जनकला किंवा पब्लिक आर्ट हा कलाप्रकार गेल्या काही वर्षांत आपल्याकडे चच्रेत आला आहे. सार्वजनिक अवकाशात वावरताना तिथल्या तपशिलांशी जोडून घेत कलाकार अनेकदा कला-प्रकल्प आकाराला आणतात. बऱ्याचदा ते तात्कालिक असतात, त्या त्या वेळचा हस्तक्षेप म्हणून त्याकडे बघता येतं. हे प्रकल्प शहराच्या सांस्कृतिक जीवनात भर घालतात. या प्रक्रियेत कला खासगी कलादालनांतून बाहेर पडते, त्या दालनांच्या नेहमीच्या व्यावसायिक चौकटी मोडून काढते. हे करत असताना कलाकार स्वत्वाची व्याप्ती वाढवत इथं ‘कलाकार’ किंवा ‘क्युरेटर’ न राहता फॅसिलिटेटर बनतात, ते कला प्रकल्पांची जोडणी करतात. लोकांना यात सहभागी होण्यास आणि त्यातून कलानिर्मिती करण्यास उद्युक्त करतात. एकीकडे, रस्त्यात, चौकात भिंती आणि चित्रं रंगवून, शिल्पं लावून शहरांना सुंदर बनवण्याचा खटाटोप चाललेला दिसतो. तर दुसरीकडे, त्या त्या शहराचे सांस्कृतिक-सामाजिक संदर्भ, तिथले अर्थ व कलाव्यवहार आणि शहर-रचना व इतर मुद्दे यांना धरून हे प्रकल्प उभे राहतात. सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करत, लोकांच्या सहभागातून काम करताना हे कलाकार नेमकी कोणती कलाभाषा निवडतात? ही निवड जाणीवपूर्वक असते की नसते? आपल्या शहरांचे बदलते ढाचे हे कुठल्या प्रकारचा प्रेक्षकवर्ग घडवताहेत? यात मोठय़ा शहरांतले कलाकार निरनिराळे घाट वापरताना दिसतात. परफॉर्मन्स, संवाद किंवा कार्यशाळा यांसारख्या गोष्टीतून हे प्रकल्प या घडीला उभे राहतात.

ठाणे शहरातील एका आटत चाललेल्या तलावाची मूळ सीमारेषा आखणे हाच प्राजक्ता पोतनीस यांचा असाच एक परफॉर्मन्स. ‘रेष’ या संकल्पनेचा विचार आणि आकलन त्या त्यांच्या विविध कलाकृतीतून आणि कला प्रकल्पातून करत आल्या आहेत. खासगी-सार्वजनिक, आंतर-बाह्य़ अवकाश याचा वेध त्या यातून घेण्याचा प्रयत्न करतात. चुन्याने आखलेली फूटभर रुंदीची आणि तलावाला वेढा घालणारी रेषा प्राजक्ताच्या दृष्टीने कॅनव्हासवर रेषा काढण्यासारखंच होतं. पण सार्वजनिक ठिकाणी हे घडू लागताच त्याचे संदर्भ बदलले आणि परफॉर्मन्स थांबवण्याची वेळ आली. तलावात अतिक्रमण करून बांधलेल्या इमारती, तिथल्या रहिवाशांची असुरक्षिततेची भावना, बिल्डर्स आणि सरकारकडून येणाऱ्या पुनर्विकासाच्या भूलथापा, स्थानिक राजकीय गुंडांनी घातलेला गोंधळ या सगळ्याच्या पाश्र्वभूमीवर जन-कलेचा अधिक खोलवर विचार होण्याची आवश्यकता असल्याची जाणीव झाली.

बहुतेक वेळा, हे लोकसहभागातून उभे राहणारे हस्तक्षेप शहराच्या परिघाच्या बाहेर घडलेले दिसतात. त्यात शहरीकरणातून उद्भवलेल्या प्रश्नांना बगल देणं नसून ते समजून घेत त्या पलीकडे जाऊन आजूबाजूला चालू असलेल्या संक्रमणाकडे लक्ष वेधणं आहे. दिल्लीच्या ‘खोज आर्टिस्ट इंटरनॅशनल’ या संस्थेच्या माध्यमातून आस्था चौहान या खिडकी गावात गेली अनेक र्वष कला प्रकल्पांवर काम करत आल्या आहेत. स्थलांतरित आणि विविध आर्थिक गटातले दुकानदार, मुलं, स्त्रिया, कारागीर यांच्याबरोबर अनेक पातळ्यांवर त्यांचा संवाद आकाराला येतो. त्यांच्या आस्थेचे विषय आणि प्रश्न यांना सामूहिकरीत्या सामोरं जाण्याच्या शक्यता शोधतो. मुलांबरोबरच्या कार्यशाळा, कम्युनिटी रेडिओ, म्युझिक बॅण्ड, तिथल्या घरगुती औषधांचं दस्तावेजीकरण यातून हा संवाद वाढत गेला. या हस्तक्षेपातून परफॉर्मन्सेस, पॉप-अप म्युझिअम, इन्स्टॉलेशन्स आकाराला आले. ‘आप की सडक’सारख्या प्रकल्पात त्यांनी बदलता परिसर, तिथल्या वाटा, रचना, इमारती यांचे नकाशे बनवले आणि त्याबाबत काही उपाययोजनाही सुचवल्या.

महानगरी जाणिवा, त्यातून शहरातील अवकाशाला भिडणं, तिथला इतिहास-संस्कृतीची सांगड घालत कलाव्यवहार घडवणं हे काही प्रकल्पांच्या बाबतीत दिसू लागलं आहे. पण त्यात या स्मृत्याकुलतेचा (नॉस्टॅल्जिया) जरासा अंश आहेच! कोलकाता शहरातला ‘चितपूर लोकल’ हा असाच एक दखल घेण्याजोगा प्रकल्प. शहरं बदलताना तिथल्या लहान-मोठय़ा रचना, जुन्या वास्तू बदलतात असं नाही तर वर्षांनुर्वष चालत आलेले पारंपरिक उद्योग, हस्तकला, आरेखनं आणि छपाई, त्यांचं अर्थकारण, वापर हेही बदलत जातं. हे सगळं हरवत चाललंय याची केवळ खंत नाही पण त्या संसाधनांतून आताच्या बदलत्या संदर्भात याकडे कसं पाहता येईल, त्याची पुनर्माडणी करता येईल का, असा विचारही शुमोना चक्रबर्ती यांच्या चितपूर भागातल्या या प्रकल्पातून विचारतात. छपाईयंत्रं, पुस्तकाची दुकानं, जत्रा म्हणजे छोटय़ा-मोठय़ा नाटकवाल्यांची कार्यालयं, मोठाले चौक असलेली घरं, फुटपाथच्या बाजूला असलेले ‘अड्डे’, अनेक प्रकारच्या हस्तकलांची दुकानं, लाकडी ठोकळ्यांनी छपाईसारखी लयाला चाललेली माध्यमं, या सगळ्यांनी समृद्ध असलेला हा शहराचा भाग त्यांनी निवडला. तोही अर्थात तिथल्या स्थानिक रहिवाशांबरोबरच्या संवादातूनच. तिथे कार्यशाळा घेऊन त्यातून तयार झालेल्या कलावस्तूंचं पॉप-अप किंवा ‘नेबरहूड म्युझियम’ बनवलं. अशा उपक्रमातून शहरातली ती वस्ती, तो परिसर विकसित करण्याच्या कल्पना मांडल्या गेल्या, तिथल्या रहिवाशांनीच त्या मांडल्या. त्या पूर्ण करण्यासाठी काय काय करता येईल हे अनेक खेळ, परफॉर्मन्स, कार्यशाळा, फेस्टिव्हल यांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलं. या प्रक्रियेचं दस्तावेजीकरण आणि त्यातून तयार झालेल्या कलावस्तूंचं कोलकाता आणि मुंबईच्या कलादालनात प्रदर्शनही केलं गेलं. तेव्हा कलादालनाच्या संदर्भात या कलावस्तूंभोवती काय चर्चाविश्व घडू शकतं, त्यातून आकृतिबंधाच्या काय नव्या शक्यता आकाराला येऊ शकतात का, यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्नही झाला. यात गॅलरी या संकल्पनेचाही पुनर्विचार त्यांनी केला.

शहराच्या अवकाशात कला आणि हस्तकला या दोन्हीला एकत्र आणत आर्किटेक्ट, कलाकार आणि संशोधक असलेल्या इंद्राणी बरुआ यांचा ‘कल्चरल री-इमॅजिनेशन्स’ हा प्रकल्प गुवाहाटीत ब्रह्मपुत्रा नदीकाठी आकाराला आला. या प्रकल्पाचा उद्देश कलाकार-कारागीर, कला आणि वास्तुकला, हस्तकला आणि ललित कला अशा साचेबंद मांडणीला छेद देणं आणि त्याच प्रक्रियेतून संमिश्र कलाव्यवहार कसा आकाराला येईल याच्या शक्यता अजमावणं हा होता. सुरुवातीला यात कारागिरांबरोबर काम करताना हस्तकला-व्यवहार आणि कलेतील अमूर्तता यांचा मेळ घालत त्यांच्या साचेबंद व्याख्यांवर विचारविनिमय केला गेला. त्यानंतर स्थानिक आणि शाश्वत असं तंत्र वापरून आणि कलाकार, कारागीर व कामगारांच्या सहयोगातून बांबूंचा तराफा बनवला गेला. मर्यादित काळासाठी तिथे उभा असलेला हा तराफा ‘फिरस्ता’ किंवा ‘जाजाबोर’ स्थळ म्हणूनच कल्पिला गेला. इथे संगीत, साहित्य, चित्रपट, नाटक, लोककला अशा क्षेत्रांतल्या कलाकारांनी सादरीकरण केलं गेलं. स्थानिक लोकसमूहांबरोबर काम करत ब्रह्मपुत्र नदीचा परिसर, पर्यावरणीय प्रश्न यांना भिडत लोकसहभागातून भोवतालच्या संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकल्पानं केला.

यासारखे जनकला प्रकल्प जसे सार्वजनिक अवकाशाला आकार देतात, तसंच सार्वजनिक अवकाश हे कलाप्रक्रिया घडवण्यात मोलाची भूमिका बजावताहेत असं दिसतं. हे लोकसहभागातून तयार होणारे प्रकल्प त्या त्या शहराची कला-संस्कृती, त्यांची बदलती परिमाणं ठरवतात, कलाव्यवहाराच्या दिशा ठरवतात. यातून एका पातळीवर कलेच्या लोकशाहीकरणाची प्रक्रिया घडत जाते, असंही दिसतं. पण ते नेमकं खरंच घडतं का किंवा पुरेसं असतं का की हे त्या त्या कलाकारांचेच प्रकल्प राहतात आणि लोकसहभाग केवळ एक साधन म्हणून यात वापरला जातो? हे पाहायला हवं. अलीकडच्या काळातल्या वाढत्या विखंडितेत हे प्रकल्प एक पर्याय उभा करू पाहतात पण ती खरोखरच प्रतिकाराची साधनं ठरतात का, हेही तपासून पाहायला हवं. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याऐवजी तात्पुरते तोडगे शोधण्याकडे यात कल दिसतो का, हाही यातला एक कळीचा मुद्दा आहे. अर्थात, या सगळ्या प्रश्नांची उकल करत आणि चिंतन करतच शहरांमधल्या या प्रक्रिया आणि जनकला व्यवहार कोणत्या मुशीतून घडतात आणि त्यांचे दूरगामी परिणाम एकूणच तिथल्या आणि एकंदर भारतीय समकालीन कलाव्यवहारावर आणि कलेच्या चर्चाविश्वावर कसे होताना दिसतात हे पाहणं या एकूणच प्रवासात महत्त्वाचं ठरणार आहे.

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com