आभासी दुनियेतील अदृश्य नियंत्रकावर कमालीचा विश्वास टाकून परावलंबित्व पत्करत स्वत:ला त्या नियंत्रकाच्या स्वाधीन केले, तर उत्तरे शोधण्याची आपली कुवतही आपण हरवून बसू, हे ओळखण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण करणे, आभासी विश्वातून केल्या जात असलेल्या मुलांच्या ‘सायकॉलॉजिकल मॅन्युपुलेशन’चा मुकाबला करणे हे आता पालकांच्या पिढीचे आव्हान असेल..

जगभरातील मानवजातीमध्ये फार पूर्वीपासून एक समजूत आहे. ‘हे जग कोण चालवतो? या जगावर नियंत्रण करणारी ती अदृश्य शक्ती कोण आहे? ती कुठे असते? ती खरोखरीच असते, की केवळ आभास असतो?’.. असे अनेक प्रश्न या समजुतीतून कायमच माणसाचा पाठपुरावा करत असतात आणि आपापल्या समजुतीप्रमाणे, कुवतीनुसार माणूस त्याविषयीची आपापली मते तयार करून त्या प्रश्नांचे स्वत:पुरते उत्तर शोधतो. ते स्वत:शी जपतो आणि त्यानुसार वागत जातो. मनोव्यापाराचा हा खेळ नवा नाही. ईश्वर आणि सैतान ही या प्रश्नांचीच माणसाने शोधलेली उत्तरे.. कित्येक वर्षांपासून तो या खेळात रमत आलेला आहे. काळाबरोबर त्या खेळाची साधने बदलत गेली आणि नव्याने जन्माला येऊ  लागलेल्या पिढय़ा नव्या साधनांसोबत रमत गेल्या. आता याच खेळाची थोडीशी भिन्न आवृत्ती त्याच्या हातात सापडली आहे. या खेळात तो जुना प्रश्न नाही; पण त्या खेळात रमलेल्याच्या मनोव्यापारावर वेगवेगळ्या वेळी, काही तरी, त्याच्या स्वत:च्या नियंत्रणापलीकडच्या कुणाचे तरी नियंत्रण असते. त्याच्या प्रभावाखाली त्या आभासी विश्वात तो एवढा गुंतून पडतो, की त्याला वास्तवातील व्यवहारांचे भान राहात नाही आणि वेळीच त्या आभासी दुनियेतून बाहेर पडता आले नाही, तर वास्तवातील दुनियेशी नाते जपण्याचीही त्याची मानसिकता राहात नाही..

मोबाइल आणि इंटरनेट ही त्याच जुन्या खेळाची नवी साधने हाती आल्यापासून अशा समस्या अधिकच उग्र झाल्याचे दिसू लागले आहे. अशा समस्यांमध्ये गुरफटलेल्यांना त्यातून बाहेर कसे काढायचे ही वास्तव जगातील भानावरच्या लोकांची एक नवी समस्या होऊन राहिली आहे. म्हणूनच, त्याच आभासी दुनियेचा आधार घेऊन त्या दुनियेत गुरफटलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होऊ  लागतात. कधी तरी त्यांना यश येते.

गेल्या काही दिवसांपासून मराठी समाजमाध्यमांवर एक कविता सातत्याने पसरविली जात आहे. ‘कोण?’ हे तिचे शीर्षक. समाजमाध्यमांवरील आभासी दुनियेत गुरफटलेल्यांचे नियंत्रण कोण करतो, हा अलीकडचा नवा प्रश्न त्या कवीला भेडसावणाऱ्या जुन्या प्रश्नांइतकाच गहन होऊ  पाहात आहे. ‘कोण फिरवितो कालचक्र हे, दिवसामागून रात्र निरंतर, कोण मोजतो खेळ संपता, आयुष्याचे अचूक अंतर..’ हे त्या कवितेच्या पहिल्या कडव्याचे शब्द!.. अगदी असाच प्रश्न पडावा, त्यामुळे वास्तव जगातील अनेकांच्या मनाचा प्रचंड गोंधळ उडावा, असा धुमाकूळ इंटरनेट आणि मोबाइलच्या आभासी जगात गुरफटलेल्यांबाबत सध्या वास्तव जगातील भानावर असलेल्या समाजाला पडला आहे. आजवर फेसबुक, व्हॉटसअप आणि आभासी खेळांच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांनी असंख्य माणसे वास्तवापासून दुरावत चालल्याची भीती व्यक्त होत होती, अशा खेळांच्या व्यसनाचा विळखा पडला, तर त्यातून त्या व्यक्तीला सोडविण्यासाठी मानसोपचारावर नवनवी संशोधनेही सुरू झाली होती. म्हणजेच, इंटरनेट आणि मोबाइल गेमच्या विळख्याचे व्यसन हा एक मनोविकार होऊ  पाहात असल्याचे स्पष्ट होऊ  लागले होते. या विळख्याची चिंता व्यापक होत असतानाच, आता एका नव्या आणि भयानक चिंतेची त्यात भर पडली आहे. ती चिंता आहे, मोबाइलच्या माध्यमातून माणसाच्या मनाचा ताबा घेणाऱ्या आणि त्याला वास्तवाच्या जगातून दूर ढकलणाऱ्या, प्रसंगी त्याचा जीव घेणाऱ्या ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ नावाच्या खेळाची!..

बालपण संपवून तरुणाईच्या उंबरठय़ावर पाऊल टाकणाऱ्या पिढीच्या मनोव्यापाराचा ताबा घेण्याची जबरदस्त ताकद असलेल्या या खेळाच्या विळख्यात मुलांनी सापडू नये, यासाठी जग जंगजंग पछाडते आहे. जवळपास सव्वाशे मुलांनी या खेळाच्या नादापायी, कुणी आभासी नियंत्याच्या मर्जीनुसार आत्महत्येचा टोकाचा मार्ग पत्करल्याचे स्पष्ट झाले. आपल्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेवणारी ही शक्ती कोण, ती कुठे आहे, वास्तवात ती खरोखरीच आहे किंवा नाही, अशा प्रश्नांच्या भानगडीतदेखील न पडता, आपल्या मानसिक व्यवहारांचा ताबा त्या अज्ञात नियंत्रकाकडे सोपविण्याच्या या मानसिकतेतून त्या पिढीला बाहेर काढण्याची गरज आता तीव्र झाली आहे. मानसोपचारात ‘सायकॉलॉजिकल मॅन्युपुलेशन’ नावाची एक संज्ञा वापरली जाते. एखाद्या व्यक्तीच्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेवण्याचाच हा प्रकार असतो. अशा अज्ञात नियंत्रकाच्या हाती स्वत:ला सोपविलेल्या व्यक्ती स्वत:च्या मनोव्यापाराविषयीदेखील अनभिज्ञ असतात, किंबहुना आपले स्वत:वर नियंत्रण राहिलेले नाही हे मान्य करण्याचीदेखील त्यांची तयारी नसते, कारण तसा विचार करण्यावरही त्याचे नियंत्रण राहिलेले नसते. त्या व्यक्तीच्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्याला जसे पाहिजे तसेच ती व्यक्ती वागत असते. अशा व्यक्तीच्या मनाचा ताबा मिळविणारा नियंत्रक त्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याचा वापर करून घेतो. अशा नियंत्रकाकडे प्रचंड आक्रमकता असते. ज्या व्यक्तीवर तो ताबा मिळवितो, त्या व्यक्तीच्या मानसिकतेतील कमकुवतपणाची त्याला पुरेपूर कल्पना असल्याने, कोणत्या टप्प्यावर या सावजाकडून कोणते काम करून घ्यायचे, हे तो नियंत्रक नेमकेपणाने जाणून असतो आणि आपल्या हेतूसाठी त्या सावजाचा वापर पूर्ण झाला, की त्याची विल्हेवाट लावण्यासही हा नियंत्रक मागेपुढे पाहात नाही, कारण नियंत्रकाच्या आहारी गेलेली व्यक्ती स्वत्वाची भावना हरवूनच बसलेली असते. नियंत्रकाच्या आहारी जाण्याचा हा टप्पा एवढा टोकाचा असतो, की नियंत्रकाच्या फायद्यासाठी काहीही करण्याची शिकार ठरलेल्याची तयारी असते. अशा प्रकारे या नियंत्रकाची शिकार ठरलेली व्यक्ती जेवढी नियंत्रकाविषयी भावनाविवश होते, तेवढी त्याची अधिकाधिक मानसिक पिळवणूक करणे नियंत्रकाला सोपे जाते. ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा अशा ‘सायकॉलॉजिकल मॅन्युप्युलेशन’चाच प्रकार आहे.

अशा अज्ञात आणि आभासी नियंत्रकाच्या आहारी गेलेल्या आणि मानसिक विकाराच्या विळख्यात सापडलेल्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काही मार्गही मानसोपचाराने दाखविलेले असतात.एकटेपणा, संवादाचा अभाव, स्वकर्तृत्वाविषयीचा हरवलेला आत्मविश्वास व त्यामुळे येणारे परावलंबित्व, वयोमानानुसार होणाऱ्या मानसिक विकासाचा अभाव, अतिरेकी संवेदनशीलता, अतिरेकी प्रामाणिकपणा, लोभीपणा, स्वाभिमानशून्यता किंवा आपल्यासारखेच सारे जग सुंदर आहे अशा समजुतीत वावरण्याची मानसिकता असलेल्या व्यक्ती मानसिक परिचालकाच्या आहारी जातात, असे निष्पन्न झालेले असल्याने, व्यक्तिमत्त्व विकास हाच या विकारावरील सर्वोत्तम उपाय असला पाहिजे. आपल्या मनावर आपलेच नियंत्रण असले पाहिजे, या जगाचा नियंता कोण, सृष्टीचे चक्र फिरविणारा, दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस आणणारा तो कोण असतो, असे प्रश्न पडले, तरी त्याची स्वत:च्या हिमतीवर उत्तरे शोधण्याकरिता बळकट, खंबीर मन आणि प्रचंड आत्मविश्वास यांचीच गरज असते. आभासी दुनियेतील अदृश्य नियंत्रकावर कमालीचा विश्वास टाकून परावलंबित्व पत्करत स्वत:ला त्या नियंत्रकाच्या स्वाधीन केले, तर उत्तरे शोधण्याची आपली कुवतही आपण हरवून बसू, हे ओळखण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण करणे हे आता पालकांच्या पिढीचे आव्हान असेल. ब्लू व्हेलसारखे हल्ले परतवायचे असतील, तर त्यासाठी पालकांनाही कंबर कसावी लागेल, हाच याचा अर्थ!

आपल्या सामान्य व्यवहारातही आपण लहान, फारसा अनुभव नसलेल्या मुलांना नेहमी एक शिकवण देत असतो. ‘नवख्या, अनोळखी माणसाने काही खाऊ  दिला, तर तो खाऊ  नका, त्याच्याशी जास्त बोलू नका, नाव-गाव, पत्ता त्याला सांगू नका.’ मोबाइलवरील खेळांच्या बाबतीतही हाच सल्ला पालकांनी मुलांना दिला पाहिजे. वास्तव जगात ज्याचे धोके मुलांनाही लगेच उमगत असतात, तेच धोके आभासी जगातही असतात, हे मुलांना समजले पाहिजे. आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या, चिंता, आपल्या जवळच्या माणसाशी बोलाव्यात असे मुलांना वाटेल अशी जवळीक मोठय़ांनी मुलांशी साधली पाहिजे. असे झाले, तर आभासी दुनियेहून वास्तव दुनिया बहारदार आहे याची मुलांना खात्री होईल. हे घडविणे आत्ताच्या टप्प्याला सोपे नाही, पण अवघड असले तरी त्याला पर्यायही नाही!.

दिनेश गुणे

dinesh.gune@expressindia.com