कला समीक्षेचं शिक्षण घेतलं असलं तरी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनिता दुबे यांनी लाकडात कोरीवकाम आणि रंगकाम करून शिल्पं घडवायला सुरुवात केली. कलानिर्मिती करताना कोरलेल्या लाकडाबरोबरच इतर अनेक गोष्टीही वापरायला त्यांनी प्रारंभ केला..

anita-dube

Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

कलेतील प्रस्थापित भाषेला, आशयाला आणि मांडणीला प्रतिरोध करत कलाव्यवहाराचा नवा विचार मांडायचा अनेकांनी वेळोवेळी प्रयत्न केला. नवी साधनं, नवं अवकाश, नव्या पद्धती यांचा अवलंब करून कलानिर्मिती केली गेली. कलारूपं, आशय आणि आकृतिबंध याबरोबरच कलाकारांनी कलादृष्टी, कलाविषयक तत्त्वज्ञान, कलानिर्मितीचे तंत्र, व्याकरण यांचा सर्वार्थाने विचार केला आणि त्या परस्परांतील संवादातून हे नवे प्रवाह निर्माण केले. अर्थात हे सगळं करताना त्याला एक वैचारिक बठक असणंही आवश्यक होतं. अशाच प्रकारची वैचारिक मांडणी अनिता दुबे यांनी त्यांच्या ‘क्वेश्चन्स अ‍ॅण्ड डायलॉग’ या लेखात केली. तोच ‘रॅडिकल पेंटर्स अ‍ॅण्ड स्कल्प्टर्स असोसिएशन’ किंवा ‘द रॅडिकल्स’ (१९८५-१९८९) या कलाकारांच्या गटाचा जाहीरनामा ठरला.

१९८० च्या दशकात सुरू झालेल्या कलेच्या वाढत्या व्यापारीकरणाच्या विरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली. समकालीन कलेतील सद्धांतिक आणि राजकीय गृहीतकांना उलथून टाकत या कलाकारांनी त्यांची सांस्कृतिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तनाशी नाळ जोडलेली आहे, असं जाहीर केलं. के. पी. कृष्णकुमार या शिल्पकाराच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या गटातील एकमेव स्त्री कलाकार होत्या अनिता दुबे. ‘‘ग्रुपचाच भाग असल्यामुळे असेल कदाचित, पण कॅटलॉगमधला लेख मी लिहू शकेन, त्यातून काही विचार मांडू शकेन, असं कुणाच्याच लक्षात आलं नाही. लेख लिहायला इतर कुणी मिळेना तेव्हा मग ‘तूच का लिहीत नाहीस’ असं मला विचारलं.’’ अनिता दुबे यांनी यातून या गटाची कलेबद्दलची राजकीय भूमिका ठामपणे अधोरेखित केली. त्या स्वत:ला त्या लेखातच ‘आठवी निनावी कलाकार’ म्हणवून घेतात. समीक्षक म्हणून बाहेरून याकडे न पाहाता त्या त्याचा एक अविभाज्य भाग होत्या हेच त्यातून सांगू पाहात होत्या.

या लेखात कलेतील आधुनिक तसेच उत्तर-आधुनिक प्रवाहांवर त्यांनी टीका केली. आधुनिक कलेच्या मर्यादा स्पष्ट करत आणि भारतीय कलेच्या गतकालाबद्दलची एकात्म मांडणी धुडकावून लावली. मुंबई-दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांपेक्षा वेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परिसरातून उदयाला येणाऱ्या कलेबद्दल कलाविश्वाला विचार करायला भाग पाडले. दुबे लेखात म्हणतात त्याप्रमाणे भांडवली व्यवस्थेमध्ये कलेचे क्रयवस्तूकरण झाले आणि कलाकाराला आपला संघर्ष कशासाठी व कशाच्या विरोधात आहे हेच कळेनासे झाले. त्याचबरोबर या काळातील कला ही आशय किंवा माध्यमाच्या खोलात न शिरता केवळ पृष्ठभागीय पातळीवर किंवा नक्कल करण्यापुरती मर्यादित राहिली. शहरी मध्यमवर्गीय बुद्धिवंत वर्गाला लाभलेल्या विशेषाधिकारी स्थानामुळे कलानिर्मिती आणि कलाइतिहास लेखनात फोफावलेल्या त्याच पद्धतीच्या वैचारिक भूमिकांवरही त्यांनी टीका केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकृतींचा लिलाव करणाऱ्या ‘सदबी’जच्या विरोधात भूमिका घेतली. कलाविश्वातील व्यवहार इंग्रजीत होत असताना ‘रॅडिकल्स’नी केरळमध्ये प्रदर्शन भरवून मल्याळममध्ये लिखाण केलं. कला जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी वैशिष्टय़पूर्ण कलाभाषेचा आणि नवी साधनं व माध्यमांचा वापर केला. यातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय जाणिवांची कला व कलाकृती काय आहे याबरोबरच ती करण्यामागची कारणे आणि प्रेरणा कोणत्या हे समजून घेण्याला महत्त्व दिलं.

सुरुवातीला कला समीक्षेचं शिक्षण घेतलं असलं तरी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात काळात दुबे यांनी लाकडात कोरीवकाम आणि रंगकाम करून शिल्पं घडवायला सुरुवात केली. समाजात आणि स्वत:मध्ये अंतर्बाह्य़ बदल घडवून आणण्याची ताकद कलेतच आहे, असा त्यांना विश्वास होता. या विश्वासामुळे कृष्णकुमार यांच्या आत्महत्येनंतर दुबे यांनी कला माध्यमाचा अधिक सखोलपणे विचार केला. कलानिर्मिती करताना कोरलेल्या लाकडाबरोबरच इतर अनेक गोष्टी वापरायला त्यांनी सुरुवात केली. त्या ‘फाऊंड ऑब्जेक्ट्स’ किंवा वेचक वस्तू एकत्र आणून त्यात थोडा फेरफार करून त्यापासून शिल्पं आणि मांडणीशिल्पं उभारू लागल्या. त्यांच्या कामाच्या प्रक्रियेत आणि कलाभाषेत मोठा बदल घडला तो त्यांच्या ‘सायलेन्स (ब्लड वेडिंग)’ मांडणीशिल्पामुळे. यात त्यांनी खराखुरा मानवी हाडांचा सापळा, त्याची रचना याचा वापर आम्रेचरसारखा केला. तांबडय़ा रंगाचे मखमली कापड चढवलेल्या हाडांच्या सापळ्यावर रंगीबेरंगी जर, मणी यांनी सजावट केली. एकीकडे ही सजावट डोळ्यांना सुखावणारी ठरते तर दुसरीकडे तेच सौंदर्य खोलवर अस्वस्थही करतं. काचेच्या कपाटात मांडलेल्या या विविध रचना जपल्याही जातात, अनोळखी व्यक्तीच्या या हाडांच्या रचनेचा केलेला वापर बेचन करतो, पण तेव्हाच सांस्कृतिक ठेवा, स्मृती जपणं आणि सौंदर्य म्हणजे नेमकं काय, असे प्रश्न उभे करतो.

दैनंदिन वापरातल्या प्लास्टिक, फोम, तारा, मणी, धागे तसंच हाडांच्या रचना, कवळ्या तर त्यांनी वापरल्या, पण िहदू देवतांच्या मूर्तीसाठी वापरले जाणारे सिरॅमिकचे डोळे वापरून त्यांनी अनेक मांडणीशिल्पं उभी केली. असे शेकडो डोळे हे एखाद्या विशिष्ट समूहाचे असू शकतात, गर्दीचे असू शकतात किंवा पाळत ठेवणारेही असू शकतात. शेकडो-हजारो डोळ्यांच्या या रचना आपल्या अस्मितेची जाणीव करून देतात. दुबे म्हणतात त्याप्रमाणे, त्या गर्दीची ऊर्जा ही दमनकारी असू शकते किंवा क्रांतिकारी. त्यांनी स्वत: कृत्रिम डोळे वापरून सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संवाद साधणं, परफॉर्मन्स करणं, हाही याचाच भाग.

शारीर रचना, शरीराचं कलानिर्मिती आणि सर्जनशील प्रक्रियेतलं महत्त्व आणि शरीर हेच नंतर माध्यम होत जाणं यातून अनिता दुबे या परफॉर्मन्सकडे वळल्या. त्यातूनच मांस कापून त्यापासून अक्षर, शब्द कोरण्याची कल्पना आकाराला आली. ‘खोज’मध्ये पार पडलेल्या ‘कीवर्ड्स’ या परफॉर्मन्समध्ये ‘अव्हां गार्द’ किंवा ‘अबाऊट एथिक्स’ हे शब्द त्यांनी बर्फाच्या ठोकळ्यावर ठेवलेल्या मांसाच्या तुकडय़ांपासून कोरले. प्रेक्षकांशी संवाद साधत या शब्दांचे अर्थ आणि इतिहास यांचा धांडोळा घेतला. साधनं आणि माध्यमांचे प्रयोग करत आणि शब्दांना मूर्त स्वरूप देत गोष्टींना/ वस्तूंना शारीर रूप कसं देता येईल, या प्रश्नाचा विचार त्या यातून मांडतात. प्रेक्षकांसमोर ते तुकडे मांडणं, कापणं, त्यासाठी लागणारी ऊर्जा, मानसिक तयारी, त्यातून आकाराला येणाऱ्या शब्दांवर होणारी चर्चा हे सारं त्या परफॉर्मन्सचा भाग बनला.

‘किस्सा नूर ए मोहम्मद’ या व्हिडीओ परफॉर्मन्समध्ये त्या लिंगभाव, धार्मिक आणि लैंगिक अस्मिता यांची सरमिसळ करत स्वत: मोहम्मदच्या वेशात प्रेक्षकांशी संवाद साधतात. यातून नऊ रस किंवा त्यातले भाव व्यक्त करतात. यात ‘मोहम्मद’ अनिताला भेटल्याचे दाखले देत गप्पा सुरू करतो. तो सामाजिक- राजकीय परिस्थितीपासून प्रेम आणि सुफी तत्त्वज्ञानावर बोलतो; पण १५ मिनिटे लांबीच्या या व्हिडीओत नंतर मात्र धार्मिक मूलतत्त्ववाद आणि फॅसिझम याबद्दल शोक व्यक्त करतो. ‘गर्म हवा’ चित्रपटाचा संदर्भ घेत फाळणीचा इतिहास, त्यातून झालेली हिंसा, उफाळून येणाऱ्या धार्मिक अस्मिता, त्यांचं बदलतं स्वरूप याबद्दल मोहम्मद/ अनिता बोलत राहतात. यात त्यांचं अस्तित्व प्रवाही बनतं. कलाकाराचं स्त्री असणं, व्हिडीओत पुरुषाची भूमिका साकारणं, स्वत:ची लैंगिक, वर्गीय आणि धार्मिक ओळख सोडून वेगळी भूमिका अंगीकारणं हे आपलं खंडित वास्तव दाखवते. समाजात सतत घडणाऱ्या हिंसेतून येणारी परकेपणाची भावना तयारी होणारी ‘सहज स्वाभाविक’ कशी बनत जाते याचेही प्रत्यंतर देते. नव्या प्रकारे आपल्याला त्यांच्या कलाव्यवहाराकडे पाहायला मदत करते. सत्य आणि कल्पित याच्या मधोमध कुठे तरी हेलकावे खातं.

कला इतिहास व समीक्षा तसंच शिल्पकला, मांडणीशिल्प, परफॉर्मन्स, व्हिडीओ अशा अनेक कलाप्रकारांना हाताळलेल्या अनिता दुबे यांची निवड येत्या कोची बिनालेच्या क्युरेटर म्हणून झाली आहे. कोची बिनालेच्या त्या पहिल्या स्त्री क्युरेटर ठरल्या आहेत. त्यांच्या कलाभाषेतील प्रयोगशीलतेचं आणि बंडखोर विचारांचं प्रतिबिंब बिनालेसारख्या मोठय़ा प्रदर्शनाच्या आखणी आणि मांडणीतदेखील पडलेलं दिसेल अशी आशा करू या.

 

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत.