सध्या सुरू असलेले मोर्चे हे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा कुठलाही विग्रह समोर आणत नाहीत. शोषण अवनतीची खरी कारणे ओळखून, त्याविरोधात पावले उचलल्याखेरीज हा असंतोष यथोचित कसा ठरेल ?

महाराष्ट्रात दीर्घकाळापासून सत्ता उपभोगत आलेला जातसमुदाय ही मराठा जातिसमुदायाची चिरपरिचित ओळख आहे. परंतु मराठा जातसमुदाय हा एकजिनसी आहे असे मुळीच नाही. खरे तर कोणतीच जात एकजिनसी नसते. वर्णव्यवस्थेच्या चौकटीत विचार करता सामाजिक-धार्मिक दर्जाच्या बाबतीत त्यांच्यात अंतर्गत तफावत आहे. तसेच राजकीय आणि आर्थिक बाबतीतही अंतर्गत स्तरीकरण प्रत्ययास येते. आंतरिक विग्रहांवर पांघरूण टाकणारे व्यापक ‘मराठा’ आत्मभान विकसित झाले ती प्रक्रिया अगदी अलीकडची आहे. आजचा जो वरचढ शेतकरी जातींचा सरंजामदार वर्ग आहे तो मध्ययुगीन आणि ब्रिटिशकालीन राजवटींच्या आश्रयात आकारास आला आहे. आर्थिकदृष्टय़ा आणि राजकीयदृष्टय़ा शक्तिशाली बनलेला सामंतांचा हा वर्ग नंतरच्या काळात स्वत:ला कुणबीऐवजी क्षत्रिय मराठा म्हणवून घेणे पसंत करू लागला. त्यांचेच अनुकरण करीत शोषित-कष्टकरी कुणबीही स्वत:चे आत्मभान आणि गौरव मराठा जातअस्मितेत शोधू लागले. पण मराठा जातसमुदायांतर्गत जातिश्रेष्ठत्वाच्या मुद्दय़ावरून निर्माण झालेले सामाजिक अंतर आणि दुरावा बेटीबंदीच्या रूढीमुळे वाढतच गेला. देशमुख-मराठा-कुणबी भेद संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके

ब्रिटिश निघून गेल्यानंतर आपल्याकडे सार्वत्रिक प्रौढ मतदानावर आधारित संसदीय शासनप्रणालीचा स्वीकार करण्यात आला. बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी कधीकाळी आपल्यापासून तोडून टाकलेल्या कुणबी जातसमूहाशी ‘मराठा’ म्हणून सलगी करायला सुरुवात केली. बहुस्तरसत्ताक शासनप्रणालीद्वारा कष्टकरी- शोषित- जातवर्गातील प्रतिनिधींना वरपासून तर खालपर्यंतच्या सत्तेत दुय्यम-तिय्यम स्तरावरचे भागीदार म्हणून सामावून घेण्यात आले; पण सत्तेच्या नाडय़ा कायमच ब्राह्मणी- भांडवली- सामंती शोषक जात-वर्गाच्या हातात राहतील याची दक्षता घेतली गेली. बहुस्तरसत्ताक शासनप्रणालीने ज्या प्रमाणात निम्नवर्गजातींना दुय्यम-तिय्यम स्तरावरच्या सत्तेत प्रत्यक्षात भागीदारी दिली त्यापेक्षा किती तरी पटीने त्यांच्यात आकांक्षा फुलविली. ती आकांक्षा कधीच फलद्रूप होणार नव्हती. कारण सत्तेत सामावून घेण्याचा अवकाश हा मुळातच खूप मर्यादित आणि संकुचित होता. त्यामुळे एका बाजूने सधन- संपन्न- सत्ताधारी वर्ग आणि दुसऱ्या बाजूने अतिशय शोचनीय स्थितीत असलेला सत्तावंचित- दुर्भिक्षग्रस्त- शोषित- कष्टकरी वर्ग असा मूलभूत विग्रह मराठा जातिसमुदायात बघावयास मिळतो. हा तो जनहिस्सा आहे, ज्यामध्ये गेली दोन दशके सर्वाधिक प्रमाणात शेतकरी आत्महत्येची प्रकरणे आढळून आलीत. तो अशा ग्रामीण कोरडवाहू शेतकरी वर्गाचा भाग आहे जे अल्पभूधारक किंवा भूमिहीन आहेत. त्यांच्या शेतमालास भाव मिळत नाही. त्यांच्या जमिनी कधी प्रकल्पाच्या नावाने, कधी सेझच्या नावाने, तर कधी विकासाच्या नावाने गिळंकृत केल्या जाताहेत. तुकडय़ा-तुकडय़ात विभाजित शेतीमुळे उत्पन्न सतत घटते आहे. वरून सावकारी कर्जाचे ओझे आहेच. विस्तारित कुटुंबाचे ओझे पेलवणे वरचेवर कठीण होत चालले आहे. सरकार जे शिक्षण देऊ  करते ते दर्जाहीन आणि कुचकामी आहे. शहरातले महागडे शिक्षण परवडत नाही. त्यामुळे शिक्षणातून तो जवळपास हद्दपारच होत चालला आहे. जे कसेबसे शिक्षण पूर्ण करतात त्यांना नोकरीला ठेवून घेताना सत्तेत असलेल्या मातब्बर जातबांधवांकडूनच नागवले जाते. अन्य ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. शिवाय सत्ताधारी व उच्चजातीय असण्याचा जो सामंती अहंगंड असतो तोही बऱ्याचदा नोकरी- रोजगार- व्यवसायाची नवी क्षेत्रे धुंडाळताना आडवा येतो. तरीही अनेक मराठा कुटुंबे अशी आहेत जी आज परिस्थितीवश ऊसतोडणी कामगार, हमाल, कंत्राटी कामगार, घरेलू कामगार, खासगी वाहनचालक, खासगी सुरक्षारक्षक, डबेवाले किंवा तत्सम स्वरूपाची मिळेल ती कामे करून गुजराण करताना आढळतात. अनेकांवर महानगरांमधून गलिच्छ वस्त्यांमध्ये असुरक्षित जीवन जगण्याची पाळी आली आहे. लोकसंख्येत मराठा जातसमूहाची बहुसंख्या असल्याने अर्थातच त्यात भूमिहीन कष्टकरी, अल्पभूधारक, असंघटित- असुरक्षित शहरी कामगार, अशिक्षित व अर्धशिक्षित बेरोजगारांची संख्याही मोठी आहे. तथापि आर्थिक दुर्भिक्ष्यात असले तरी त्यांच्यात जातिश्रेष्ठत्वाची भावना त्याहीपेक्षा प्रबळ असल्याने खेडोपाडी दलितांवर अत्याचार करण्यात ते अग्रस्थानी असतात हे दुर्लक्षिता येत नाही. हे तेच लोक आहेत ज्यांना कधीकाळी महानगरातील सुपारीबाज पक्षांनी कामगार- कष्टकऱ्यांच्या चळवळी फोडण्यासाठी ‘सैनिक’ म्हणून वापरून घेतले. हे तेच लोक आहेत जे धर्माध- जमातवादी- भांडवली शक्तींकडून मुसलमानविरोधी दंगलीत रस्त्यावर उतरवले गेले. तसेच हे तेच लोक आहेत जे जातीच्या अस्मितेपोटी आजवर सातत्याने आपल्या मातब्बर जातबांधवांना सत्तेत बसवीत आले. कधी त्यांनी भांडवली पक्षांना आपलेसे मानले; तर कधी त्यांनी धर्माध-जमातवादी शक्तींना सत्तेत नेऊन बसविले. हे दोन्ही पर्याय स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड हाणून घेणारे असूनही ते वर्षांनुवर्षे त्याचीच पुनरावृत्ती करीत आहेत.

इथे महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होऊ  शकतो की, मेटाकुटीस आलेल्या शोषित- कष्टकरी मराठा बांधवांच्या आकांक्षा खुडून टाकण्याचे काम केले कुणी? या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर आहे, त्यांच्याच जातिसमुदायातील मातब्बर श्रेष्ठीजनांनी, ज्यांचे हितसंबंध सर्वार्थाने शोषक- वर्गजातींशी घट्टपणे जोडले गेले आहेत. शोषित-कष्टकरी जनसमूहाचा हिस्सा असलेल्या मराठय़ांचे दैनंदिन जगण्या-मरण्याचे प्रश्न मराठा श्रेष्ठीजनांनी कधीही राजकारणाच्या अजेंडय़ावर आणले नाहीत. उदाहरणार्थ, गेल्या दीड दशकात एकटय़ा महाराष्ट्रात २० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खासगी आणि विनाअनुदानित शिक्षणाच्या धोरणामुळे ग्रामीण शेतकऱ्याची मुले शिक्षणातून हद्दपार होत गेली. उद्योजक- भांडवलदार- बागायतदार वर्गावर सवलतींची आणि सुविधांची खैरात होत असताना ग्रामीण शेतकरी देशोधडीला लागला. असे किती तरी दाखले देता येतील की जिथे ग्रामीण शेतकरी जनतेच्या विरोधात विधिमंडळात कायदे पारित होत असताना श्रेष्ठीजन मराठा नेतृत्वाने सत्तावंचित- दुर्भिक्षग्रस्त- विस्थापित मराठय़ांचे हित जोपासले नाही. त्यांना त्यांच्या प्रश्नांची कधी सोडवणूकच करावीशी वाटली नाही; कारण शोषित-कष्टकरी मराठय़ांना जात-अस्मितेच्या कोंदणात बंदिस्त करूनच श्रेष्ठीजन मराठा सत्ता उपभोगू शकत होते. आता मोर्चाच्या निमित्तानेही पुन्हा तेच घडते आहे. हे मोर्चे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा कुठलाही विग्रह समोर आणीत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. तो मराठा जातसमुदायातील विग्रही तत्त्वांच्या एकजुटीचा नवा प्रयत्न आहे एवढेच म्हणता येईल. त्यात प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा यांची गठ्जोड अधिक घट्ट होताना दिसते आहे. त्यांना पुन्हा नव्याने तसा प्रयत्न करण्याची गरज का भासली?

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओ.बी.सी. वर्गात राजकीय जागरूकता वाढीस लागली. निवडणुकीतील जातीय समीकरणे आणि जातवार संख्येचे गणित यामुळे राजकीय सत्तेमधील वाटा आपल्याकडे वळविण्यात सर्वच पक्षांमधील ओ.बी.सी. नेतृत्व बऱ्यापैकी यशस्वी ठरले. राजकीय सत्तेचा सामाजिक-पाया विस्तारणे ही गोष्ट भारतीय लोकसत्ताक राज्यपद्धतीस अधिक प्रगल्भ बनविणारी होती; पण याचा फटका मराठा राजकीय वर्चस्वास बसला. दुसऱ्या बाजूने मंडल आयोगाची प्रतिक्रिया म्हणून उभ्या राहिलेल्या हिंदुत्ववादी राजकारणास उभारी आल्यानंतर मराठा वर्चस्वाच्या राजकारणासमोर आणखी नवी आव्हाने उभी राहिली. विशेषत: गेली तीन दशके मराठवाडय़ातील मराठा मतदारांपैकी मोठा हिस्सा आस्तेकदम शिवसेनेच्या तंबूत जाऊन स्थिरावला. विदर्भात तो लक्षणीय प्रमाणात भाजपच्या तंबूत सरकतो आहे हे मागच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आले. आधीच एकसंध नसलेले मराठा मतदान आणखी तुकडय़ा-तुकडय़ात विभाजित झाल्याने मराठा जातवर्चस्वाचे राजकारण करणाऱ्या पारंपरिक पक्षांचा अभूतपूर्व शक्तिपात घडून आला. या संपूर्ण पृष्ठभूमीवर मराठा जातिसमुदायाच्या एकवटीकरणाचे प्रयत्न नव्याने सुरू होतील हे अभिप्रेत होते. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दलित विरुद्ध मराठा असे ध्रुवीकरण घडवून मराठा जातिसमुदायाचे एकवटीकरण घडवून आणले जात आहे.

मराठा क्रांती मोर्चासंबंधी काही अभ्यासक असे मत व्यक्त करीत आहेत की, हे मोर्चे म्हणजे मराठा जातिसमुदायातील प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा आक्रोश होय. खरे म्हणजे त्यांच्या या म्हणण्यात तथ्य आणि विश्लेषण कमी आणि त्यांची स्वत:ची मनोकामना अधिक दिसते. पण तरीही या मोर्चाकडे एक मोठे दिलासादायक सामाजिक परिवर्तन म्हणूनही बघायला हवे. दिलासादायक यासाठी की मराठा जातिसमूहातील मूलभूत विग्रह आणि आंतर्विरोध मुखर झाल्याशिवाय इथल्या सामाजिक परिवर्तनाचा रुतलेला गाडा पुढे जाण्याची शक्यता फारच कमी आहे. जातभांडवल दिमतीला असतानासुद्धा जे मातब्बर-  सत्ताधारी वर्गाचा हिस्सा बनू शकले नाहीत त्यांची ती आकांक्षा कधी तरी असंतोषात परावर्तित होणारच होती. तो असंतोष आपल्यावर उलटू नये म्हणून आता मराठा श्रेष्ठींकडून त्या असंतोषास हेतुपुरस्सर दलितविरोधी वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते आहे. मराठा आरक्षणाची मागणी करायची आणि त्याच वेळी अत्याचार प्रतिबंधक कायद्यास विरोधही करायचा याचा अर्थ तोच आहे. अशा स्थितीत शोषित- कष्टकरी जनसमूहाचा हिस्सा असलेल्या मराठा बांधवांच्या मनातील हा असंतोष तेव्हाच यथोचित ठरवता येईल जेव्हा ते आपल्या शोषणाची आणि अवनतीची खरी करणे ओळखून त्याविरोधात मुक्तीच्या समान हितसंबंधाखातर अन्य शोषित जनसमूहांच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेतील. तशी अपेक्षा करण्यासाठी भक्कम आधारदेखील आहे. महाराष्ट्राच्या प्रागतिक आणि पुरोगामी चळवळीचा गौरवास्पद वारसा त्यांच्या पाठीशी आहे. सत्यशोधक- ब्राह्मणेतर- जात्यंतक चळवळीच्या इतिहासात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. तो वारसा स्वीकारून शोषित-कष्टकरी वर्गाचा भाग असलेल्या मराठा बांधवांनी त्यांना राजकीय लाभापुरते वापरून घेणाऱ्या मातब्बर स्वजातीयांपासून आणि धर्माध-जमातवादी शक्तींपासून सावध राहावे, यातच त्यांचे हित आहे. त्यांनी दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, मागास मुसलमान इत्यादी कष्टकरी-शोषित वर्गजातींच्या मुक्तिगामी राजकारणाचा भाग बनावे अशी अपेक्षा गैर ठरणार नाही; कारण तोच खरा क्रांती मोर्चा असेल!

लेखक  सामाजिकराजकीय इतिहासाचे अभ्यासक आहेत.

ईमेल : ingledevs@gmail.com