापासून पार खेडय़ापाडय़ात हातपाय पसरलेल्या मॅगीवर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. प्रत्येक घरात, कॉलेजच्या कट्टय़ावर, कार्यालयाच्या कॅण्टिनमध्ये, चिमुरडय़ांच्या गप्पांत मॅगीच्या बाजूने व उलट मतांचा धुरळा सध्या उडालेला आहे. त्याचा वेध..

आपण आहारसाक्षर आहात का?
एखाद्या उत्पादनात घातक घटकांचे प्रमाण किती असावे हे सरकारने नेमून दिले आणि कंपन्यांनी ते तंतोतंत पाळले असे गृहीत धरले तरी ग्राहकांनी ते किती प्रमाणात खावेत यावर कोणाचाच र्निबध नाही. मीठ हा आहाराचा प्राण, पण ते मूठभर खाल्ले तर? सगळ्यात मूलभूत गरज असलेल्या आहाराच्या बाबत आपण साक्षर केव्हा होणार..

प्राजक्ता कासले
कोणे एके काळी युरोपातील व्यापारी भारतीय मसाल्यांचा शोध घेण्यासाठी साहसी यात्रा करत होते. भारतातील हजारो प्रकारच्या पाककृती आजही जगात वाखाणल्या जातात. आहारशास्त्रानुसार भारतीयांच्या रोजच्या जेवणातले ताजे पदार्थ अगदी योग्य आहेत, असे आहारतज्ज्ञही आवर्जून सांगतात. मात्र एवढे असूनही भारतीय बाजारपेठेत रेडी टू इट, रेडी टू कुक पदार्थाचा बोलबाला आहे. हे पदार्थ कदाचित भारतीय अन्नसुरक्षा व प्रमाणीकरण प्राधीकरणाने दिलेले निकष मानतही असतील, मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत सतत शरीरात जात असलेल्या या पदार्थाच्या एकूण परिणामाचा विचार केला की झोप उडेल.
चहासाठी फक्त पाणी, साखर, पावडर लागते आणि तरीही प्रत्येकाच्या घरातील चहाचा स्वाद वेगळा असतो. मात्र सतराशे साठ व्यंजने वापरून भारतात तयार होणाऱ्या पदार्थाची विविधता घालवून त्यांच्या स्वादात एकता आणण्याचे क्रांतिकारी कार्य केले आहे ते ‘रेडी टू कुक’ पदार्थानी. बाजारात आजमितीला रेडी टू इट (म्हणजे फक्त गरम करायचे) व रेडी टू कूक (शिजवायचे किंवा तळायचे) असे दोन प्रकारांतील पदार्थ आहेत. यात रेडू टू इटमध्ये पनीर मखनी, मटार पनीरसारखे बरेचसे पंजाबी पदार्थ, उपमा, सूपपासून चिकन, मासे यांचे तयार पदार्थ येतात. रेडी टू कुकमध्ये डोसा, इडली, कटलेट्स, फ्रेंच फ्राइज, नगेट्स, लॉलीपॉप, नूडल्स, पास्ता असे पदार्थ येतात. याशिवाय सुक्या पदार्थामध्ये पाणी घालून (नारळाच्या भुकटीपासून सार) त्यापासूनही पदार्थ करता येतात. कमी वेळेत फारशा खटपटीसह तयार होणारी ही पॅकेट पटापट घरी आणली जातात.

आता भारतातील तयार अन्नपदार्थासाठी नेमके काय निकष आहेत, हे पाहू या. एखाद्या पदार्थात नेमके कोणते घटक असावेत, त्यांची मात्रा काय असावी, घातक घटकांची कमाल मर्यादा किती असावी याबाबत जुन्या नियमांमध्ये संदिग्धता होती. मात्र २०११ची नियमावलीत त्यात बदल करण्यात आले. अर्थात सतत बदलणाऱ्या बाजारपेठेनुसार हे नियमही अधिक स्पष्ट करण्याची गरज भासल्याने आता २०१५ च्या नवीन नियमांवर काम सुरू आहे. उत्सुकांना ६६६.ऋ२२ं्र.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर हे नियम पाहताही येतील. अर्थात इन्संट पॅक फुडबाबत मात्र वेगळे निकष दिलेले नाहीत. या यादीत नसलेल्या सर्व पदार्थासाठी ‘इतर’ या वर्गाखाली मात्रा नमूद करण्यात आली आहे, असे एफडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व पदार्थामधील घटक आणि तयार पदार्थ याची तपासणी झाल्यावरच बाजारात ते पदार्थ आणण्यास परवानगी मिळते. बाजारातूनही या पदार्थाची अधूनमधून तपासणी होते, असे एफडीएकडमून सांगितले जाते.
कोणताही पदार्थ साठवायचा असला की त्यात परिरक्षक (प्रीझव्‍‌र्हेटिव्ज) घालावेच लागतात. बहुतांश अन्नपदार्थावर क्लास टू प्रीझव्‍‌र्हेटिव्ज असे छापलेले असते. पण नेमकी कोणती रसायने घातली आहेत त्याचा थांगपत्ता लागत नाही. बरे या रसायनांची अगम्य भाषेतील नावे वाचली तरी त्यामुळे शरीरात काय होणार, याची कल्पना येत नाही, असे आहारतज्ज्ञ डॉ. रत्ना थर यांनी सांगितले. तेल, साखर, मीठ हे नसíगक परिरक्षक आहेत व लोणचे, मोरंबा, पापड यांच्यामध्ये त्याचा वापरही वर्षांनुवष्रे केला जातो. मात्र हे साठवणुकीचे पदार्थ ताटातील इतर पदार्थाच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात असतात. ते भाजीसारखे खायचे नाहीत, हे आपल्या पूर्वजांनाही माहिती होते. त्यातच कोणताही पदार्थ काही काळ राहिला की आपोआपच त्याचा रंग, चवीवर परिणाम होतो. मात्र त्यात रंग, चवीसाठी वेगळी रसायने आलीच. आता हे सर्व पदार्थ आरोग्य खात्यातील चाणाक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेखालून जातात आणि एफडीएचे अधिकारी या सर्व पदार्थावर करडी नजर ठेवतात, असे गृहीत धरूया. प्रत्येक पदार्थात मर्यादेच्या आतच घातक पदार्थ असले तरी हे पदार्थ किती खावेत यावर सरकारचे नियंत्रण नाही. आता हेच पाहा. दिवसाची सुरुवात होते ती ब्रेड-जाम-बटरने. या तीनही पदार्थात मर्यादित मात्रेपेक्षा कमी प्रमाणात धातू, रसायने असली तरी एकाच वेळी तीन पदार्थ पोटात गेल्याने शरीरातील धातूचे प्रमाण वाढणारच ना.. हे केवळ सकाळचे, त्यानंतर दुपार, संध्याकाळ व रात्रीपर्यंत किती पदार्थ पोटात ढकलायचे याचा कोणताही विचार केला जातो का.. हा प्रश्न उरतोच. डीप फ्रीज करून नंतर उकळत्या तेलात तळण्याचे पदार्थ घरच्या पदार्थापेक्षा चविष्ट लागतात. पण ही चव कुठून येते असा विचार केला आहे का.. उणे ४० अंश से. ते ३०० अंश से. असा प्रवास करणाऱ्या पदार्थामध्ये कोणते जीवनसत्त्व, क्षार राहिले असतील. तेलात बुडून पचायला जड झालेले, रासायनिक चवीचे पिष्टमय पदार्थ शरीरात ढकलले जातात. आरोग्य विभागातील निकष या पदार्थानी पाळलेले असतात, पण आहारशास्त्राचे काय?
हे झाले घटकपदार्थाचे. मूळ पदार्थ तर त्यापेक्षाही भयंकर म्हणावे असे. बिस्कीट के नाम पर मदा खा रहे हो.. असे जाहिरातीतून सांगेपर्यंत अनेकांना मद्याच्या अवगुणांबाबतही माहिती नव्हती. पाव, केक, बिस्किट, नूडल, पास्ता या सगळ्यात मदा असतो. अगदी ऑल ग्रेन दावा करणाऱ्या पदार्थातही मद्याच्या तुलनेत इतर ध्यान्यांचे प्रमाण केवळ दाखवण्यापुरतेच असते. मद्याच्या जोडीने साखरेचा, तेलाचाही हात सोडून वापर केलेला असतो, असे मधुमेह प्रतिबंधक चळवळीतील डॉ. राजेंद्र आगरकर म्हणाले. हे सर्व मान्यताप्राप्त घटकच आहेत. पण त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
खाण्याबाबतची हौस, चव वगळता इतर घटकांकडे साफ दुर्लक्ष करण्याची वृत्ती आणि त्यात भरीला सरकारची उदासीनता यामुळे ग्राहकांच्या पोटातून पाकिटाचा मार्ग काढत या कंपन्यांनी घराघरांत शिरकाव केला आहे. रासायनिक घातक पदार्थामुळे उठलेले वादळ बाजारपेठेच्या नियमांनुसार काही दिवसांनी शांत होईल. पण गारेगार मॉलमध्ये चकचकीत वेष्टनाआड खाण्यासाठी तय्यार असलेल्या पाकिटात दडलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांना घरी घेऊन येण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
मद्याचे पदार्थ स्वस्त कसे?
मदा म्हणजे गव्हाचे अति मऊसूत, पांढरे पीठ. मदा तयार करण्यासाठी गव्हावर बरीच प्रक्रिया करावी लागते. त्यातील तंतू (फायबर) वेगळे करावे लागतात. थोडक्यात गव्हाचे सगळे चांगले गुण वेचून बाहेर काढल्यानंतर मदा तयार होतो. एवढी प्रक्रिया केल्यावर खरे तर गव्हाच्या पिठापेक्षा मद्याची किंमत अधिक हवी. मात्र तरीही मद्याचा ब्रेड २०-२२ रुपयांत आणि गव्हाच्या पिठाचा ब्रेड ३० रुपयांत, असे का? यामागील कारण शोधण्यासाठी फारशी अक्कल लागत नाही. कच्चा माल म्हणजेच मदा सरकारने सवलतीच्या दरात उपलब्ध केल्याशिवाय हे शक्य नाही . मद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) जास्त असतो. एखादा पदार्थ खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी किती वाढते त्यावर जीआय ठरतो. साधारण ५० ते १०० या दरम्यान ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी असते. शुद्ध साखरेचा जीआय १०० असतो. मद्याचा जीआय साखरेच्या बरोबरीचा आहे. याशिवाय मदा लहान आतडय़ांमध्ये चिकटून बसतो. त्यामुळे बद्धकोष्ठाच्या तक्रारी वाढतात. या मद्यासोबत तेल आणि साखर असे त्रिसूत्री असेल तर मग आरोग्याची ऐशीतैशी होणारच. आपल्या देशात मधुमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदय विकाराचे प्रमाण फार जास्त आहे विशेषत: तरुण वयात. असे असताना मदा आणि साखर यांचा मुक्त वापर राजमान्य का? आज मद्याचा ब्रेड, बिस्किटे, पिझ्झा, बर्गर, पाव, नूडल, पास्ता या पदार्थाचा सुळसुळाट आहे. पाकीटबंद फळांचा रस, त्यातील साखर आरोग्यदायी आहे का? शीतपेयात तर साखर, उत्तेजक पदार्थ आणि आपल्याला ठाऊक नसलेली रसायने आरोग्याची पार वाट लावू शकतात.
– डॉ. राजेंद्र आगरकर, अध्यक्ष, सोसायटी फॉर प्रीव्हेन्शन ऑफ हायपरटेन्शन अन्ड डायबेटिसशिसे येतेच कसे?
शिशाचे कण माती, हवा आणि पाण्यात मिसळू शकत असल्याने श्वासावाटे तसेच प्यायचे पाणी आणि खाद्यपदार्थामधून ते शरीरात जाण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी रबर किंवा धातू सातत्याने झिजण्याचे प्रक्रिया होते (उदा. महामार्गावरची वाहतूक) अशा ठिकाणीही हवेत शिशाचे कण पसरू शकतात. हवेतले शिशाचे कण हवेत उडणाऱ्या धूलिकणांवर बसतात आणि पावसावाटे मातीत मिसळतात. अशा प्रकारे मातीच्या वरच्या थरात काही प्रमाणात शिसे असू शकते आणि त्या मातीत उगवणाऱ्या गवत किंवा भाजीपाल्यात ते काही प्रमाणात उतरते. कारखान्यांमधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या मैलापाण्यातही शिसे असू शकते. धातूच्या भांडय़ांमध्येही काही प्रमाणात शिसे असू शकते. अशा भांडय़ांमध्ये सॉस किंवा तत्सम आम्लधर्मी पदार्थ साठवले गेल्यास किंवा गरम केल्यास त्या पदार्थात शिसे उतरते.
मोनोसोडियम ग्लुटामेट
यीस्ट व जिलेटिन वापरलेल्या पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट असते. हा घटक पदार्थाची चव वाढवतो. चायनीज व जॅपनीज पद्धतीचे पदार्थ, सॅलड ड्रेसिंग, डबाबंद भाज्या, सूप, प्रक्रिया केलेले मटण यात हा घटक असू शकतो. हा घटक पोटात गेल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल तज्ज्ञांची मते वेगवेगळी असल्याचे दिसून येते. डॉ. वैशाली जोशी यांच्या मते, ‘मोनोसोडियम ग्लुटामेट हा घटक अधिक प्रमाणात खाल्ला गेल्याने डोकेदुखी, खूप घाम येणे, मान आणि चेहऱ्याची आग होणे, छातीत धडधड होणे, मळमळ आणि पोटदुखी, थकवा अशी लक्षणे लगेच दिसू शकतात. अ‍ॅलर्जिक व्यक्तींना मोनोसोडियम ग्लुटामेटमुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. या लक्षणांना ‘चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम’ असेही म्हणतात.’
‘चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम’ या संकल्पनेत नमूद केलेली लक्षणे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट या घटकाचा असलेला संबंध याबद्दल निश्चित पुरावा नसल्याचे मत दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयाच्या पोषणतज्ज्ञ डॉ. सीमा सिंह यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मतानुसार, ‘एका लहान गटाला मोनोसोडियम ग्लुटामेटच्या तात्पुरती लक्षणे जाणवणे शक्य असल्याचे संशोधक मान्य करतात, परंतु एखाद्या व्यक्तीस या घटकाची अ‍ॅलर्जी नसेल आणि ते मर्यादित प्रमाणात खाल्ले गेले तर आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. हा घटक असलेली उत्पादने अनेक वर्षे बाजारात आहेत, पण आरोग्यावर होणारे कोणतेही दीर्घकालीन परिणाम अद्याप सूचित करण्यात आलेले नाहीत.’
मोनोसोडियम ग्लुटामेट फक्त वेष्टनीकृत अन्नपदार्थामध्येच नव्हे तर टोमॅटो, मशरूम, पार्मेझान चीझ आणि इतर काही भाज्या व फळे अशा नैसर्गिक पदार्थामध्येही असते, अशी माहितीही आहारतज्ज्ञांनी दिली आहे.

शिसे पोटात गेले तर..
शिसे शरीरातील प्रामुख्याने मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करते. डॉ. वैशाली जोशी म्हणाल्या, ‘खाद्यपदार्थामधून शिसे पोटात गेले की लगेच त्याचा त्रास होत नसला तरी सातत्याने आणि दीर्घकाळ शिसे पोटात जात राहिले तर तो होऊ शकतो. यात अस्वस्थता, भूक व झोप कमी होणे, थकवा येणे अशी लक्षणे दिसतात. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास नसांचे नुकसान होऊ शकते. श्रवणशक्ती व दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते. लहान मुलांत अ‍ॅनिमिया, विकास मंदावणे हे परिणाम संभवतात.’

संपदा सोवनीकॅडबरी ते मॅगी व्हाया पेप्सी!

देशभरातील विविध राज्यांत बंदी घालण्यात आलेला ‘मॅगी’ हा काही पहिलाच पदार्थ नाही. याआधीही भारतात अनेक खाद्यपदार्थावर किंवा पेयांवर बंदी घालण्यात यावी, असा फतवा निघाला होता. त्या खाद्यपदार्थामध्ये आणि पेयांमध्येही अशीच घातक रसायने अथवा घातक घटक असल्याचे त्या-त्या वेळी ‘आढळून’ आले होते. पण आजही ते सर्व पदार्थ सर्रास विकले जात आहेत..

कॅडबरी आणि अळ्या
कॅडबरी कंपनीला २००३मध्ये एका मोठय़ा वादळाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा महाराष्ट्रातील आठ वेगवेगळ्या दुकानांमधील कॅडबरीच्या डेअरी मिल्कमध्ये अळ्या सापडल्या होत्या. या उत्पादनाचे आणि पर्यायाने कंपनीचे तोंड ऐन दिवाळीच्या तोंडावर भलतेच कडू झाले होते. कॅडबरीने सारवासारव करताना, वितरकांकडे साठवण्याची जागा योग्य नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे म्हटले होते. मात्र अन्न व औषध प्रशासनाने त्यांना वेष्टनाबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. या काळात कॅडबरी कंपनीची विक्री ३० टक्क्यांनी कमी झाली. त्यावर उपाय म्हणून कंपनीने ‘प्रोजेक्ट विश्वास’ नावाचा प्रकल्प सुरू करून कॅडबरीच्या सर्व उत्पादनांचे गुणात्मक मूल्यांकन करण्यापासून ग्राहकांमध्ये विश्वास वाढवण्यापर्यंत अनेक कामे केली.

कोलगेट टोटल आणि कर्करोग
गोष्ट तशी जुनी आहे. जुनी म्हणजे १९९७ची! त्या वेळी कोलगेट ही टूथपेस्ट बनवणारी कंपनी ‘डेण्टिस्टने सुझाया नंबर वन ब्रँड’ बनायची होती. त्या वेळी अमेरिकेत या कंपनीच्या कोलगेट टोटल या टूथपेस्टमध्ये ट्रायक्लोसन हे रसायन असतं, असं आढळलं होतं. टूथपेस्टसदृश सगळ्याच उत्पादनांमध्ये हे रसायन असतं. त्याचं प्रमाण आवाक्यात नसेल, तर कर्करोग होण्याचीही भीती असते. १९९७मध्ये अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने या उत्पादनाला हिरवा कंदील दिला खरा, पण दोन वर्षांपूर्वी या उत्पादनातील ट्रायक्लोसनचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं होतं. पण त्याबाबतही पुढे काहीच घडलं नाही.

शीतपेयं आणि कीटकनाशकं
२००६मध्ये शीतपेयांमध्ये कीटकनाशकं असल्याचा वाद निर्माण झाला होता. हेपटॅचलरसारखं भारतात बंदी असलेलं कीटकनाशक चाचणीसाठी घेतलेल्या शीतपेयांपकी ७१ टक्के शीतपेयांमध्ये आढळलं होतं. त्या वेळी कोलकाता येथील कोकाकोलाच्या नमुन्यात लिण्डेन या कीटकनाशकाची मात्रा मर्यादित प्रमाणापेक्षा १४० पट जास्त होती. तर ठाण्यातील कोकाकोलाच्या नमुन्यात क्लोरोपायरीफोजची मात्रा मर्यादित निकषांच्या २०० पट जास्त असल्याचे आढळले होते. झाली. मात्र आजही ही शीतपेये बाजारात सर्रास विकली जातात.

रोहन टिल्लू

अस्तही ‘इन्स्टंट’?

रोजच्या ताटातील पोळी-भाजीसाठी सर्वसामान्यांचा खिसा अधिक हलका होत असला तरी, हाच ऐवज म्हणजे अन्नधान्य, कणीक, दूध भुकटी, साखरादी कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या बहुराष्ट्रीय नेस्लेसाठी महागाई चिंता ठरण्यापेक्षा वरदान ठरत गेली. इतक्या वर्षांत तिच्या नफ्याला कातर बसल्याचे दिसले नाही. २०१३ मध्ये देशात सर्वत्र महागाई कडाडली असताना, नेस्लेने त्या सालात गेल्या दशकभरातील सर्वोच्च नफा कमावला. गत तीन-साडेतीन वर्षांतील अर्थव्यवस्थेसाठी खडतर काळाची जराही झळ बसू न देणाऱ्या नेस्लेला यंदा नरमलेली महागाई आणि परिणामी ती वापरत असलेल्या कच्च्या मालाच्या उतरलेल्या भावाची सुगी दिसू लागली होती. मात्र भलतेच विपरीत घडले. 

मॅगी, किटकॅट, पोलो, नेसकॅफे, इक्लेअर्स, एव्हरीडे, मन्च, मिल्कीबार अशा बाजारावर अधिसत्ता गाजविणाऱ्या नाममुद्रांच्या फौजेतील बिनीचा शिलेदारच कमअस्सल ठरला. ज्या मॅगीने नेस्ले इंडियाच्या व्यवसायाला तारले, त्यावरील अतिरिक्त भिस्तच कंपनीला आज भोवताना दिसत आहे.
या १४० वर्षांचा वारसा लाभलेल्या स्विस कंपनीची उत्पादने भारतात शतकभरापासून उपलब्ध होत असली, तरी गेली २५ वर्षे मॅगी हीच कंपनीची ध्वजाधारी नाममुद्रा राहिली आहे. १९८२ साली मॅगी २ मिनिट्स नूडल्स भारतात दाखल झाले आणि २००१ पासून नेसकॅफेला असलेला दर्जा हिरावून घेत मॅगी हेच नेस्ले इंडियाचे सर्वाधिक भर असलेले ब्रॅण्ड बनले. देशाच्या बाजारपेठेत ब्रॅण्डेड फूड उत्पादनांचाही तो उदय काळ होता. तेव्हापासून सरासरी वार्षिक १५ टक्के दराने ही बाजारपेठ विस्तारत आली असून, यात झटपट नूडल्स व त्या बाजारपेठेवर ९० टक्के वरचष्मा राखणाऱ्या मॅगीचे अर्थातच मोठे योगदान आहे. मॅगीने गाठलेल्या यशोशिखराचे हे पाठ व्यवस्थापनशास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श केस स्टडी ठरत आली आहे. आता या ब्रॅण्डच्या या झटपट अस्ताचा वस्तुपाठही त्यांच्या अभ्यासक्रमाचा अभिन्न हिस्सा बनेल कदाचित!
मॅगीवरील सद्यसंक्रांतीचे परिणाम
’नेस्ले इंडियाचे आर्थिक वर्ष २०१४ मधील विक्री उत्पन्न ९८०० कोटी रुपयांचे असून, त्यात ‘मॅगी’अंतर्गत येणाऱ्या उत्पादनांचा वाटा सुमारे २२०० कोटी रुपयांचा (२३ टक्के) आहे.
’नेस्ले इंडियाच्या २०१४ सालच्या ११८५ कोटी रुपयांच्या एकूण नफ्यात ‘मॅगी’चे योगदान गेली काही वर्षे ३० टक्के इतके आहे.
’त्या तुलनेत ताज्या गदारोळाच्या परिणामी कंपनीच्या एकूण विक्री उलाढालीवर ७ ते ९ टक्क्य़ांचा परिणाम संभवू शकेल.
’विश्लेषकांच्या मते, जोवर मॅगीसंलग्न वादंग शमत नाही, तोवर दर तिमाहीला साधारण १५० कोटींची विक्रीतील घट कंपनीला सोसावी लागेल.
’बाजारपेठेतील सर्वच नूडल्स उत्पादनांना मॅगी वादंगाचा नकारात्मक परिणाम भोवताना दिसेल, असाही बाजारतज्ज्ञांचा होरा आहे.

सचिन रोहेकरमॅगीची बाधा, कुणाच्या पथ्यावर?
गेल्या काही महिन्यांपासून मॅगीबाबत घडत असलेल्या घडामोडी पाहिल्या की, हा वाद आरोग्याशी संबंधित आहे की बाजाराशी अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
भारतीय नूडल्स बाजारात गेल्या आठेक वर्षांपासून प्रचंड तेजी आली आहे. झटपट अर्थात इस्टंट नूडल्सच्या बाजारपेठेत २०१०मध्ये १३०० ते १६०० कोटी रुपयांची उलाढाल होत होती. हीच उलाढाल दरवर्षी २० टक्के सरासरी वाढ करत २०१४मध्ये साडेचार हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या आकडेवारीवरून नूडल्सच्या भारतीय बाजाराची व्याप्ती लक्षात येते. मॅगीखेरीज टॉप रॅमन स्मूडल्स व कप नूडल्स(इंडो निस्सीन लि.), चिंग्ज इन्स्टंट नूडल्स, वाइ वाइ(चौधरी समूह) आणि स्मिथ अ‍ॅण्ड जोन्स अशा अनेक कंपन्यांची नूडल्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, नूडल्सचा बाजारातील मॅगीचा हिस्सा ६० टक्क्यांहून अधिक राहिला आहे. युरोमॉनिटर या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ताज्या अहवालानुसार २०१४मध्ये भारतीय नूडल्स बाजारातील मॅगीची हिस्सेदारी ६३ टक्के इतकी होती. तर नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्स, सॉस आणि तत्सम पदार्थाची एकंदर उलाढाल ६२३ दशलक्ष डॉलर (सुमारे ३२००-३५०० कोटी रुपये) इतकी आहे.

गेल्या पाच सहा वर्षांपासून मॅगी बाजारातील आपला ‘फर्स्ट क्लास’ कायम राखत असतानाच २००९पासून नूडल्सचा एक बॅ्रण्ड सातत्याने आणि वेगाने वर झेपावत चालला आहे. तो म्हणजे आयटीसीची ‘यिप्पी’ नूडल्स. ‘आयटीसी’ने २०१०मध्ये ‘सनफिस्ट यिप्पी’ नावाने इन्स्टंट नूडल्स बनवण्यास सुरुवात केली. आणि बघता बघता अवघ्या साडेचार वर्षांत या नूडल्सनी बाजाराचा १८ टक्के भाग व्यापून टाकला. महानगरांत मॅगी ‘बाप’ ठरत असताना ‘आयटीसी’ने ५० हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांवर आपले लक्ष केंद्रित केले. ‘आयटीसी’चे देशभरातील वितरणजाळे यामुळे ‘यिप्पी’ अल्पावधीतच लोकप्रिय ठरू लागला आहे. आज ‘यिप्पी’ दुसऱ्या क्रमांकाचा नूडल्स ब्रॅण्ड आहे.
मात्र त्याचा मॅगीच्या भरारीला अजिबात धक्का लागलेला नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या नूडल्सच्या बाजारात ‘यिप्पी’आपले स्थान बळकट करत आहे. मात्र आता मॅगीवर बंदी आल्याने नूडल्सच्या बाजारात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मॅगीप्रकरणामुळे नूडल्स खाणाऱ्यांची संख्या घटेल व त्यामुळे आमच्या नूडल्सनाही फटका बसेल, असे अन्य कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र, नूडल्सच्या बाजारातील मॅगीचा हिस्सा असलेल्या साठ टक्क्यांपर्यंत नूडल्स खाणाऱ्यांचे प्रमाण नक्कीच घसरणार नाही. साहजिकच बाजारात मागणी-पुरवठा यांत मोठी तफावत निर्माण होऊ शकेल. मॅगीवरील बंदी दीर्घकाळ टिकली तर ‘यिप्पी’, टॉप रॅमन आणि चिंग्ज यांना हातपाय पसरवण्याची मोठी संधी आहे. आपल्या नूडल्स किती ‘सच्च्या’ आहेत, असे सांगणाऱ्या ‘यिप्पी’च्या जाहिराती अचानक सुरू झाल्या आहेत. तेव्हा आता मॅगीची बाधा, कुणाच्या पथ्यावर पडतेय, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 असिफ बागवान