वेळेत निदान म्हणजे अर्धे उपचार- असे वैद्यकीय क्षेत्रात सांगितले जाते. मात्र या वाक्याची महती सांगत, प्रसंगी भीती घालत सहा महिन्यांनी- वर्षांनी करायच्या ढीगभर नियमित चाचण्यांचे पॅकेज लोकांच्या गळ्यात मारले जाते. मोठमोठय़ा आजारांचा व त्यांच्या परिणामांचा धाक दाखवल्याने शहरातील मध्यमवर्ग या चाचण्यांच्या मागे जातो. कंपन्यांकडून दिल्या जात असलेल्या मेडिक्लेममुळे त्यात आणखीन भर पडली आहे. मात्र या भरमसाट चाचण्यांमुळे रुग्णाचे नव्हे, तर पॅथोलॉजी लॅबचे व ‘कट प्रॅक्टिस’मुळे डॉक्टरांचे उखळ पांढरे होत असल्याचा आरोप दिल्लीच्या ‘एम्स’मधील  डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे कमी चाचण्यांमधून आजाराचे योग्य निदान करण्यासाठी या संस्थेतील डॉक्टरांनी मोहीम राबवली आहे. इतर डॉक्टरांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसबाबत बोलतानाच शहरी जीवनामुळे गुंतागुंतीचे होत चाललेल्या आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी नियमित चाचणी योग्य असल्याचेही मत डॉक्टर व्यक्त करतात. कमी चाचण्यांमुळे योग्य निदान होऊ शकते का आणि या नियमित चाचण्यांचा फायदा होतो का, याबद्दल राज्याच्या विविध भागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलेली मतमतांतरे..
आजार  असलेल्यांसाठी  नियमित  तपासण्या  उपयुक्त
नियमित तपासण्या सर्व आजारांसाठी कधीच उपयुक्त ठरू शकत नाहीत. त्यामुळे ‘रुटिन चेकअप’च्या नावाखाली रुग्णालयांनी निरनिराळ्या ‘स्कीम्स’ बाजारात आणायच्या, या स्कीममध्ये १३ हजार, १५ हजार किंवा अधिकही अशी घसघशीत रक्कम भरून रुग्णांनी तपासण्या करून घ्यायच्या आणि त्यात काही आजार आढळला नाही म्हणजे सारे काही आलबेल आहे असे समजून शांत झोपायचे ही पद्धत मला मान्य नाही.
रुग्णाचा आधीचा आजार, त्याचे लिंग, वय, वजन, कौटुंबिक आजारांची पाश्र्वभूमी, व्यसने, जीवनशैली, दैनंदिन कामाचे स्वरूप या सर्व गोष्टींचा विचार करूनच कुणासाठी कुठल्या नियमित तपासण्या असाव्यात हे ठरायला हवे. सरसकट सर्वासाठी असलेल्या नियमित तपासण्यांच्या ‘स्कीम्स’ पैसेकाढू तर आहेतच, पण त्या चाळिशी उलटलेल्यांच्या मनात आरोग्याबद्दल असुरक्षिततेची भावनाही निर्माण करतात.
असे असले तरी नियमित तपासण्या पूर्णपणे फोल असतात असे नव्हे. नियमित तपासण्यांचे निरोगी व्यक्तींसाठीच्या तपासण्या आणि रुग्णांसाठीच्या तपासण्या असे दोन प्रकार आहेत. आजार असलेल्या व्यक्तींसाठी नियमित तपासण्या गरजेच्या आहेतच, पण त्यादेखील त्याच्या तज्ज्ञ डॉक्टरनेच ठरवायला हव्यात. तपासण्यांआधी ‘एम. डी. फिजिशियन’ असलेल्या डॉक्टरने रुग्णाला तपासून, त्याच्याशी बोलून त्याला त्यावेळी कोणत्या चाचण्या करून घेणे गरजेचे आहे हे ठरवले पाहिजे. यात अनेक अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील. डॉक्टरने रुग्णाला तपासून सुचवलेल्या चाचण्यांमध्ये काही आजार आढळला तरच त्यापुढील चाचण्या करायला हव्यात.
अनेक आजार शरीराच्या आत दडलेले असूनही अनेकदा ते कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. उच्च रक्तदाबाच्या ५० टक्के रुग्णांना काहीही लक्षणे जाणवत नाहीत. मधुमेहाची लक्षणे न दिसता कधीतरी तपासणीत रक्तातील साखर वाढलेली सापडते. कोलेस्टेरॉल तर कुठलेही लक्षण न दाखवता वाढलेल्या अवस्थेत शरीरात काही दशके राहू शकते. या गोष्टी नियमित तपासणीत सापडू शकतात. त्यामुळे या तपासण्या केवळ पैसे उकळण्याचाच एक मार्ग आहे असे नाही; परंतु त्या करण्याच्या पद्धतीवर त्यांचा उपयोग व परिणामकता अवलंबून आहे हे निश्चित.
नियमावली बनवण्याची  गरज
वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनावश्यक चाचणी, तपासणींचे प्रमाण वाढत चालले आहे, पण त्यामागे रुग्णांची अवस्था नेमकी कोणत्या स्थितीत आहे हे समजण्याची गरज असते. तथापि, कट-प्रॅक्टिसच्या नावाखाली होणाऱ्या चाचण्या, तपासण्या बंद होण्याची गरज आहे. त्याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नियुक्त करून चाचणी, तपासणींची नियमावली बनवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अगदी काही दशकांपूर्वी आपल्याकडे फॅमिली डॉक्टर नावाची कार्यप्रणाली अस्तित्वात होती. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचा इतिहास त्यांना ज्ञात असे. त्यामुळे एखाद्या रुग्णाची नेमकी कोणती चाचणी करून घ्यावी हे ते अचूकपणे सांगत असत. ऊठसूट सरसकट चाचण्यांचा भडिमार त्यांच्याकडून होत नसे. कालौघात वैद्यकीय क्षेत्रात स्पेशालिटीचे महत्त्व वाढत गेले. हृदय, छाती, कर्करोग, किडनी असे प्रत्येक अवयव-रोगागणिक वैद्यकीय तज्ज्ञ निर्माण झाले. या स्पेशालिस्ट डॉक्टरांना त्यांना आवश्यक असणारे रिपोर्ट हवे असतात. त्यासाठी पूर्वी केलेल्या चाचण्यांकडे दुर्लक्ष करून ते नव्याने चाचण्या करण्यास भाग पाडतात. एका अर्थी त्यांची ही गरज असली तरी रुग्णांचा आíथक, मानसिक विचार करणे गरजेचे आहे. शिवाय एम.डी., एम.एस. असे शिक्षण घेऊन स्वत:चे इस्पितळ सुरू करण्यासाठी काही कोटी रुपयांचा खर्च येतो. या खर्चाचा ताळमेळ बसण्यासाठी अनेक डॉक्टर कट-प्रॅक्टिसला शरण गेल्याचे दिसत आहेत. खरे तर कट-प्रॅक्टिसची प्रवृत्ती वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार झाली पाहिजे. ज्यांना पसाच कमवायचा आहे, त्यांना वैद्यकीय सोडून अन्य मार्ग मोकळेच आहेत.
रुग्णांच्या चाचण्या, तपासण्या नेमक्या कोणत्या कराव्यात, याबाबत मतांतरे आहेत. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अनावश्यक चाचण्यांची गरज नसल्याचे मत व्यक्त केले असले आणि त्यामध्ये तथ्य असले तरी याबाबत निश्चित भूमिका घेण्याची वेळ आली आहे. यासाठी शासकीय डॉक्टर, विशेष तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास असलेले पण वैद्यकीय क्षेत्राबाहेरील अभ्यासक अशांची समिती नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून चाचणी, तपासणीबाबतची नियमावली- (गाइडलाइन) तयार केली पाहिजे, तरच अनावश्यक चाचण्यांना आळा बसणे शक्य होणार आहे.
या बाबतीत शासकीय डॉक्टरांना दिला जाणारा प्रशिक्षण कार्यक्रम आदर्शवत ठरावा. शासकीय डॉक्टरांना आरोग्य व कुटुंबकल्याण केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जात असताना रुग्णांच्या नेमक्या कोणत्या व किती चाचण्या कराव्यात यांची स्पष्ट माहिती लेखी स्वरूपात दिलेली असते. याचेच अनुकरण वैद्यकीय क्षेत्रात सार्वत्रिक होण्याची गरज आहे.
अशा डॉक्टरांवर कारवाई हवीच
डॉक्टरांकडून ‘कट प्रॅक्टिस’च्या प्रमाणात सर्वत्रच वाढ होत असून तशा तक्रारी आल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केलीच पाहिजे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा डागाळत असल्याने खरे तर डॉक्टरांनी त्यापासून दूरच राहिले पाहिजे
रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यावर रोगनिदानासाठी त्याला विविध चाचण्या करायला लावले जाते. समजा, एखादा रुग्ण फिजिशिअनकडे गेल्यावर त्याला हृदयविकार असल्याच्या शक्यतेवरून तो संबंधित रुग्णाला एका विशिष्ट हृदयरोगतज्ज्ञाकडे पाठवतो. रुग्ण हृदयरोगतज्ज्ञाकडे गेल्यास त्याला या रुग्णाकडून मिळणाऱ्या रकमेतून २० ते ३० टक्के रक्कम फिजिशिअनला देतो. यालाच ‘कट प्रॅक्टिस’ असे वैद्यकीय भाषेत म्हटले जाते. नागपुरातही याची लागण झाली आहे. काही डॉक्टर तर कट प्रॅक्टिससाठी रुग्णांच्या मनात एखाद्या आजाराविषयी प्रचंड भीती निर्माण करून संबंधित डॉक्टरांकडे जाण्यास बाध्य करतात. त्यामुळे रुग्णही संभ्रमात पडून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या त्या डॉक्टरकडे जातात. तेथेही त्याला अमुक आजार असल्याचे सांगून अनेक चाचण्या करण्यास बाध्य करून त्याची लूट केली जाते. हा छुपा व्यवहार रुग्णांच्या लक्षातच येत नाही. जेव्हा येतो तेव्हा वेळ आणि हातचा पैसाही निघून गेलेला असतो. अशा काही तक्रारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. असे प्रकार दोन-चार डॉक्टर्स करतात, परंतु त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचीच बदनामी होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी या अनैतिक प्रकारापासून दूर राहिले पाहिजे. यानंतरही संबंधित डॉक्टरांनी हा प्रकार सोडला नाही, तर तेथील आयएमएच्या शाखेने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सध्या रुग्णही जागरूक झाले आहेत. त्यालाही डॉक्टरांच्या संशयास्पद हालचाली टिपता येऊ लागल्या आहेत. तसेच उपचारासाठी लागणारी तजवीज म्हणून ते आरोग्य विमाही काढत आहेत. ज्यांनी तो काढून घेतला त्यांच्यावर कट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची विशेष नजर राहत असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे, कारण आरोग्य विम्यामुळे रक्कम मिळण्याची अधिक शाश्वती असते, परंतु कोणता डॉक्टर ‘कट प्रॅक्टिस’ करतो, याची माहिती सामान्य रुग्णांना नसल्याने त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. एखादा डॉक्टर चाचण्या करावयास लावतो किंवा विशिष्ट डॉक्टरांकडे पाठवतो. त्याचे हे प्रकरण संशयास्पद वाटल्यास पुराव्यासह महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे तक्रार करा.
मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत
कोणत्याही आजाराचे निदान आणि औषधांचा खर्च सध्या मोठय़ा प्रमाणात वाढला असून त्यात रुग्ण अक्षरश: भरडला जात आहे. एखाद्या आजारासाठी कोणत्या चाचण्या करणे आणि औषधे गरजेची आहेत, याची मार्गदर्शक तत्त्वे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी निश्चित करून ती संकेतस्थळावरून जाहीर होणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वसामान्यांनाही त्याबाबत प्राथमिक माहिती होईल. रुग्ण या प्रक्रियेविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असतो. काही वर्षांपूर्वी ‘डेंग्यू’सदृश रुग्णांवर डॉक्टर फारशा चाचण्या न करता उपचार करत असत, पण आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता कुठल्याही तापाची शंका वाटली की, पहिल्या दिवशीच रक्तकणिकांची चाचणी घेण्यास सांगण्यात येते. रक्तकणिकांचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आल्यास मग खर्चीक उपचार सुरू होतात. अशा काही निदानांमुळे रुग्ण हळूहळू एका वेगळ्याच चक्रात सापडतो. स्तनाच्या तपासणीसाठी ‘मॅमोग्राफी’चा धरला जाणारा आग्रह, हादेखील त्यातील एक भाग. किरकोळ आजारांसाठी चाचण्यांचा फेरा सुरू होतो. मुंबईतील एका ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टराने मध्यंतरी विनाकारण केल्या जाणाऱ्या चाचण्यांवर आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केली होती. ‘जनरल फिजिशियन’मार्फत रुग्णास साध्या चाचण्या वगळता इतर चाचण्या करण्यास सांगितले जाऊ नये. दवाखान्यात त्यांनी उपचार करावा. त्यातून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित रुग्णास तज्ज्ञ डॉक्टराकडे पुढील उपचारासाठी पाठविण्यात यावे. अशा वेळी तज्ज्ञाला वाटल्यास चाचण्या केल्या जातील आणि पहिल्या पातळीवर चाचण्यांच्या ससेमिऱ्यातून रुग्णाची सुटका होईल, अशी त्यामागे अपेक्षा होती. काही वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाने विविध चाचण्यांसाठी ‘आऊटसोर्सिग’चा पर्याय स्वीकारला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व आजारांशी संबंधित शास्त्रीय माहिती, उपचार व तपासण्यांची माहिती मराठीतून उपलब्ध करावी, असा प्रस्ताव आपण दिला होता. त्याचा पाठपुरावा करूनही तो अद्याप दृष्टिपथात आलेला नाही.
वेगळा विचार करणे आवश्यक
अनावश्यक चाचण्या करणे किंवा सरसकट सर्वानाच चाचण्यांच्या मागे लोटणे चुकीचेच आहे. याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रात काही प्रमाणात गैरवापरही होतो, त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. मात्र काही ठिकाणी होत असलेल्या गैरप्रकारांमुळे नियमित चाचण्यांवर पूर्ण बंदी घालणेही आत्मविनाशकच होईल. नियमित चाचण्यांबाबत आपण थोडा वेगळा विचार करणेही गरजेचे आहे.
गेल्या १५ वर्षांत देशातील आजारांचे प्रकार (डिसीज प्रोफाइल) बदलले आहेत. पूर्वी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण जास्त होते व त्याचा अंदाज असल्याने फारशा चाचण्या न करताही उपचार होत. आता मात्र जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण वाढले आहे. उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग.. या आजारांचे प्रमाण व त्यामुळे होत असलेली गुंतागुंतही वाढत चालली आहे. या आजारांचा शरीराच्या इतर अवयवांवरही- डोळे, पाय, मूत्रपिंड- परिणाम होतो. त्यामुळे या आजारांचे निदान आधी झाले तर त्यांच्यावर उपाय करणे अधिक सोयीचे ठरते. नियमित तपासण्यांमुळे आजारांचे योग्य व्यवस्थापन होऊ शकेल. त्यामुळे या तपासण्यांना रॅकेटचा भाग समजणे चूक आहे.  देशात आज दहा कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेहाचा सर्वच अवयवांवर परिणाम होतो. परिणाम होईपर्यंत वाट पाहावी का? मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस करावे लागते. हा धोका पत्करण्यापेक्षा चाचणी करणे अधिक योग्य ठरणार नाही का? दहा कोटी मधुमेहींपैकी पन्नास टक्के लोक ३५ ते ५० वयोगटातील आहेत. हीच परिस्थिती कमीअधिक प्रमाणात रक्तदाब, हृदयविकार यांच्याबाबतही आहे. त्यामुळे केवळ वृद्धांनी चाचणी करावी, हे सांगणेही योग्य नाही. एक ते चार डॉलर हे रुग्णांच्या जागृती व तपासण्यांवर खर्च केले तर उपचारांचे ५०० डॉलर वाचतात, असे सांगण्यात येते. हे आजार नियंत्रणात आणण्यासाठी कोलेस्टेरॉल, रक्तदाब, शर्करा या चाचण्या आवश्यकच ठरतात.
चाळीस वर्षांनंतर कोणत्या चाचण्या कराव्यात व पन्नास वर्षांनंतर कोणत्या चाचण्या कराव्यात याचे मार्गदर्शन नागरिकांना करणे आवश्यक आहे. हायपरटेंशन गाइडलाइन्स बाय जॉइंट नॅशनल कमिशन आणि डायबीटीस गाइडलाइन्स बाय रीसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबीटीस इन इंडिया या संस्थांच्या वेबसाइटवर ही माहिती मिळू शकेल. भारंभार व अनावश्यक चाचण्या गैर आहेतच, पण आजारांचे नियमन करण्यासाठी नियमित चाचण्यांचे महत्त्व कमी होत नाही.
चाचण्यांचा अतिरेक चुकीचाच
शहर असो किंवा तालुक्याचे ठिकाण, रुग्णनिदान करण्यापूर्वी सरसकट १५-२० चाचण्या सांगणे आता फॅशन बनू लागल्यासारखे वातावरण आहे. याचा अर्थ चाचण्याच करू नयेत असा नाही. रुग्णाच्या किती चाचण्या कराव्यात याचे निकष नसले तरी किमान नैतिकता पाळली जाणे आवश्यकच आहे. सरसकट चाचण्यांमागे वैद्यकीय क्षेत्रातील मानसिकतांचे दोन-तीन प्रकारे विश्लेषण करता येईल. ज्या ज्या रुग्णालयांमध्ये डॉक्टराच्याच मालकीची प्रयोगशाळा असते, तेथे रुग्णांची लूट अधिक होते, हे निष्कर्ष बहुतेकांना माहीत आहेत. मात्र रुग्णांचा बहुतेक वेळा नाइलाज असतो. बऱ्याचदा डॉक्टरांचे अज्ञान हेही एक महत्त्वाचे कारण आहे आणि तिसरे कारण वेळ नसणे. रुग्णांना प्रश्न विचारून त्याच्या आजाराविषयीची माहिती मिळविणे, त्याला होत असणारा त्रास आणि त्याला तपासल्यानंतर नक्की कोणता आजार असावा, याविषयी केलेले निदान यासाठी लागणारा वेळ देऊ न शकणारे काही डॉक्टर्स १५-२० चाचण्या सुचवतात. तसा कट-प्रॅक्टिसचा व्यवसायही सर्वत्र आहे. एका विशिष्ट प्रयोगशाळेतच चाचण्या करण्याचा आग्रह जेव्हा धरला जातो, तेव्हा डॉक्टरांचा त्यात हिस्सा असतोच. मात्र हे सर्व टाळता येऊ शकते. त्यासाठी डॉक्टरांना रुग्णांशी अधिक वेळ बोलावे लागेल. मात्र अलीकडे मानसिकता बदलू लागली आहे. रुग्णाला तपासल्यानंतर दोन-तीन चाचण्या सुचवल्या आणि त्यानंतर पुढचा उपचार ठरवू असे सांगितले तर रुग्णांचाही डॉक्टरांवर विश्वास बसत नाही. त्यांना ताबडतोब उपचार हवे असतात. झटपट झाले आहे सगळे. त्यामुळे सरसकटपणे चाचण्या सांगितल्या जातात. अलीकडे तर सर्व प्रकारच्या चाचण्या करून घेणाऱ्यांचा मोठा वर्ग आहे. अर्थात ते पूर्णत: चुकीचे नाही. या तपासण्यांचा उपयोग आरोग्य आलेख काढण्यासाठी उपयोगी पडतो. मात्र काही शहरांमध्ये अलीकडे सिटीस्कॅन, सिटी अ‍ॅन्जिओग्राफ अशाही चाचण्या ‘पॅकेज’च्या भाग झाल्या आहेत. वास्तविक सगळ्या रुग्णांसाठी सगळ्या चाचण्यांची आवश्यकता नसते. सरसकट केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे पॅकेज ठरवताना काही वेळा किमती कमी होतात, ते खरे आहे. एखाद्या कारखान्यातील १०० कामगारांची आरोग्य तपासणी करायची असेल तर काही मोजक्या चाचण्या सामूहिकपणे करणे सोयीचे असते. मात्र अलीकडे सरसकटपणे तपासणी करून सरळ चाचणीचे अहवालच समोर ठेवले जातात. खरे तर विशिष्ट वयानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही चाचण्या करून घेणे गरजेचे असते. मात्र त्याचा अतिरेक होणे चुकीचेच.
डॉ. अजित भागवत
हृदयरोगतज्ज्ञ, औरंगाबाद