जुलैच्या सुरुवातीला पाच एकर क्षेत्रात मक्याची पेरणी केली. नंतर महिनाभर प्रतीक्षा करूनही पाऊस काही आला नाही. पुन्हा नव्याने खर्च करून दुबार पेरणी करावी लागली. मात्र परिस्थिती बदलली नाही. आतापर्यंत जी रोपे चार ते पाच फुटापर्यंत वाढायला हवी, ती पाणी नसल्याने एक ते दीड फुटापर्यंतच खुरटली. विहिरीला पाणी नाही. उन्हामुळे रोपे आता सुकण्यास सुरुवात झाली आहे. खरिपाचे काही उत्पन्न येईल याची आशा मावळत आहे. यामुळे मुलाला बांधकामावर रोजंदारीवर पाठवले..

धुळ्याच्या म्हसदी गावातील लोटन बागूल यांची ही प्रतिक्रिया.

नाशिक विभागात अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी कमी-अधिक फरकाने बहुतांश शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. दुबार पेरणी करूनही कित्येकांचे हात पोळले गेले. प्रारंभीचा काळ सोडला तर धुळे, जळगाव व नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. धुळे व जळगाव जिल्ह्यात तलाव व धरणेही भरली नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर पिके कशी जगवावीत, याची चिंता आहे.

जळगावमध्ये खरीप हंगामात ९० टक्क्यांहून अधिक पेरणी झाली. एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले. खान्देशात कापसाचे क्षेत्र मोठे आहे. जळगाव, भुसावळ, यावल, रावेर तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला असून, अमळनेर, बोदवड, मुक्ताईनगर, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा येथे दमदार पावसाअभावी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. पेरण्यांना उशीर झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता असताना आता ती जगतील की नाही, याची भ्रांत आहे.

धुळे जिल्ह्य़ात जूनच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसाच्या भरवशावर अनेक भागात पेरण्या उरकण्यात आल्या. पण नंतर पंधरवडय़ाच्या खंडाने पाऊस झाला. जून आणि जुलै महिन्यात २५ दिवस पाऊस नव्हता. यामुळे एक हजार १३६ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढवले. मूग, उडीद, सोयाबीन, मका व ज्वारी या पिकांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले.

नगर जिल्ह्यातही गंभीर स्थिती आहे. या जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर पेरणी झाली. काही भागात तीन आठवडे तर काही भागात सव्वा महिन्यांपासून पावसाने ओढ दिली. परिणामी, दुबार पेरणी करूनही सोयाबीन तग धरू शकले नाही. अनेकांनी ते मोडून चारा लागवडीकडे मोर्चा वळविला. ऊस लागवडीचे क्षेत्र घटले. मोसंबी, पेरू, डाळिंबासह अन्य फळबागा अडचणीत सापडल्या. नगर जिल्ह्यात खरीप कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड होते. हे वर्ष त्यास अपवाद ठरले.  नाशिक व पुणे जिल्ह्यातील पावसामुळे नगरला पाणी पुरविणारी धरणे भरली. यामुळे मुळा, गोदावरी, कुकडी, प्रवरा कालव्यांतून पाणी सोडण्यात आले. कालव्यांचे पाणी सर्वत्र मिळत नाही. ज्या भागांना ते मिळते, तिथे पाणी पोहोचण्यास महिना लागतो. या पाण्याचा लाभ केवळ एक लाख हेक्टरवरील पिकांना होईल. उर्वरित चार लाख हेक्टरवरील पिकांचे काय, हा प्रश्न आहे.  कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या भागात मराठवाडय़ासारखीच स्थिती आहे. फळबागांसाठी निर्मिलेली शेततळी भरली नाहीत. बागा वाचविण्यासाठी आता टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. सप्टेंबरमध्ये पावसाची साथ न मिळाल्यास पुढील पिकांचे नियोजन कोलमडण्याच्या मार्गावर आहे.

  • धुळे – दुबार पेरणीचे संकट
  • जळगाव – धरणे अजून भरलेली नाहीत
  • नाशिक – पावसाची उघडीप, पण चिंता नाही
  • नगर – फळबागांना टँकरने पाणी