अकोल्यात राहणारी ती सर्वसामान्य गृहिणी, पण मनात खोलवर रुजलेल्या समाजकार्याच्या ओढीने त्यांना अंधांची काठी बनण्यास भाग पाडलं. स्वत: पत्ते शोधून अंधांना मदत करायला, अनेकांना आपल्या राहत्या घरी राहायला आणायला सुरुवात केली. दोन्ही डोळे नसतानाही ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्याच्या आधारे त्यांनी मुलांना शिक्षण द्यायला व त्याद्वारे आयुष्यात उभं राहायला मदत केली. अंधांची दृष्टी बनलेल्या मंजुश्री कुलकणीर्ंविषयी.
साधनाताई आमटेंची भेट ही माझ्या आयुष्याला एक विधायक वळण देणारी गोष्ट ठरली आणि समाजातल्या अंध मुलांना ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे स्वत:च्या पायावर उभे करणे हेच माझे आता जीवितकार्य झाले आहे.
१९८७ साली माझं लग्न झालं आणि मी वरोऱ्याला आले. अनेकदा मी आनंदवनात जायचे. तेव्हा साधनाताईंशी ओळख झाली. त्या म्हणाल्या, ‘मंजुश्री, तू सामाजिक कार्यात मन रमव.’ पण मुलगा झाला अन् मी संसारात अडकले. पुन्हा जेव्हा १९९९ मध्ये साधनाताईंची भेट झाली तेव्हा समाजकार्याच्या या भावनेचं बीज खोलवर रुजलं गेलं. तिथे बेला ही अंध मुलगी भेटली. कुणाही पुढे हात पसरण्यापेक्षा ताठ मानेने जगण्याचा तिचा निर्धार मला खूप आवडला आणि मनात आले की, समाजात आजमितीस असंख्य अंधलोक भीक मागून जीवन व्यतीत करतात. पण बेलासारखेही अनेक जण असतीलच. आपण या अंधासाठी त्यांची दृष्टी बनण्याचे काम करायला हवे, हा निर्धार करूनच मी अकोल्याला परत निघाले. खरं तर मी आणि पती गोविंद (कुलकर्णी)यांनी लग्न करतानाच ठरविले होते की, मुले मोठी झाली की, दोघांनी सामाजिक कार्यातच आयुष्य घालवायचे. मात्र त्याला मूर्त रूप यायला २००३ साल उजाडले आणि तिथून सुरू झाला एक अविरत प्रवास..
अकोल्यातील जठारपेठेत राहणाऱ्या अंध सुमनताईंना वाचनाची खूप हौस! बाजारात कुठलेही नवीन पुस्तक आले की, त्या ते विकत आणणार आणि दुसऱ्याकडून वाचून घेणार, मला ही माहिती मिळाली. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुस्तक वाचून दाखवत असे आणि हळूहळू मला परिसरातील अंध लोकांची माहिती मिळायला लागली. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवायला, पुस्तक वाचून दाखवायला सुरुवात केली. त्या वेळी आम्ही दोघांनी एक पक्कं ठरवलं की यापुढे बाहेर हॉटेलात जेवायला, सिनेमा पाहायला किंवा बाहेरगावी फिरायला जायचे नाही. यातून वाचणारा पैसा अंधासाठी खर्च करावयाचा आणि ते तत्त्व अजूनही पाळले आहे.
२००५ला मी ब्रेल लिपी शिकले. त्या वेळी कळले की, तोपर्यंत केवळ सातवी इयत्तेपर्यंतच ब्रेल लिपीची पुस्तके उपलब्ध आहेत. सातवीनंतर या मुलांचं काय, हा प्रश्न मला अस्वस्थ करू लागला, कारण यांना सर्वसामान्य मुलांचा अभ्यास झेपत नाही आणि त्यांना वाचून कोणी दाखवत नाही. मुंबईसारख्या शहरापेक्षा गावात राहणाऱ्या मुलांचे काय होत असेल? म्हणून मी नॅब (नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाइंड) या संस्थेकडून जिल्ह्य़ातील मुलांची यादी घेतली आणि सर्वाशी संपर्क साधणे सुरू केले. त्यातूनच कोणत्या विद्यार्थ्यांला कशाची आवड, कुठला छंद आहे तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांची माहिती झाली आणि आम्ही स्वत:च्याच घरी १७ जून २००९ रोजी ‘क्षितिज’ या अंध अपंग विरंगुळा केंद्राची स्थापना केली.
सुरुवातीला ६०-७० अंध अपंग मुलं-मुली एकत्र आल्या. तिथे त्यांना पुस्तक वाचून दाखवणं, पत्ते खेळणं, बुद्धिबळ खेळणं, सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, मुलांचे वाढदिवस साजरे करणे अशा विविध छोटय़ा-छोटय़ा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यासोबतच त्यांना स्वत:च्या पायावर कसे उभे करता येईल यासाठी मी प्रयत्नशील होते. मी आठवी पास मुलांनाही दहावीच्या परीक्षेला बसवले. शाळा सोडल्यामुळे ही मुले अभ्यासापासून दूर गेलेली होती. अभ्यासक्रमाचं ध्वनिमुद्रण आणि मी घेतलेला अभ्यास यामुळे या मुलांबरोबर बावीस मुले बारावीही पास झाली आणि आमचा सर्वाचाच आनंद द्विगुणित झाला.
 १७ जून २०१० साली पहिला वर्धापन दिनी पुनर्वसन केंद्रही स्थापन केले. वृत्तपत्रांनी माझं हे काम पूर्ण जिल्ह्य़ात पोहोचविले आणि मला अनेक दानशूरांनी आर्थिक मदत करायला सुरुवात केली.
या मुलांना मी योगासने शिकवायला सुरुवात केली. अकोला जिल्हा योगासन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो. या वेळी अंधांना परवानगी कशी द्यायची, या प्रश्नात आयोजक मंडळी अडकली. आमच्या चमूतील मोनाली देव ही विद्यार्थिनी आयोजकांना म्हणाली, ‘आमच्याकडून योगासने करून घ्या नंतरच प्रवेश द्या!’ तिचे आत्मविश्वासपूर्ण उत्तर ऐकून आयोजकांनी प्रवेश दिला. मोनालीचं योगासनातले कौशल्य बघून सारेच थक्क झाले. मुलीतून ती जिल्ह्य़ात प्रथम आली आणि नंतर राज्यस्तरीय स्पर्धेतही जिंकली. एवढेच नाही तर बारावीला तिला ७५ टक्के गुण मिळाले व ती अपंगांतून बोर्डात पहिली आली. या वेळी खरोखरच मला मी करत असलेल्या कामाची खरी पावती मिळाली असे वाटले. मोनालीसारख्या अनेक मुलांना मी डी.एड.ला प्रवेश मिळवून दिला. काहीजण अकोल्यातच शिक्षण घेऊ लागली तर काही जिल्ह्य़ाबाहेर गेली.
संस्थेला आजही इमारत नाही. सगळी कामं आजही घरीच चालतात. त्यामुळे माझी तारेवरची कसरत होते. बारावीनंतर राहण्याची व जेवण्याची सोय होऊ न शकणारी काही मुलं घराकडे शिक्षण सोडून परत जाणार होती. त्यांच्यासाठी मी तीन खोल्या भाडय़ाने घेतल्या व त्यात या विद्यार्थ्यांची सोय केली. दोघांना तर दत्तक घेतले गेले.
‘क्षितिज’मधील अंध मुले शिक्षणात प्रगती चांगल्या प्रमाणात करीत होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत हे यश सर्वाना दिसत होते, पण या मुलांना लेखनिक मिळवून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागे. बोर्डात यासाठी अर्ज करणे, अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे, अंध मुलांसाठी वेगळी खोली देणे यासाठी शाळांकडे मागणी करणे यासाठी माझा लढा सुरू झाला. मात्र आता मला या कामात खूप मोठे यश आले आहे. अकोल्यातील शाळा, महाविद्यालये या कामांत मोलाची मदत करत आहेत. आता ही मुले आपणाहून माझ्या घरी येतात. पुस्तकांचा, सीडींचा अभ्यास करतात. याकामी मला नागपूरच्या ‘सक्षम’ संस्थेची मदत मिळते. आज संस्थेची ५ मुलं डी.एड. तर १० बी.ए. पास झाली आहेत.
मी या वर्षीपासून गावोगावी फिरायला सुरुवात केली आहे. त्या वेळी मला जाणवले की, अकोला जिल्ह्य़ात अंधांचे प्रमाण जास्त आहे. यामागे समाजातील दारिद्रय़ व कुपोषण असल्याचे आढळले.   
३ डिसेंबर २०१३ अपंग दिनाचे औचित्य साधून विरंगुळा केंद्रात नव्या प्रकल्पाची सुरुवात झाली. कागदाच्या पत्रावळी व द्रोण बनविणे. विश्वास पातुरकर व संदेश पातुरकर यांनी स्वत: हैद्राबादहून मशीन आणून संस्थेला भेट दिली व याद्वारे ही मुले स्वत: द्रौण, पत्रावळी बनवितात. मागील दोन वर्षांपासून संस्थेचे पुण्यातही काम सुरू झाले आहे. येणाऱ्या काळात अंध मुलांसाठी बालवाडीपासून शिक्षणाच्या सोयीसोबत कौशल्यपूर्ण शिक्षणाद्वारे त्यांनी जास्तीत जास्त व्यावसायिक क्षेत्रांत जाता यावे यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. १४ जानेवारी २०१४ पासून मी अंध महिलांसाठी गृहोद्योगाची सुरुवात केली असून सध्या माझ्याकडे २५ महिला आहेत. त्याही द्रोण बनवण्याचे काम करतात  आणि पैसे कमवतात.
शासनाची किंवा नॅबची कुठलीच मदत नसतांना मी आतापर्यंत ३० मुलांना यशस्वीपणे जीवनात उभे केले. सध्या माझ्याजवळ ३५ मुले आहेत. त्यांचा सर्व खर्च समाजातील देणगीदारांकडूनच होतो. अमित व अनुजा ही माझी मुले मला कामात खूप मदत करतात.
अंध मुलांना शिक्षणाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे जगासमोर सक्षमपणे व ताठ मानेने उभे करणे हेच माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. संपर्क- मंजुश्री कुलकर्णी
९८५०३२२६७८ kshitisfoundtionakola@gmail.com
(शब्दांकन-संतोष मुसळे)

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’