भारतीय कलाकारांनी १९७०-८० च्या दशकात चित्रकलेबरोबर शिल्पकलेतही वेगळे मार्ग चोखाळायला सुरुवात केली. शिल्पकारांनी नवीन मटेरिअल, साहित्य हाताळायला सुरुवात केली. त्याच्या परिणामी त्या काळात नव्या पद्धतीच्या प्रतिमा तयार झाल्या. या नावीन्यपूर्ण प्रायोगिकतेमध्ये औद्योगिकीकरणाच्या परिणामी त्यातून आलेल्या वस्तू आणि मटेरिअल किंवा यांत्रिकीकरणातून आलेले आकार आणि पोत यांचा समावेश केला गेला. लाकूड, धातूचे पत्रे किंवा पॅकेजिंग मटेरिअलसारख्या गोष्टी वापरून काही शिल्पकारांनी काम सुरू केलं. संगमरवर, पितळ, फायबर ग्लास, प्लास्टर ऑफ पॅरिस अशा विविध प्रकारचं मटेरिअल हाताळत, त्यांचा मेळ घालत शिल्पकारांनी या काळात शिल्पाकृती निर्माण केल्या. या काळातल्या कलाकारांनी यातून नवी प्रतिमानिर्मिती तर केलीच, पण या साधनांना शिल्पकलेची माध्यमं म्हणून प्रतिष्ठाही मिळवून दिली. यापकी एक म्हणजे मृणालिनी मुखर्जी.

शांतिनिकेतनमध्ये काम करणाऱ्या बिनोद बिहारी मुखर्जी आणि लीला मुखर्जी या कलाकार आई-वडिलांकडून कलेचा वारसा त्यांना मिळाला. पण  मृणालिनी सुरुवातीला कला शिक्षणासाठी फारशा उत्सुक नव्हत्या. बिनोद बिहारी मुखर्जीच्या आग्रहावरून त्यांनी बडोद्याच्या कला विभागात भित्तिचित्रकलेचं शिक्षण घेतलं. मात्र त्यांची कलानिर्मिती ही मुख्यत: शिल्पकलेच्या क्षेत्रातच झालेली दिसते. के. जी. सुब्रमण्यन तेव्हाचे बडोद्याचे प्रमुख. ते बिनोद बिहारी यांचे शांतिनिकेतनमधले विद्यार्थी होते. त्यामुळेच बडोद्याच्या मोकळ्या वातावरणात मृणालिनीला वडलांनी शिकायला पाठवलं. ‘के.जीं.’नी पुढाकार घेऊन कला आणि हस्तकला यांची सांगड घालत समकालीन कलाव्यवहाराची मांडणी केली. तीच बडोद्याच्या कला विभागात काही प्रमाणात प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नही केला. यामुळेही नवीन मटेरिअलमध्ये प्रयोग करायला या काळात चालना मिळाली. याची पुढची पायरी मृणालिनी मुखर्जी यांनी नसíगक धागे, सुतळीचे किंवा तागाचे पीळ वापरून शिल्पं आकाराला आणली. या वेगळेपणामुळे त्यांच्या कलाकृती ठसा उमटवणाऱ्या ठरल्या आहेत.

सुतळी किंवा तागाचा दोर ही कलाकृती तयार करण्यासाठी सहसा वापरली जात नाही. खरंतर ती हस्तकलेसाठीदेखील फारशी वापरली जात नाही. पोती बनवायला, बांधकामाचे पहाड उभे करायला, सामानाची बांधाबांध करायला याचा नेहमी वापर होतो. हाच दोर घेऊन मृणालिनी मुखर्जीनी अत्यंत भव्य आकाराच्या शिल्पाकृती तयार केल्या. त्यांच्या हातात मात्र हा दोर जणू काही पेन्सिलनं काढलेली रेघ बनतो. या दोराचे पीळ, त्यांच्या गाठी मारत, पेड घालत ही मोठाल्या आकाराची शिल्पं उभी राहिली. बडोद्यात सुरुवातीच्या काळात मात्र ‘वो तो क्राफ्ट में कुछ कर रही है’ असं म्हणत कलाक्षेत्राने त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केलं. पण मृणालिनी प्रयोग करत राहिल्या, त्यातून त्यांचा आणि कलेचा परीघ व्यापक करत राहिल्या.

१९७०च्या दशकात त्यांनी नसíगक धाग्यांचा त्यांच्या कामात वापर सुरू केला. तागाचे हे दोर पिळून रंगवून त्यापासून विविध शिल्पाकार तयार करणं हे त्या काळात फारच नावीन्यपूर्ण आणि अनोखं होतं. ही भव्य आकाराची अवकाश भरून टाकणारी शिल्पं बनवायला त्यांना महिनोन्महिने लागायचे. अतिशय परिश्रमपूर्वक, चिकाटीने आणि बारकाईने या धाग्यांच्या गुंतागुंतीच्या रचना त्या हाताने तयार करीत असत. यातून निर्माण होणारे आकृतिबंध हे निसर्गातील आकार, फुले, वनस्पती त्याचप्रमाणे आदिवासी देवदेवता, मुखवटे यांची आठवण करून देतात. एकाच प्रकारात अडकून न पडलेल्या आणि नवीनतेचा शोध घेणाऱ्या मुखर्जी यांची शिल्पे आपल्या ऐंद्रिय जाणिवा जागृत करतात. या स्पर्श-संवेद्य कलाकृती त्यातील वक्ररेषा, आच्छादने, मुडपलेले पदर या आधारे गूढता, वैषयिक भावना यांना हात घालतात. निसर्गातील नवनिर्मितीची प्रक्रिया, त्यातून त्याचं धार्मिक चिन्हं किंवा प्रतिमा यात होणारं रूपांतर, त्यातील सौंदर्य आणि कठोरपणा अशा विविध गोष्टींचा वेध ही कलारूपे घेत राहतात. त्यांच्या कलाव्यवहारातून त्यांनी अर्थातच कला आणि हस्तकला यातल्या सीमारेषाही पुसट बनवल्या. मुखर्जी यांनी आयुष्यभर त्यांच्या कलाव्यवहारातून विविध माध्यमे आणि आकृतिबंध यांचा शोध घेत, प्रयोग करीत, आपली कला अधिकाधिक वृिद्धगत केली. अत्यंत ऊर्जा आणि ताकदीने भरलेली मुखर्जी यांची कलाभाषा ही प्रयोगशील होती. खरंतर त्यांचं माध्यम हीच त्यांची कलाभाषा बनलेली दिसते. १९९० च्या दशकात ब्रिटिश कौन्सिलची शिष्यवृत्ती मिळाल्यावर त्यांनी सिरामिक या माध्यमात काम सुरू केले. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी ब्राँझमध्ये शिल्पं बनवायला सुरुवात केली होती. यात उमलणाऱ्या कळ्या, विविध पुष्प-लतांचे आकार, िलग प्रतिमा, दैवी प्रतिमांचा विकास यासारखे विषय हे नवीन माध्यमे आणि त्यानुरूप तयार होणारे आकृतिबंध यातून निर्माण होतात. त्यांच्या कलाव्यवहाराचे बदलते टप्पे, बदलत जाणारे आकृतिबंध आणि त्यातून उलगडत जाणाऱ्या त्यांच्या कलाकृती यांचं एकत्रितरीत्या दर्शन त्यांच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयामधल्या भव्य प्रदर्शनात होऊन गेले. त्यातून त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. पीटर नॅगी यांनी क्युरेट केलेले ‘रूपांतरण’ (इंग्रजी नाव : ट्रान्सफिगरेशन्स. आकृत्यांतरण) हे मृणालिनी यांच्या आयुष्यभराच्या कलाकृतींचा आढावा घेणारे प्रदर्शन २०१५ साली भरवलं गेलं. खेदाची गोष्ट अशी की प्रदर्शन सुरू होण्याच्या आदल्याच रात्री मृणालिनी मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इतक्या कष्टाने उभ्या केलेल्या या प्रदर्शनाला मिळणारा कलाप्रेमींचा प्रतिसाद कसा आहे ते मात्र त्या पाहू शकल्या नाहीत.

त्यांच्या शिल्पातील संवेदनशीलता आणि त्याचबरोबरीने असणारा जोमदारपणा बघणाऱ्याला भारावून टाकतो. मानव आणि निसर्ग यांच्यातलं नातं आणि तणाव मुखर्जी यांच्या या मूर्त-अमूर्तात घडत जाणाऱ्या कलाकृतीतून आपल्याला दिसत राहतात. निसर्गाचं सौम्य रूप आपल्यासमोर येत नसलं तरी त्याचे सुसंवादी पलू मात्र खिळवून ठेवतात. १९७० अन् ८० च्या दशकातील ‘बसंती’, ‘नागदेवता’, ‘पक्षी’, ‘यक्षी’, ‘आदि पुष्प’ ही भव्य शिल्पं. फिकट तपकिरी, पिवळ्या आणि बदामी रंगांत किंवा लाल, जांभळ्या रंगात रंगवलेल्या तागाच्या दोरांचे पीळ आणि त्यातून आकाराला येणारे हे नसíगक आकार. हे नसíगक आकार कधी कधी मानवी वृत्ती आणि भावना यांचं रूपक बनतात. बरेचदा हे आकार संदिग्धता दर्शवत राहतात. उदाहरणार्थ, ‘बसंती’ या शिल्पात फुलाचे उमलणारे आकार दिसतात, त्यातले आतले पदर दिसतात, अंतर्गत रचना दिसते. पण तीच रचना, त्यातली आच्छादनं िलगप्रतीकेही दाखवतात. आदिम काळातील योनीपूजा, निसर्गातील प्रतीकांच्या संदर्भातून आलेले विधी, त्यात देवदेवता यांच्या प्रतिमा त्या उभ्या करतात. जमिनीतून उगवणारे हे आकार आजूबाजूचं सारं अवकाश व्यापून टाकतात. त्यांच्या इतर कलाकृतींप्रमाणे ‘नॅचरल हिस्टरी सिरीज’ या शिल्पांचं ‘वाचन’ हे नेहमीप्रमाणे वैषयिक आणि शृंगारिक सारतत्त्व असल्याबद्दल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या आईच्या म्हणजे लीला मुखर्जीच्या आजारपणात त्यांचं शरीर अस्थिपंजर बनलं होतं; याच्या आठवणींचा संदर्भ या शिल्पांना होता. लहान आकाराची ही ब्राँझमधील शिल्पं त्यांच्या आजारी, कृश शरीराचे अवयव, त्याला झालेले क्लेश दर्शवीत होती.

शिल्पाकृतीत देवदेवता आणि मिथकं दिसत असली तरी ती मुख्यत निसर्गातील अलौकिक तत्त्वाच्या आकलनातून त्यांच्या कलाकृतींचा अविभाज्य भाग बनली. तीच त्यांच्या शिल्पाकृतींची खरी ताकद. मृणालिनी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, ‘‘माझी पावित्र्याची कल्पना कुठल्याही संस्कृतीपुरती मर्यादित नाहीये. ती एक भावना आहे. ती मंदिर, चर्च, मस्जिद किंवा जंगल कुठेही अनुभवायला येऊ शकते. गर्दी असलेल्या मंदिरात जाण्यापेक्षा मला ऐतिहासिक आणि पुरातत्त्व स्थळी जायला जास्त आवडतं. ते अवकाश, तिथलं वातावरण, त्याची भव्यता यातून आत्मिक शांती मिळते. आणि हे जगात कुठेही घडू शकतं. कलानिर्मितीमागची प्रेरणा आणि चेतना ही मला अगदी संग्रहालयातील वस्तूंपासून माझ्या भवतालापर्यंत अनेक गोष्टींतून मिळत राहते.’’

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com