भाषा, समाजशास्त्र, विज्ञान, गणित, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण या सगळ्या नियमित आणि बंधनकारक विषयांबरोबरच, सामान्यज्ञान, चित्रकला, संगीत, कार्यानुभव, घोडेस्वारी, नेमबाजी, पोहणे, कराटे या सगळ्यांचे प्रशिक्षण देणारी ही शाळा. ही शाळा फक्त मुलींची. ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेची ‘मिनी एनडीए’ अशीच ओळख आहे. मात्र सैन्यदलाबरोबरच आज अनेक क्षेत्रांत शाळेतील विद्यार्थिनींनी आपले स्थान निर्माण केले आहे.

पुणे शहरापासून साधारण अध्र्या-पाऊण तासाचा रस्ता.. घाटाचा आणि निसर्ग सौंदर्याने पूर्ण भरलेला. टेकाडावरची पांढरी, लाल टुमदार इमारत पिकनिकसाठी येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष हमखास वेधून घेणारी. शब्दश: आगीशी खेळण्यापासून ते एखाद्या नाजूक कलाकुसरीच्या कामापर्यंत, अनेक गोष्टी येथे चालतात. ही इमारत आहे भारतातील पहिल्या मुलींच्या सैनिकी शाळेची, ‘राणी लक्ष्मीबाई’ प्रशालेची. मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावातली ही शाळा. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरच जागोजागी इथे काही तरी वेगळे आहे याची साक्ष मिळू लागते. आवळा, डाळिंब, चिकू, आंब्याचे वृक्ष, फुलझाडे, स्वच्छता, नीटनेटकेपणा पहिल्यांदा नजरेत भरतो. आवारात कुठे नेमबाजीचे प्रशिक्षण, कुठे झाडांच्या वाफ्यांना पाणी घालणाऱ्या मुली, झाडाच्या सावलीत वाचत बसलेले कुणी तरी दिसते. मुख्य इमारतीत वेगवेगळी पदके, ढालींची कपाटे, मुलींनी तयार कलावस्तू, चित्रांचे कोलाज इथल्या उत्साही वातावरणाची आणि ऊर्जेची जाणीव करून देते. त्याबरोबरच या निवासी शाळेत जाणवतो तो घरातल्या वातावरणातला उबदारपणा.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

सर्वागीण विकास

सैन्यदलातील संधींसाठी मुलींना तयार करणे हा जरी शाळेचा प्राथमिक उद्देश आहे. त्या पलीकडे जाऊन मुलींचा सर्वागीण विकास घडवण्यासाठी शाळा प्रयत्नशील असते. १९९७ मध्ये शाळा सुरू झाली. सर्व क्षेत्रात मुली समर्थपणे जबाबदारी पेलत आहेत. पण, ही यशोगाथा मोजक्याच मुलींपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी शाळा झटते आहे. ‘मुलगी’ म्हणून आजही असलेल्या अदृश्य चौकटी ही शाळा मोडीत काढते. राज्य मंडळाशी संलग्न या शाळेत पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. पाचवी आणि अकरावी अशा दोन टप्प्यांवर प्रवेश होतात. पाचवीला प्रवेश देताना परीक्षा घेतली जाते. अनुदानित आणि विनाअनुदानित तुकडय़ा मिळून ७२० विद्यार्थिनी शाळेत आहेत.

द्विभाषक धडे

मुळात ही मराठी माध्यमाची शाळा. गरज आणि मागणीमुळे द्विभाषक झाली आहे. आठवीपासून ‘सेमी इंग्रजी’ आहे. म्हणजेच विज्ञान आणि गणित हे विषय इंग्रजीतून शिकवले जातात. मात्र अचानकपणे आठवीला दोन विषयांचे माध्यम बदलल्यामुळे विद्यार्थिनींचा होणार गोंधळ टाळण्यासाठी त्यांची इंग्रजी माध्यमातून अभ्यास करण्याची, शिकण्याची सवय आधीपासूनच लावली जाते. सातवीपासून विद्यार्थिनींना दोन्ही भाषांमध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जातात. विद्यार्थिनींना कळेल, वाटेल त्या माध्यमातून त्यांनी उत्तरे द्यायची. सातवीच्या वार्षिक परीक्षेला विज्ञान आणि गणिताच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमातून असतात.

वाचनाचा तास

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाताली सर्व नियमित विषय शाळेत शिकवले जातात. त्याचबरोबर योग अभ्यास, घोडेस्वारी, अडथळ्यांशी सामना (ऑब्स्टॅकल ट्रेनिंग), पोहणे, कराटे, नेमबाजी यांचेही प्रशिक्षण मुलींना दिले जाते. कार्यानुभव, चित्रकला हे विषयही सर्व विद्यार्थिनींसाठी बंधनकारक आहेत. सर्व विद्यार्थिनी दर वर्षी चित्रकलेच्या शासकीय परीक्षा देतात आणि त्यात उत्तम यशही मिळवतात. प्रत्येक वर्गाला आठवडय़ातील एक दिवस वाचनाचा तास असतो. शाळेच्या वेळापत्रकातच या तासाचा समावेश करण्यात आला आहे. शाळेच्या सुसज्ज ग्रंथालयात मुली या वेळेत अवांतर वाचन करतात. ग्रंथालयाकडून वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रमही घेतले जातात.

प्रयत्नांची शिकवण

शाळेचा दिवस सकाळी पाच वाजताच सुरू होतो. योग-अभ्यास, व्यायाम करून मुलींना आवरण्यासाठी वेळ दिला जातो. सकाळच्या वेळात नियमित विषयांचे वर्ग भरतात. दुपारी जेवण, विश्रांती झाली की शाळेचे दुसरे सत्र सुरू होते. इतर उपक्रम, साहसी खेळ यांचे प्रशिक्षण या संध्याकाळच्या सत्रात दिले जाते. आठवडय़ाचा एक दिवस सुट्टीचा असतो. या दिवशी मुलींना चित्रपट दाखवला जातो.शाळेचे वेळापत्रक पाहिले की इतक्या विषयांचा, उपक्रमांचा मुलींवर ताण येत नाही का, असा प्रश्न पडतो. त्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग सांगतात, ‘मुळात मुलींचा सर्वागीण विकास व्हावा हे शाळेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक मुलगी प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ होईल असे नाही. प्रत्येकीची आवड आणि क्षमता वेगळ्या असतात. मात्र त्यांना सर्वच विषयांची प्राथमिक ओळख होणे गरजेचे आहे. मुली चित्रकलेल्या परीक्षेला बसल्या म्हणून त्यांनी त्यात उत्तम गुण मिळवलेच पाहिजेत असा दबाव त्यांच्यावर कधीच नसतो. पण परीक्षेला बसायचे, प्रयत्न करायचा याचे बंधन असते. त्यातूनच हार न मानण्याचे, नकारात्मक विचार न करता किमान प्रयत्न करून पाहण्याचे संस्कार मुलींवर आपोआपच होतात.’

शाळेच्या गुणवत्तेचे मोजमाप प्रचलित व्याख्यांमध्ये करायचे तर शाळेचा निकाल कायम शंभर टक्के असतो. या विद्यार्थिनींना कोणत्याही खासगी शिकवण्या नाहीत. शाळेतच करून घेतलेली दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी पुरेशी असते. त्याचबरोबर जेईई, नीट यांच्या तयारीचे वर्गही अकरावीपासून शाळा घेते. सीबीएसई, आयसीएसईच्या शाळेतील अनेक विद्यार्थिनी मराठी माध्यम असूनही शाळेत प्रवेश घेत आहेत. याबाबत जोग यांनी सांगितले, ‘मुळात गुण मिळवण्यासाठी ही शाळा नाहीच. मुली अनुभवांतून, उपक्रमांतून शिकावे असे शाळेला वाटते.  ओपन बुक परीक्षांसारख्या पद्धती शाळेत राबवल्या जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी परीक्षांचा बाऊ कधीच नसतो. ’

समुपदेशन कक्ष

शाळा निवासी असल्यामुळे येथील शिक्षक आणि कर्मचारी पालक आणि शिक्षक अशी दुहेरी जबाबदारी पेलत असतात. त्याचबरोबर शाळेत रोज समुपदेशकही उपस्थित असतात. वसतिगृहाच्या ताईपासून आजीपर्यंतच्या वयोगटांच्या निरीक्षक शाळेचे वातावरण उबदार राहील याची काळजी घेतात. महिन्यातून एकदा पालक मुलींना भेटू शकतात. ‘शाळेत प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत मुलींना घरची आठवण येते. मात्र त्यांच्याशी बोलून समुपदेशक आम्हाला काही अडचणी असतील तर सांगतात. रोज दोन शिक्षक पूर्ण वेळ शाळेत असतात. आरोग्य अधिकारी असतात. त्याशिवाय वसतिगृहांचे निरीक्षक, कर्मचारी असतात. पण आपल्या बरोबरीच्या मुलींना सांभा़ळून घेण्यात, त्यांना इथे रुळायला मदत करण्यात मोठय़ा वर्गातील मुलीच मदत करतात. मुलींना पैसे, मौल्यवान वस्तू, मोबाइल वापरण्याची परवानगी नाही. मात्र त्यांना आवश्यक त्या सुविधा शाळेतच पुरवल्या जातात. वर्षांच्या शेवटी पालकांना या सर्व गोष्टींचा हिशेब दिला जातो. प्रशिक्षणाचा वेळ वगळून घरगुती वातावरण राहील याची काळजी सातत्याने घेतली जाते,’ असे जोग यांनी सांगितले.

खेळ, नाटय़, निबंध अशा स्पर्धामध्ये विद्यार्थिनी सातत्याने आघाडीवर असतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प शाळेत उभे करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थिनीवर एका झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी दिली जाते. या शिवाय सर्व सण समारंभांचे आयोजन, शिबिरे, रॉक क्लाइम्बिंगसारख्या बाह्य़ शिबिरांना हजेरी अशा उपक्रमांतून विद्यार्थिनींची जडणघडण या शाळेत होत आहे. भारतीय सैन्यदलाबरोबरच, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधि क्षेत्र यांच्या माध्यमातून या शाळेच्या माजी विद्यार्थिनी शाळेबाहेरच्या वातावरणातही सर्वार्थाने सक्षम होण्याचे संस्कार पेरत आहेत.

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

रसिका मुळ्ये