स्वाधीन भारतीय विधिक सत्याग्रही या संघटनेने मथुरेच्या जवाहर बागेत उभारलेल्या अनधिकृत संस्थानाचा बीमोड करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संघटनेच्या कथित ‘सत्याग्रहीं’नी बॉम्ब, रायफली, गावठी कट्टे, पेट्रोल बॉम्बने हल्ला चढवला. या वेळी उडालेल्या चकमकीत दोन पोलीस अधिकारी मृत्युमुखी पडले तर रामवृक्षसह त्याचे २७ अुनयायी ठार झाले. मथुरेतील ही घटना दोन वर्षांपूर्वीच्या हिस्सारमधील घटनेसारखीच. चिंता वाटावी अशी. कडव्या अतिरेकी विचारांना समाजातूनही मिळत असलेले बळ आणि त्या जोरावर फोफावत असलेल्या संघटना हे वास्तव आयसिस वा तालिबानसारख्या संघटनांतून जगासमोर आले. पण अशा संघटना ही काही कोणत्याही धर्माची वा देशाची ‘मक्तेदारी’ नाही. सगळीकडेच त्या दिसतात. नेताजी सुभाषचंद्र यांचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्या रामवृक्षसारख्या अतिरेक्याने केलेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने काही धार्मिक कट्टरतावादी संघटना आणि पंथांवर दृष्टिक्षेप..

जवाहर बाग. २६० एकर जमिनीचा तुकडा.
तो आहे मथुरेमध्ये. म्हणजे भारतातच. पण तेथे राज्य भारत सरकारचे नव्हते. तेथे वेगळेच सरकार होते. त्या सरकारचे सैन्य होते, पोलीस दल होते, न्यायालय होते, शाळा होत्या. ते सरकार होते स्वाधीन भारताचे. चालवत होते स्वाधीन भारतीय विधिक सत्याग्रही. त्यांचा प्रमुख होता रामवृक्ष यादव ऊर्फ नेताजी ऊर्फ बडे पिताजी.
साध्या जाट शेतकऱ्यासारखा दिसणारा. अंगात बंडी, धोतर, डोक्यावर मुंडासे. उंचापुरा. सडसडीत अंगकाठीचा. पांढरी दाढी. स्वभावाने रागीट. पण पट्टीचा वक्ता. हा बाबा जय गुरुदेव यांचा शिष्योत्तम.
काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्याने जाताना, बाजूच्या दगडांवर, खडकांवर ‘जय गुरुदेव’ असे चुन्याने खरडलेले दिसायचे. ते जय गुरुदेव म्हणजे हा मथुरेतला बाबा. तो मूळचा उत्तर प्रदेशातल्या इटव्याचा. लहानपणीच पोरका झाला. कोणा बाबाच्या आश्रयाला गेला. पुढे स्वत:च बाबा बनला. साधासुधा नव्हे. संस्थानी बाबा. मथुरेत त्याचा महालासारखा आश्रम आहे. तसे त्यांचे अनेक आश्रम आहेत. स्पा, जलतरण तलाव अशा सोयी असलेले. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे किमान चार हजार कोटींची जायदाद होती. २५० आलिशान गाडय़ा होत्या. त्यांचीच किंमत होती १५० कोटी.
त्यांचे अनुयायीही संख्येने हजारो. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी राजकारणीही रीघ लावत. सत्तरच्या दशकात त्यांच्या दारी येणाऱ्यांत इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी अशा थोरामोठय़ांचा समावेश होता. पण याच इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात या बाबाला तुरुंगात डांबले होते. ७७मध्ये सुटल्यानंतर त्यांनी थेट राजकारणातच प्रवेश केला. दूरदर्शी पार्टी नावाचा पक्ष काढला.
आपण नेताजी सुभाषचंद्र बोस आहोत असे हा बाबा सांगायचा. नेताजींच्या मृत्यूचे गूढ राजकारण्यांच्या सोयीचे होते, तसेच तोतयांच्याही. त्यांच्या नावावर राजकीय कमाई करणे सोपे. या बाबानेही त्याचा फायदा घेतला.
२३ जानेवारी १९७५ रोजी कानपूरच्या फुलबाग परिसरात त्यांचा सत्संग होता. सुमारे २० हजार लोक जमले होते. गुरुदेवांची गुरुवाणी ऐकण्यासाठी ते आतुर होते. हे बाबा व्यासपीठावर आले आणि सांगू लागले, मीच नेताजी. तुमच्या डोळ्यांदेखत असा लपून बसलो होतो. ते ऐकले आणि समोरची गर्दी भडकली. बाबावर दगड फेकू लागली. सत्संग उधळला. पण बाबाने मरेपर्यंत आपला दावा काही मागे घेतला नाही. धर्म आणि असे राजकारण ही युती फारच फायदेशीर आहे हे त्याच्या लक्षात आले होते.
रामवृक्ष यादव हा त्याचा शिष्य. गुरुदेवांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे वारसदार ठरू असे त्याला वाटत होते. पण झाले भलतेच. पंकज यादव म्हणून दुसरा शिष्य होता. त्याने बाबाच्या संपत्तीवर कब्जा केला. रामवृक्ष संतापून बाहेर पडला. त्याने आपला स्वत:चा गट स्थापन केला. स्वाधीन भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रही. त्याची नोंद राजकीय पक्ष म्हणून करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडी २०१३ मधल्या.
आता जय गुरुदेव यांचा खरा वारसदार बनणे हे त्याच्यापुढचे लक्ष्य होते. तेव्हा त्यानेही नेताजींच्या नावाचा वापर सुरू केला. २०१४ मध्ये त्याने मध्य प्रदेशातले सागर ते नवी दिल्ली असा लाँग मार्च काढला. मागणी होती – नेताजींच्या गोपनीय फायली खुल्या करण्याची. एप्रिल २०१४ मध्ये त्यांचा मोर्चा मथुरेत अडवण्यात आला. तेव्हा त्यांनी जवाहर बागेत दोन दिवस निदर्शने करण्याची परवानगी मागितली. प्रशासनाने ती दिली. पण नंतर त्यांनी बागेतच बस्तान ठोकले. ते गेल्या २ जूनपर्यंत.
********
२ जून.
जवाहर बागेवर कब्जा करून बसलेल्या या घुसखोरांना हटविण्याची कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक आले होते. ही कारवाई होणार याची माहिती रामवृक्षला आधीच लागली होती. राजकारणात, पोलिसांत त्याचेही खबरे होते. त्यामुळे तो सावध होता.
जवाहर बागेतल्या त्याच्या या ‘राज्या’त सुमारे तीन हजार लोक राहात होते. सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होई. मुले पीटीसाठी जमत. मोठी माणसे व्यायाम करीत. लाठय़ाकाठय़ा चालवण्याचे प्रशिक्षण घेत. तोवर एक गट न्याहरीच्या तयारीला लागे. ८.३० ते १२ न्याहरी चाले. रात्रभोजन होई सायं. ४ ते ८ दरम्यान. सकाळी ८ वाजता प्रात:प्रार्थना होई. सगळे रांगेत जमत आणि राष्ट्रगीत म्हणत :
‘संकल्प है शहिदों का, देशभक्तों की मंझिल लक्ष्य
स्वाधीन भारत का झंडा लहराने लगा.. जय हिंद, जय सुभाष..’
यानंतर न्याहरी. मग माणसे नेमून दिलेल्या कामाला लागत. मुलांची शाळा सुरू होई.
त्या दिवशी मात्र जवाहर बागेत वेगळेच वातावरण होते. शाळेला सुटी दिली होती. मुले वगळून बाकीच्यांची सभा बोलावण्यात आली होती. त्यात रामवृक्षने युद्धाची ललकारी दिली. पोलिसांनी हल्ला केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असे तो म्हणाला. त्याची स्वाधीन भारत सुभाष सेना बंदुका, हातगोळे, तलवारींसह तयारीत होतीच.
सायंकाळी चार-साडेचारच्या सुमारास पोलीस आले. जवाहर बागेत जाण्यासाठी दोनच दरवाजे होते. पोलिसांनी आवाराची भिंत तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर आतून गोळीबार सुरू झाला. पहिली गोळी आली ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने. ती हुकली. त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ठाणे अधिकारी संतोष यादव यांनी त्यांना बाजूला ढकलले. तेवढय़ात दुसरी गोळी आली आणि तिने संतोष यांच्या कपाळाचा वेध घेतला. ते कोसळले. तिकडे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी यांच्यावरही गोळीबार करण्यात येत होता. त्यांना दोन गोळ्या लागल्या. त्यात ते मरण पावले.
हे पाहताच पोलिसांनी प्रतिहल्ला चढवला. सर्वत्र अंदाधुंदी माजली. आतून हातगोळे, पेट्रोलबॉम्ब फेकण्यात येत होते. अचानक एका झोपडीतल्या सिलिंडरने पेट घेतला. आगीचे तांडव सुरू झाले. माणसे सैरावैरा पळू लागली. कोणी गोळ्यांनी, कोणी आगीत भाजून मेले. त्यांत नेताजी रामवृक्षचाही समावेश होता. मृतांचा अखेरचा आकडा होता : दोन पोलीस अधिकाऱ्यांसह २९.
*********
ही मरणारी मेंढरे होती तरी कोण? कोणत्या ओढीने ती या बाबामागे आली होती?
ती ओढ होती चांगल्या आयुष्याची. अध्यात्म परलोकाची चिंता वाहत असते. हे आधुनिक बाबा त्यांना अधिभौतिकाबरोबरच भौतिक कल्याणाची स्वप्ने दाखवीत होते. जय गुरुदेव त्यांना ‘काल’ आणि ‘माया’ यांपासून सुटका देणार होते. त्यांच्या आत्म्याला सत्लोकात पोचविणार होते. रामवृक्ष त्यांच्यासाठी याच धरतीवर सत्ययुग आणणार होते. या देशात लवकरच चांगला काळ येणार आहे, असे सांगत होते. आणि साध्या-साध्या विवंचनांनी, वेदनांनी ग्रस्त असलेले लोक त्यांना देवाचा अवतार मानीत होते. देवीबाई नावाची महिला त्यातलीच एक. तिला मूल होत नव्हते. सतत आजारी पडे. एके दिवशी कोणी तरी तिला जय गुरुदेवाच्या चमत्कारांबद्दल सांगितले. ती त्यांच्या सत्संगाला जाऊ लागली. ते मेल्यावर ती आणि तिचा नवरा रामवृक्षच्या भजनी लागली. तिची ही आंधळेपणाची कथा प्रातिनिधिकच म्हणायची. असे अनेक लोक आता त्यांच्या कहाण्या सांगत आहेत. त्यांच्या जबान्यांवरून समजते की, नेताजी हा हुकूमशहा होता. जवाहर बागेतून कोणालाही तो बाहेर पडू देत नसे. कोणी तसा अपराध केला तर त्याला फटक्यांची शिक्षा मिळे. एखाद्याच्या हातून साधा प्रमाद घडला तरी नेताजीचे न्यायालय त्याला शिक्षा करी. ती कधी आश्रमातल्या भंडाऱ्याचा खर्च सोसण्याची असे, तर कधी फटक्यांची. पण देवीबाईसारख्या अनेक भक्तांसाठी रामवृक्ष जे स्वप्न दाखवीत होता ते खूपच आकर्षक होते. भारतीय चलन त्यांच्यासाठी दुर्मीळच. रामवृक्षच्या राज्यात त्यांच्या खात्यामध्ये आझाद हिंद बँकेची सोन्याची नाणी पडणार होती. धर्म आणि राजकारण यांचे ‘कॉकटेल’ या भक्तांना अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लावत होते.
जय गुरुदेव, रामवृक्ष, देवीबाई ही मथुरेतल्या महाभारतातील पात्रे. वेळोवेळी पात्रे बदलतात, स्थान बदलते. जय गुरुदेव आणि रामवृक्ष बदलतात. देवीबाई मात्र तीच राहते. तिची कहाणीही तशीच राहते.
********
आज एक रामवृक्ष गेला. उद्या त्याच्या वेगळ्या फांद्या उगवतील. देवीबाईसारखे लोक त्याच्या सत्संगाला जातील. त्या बाबा, बुवा, बापूंच्या पंथाकडे अशा बंदुका आणि तलवारी नसतील कदाचित. पण अतिरेकाची मात्रा तीच असेल.
किंबहुना आहेच. ती हिस्सारमधल्या रामपाल प्रकरणात दिसली. ती आसाराम प्रकरणातील साक्षीदारांचे खून पडताना दिसली. पण त्याने कुणाचे डोळे उघडले असे मात्र दिसत नाही.
********
तरीही मथुरेतल्या महाभारताने एवढा धडा तर नक्कीच दिला आहे की, देव, देश आणि धर्म यांच्या नावाखाली जे चालते ते नेहमीच देवाचे, देशाचे आणि धर्माचे असते असे नाही!
स्वाधीन भारताच्या मागण्या..
* राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची निवडणूक रद्द करावी.
* देशात आझाद हिंद सरकार स्थापन करावे.
* भारतीय चलनाचे अवमूल्यन करावे.
* रिझव्‍‌र्ह बँकेची स्थापना ब्रिटिशांनी केली. तेव्हा ती बरखास्त करावी.
* आझाद हिंद बँकेचे चलन देशात प्रचलित करावे. म्हणजे एक रुपयात ६० लिटर डिझेल मिळेल.

 

विदेशातील अतिरेकी पंथ – ओम शिनरीक्यो

Untitled-2

जपानच्या टोकियोमधील भूमिगत रेल्वेत १९९५ साली झालेल्या सरीन नावाच्या विषारी वायुहल्ल्यामुळे ओम शिनरीक्यो हा पंथ जगात चर्चेत आला. शोको असाहारा नावाच्या व्यक्तीने त्याची १९८४ साली सुरुवात केली होती. त्याचे मूळचे नाव चिझुओ मात्सुमोटो होते. त्याने १९९२ साली ते बदलून शोको असाहारा असे केले. या पंथाच्या अनुयायांची ओम हेच अंतिम सत्य आहे अशी धारणा आहे.
हिंदू धर्मातील शिव आणि ओम या कल्पना, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मातील काही संकल्पना एकत्र करून त्यांचे तत्वज्ञान बनले आहे. नॉस्ट्रॅडेमसच्या भाकिताप्रमाणे तिसरे महायुद्ध होणार आहे, त्याला अमेरिका कारणीभूत ठरेल. त्यातून जगाचा अंत ओढवणार आहे. या जगबुडीतून वाचवण्यासाठी शोको असाहारा हा दिव्य पुरुष असून, तो नागरिकांची पापे आपल्या शिरावर घेईल, अशी या पंथाची मान्यता आहे. त्यांना हिंसा वज्र्य नाही.
टोकियोच्या शिबुया भागात राहत्या घरी असाहाराने हा पंथ सुरू केला. सुरुवातीला केवळ योगा आणि ध्यानधारणेचे वर्ग घेतले जात. १९८९ साली त्याला एक धार्मिक पंथ म्हणून मान्यता मिळाली आणि मोठय़ा प्रमाणात सुशिक्षित युवक त्याच्याकडे आकर्षित झाले. त्यांच्याकडून वज्रयान साक्का आणि एन्जॉय हॅपिनेस यांसारखी नियतकालिके चालवली जात. १९८९ मध्ये पंथाच्या अनुयायांना जबरदस्तीने बंद करून ठेवणे, त्यांचा गूढ मृत्यू होणे, विरोधकांचे खून होणे अशा घटनांतून हा पंथ चर्चेत आला. १९९३ साली त्यांनी विषारी वायू आणि स्वयंचलित बंदुका बनवण्यास प्रारंभ केला. २० मार्च १९९५ रोजी त्यांनी टोकियो रेल्वेत सरीन वायू सोडून १३ जणांना ठार मारले, तर शेकडो जण जखमी झाले. असाहाराने कधीच याची जबाबदारी घेतली नाही.
या पंथात २००७ साली फूट पडून त्याचे ‘आलेफ’ आणि ‘हिकारी नो वा’ अशा नावांचे दोन गट पडले. जपान, कॅनडा, अमेरिका, कझाकस्तान अशा अनेक देशांत त्याच्यावर दहशतवादी संघटना म्हणून बंदी आहे.

 

कुक्लक्स क्लॅन

Untitled-3
कु क्लक्स क्लॅन ही अमेरिकेतील सध्याच्या आणि भूतकाळातील तीन वेगवेगळ्या हिंसक पंथांची नावे. कुक्लॉस या ग्रीक शब्दावरून त्यांचे नाव आले . त्याचा अर्थ वर्तुळ. गोऱ्या अमेरिकनांच्या वर्चस्ववादावर त्यांचा विश्वास होता. या तिन्ही पंथांनी अमेरिकी समाजाच्या कथित शुद्धीकरणावर भर दिला. आपल्या विरोधकांना हिंसक पद्धतीने नामोहरम करण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. १८६५ ते १८७०, १९१५ ते १९४४ आणि १९४६ पासून पुढे असा त्यांचा ढोबळमानाने कालखंड आहे. समतावादी सामाजिक चळवळींना त्यांचा विरोध होता. त्यातील पहिल्या पंथाची स्थापना पुलास्की, टेनिसी येथे झाली. दुसरा पंथ अ‍ॅटलांटा, जॉर्जिया येथे स्थापन झाला, तर तिसरा पंथ बर्मिगहॅम, असाबामा येथे सुरू झाला. या वेळपर्यंत अनेक लहानमोठे गट मिळून केकेके पंथ बनला होता. कृष्णवर्णीय अमेरिकनांच्या सामाजिक हक्कांसाठीच्या चळवळीला विरोध करणे, त्यांच्यावर हल्ले करणे असले उद्योग त्याचे अनुयायी करीत असत. त्यांच्या राष्ट्रीय नेत्याला ग्रँड विझर्ड किंवा इंपेरियल विझर्ड असे म्हणत. विल्यम सिमॉन्स, जेम्स कोलस्कॉट, सॅम्युएल ग्रीन, डेव्हिड डय़ूक असे त्यांचे नेते होते. अमेरिकेत १९३० च्या दशकात आलेल्या महामंदीच्या काळात त्यांचे अनुयायी कमी झाले. तसेच १९६५ मध्ये अमेरिकी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी या पंथाच्या अनुयायांविरोधात मोहीम राबवून बराच अंकुश ठेवला. त्यानंतर आता त्यांचे सहा ते दहा हजार अनुयायी असल्याचे मानले जाते. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी, सर्व अंग झाकणारा घोळदार झगा, तोंडावर आवरण असा त्यांचा वेश असे.