फलटण येथे औषधांचे दुकान असलेल्या अमोल देशमुख या तरुणाने  बनवलेल्या ‘औषध’ या लघुपटास  यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा लघुपट औषधविषयक चुकांविषयी असला तरी मुख्यत: मानवी मनाची अपराधाबाबतची संवेदनशीलता दाखवणे हाच या लघुपटाचा केंद्रबिंदू आहे.  ‘औषधीय चुका’ या मानवी चुका असल्या तरी त्या घडतात मुख्यत: कामाच्या सदोष पद्धतीमुळे. या  लघुपटाच्या निमित्ताने ‘औषधीय चुका’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची चिकित्सा..

फलटणच्या गजबजलेल्या भागातील एक केमिस्टचे दुकान. गिऱ्हाइकांची दुकानात बऱ्यापैकी गर्दी. त्यात एक म्हातारी, खेडुत आजीही उभी. तिने प्रिस्क्रिप्शन दिल्यावर काऊंटरवरील नोकर तत्परतेने तिच्या सर्व औषध-गोळ्या आणून देतो. औषधांची एकूण किंमत ऐकून आजी गडबडते, ‘सर्व औषधे नाही नेत, पुरेसे पैसे नाहीत’ असे म्हणू लागते. दुकानात आतमध्ये दुसऱ्या रुग्णाच्या कामात बिझी असलेला फार्मासिस्ट हे ऐकून ‘आजी, नंतर दे पैसे, घेऊन जा सर्व औषधे’ असे उदारपणे सांगतो. या चांगुलपणाने आजीला बरे वाटते, धन्यवाद देऊन ती सर्व औषधे घेऊन निघून जाते. त्या वेळी दुकानात वीज नसते. यथावकाश वीज आल्यावर फार्मासिस्ट विक्री केलेल्या सर्व औषधांच्या नोंदी संगणकावर करू लागतो. अचानक त्याच्या काही तरी लक्षात येते. ते नोकरास बोलावून आजीला कोणती औषधे दिली अशी विचारणा करतो आणि सारा घोटाळा त्याच्या ध्यानात येतो. वेदनाशामक गोळ्यांच्या ऐवजी नोकराने चुकून आजीस रक्तदाब कमी करणाऱ्या गोळ्या दिलेल्या असतात. फार्मासिस्ट अक्षरश: हादरतो. त्या गोळ्या घेतल्या व रक्तदाब कमी होऊन म्हातारी दगावली वगैरे तर? त्याच्या पायाखालची जमीनच सरकते.. धावत तो आजी ज्या हॉस्पिटलमधून आली होती तेथे जातो. बराच वेळ घालवून तिचा पत्ता शोधतो. पत्ता म्हणजे काय ते केवळ तिच्या गावाचे नाव कळते. ते असते तब्बल ३५ कि.मी.वर. जराही वेळ न दवडता तो व नोकर बाइक घेऊन अनेक अडचणींना तोंड देत त्या दुर्गम खेडय़ापर्यंत पोहोचतात. तिथे समोरच एक मयत झालेले दिसते. ‘म्हणजे आपली शंका खरी ठरली तर..’ फार्मासिस्ट मनातल्या मनात पार खचतोच, हवालदिल होतो. पण मयत स्त्री ती आजी नसते. मग आजीचा शोध ते जारी ठेवतात व अखेरीस आजीच्या घरापर्यंत पोहोचतात आणि चूक लक्षात आल्यापासूनच्या जीवघेण्या अपराधी अस्वस्थतेला विराम मिळतो. अर्थात हा विराम आनंदी की शोकांत हे स्वत: पडद्यावरच पाहावयास हवे..

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

ही कथा आहे ‘औषध’ या १६ मिनिटांच्या लघुपटाची. या लघुपटास नुकतेच ६३व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने गौरवले गेले. एका मराठी चित्रनिर्मितीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच, पण विशेष कौतुकास्पद बाब अशी की, ही निर्मिती करणारे अमोल देशमुख हे स्वत: फार्मासिस्ट असून, गेले अनेक वर्षे फलटणला औषध दुकान चालवत आहेत. आपल्याच दुकानात काही वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारित त्यांनी हा लघुपट बनवला आहे. आपल्या चुकीने हादरलेल्या, मानवी जीवनाचे मूल्य जाणणाऱ्या, अपराधी, संवेदनशील मनाची उलघाल व पुढील अरिष्ट (आधीच ते घडलेले नसल्यास) टाळण्यासाठीची धडपड त्यांनी या लघुपटात अत्यंत परिणामकारकतेने दाखवली आहे. वेगळ्याच क्षेत्रात उमेदवारीच्या काळातच इतके नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल फार्मासिस्ट अमोलचे अभिनंदन!

चुका होणं हा मानवी स्वभावाचा भाग आहे. कोणत्याही व्यवसायात चूक झाल्यास कधी ना कधी नुकसान तर होत असतेच. पण आरोग्य क्षेत्रात चुका झाल्यास तो रुग्णाच्या जीवन-मृत्यूचा खेळही ठरू शकतो व रुग्णास इजा होता कामा नये या वैद्यकशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला छेद जातो. औषध लघुपट औषधविषयक चुकांभोवती फिरत असला, तरी या चुका टाळाव्या, कशा टाळाव्या वगैरे कोणताही उपदेशपर संदेश तो देत नाही. मुख्यत: मानवी मनाची अपराधाबाबतची संवेदनशीलता दाखवणे हाच या लघुपटाचा मुख्य उद्देश आहे. पण असे असले तरी रुग्ण सुरक्षेसंबंधात अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे तो लक्ष वेधतो.

एकंदर आरोग्य क्षेत्रात होणाऱ्या वैद्यकीय चुका/ अपघात म्हणजे ‘मेडिकल एर्स’ यांचाच एक भाग म्हणजे ‘औषधीय चुका’ (मेडिकेशन एर्स)  यांचा अर्थ म्हणजे औषधाशी संबंधित होणाऱ्या कोणत्याही टाळता येण्याजोग्या चुका ज्यामुळे रुग्णास काही त्रास झाला, औषधाचे दुष्परिणाम भोगावे लागले तरी अशा चुका संबंधित कोणत्याही घटकाकडून होऊ शकतात. म्हणजे त्यात आरोग्यसाखळीतील सर्वच घटक आले. प्रिस्क्रिप्शनमुळे होणाऱ्या चुका, प्रिस्क्रिप्शननुसार औषधे काढून देताना झालेल्या चुका, रुग्णास औषध देताना झालेल्या चुका अशा औषध वापर प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर काही चुकीचे घडू शकते. या चुका ‘एर्स ऑफ ओमिशन’ म्हणजे एखाद्या न केलेल्या बाबींमुळे असू शकतात. उदा. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास वेळापत्रकानुसार गोळ्या देण्यास नर्स विसरली तर ती झाली ओमिशन एरर. किंवा एर्स ऑफ कमिशन म्हणजे अचूकतेने न केलेली बाब. उदा.- अमुकच्या ऐवजी तमुक औषध दिले गेले, औषध योग्य पण डोस कमी/जास्त दिला गेला वगैरे. प्रगत देशांमध्ये वैद्यकीय व औषधीय चुका/ अपघातांविषयी भरपूर जागरूकता आहे, असे चुकीचे काही तरी घडू शकते याची जाण आहे व ते घडू नये, घडल्यास दुष्परिणाम थोपवता यावे यासाठी आरोग्य यंत्रणा जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करते. अन्न व औषध प्रशासन व इतरही अनेक संस्था यासाठी कार्यरत असतात. अमेरिकेत यासाठी एक राष्ट्रीय समन्वयक केंद्रच आहे. चुकांचे रिपोर्टिग करण्यासाठीही संबंधितांना प्रोत्साहित केले जाते व या रिपोर्ट्सची कारणमीमांसा करून भविष्यात तशा चुका होऊ नयेत यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातात.

काही वर्षांपूर्वी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये फार्मसीमधून हायटॉक्झिझीन या अ‍ॅलर्जीवरील औषधाऐवजी रुग्णास चुकून हायड्रालाझीन हे बीपी कमी करणारे औषध दिले गेले व रुग्णास इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली. या घटनांपासून बोध घेऊन अनेक सूचना, संदेश रुग्णालये, औषध दुकाने यांना देण्यात आले. अशी सारखी नावे असलेल्या औषधांबाबत विशेष काळजी घ्या, अशी औषधे शेल्फवर ठेवताना अगदी बाजूबाजूला ठेवू नका. अशा सूचनांचा संबंधितांवर भडिमार झाला. प्रगत देशांमध्ये एकंदरच कायद्याची कडक अंमलबजावणी, नियमांचे पालन यामुळे कामाची शिस्त असते. ‘प्रत्येकाच्या कार्यकक्षा, भूमिका सुनिश्चित केलेल्या असतात. सर्व कामे ठरावीक आकृतिबंधात करावे लागते. उदा.- प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी डॉक्टरांना ठरावीक नमुन्याचे बंधन असते, पुन्हा हस्तलिखित प्रिस्क्रिप्शन असेल तर हस्ताक्षर सुवाच्य असावे, औषधाविषयी माहिती परिपूर्ण असावी असाही दंडक असतो.’

औषधे देण्यापूर्वी फार्मासिस्टकडून प्रिस्क्रिप्शनचे ऑडिट होते. म्हणजे प्रिस्क्रिप्शनमध्ये काही त्रुटी असतील किंवा चुकीचा डोस, एकमेकांत आंतरक्रिया करणारी औषधे असे काही असेल तर डॉक्टरांशी संवाद साधून दुरुस्ती करण्यात येते. प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधे काढण्याचे काम समजा फार्मसीतील मदतनिसाने केले तरी ती अचूक आहेत की नाही हे फार्मासिस्टच तपासतो. अशा प्रकारच्या नियमनामुळे चुका वेळीच समजून येतात. रुग्णांमध्येही औषधांविषयी सजगता असते. अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी ग्राहकांना मार्गदर्शन – काय करावे, काय करू नये अशा सूचना देत असते. हे सर्व वाचून साहजिकच अमेरिकेत किंवा इतर प्रगत देशांमध्ये आरोग्यसेवा एकदम योग्य आहे, ‘रुग्ण सुरक्षे’बद्दल काही शंका नाही असे वाटेल पण तसे चित्र नाही. सर्वतोपरी काळजी घेऊनही त्रुटी उरतातच, चुका/अपघात होतातच.

अमेरिकेत साधारण १ लाख लोकांना दर वर्षी औषधीय चुकांचे जीवघेणे दुष्परिणाम भोगावे लागतात. तेथे साधारण १२०० रुग्णालयांचे सर्वेक्षण केल्यावर एकंदर अशा ‘औषधीय चुकांचे’ प्रमाण हे ६ टक्के असल्याचे आढळले.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ‘वैद्यकीय चुकांचे’ हे अमेरिकेतील मृत्यूचे तीन नंबरचे कारण (हृदयविकार व कॅन्सर पहिली दोन कारणे) असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे निश्चित धक्कादायकच आहे. या अहवालाविषयी उलटसुलट चर्चाही चालू आहेत. वादही आहेत.

ही यादी अर्थात अजूनही मोठी होईल. अशा सर्व परिस्थितीत काही चुका होत असतात, काही किरकोळच तर काही जीव घेणाऱ्याही. त्या नेमक्या किती होतात, कशा, कुठे होतात याची मोजदाद व सविस्तर माहिती तशी फारशी उपलब्ध नाही. काही चुका लक्षात येतात, काही लक्षात येत नाहीत, काही दबून जातात, तर काही प्रसिद्धिमाध्यमांमध्ये मुख्य मथळे बनतात.

एक लक्षात घेतले पाहिजे की ‘औषधीय चुका’ या मानवी चुका असल्या तरी त्या घडतात मुख्यत: कामाच्या सदोष पद्धतीमुळे. जर कार्यपद्धती सुनिश्चित असेल व ती ठरवताना अनेकविध शक्यतांचा विचार करून तयार केली असेल तर बऱ्याच चुका टळतील, झाल्या तरी लक्षात येतील व रुग्णांपर्यंत पोचणार नाहीत. या पाश्र्वभूमीवर परत ‘औषध’कडे वळू या. त्यात औषधांच्या बाबतीत घोटाळा का झाला? चिठ्ठीनुसार शेल्फमधून आजीच्या सर्व गोळ्या नोकराने काढल्या. पण स्वत: त्या एकदा चेक करून नंतर फार्मासिस्टकडून सर्व बरोबर असल्याची खात्री करून द्यायला हवी होती. घाईत असल्याने फार्मासिस्टचेही दुर्लक्ष झाले व गडबड झाली. मुळात जर दुहेरी निरीक्षणाची पद्धती, शिस्त दुकानात असती तर ही चूक वेळीच सावरता आली असती. दुकानात गर्दी असली की काम झटपट निपटण्याकडेही कल असतो. कारण दुकानात थोडेही थांबण्याचा धीर बहुतेक गिऱ्हाइकांकडे नसतो व त्यामुळे कामाच्या ताणामुळे चुका होत असतात, पण त्या घटनेपासून बोध घेऊन आता दोनदा खात्री करून घेतल्याशिवाय एकही औषध ग्राहकास देत नाही, असे फार्मसिस्ट अमोलने आवर्जून नमूद केले. औषधे घेणारा रुग्ण सुशिक्षित व सजग असता, तर त्याने कदाचित प्रिस्क्रिप्शननुसार औषधे आहेत की नाहीत ते वाचले असते किंवा निदान नोकर वा फार्मसिस्टशी बोलून शहानिशा केली असती. पण ‘औषध’मधील रुग्ण होती अशिक्षित. त्यामुळे तेथे या औषध साक्षरतेचीही शक्यता नव्हती.

एकंदर औषध लिहिणाऱ्याने (डॉक्टर्स), देणाऱ्याने (फार्मासिस्ट, नर्स) व सहकर्मचारी आणि घेणाऱ्याने (रुग्ण) यांनी सतर्क राहाणे आवश्यकच. हवाई वाहतूक क्षेत्र हे मोठे जोखमीचे क्षेत्र मानले जाते व सुरक्षा हा केंद्रबिंदू ठेवून कार्यपद्धती विकसित केली जाते. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रासाठी रुग्ण व रुग्णसुरक्षेला केंद्रबिंदू मानले गेले पाहिजे. याचा अर्थ सध्या आपण पूर्ण असुरक्षित आहोत आणि जे काही घडते ते चुकीचेच असते व सर्व आरोग्य व्यावसायिकांनी एकमेकांकडे व ग्राहकांनी आरोग्यसेवेकडे संशयाने, अविश्वासाने पाहावे, असे निश्चित नाही. पण जेथे सर्व कामात, धोरणात सुस्पष्टता, सुसूत्रता, पारदर्शकता व शिस्त आहे, तेथेही  ‘वैद्यकीय चुका’ मोठय़ा प्रमाणात होतात व विकसनशील देशात त्याचे प्रमाण काही पटींनी जास्त आहे, असे मानले जाते. हे लक्षात घेऊन आपल्या आरोग्यसेवेमध्ये काही धोरणात्मक बदल व सुरक्षा भान, सुरक्षा संस्कृती रुजणे महत्त्वाचे आहे. यात रुग्णांचीही जबाबदारी मोठी आहे.

आरोग्य व्यवस्थेविषयी विश्वास, आदर पण सतर्क दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. ‘फार्माकोव्हिजिलन्स’ (औषध दुष्परिणामांचा अभ्यास करणारी यंत्रणा) केंद्रे, क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, आरोग्य सेवांचे मानांकन अशा काही सकारात्मक घडामोडी गेल्या काही वर्षांत झाल्या आहेत व रुग्ण सुरक्षेच्या दृष्टीने त्या अत्यंत स्वागतार्ह आहेत. पण अजून आपल्याला या क्षेत्रात खूप काही करणे बाकी आहे व दिवसागणिक हे क्षेत्र अधिक गुंतागुंतीचे, आव्हानात्मक होत आहे. ‘वैद्यकीय चुका’ हा फार मोठा विस्तृत विषय आहे. यात सदोष शस्त्रक्रिया, आयसीयू विभागातील चुका, सदोष वैद्यकीय उपकरणे, भेसळयुक्त औषधे, चुकीचे रोगनिदान वा उपचार, औषधीय चुका असे अनेक भाग आहेत. अनेक अनुभवी डॉक्टर्स, फार्मासिस्टशी चर्चा केल्यावर चुका/अपघात कसे होतात वा कशा टाळता येतात याची अनेक उदाहरणे समोर आली. अर्थात, त्याविषयी परत कधी तरी. तूर्तास ही चर्चा होती ‘औषधीय चुकां’विषयी, ‘औषध’च्या निमित्ताने.

 

याबाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याचे उत्तर देणे अवघडच. या विषयांवर निरीक्षणे, संशोधन, चर्चा तशी फारच कमी. पण अशा चुकांना वाव देणारी परिस्थिती मात्र सार्वजनिक व खासगी दोन्ही आरोग्यसेवांमध्ये दिसते. काही रुग्णालये, काही फार्मसीची दुकाने याला निश्चित अपवाद असतील. पण रुग्ण सुरक्षेबाबत व आरोग्यसेवेतील पावलोपावली असलेल्या धोक्यांबद्दल जागरूकता व त्याचा व्यापक विचार हा शासन, प्रशासनापासून ते ग्राहकांपर्यंत फारसा रुजलेला दिसत नाही. आरोग्य क्षेत्रातील अनेक कच्चे दुवे सहजपणे आढळतात. त्यातील काही असे –

* अनेक ठिकाणी (मग ती औषध दुकाने असतील किंवा अगदी शासकीय रुग्णालयेही) फार्मसिस्टच्या उपस्थितीत व सक्रिय देखरेखीशिवाय औषधांची हाताळणी व इतर कर्मचाऱ्यांनी औषधे हाताळणे

* प्रशिक्षित नर्सेसचा अभाव, तर कुठे पुरेसे डॉक्टर्स नसणे. कायदे वा नियमांच्या कडक अंमलबजावणीचा अभाव

* सुनिश्चित कार्यपद्धती व स्टॅण्डर्ड प्रोटोकॉल्सचा अभाव किंवा त्याचे काटेकोर न केलेले पालन, पारदर्शकतेचा अभाव

* एक लाखांवर औषधे, त्यात अनेक नावांत प्रचंड साधम्र्य असलेल्या पण गुणधर्म पूर्ण वेगळे असणाऱ्या औषधांचाही भरणा

* अनेक प्रिस्क्रिप्शन्स अपूर्ण व वाचता न येण्याजोगी. एकंदर आरोग्यसेवेवर कामाचा प्रचंड ताण

* मोबाइल फोन्स, वाहतूक, रुग्णांची गर्दी अशा अनेक कारणांनी कामात येणारा व्यत्यय व विचलित होणारे लक्ष

 

– प्रा. मंजिरी घरत
लेखिका औषधनिर्माण शास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
  symghar@yahoo.com