दिल्लीपासून हायवेवरून उत्तर प्रदेशकडे जाणारा रस्ता. आता रुक्ष, वैराण झालेल्या, फारशी वस्ती नसलेल्या प्रदेशात प्रवास करून पोहोचल्यावर वसुधा थोळूर यांचा स्टुडिओ लागतो. शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या आसपासच्या भागांत उभ्या असलेल्या इमारतींच्या कॉम्प्लेक्समधल्या राहत्या घरातला हा स्टुडिओ.  दादरी आणि ग्रॅण्ड ट्रंक रोडही लागूनच. उत्तर प्रदेशमधला कसदार शेतजमीन असलेला तसंच मिथकं आणि ऐतिहासिक घटनांनी भरलेला आणि भारलेला हा प्रदेश. वसुधाच्या स्टुडिओत लावलेले मोठाले कॅनव्हास दिसतात. ‘ओल्ड प्रॅक्टिसेस न्यू लॅण्डस्केप्स’ नावाची ही मालिका आजूबाजूचं बदलतं वास्तव आणि लॅण्डस्केप टिपते. शेतजमिनीवर बांधलेल्या गगनचुंबी इमारती, चकचकीत मॉल्स, छोटी गावं-वस्त्या हटवून त्या जागी ‘नव्या भारताचं’ मांडलेलं हे स्वप्न. इतिहासाच्या, आठवणींच्या पुसट खुणा आणि दुसऱ्या बाजूला कडक बंदोबस्तातल्या टाऊनशिप आणि विद्यापीठं, तटबंदी असलेल्या इमारती, अस्तंगत होत चाललेली झाडंझुडपं. शहरांचं घडणं, जडणं, विस्थापनं, स्थलांतरं, त्यातून तयार होणारे बंदिस्त समुदाय. हे सगळे त्यांच्या अलीकडच्या चित्रभाषेचा भाग बनत गेले. फक्त चित्रभाषेचा नव्हे तर युनिव्हर्सिटीच्या कला अभ्यासाचादेखील भाग बनलंय. या विषयांवरचं संशोधन कला विद्यार्थ्यांच्या जाणिवा आणि कलाभाषा दोन्ही प्रगल्भ करणाऱ्या ठरत आहेत.

त्यांची स्वत:ची कलाभाषाही अशाच प्रक्रियेतून साकारत गेली. मद्रास आणि इंग्लंडमध्ये त्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चोलमंडल आर्टिस्ट व्हिलेज या कलाकारांसाठी खास उभारलेल्या गावात काही काळ काम केलं. वसुधासाठी ‘‘चित्रं काढणं ही प्रक्रिया खूप दीर्घकाळ चालणारी आहे. त्यात अनेक पदर सुटे करून पाहता येतात. चित्र काढणं हे माझ्यासाठी एखादं पुस्तक लिहिण्यासारखं आहे आणि त्यामुळेच भाषा त्यात महत्त्वाची ठरते.’’ लिखाण आणि चित्रकृती या दोन्ही कृती त्यांच्यासाठी एकाच वेळी चालू असतात. त्यातूनच मग लिखाणातला मजकूर बऱ्याच वेळा चित्रात उतरतो. सुरुवातीला बराच प्रवास करत असताना, जगभरातल्या शहरात राहताना सोय म्हणून त्यांनी या कथनांचे लहान लहान तुकडे बनवायला सुरुवात केली. बदलत्या वातावरणात केलेल्या या चित्रकृतींमध्ये त्यांना एक सुसंगती सापडू लागली. त्यातून सुसंबद्ध अशा चित्ररचना तयार होत गेल्या आणि कलाभाषादेखील घडत गेली. त्यांचं अवकाश, मुख्यत: घरातले आतले भाग, खोल्या, वस्तू हे सगळं त्यांच्या चित्रात उतरत गेलं. घराचं घरपण दाखवत त्या अवकाशावर या रेखाटनातून आपला दावा त्या सांगत होत्या. काळ, अवकाश आणि वेग यांचं एक अतूट नातं हेही या चित्रांचा अविभाज्य भाग होता. चित्राची एक चौकट त्यांना पुरेशी वाटत नाही. त्यांचे विचार, इच्छा यांची मांडणी चित्रांच्या मालिकेतून उलगडत जाते. त्याचं एक कथन तयार होतं. त्यांच्या जाणिवांचे पदर, त्यातली गुंतागुंत अगदी जशीच्या तशी पकडताना ही मालिका आकाराला येते.

त्यांच्या आजूबाजूचे काही प्रसंग, गोष्टी त्या आपल्या चित्रातून जिवंत करतात. अतिशय जवळच्या गोष्टी त्यात येतातच, परंतु नवीन कलाभाषेचे, व्यक्तिगत आणि सामूहिक अस्मितांचे, संवादासाठीच्या लोकसंमत भाषेचे अनेक पदर यात सुटे होत जातात. हे करत असताना ते एका व्यापक चित्रविचाराचा भाग बनून राहतात. हे विचार आपल्यापुढं मांडताना यात एक सामाईक गोष्ट दिसते ती म्हणजे चित्रात येणारी त्यांची स्वत:ची प्रतिमा. पण ती केवळ ‘सेल्फ पोर्ट्रेट’ म्हणून येत नाही. त्या जणू काही सूत्रधार असतात. नाटकाचा एखादा तुकडा, त्याची कथा, त्यातली पात्रं यांची ओळख करून देणारी. त्या प्रक्रियेत त्या स्वत:च त्या कथनातलं पात्र बनतात. कधी त्या कथनाशी स्वत:ला जोडून घेत, कधी त्यापासून अलग होत. त्या निरनिराळ्या भूमिका बजावायला लागतात. या सगळ्यात आभासी जग आणि वास्तव यांची सरमिसळ होत जाते.

हे करताना दोन-तीन-चार चित्रांची मालिका तयार होते. त्याला डिप्टिक किंवा ट्रिप्टिक न म्हणता ‘मोंटाज’ हा शब्द त्या वापरतात. दोन किंवा तीन वेगवेगळ्या चौकटींत न पाहता ही चित्रं एकाच चित्राचा भाग म्हणून ते येतं. ‘इमॅक्युलेट कन्झम्पशन ऑर लव्ह इन द टाइम ऑफ अ‍ॅबसेन्स’ किंवा ‘द अ‍ॅनाटॉमी ऑफ सेलिब्रेशन ऑर द पार्टी प्लॉट’मध्ये गुजरातमधले लग्नाचे मांडव, तिथली सजावट यांचं चित्रण त्या करतात. एकीकडे हिंसेचा अनुभव आणि त्याचबरोबरीला हे सोहळे. हे मांडव सजवलेले, रोषणाई केलेले असले तरी नीट पाहिलं तर आतून रिकामे, ओस पडलेले दिसतात. घराजवळचे हे ‘पार्टी प्लॉट’, तिथले आवाज, संगीत, उत्सव, गडबड आणि त्यातला ठोकळेबाजपणा ही अनुभूती वसुधा व्हिडीओत टिपतात. तिथे वाजणारे ढोल, त्यावर उधळले जाणारे पैसे, ढोल वाजवणाऱ्यांच्या तोंडात कोंबलेल्या नोटा सगळं या कॅमेऱ्यात बंद करतात.

गुजरातेतल्या हिंसेच्या अनुभवातूनच ‘सेल्फ पोर्ट्रेट’ ऑफ शहाजहान’ आकाराला आलं. दंगलीत झालेल्या जखमांमुळे जबडय़ाची शस्त्रक्रिया तिला करून घ्यावी लागली. चित्रात मधोमध शहाजहानचं वास्तववादी व्यक्तिचित्र काढलेलं आहे आणि आजूबाजूला जळणारे दस्तावेज दिसतात. या भागातल्या स्त्रियांचं मुख्य काम हे भरतकाम करणं किंवा कापड गिरण्यात काम करणं. याचा संदर्भ घेऊन वसुधा यांनी भोवताली कापडावरच्या नक्षीकामाचे नमुने वापरले. लाल रंगातलं भरतकाम शस्त्रक्रियेच्या टाक्यांप्रमाणे भासतं. शहाजहानसारख्या कुमारवयीन मुलींबरोबर त्यांनी ‘हिम्मत’ ट्रस्टच्या मदतीने काम सुरू केलं. रेफ्युजी कॅम्पमधल्या मुलींबरोबर ‘हिम्मत’तर्फे कार्यशाळा घेतल्या. त्यांना व्यक्त होण्यासाठी एक जागा असावी इतक्या साध्या उद्देशातून या उपक्रमाची सुरुवात झाली. वसुधा यांच्या गडद, काळसर-तपकिरी रंगछटांच्या पाश्र्वभूमीवर या मुलींनी उठावदार रंगात काढलेली चित्रं लक्ष वेधणारी होती. चित्रं, रेखाटनं, छायाचित्रं, व्हिडीओ, भरतकाम, बाटिक यांसारखी निरनिराळी माध्यमं या कार्यशाळांमध्ये मुलींना हाताळायला मिळाली, त्यातून त्यांचा भवताल मांडता आला. एक दशकभर तिथं काम केल्यावर त्याचं मुंबईच्या साक्षी गॅलरीत ‘बियॉण्ड पेन’ हे प्रदर्शन भरविण्यात आलं. गुजरात दंगलीसारखी खोलवर झालेली जखम भरून यायला एका प्रकारे अशा गोष्टींची मदत झाली. हे प्रदर्शन म्हणजे त्यात सहभागी झालेल्यांनी मांडलेली कैफियतच होती. यातल्या सहा मुलींनी व्हिडीओ बनवले, चित्रं काढली, रेखाटनं केली. त्यांची सामाईक वेदना, वैयक्तिक दु:ख, गमावलेली माणसं, विस्थापनाचा अनुभव हे त्यांच्या चित्रातून आपल्यासमोर त्यांनी मांडलं. हे सगळं एका सामूहिक प्रयत्नातून, मैत्रीतून आणि सहभागातून घडलं. पण ही अभिव्यक्ती सहवेदनेपुरती नव्हती. याउलट, या मुलींनी त्यांच्या दैनंदिन जगण्यातल्या गोष्टी यातून पुढे आणल्या. यात शिक्षण, पिण्याचं पाणी, सरकारी मदत किंवा मृत्युपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी अशा गोष्टी या लांब चित्रपट्टय़ांवर साकारल्या. दुसरीकडे, कापड, कागदाचे तुकडे किंवा वर्तमानपत्रातली कात्रणं वापरून कोलाज आणि काही अमूर्त रचनाही या मुलींनी तयार केल्या.

कलाव्यवहार हा जमिनीत मूळ कसा धरू शकतो आणि त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीत रुजून कसा फुलू शकतो याचं हे एक उदाहरण म्हणून पाहता येईल. तो उपरा न ठरता तिथल्या मातीशी मिळताजुळता असावा याचा हा एक प्रयोग होता. अत्यंत दाहक परिस्थितीला तोंड देत असताना किंवा त्यातून बाहेर पडत असतानाची मानसिकता आणि विविध माध्यमांतून व्यक्त होत राहण्याची कमालीची गरज यात जाणवते.

वसुधा म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘कलाकाराने आपल्या भवतालाचं भान ठेवत कलानिर्मिती करणं हे महत्त्वाचं ठरतं. कलेच्या क्षेत्रात फार संदिग्धता जाणवत असली तरी गॅलरी किंवा मोठय़ा शहरात प्रदर्शनाच्या आकांक्षांपेक्षा तुमचं स्थळ-काळाचं भान मोलाचं असतं. त्यातून तुमचं स्वत:चं असं काही तरी घडतं, आकाराला येतं.’’

– नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत.