व्यासंगी आणि चिंतनशील समीक्षक, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी अलीकडेच निवर्तले. त्यांच्या ज्येष्ठ सुह्रदाने या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध..

Untitled-17
दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी ऊर्फ द.भि. गेले आणि मराठीतील सहसर्जक समीक्षापर्वाचा अस्त झाला. दभिंचा व माझा परिचय झाल्याला ३५ वष्रे होऊन गेली. नागपूर शहरात एसएनडीटी विद्यापीठाच्या परीक्षांचे नियंत्रण करण्यासाठी एके काळी मी जात असे, तेव्हा त्यांच्याकडे आवर्जून हजेरी लावत असे. जंतरमंतर येथील त्यांच्या निवासस्थानी पहिल्यांदा मी गेलो त्या वेळी नागपुरात त्यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. त्यांच्याकडे भेटायला जाण्याविषयी आणि प्रत्यक्ष भेटीविषयी बरेच काहीकाही कानांवर होते. परंतु मला त्यांच्या स्वागतामागील मनपूर्वकता, त्यांच्या विद्वत्तेमागील साहित्यप्रेम आणि त्यांच्या साहित्यचच्रेमागील रसिकता दरवेळी अनुभवास आली. दभिंच्या आणि माझ्या भेटीत तीन मुख्य दुवे होते. एक, म. द. हातकणंगलेकर, दुसरा वि.बा. प्रभुदेसाई आणि तिसरा अक्षयकुमार काळे. हे तिघे दभिंच्या स्वभावातील सगळ्या खाचाखोचा ठाऊक असूनही दभिंवर डोळस प्रेम करणारे होते. माझे या वर्तुळातले नाते लक्षात घेऊनच दभि कालांतराने एसएनडीटीच्या मराठी विभागात व्याख्यानाला आले होते व त्यांनी मराठी नाटय़वाङ्मयाविषयी व्यासंगपूर्ण विचार मांडले होते. मात्र, आपल्या स्वभावधर्माला जागून व्याख्यानास सुरुवात करण्यापूर्वी पुण्याच्या माणसांना काही चिमटे काढायला ते विसरले नव्हते.
मराठीचे अध्यापन आणि साहित्याची समीक्षा या दभिंच्या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या गोष्टी होत्या. मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी वाङ्मयाचा त्यांचा उत्तम व्यासंग होता. ज्ञानेश्वर आणि मर्ढेकर ही त्यांची दैवते होती. भारतीय साहित्यशास्त्र त्यांना कुठल्याही संस्कृतच्या नामांकित प्राध्यापकाइतकेच चांगले अवगत होते. या साहित्यशास्त्राची परिभाषा त्यांच्या वक्तृत्वाचा आणि लेखनाचा अविभाज्य घटक होती. ग.त्र्यं. देशपांडे यांचा याच नावाचा सुप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून घटवून घेतला होता. पुण्यात रा.श्री. जोग यांची आणि मुंबईत व मराठवाडय़ात वा.ल. कुळकर्णी यांची जशी विद्यार्थ्यांची मोठी परंपरा उत्पन्न झाली, तशीच विदर्भात द.भि. कुलकर्णी यांची परंपरा निर्माण झाली. प्रभा गणोरकर, यशवंत मनोहर, स.त्र्यं. कुल्ली, प्रमोद मुनघाटे, संध्या अमृते यांसारखे पीएचडीचे आणि ग्रेस, अक्षयकुमार काळे, श्रीकांत तिडके, प्रदीप विटाळकर यांसारखे त्यांच्या एम.ए.च्या वर्गातले विद्यार्थी यथावकाश मराठीचे नामवंत प्राध्यापक झाले.
‘दुसरी परंपरा’, ‘पहिली परंपरा’, ‘महाकाव्य स्वरूप व समीक्षा’, ‘ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद’, ‘तिसऱ्यांदा रणांगण’, ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुनस्थापना’, ‘दोन परंपरा’, ‘युगास्त्र’, ‘द्विदल’, ‘हिमवंतीची सरोवरे’, ‘पहिल्यांदा रणांगण’, ‘कादंबरी स्वरूप व समीक्षा’, ‘नाटय़वेध’, ‘समीक्षेची सरहद्द’, ‘सुरेश भट नवे आकलन’, ‘नाटक स्वरूप व समीक्षा’, ‘महाकथा जीएंची’, ‘वल्कले’, ‘प्रतीतिविश्रांती ज्ञानदेवांची’ इत्यादी पंचवीस समीक्षाग्रंथ द.भि. कुलकर्णी यांनी लिहिले. ‘रेक्वीयम’ (कथासंग्रह), ‘मेघ’, ‘मोर’ आणि ‘मथिली’, ‘अपाíथवाचे चांदणे’, ‘पस्तुरी’ (ललित लेखसंग्रह) आणि ‘मेरसोलचा सूर्य’ (कवितासंग्रह) या ललित लेखनाची नोंद न करता पुढे जाता येत नसले तरी, द.भि. या नावाची ओळख त्यांच्या समीक्षालेखनाशीच निगडित आहे.
सद्धांतिक व उपयोजित अशा दोन्ही प्रकारचे समीक्षालेखन त्यांनी केले. ‘महाकाव्य’ हा त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. शतकानुशतकांची परंपरा असणारा, जागतिक साहित्यविश्व व्यापणारा, देशागणिक वेगवेगळी रूपे धारण करणारा, नवनव्या साहित्यकृतींना जन्म देण्याची क्षमता असणारा भव्योदात्त विषय त्यांनी आपल्या प्रबंधासाठी निवडला आणि त्यावर बाराशे पृष्ठांचा प्रबंध लिहिला. त्या प्रबंधाचा गाभा पुढे ‘महाकाव्य : स्वरूप व समीक्षा’ या ग्रंथाच्या रूपाने प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने त्यांच्या या ग्रंथाची व ग्रंथविषयाची मराठी समीक्षेने घ्यावी तेवढी दखल घेतली नाही. मर्ढेकरांच्या काव्यप्रतिभेवर व सौंदर्यमीमांसेवर द.भिं.चे निरतिशय प्रेम होते. कवी व सौंदर्यमीमांसक म्हणून मर्ढेकरांची योग्यता असाधारण असल्यामुळे मर्ढेकरांना व त्यांच्या भूमिकेला झालेला विरोध त्यांना कधीच खपला नाही. विरोधकांना मर्ढेकर उमजलेच नाहीत असे त्यांचे ठाम मत होते. मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राची पुनस्थापना करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात मर्ढेकरांच्या सर्व टीकाकारांचा साधार परामर्श त्यांनी घेतला आहे. ज्ञानेश्वरांविषयी ते नेहमीच उमाळ्याने लिहीत आणि बोलत. अभिनव गुप्तांच्या परंपरेतून आलेल्या चिद्विलासवादी विचारधारेचा आपल्या प्रतिपादनातून ते अधिकारवाणीने उलगडा करत. ज्ञानेश्वरांविषयी बोलताना त्यांच्या शब्दांना लडिवाळपणाचा स्पर्श आपोआप घडे. केवळ ज्ञानेश्वरच नाही, तर सर्व संतवाङ्मयाचा त्यांचा व्यासंग होता. चक्रधरांविषयी व तुकारामांविषयी अगदी वेगळ्या प्रकारचे आकलन त्यांनी आपल्या समीक्षेमधून मांडले आहे.
आधुनिक मराठी साहित्यातील ‘रणांगण’ व जी.ए. कुलकर्णी यांचे कथासाहित्य यांनी द.िभ.ना अक्षरश भुरळ घातली होती. या दोहोंवर त्यांनी स्वतंत्र दृष्टिकोनांतून लिहिले आहे. या साहित्यकृतींकडे पाहण्याची द.िभ.ची दृष्टी सर्वस्वी स्वतंत्र होती. समीक्षक हा खराखुरा रसिक आणि खराखुरा सहकलावंत असतो, कलावंत व आस्वादक हे दोघे मिळून साहित्यकृतीची संघटना निर्मित असतात असे त्यांचे आग्रही मत होते. अभ्यासाविषयी, समीक्षासिद्धांतांविषयी, पांडित्याविषयी आदर असला तरी साहित्यास्वादावर व रसिकतेवर या गोष्टींचे आक्रमण झालेले त्यांना खपत नसे. समीक्षा करताना पांडित्यापेक्षा रसिकता आणि सहसर्जकता त्यांना सदैव महत्त्वाची वाटत आली. ‘पहिली परंपरा’, ‘दुसरी परंपरा’ या आपल्या पुस्तकांतून मराठी कवितेचा वेगळा अन्वयार्थ त्यांनी लावला. भा. रा. तांबे यांनी कवितेच्या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा द.िभ.नी अपूर्व असा परामर्श घेतला आहे. ‘विविध विरोधी घटकांचा समन्वय, पुनरुज्जीवनवाद, अभिजातवाद व गीतरचना हे त्यांच्या कवितेतील घटक’ लक्षात घेऊन त्यांनी तांबे यांची थोरवी वर्णन केली आहे. केशवसुतांपेक्षाही तांबे यांच्याविषयीचे द.भि. कुलकर्णी यांचे प्रेम त्यांच्या लेखनातून प्रकटले आहे. ‘बी’ कवींच्या ‘चाफा’ या कवितेचा मायावादाच्या दिशेने अर्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘पहिल्यांदा रणांगण’मधील द.िभ.चे लेखन कथा, कादंबरी, नाटक व कविता या साहित्यप्रांतातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा अभूतपूर्व आस्वाद आहे. आस्वादक समीक्षा साहित्यकृतीच्या अंतरंगातील सौंदर्याचा किती वेगवेगळ्या अंगांनी बोध घडविते त्याचे प्रात्यक्षिक या संग्रहातून वाचकाला पाहावयास मिळते. जीएंची कथा, एलकुंचवारांची नाटके, पु.शि. रेगे यांची ‘सावित्री’, अनिलांची कविता यांचा मर्मग्राही वेध घेणाऱ्या लेखांनी द.भि. कुलकर्णी यांच्या साहित्यसमीक्षेचे सामथ्र्य प्रस्थापित केले आहे. नाटक, कादंबरी आणि कथा या तिन्ही साहित्यप्रकारांविषयी त्यांनी स्फुट परंतु सूत्ररूप विचारप्रकटन केले आहे. ते वाचताना त्यांच्या ठिकाणच्या स्वतंत्र प्रज्ञेचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. त्यांनी आपली समीक्षा सिद्धांताच्या चौकटीत बंदिस्त केली नाही. साहित्यकृतीच्या प्रकृतीस तत्परतेने प्रतिसाद देण्यात व पुनपुन्हा तिचा नवा शोध घेण्यात ते सदैव रमले होते. त्यांच्या समीक्षेत परंपरेचे भान आहे, नवतेचे स्वागत आहे, रसिकतेची दृष्टी आहे आणि मर्मग्राही आकलन आहे. त्यांच्या संशोधनपर लेखनातून शोधकता, सूचकता आणि सूक्ष्मता यांचे दर्शन घडे. रा. श्री. जोग संपादित मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या चौथ्या खंडात १८७४ पूर्व मराठी निबंधवाङ्मयावर त्यांनी लिहिलेला लेख शोधनिबंधाचा वस्तुपाठ म्हणावा असा आहे.
कालौघात नागपुरात द.भिं.विषयी मतमतांतरे उत्पन्न झाली. काही प्रमाणात त्यांच्या विरोधी वातावरणही निर्माण झाले आणि त्यांनी नागपूर सोडून कायमच्या निवासासाठी पुण्याला यावयाचा निर्णय घेतला. तो फारच फलदायी ठरला; द.भिं.साठी व पुणेकरांसाठीही! गेल्या दशकभरात पुण्यात त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. नवनवे लेखक, प्रकाशक त्यांना भेटू लागले. अरुण जाखडे यांनी त्यांची जुनी, नवी पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेशी त्यांचे हार्दकि संबंध निर्माण झाले. मोठमोठे वाङ्मयीन परिसंवाद व चर्चा आणि लहान लहान गटांतले साहित्यविषयक उपक्रम त्यांच्या उपस्थितीविना पार पडेनात. त्यांची अस्खलित काव्यशास्त्रप्रचुर वक्तृत्वशैली आणि त्यांची प्रेरणादायी ऊर्जा सर्वाना हवीहवीशी वाटू लागली. या सर्वावर कळस चढला तो त्यांना लाभलेल्या पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामुळे. अध्यक्षपदावरून त्यांनी केलेले भाषण त्यांच्या आवडत्या अलौकिकतावादी परिभाषेत प्राधान्याने समीक्षाविषयक अभिप्राय व्यक्त करणारे होते.
या वर्षीच्या संमेलनप्रसंगी प्रकृती तितकीशी बरी नसतानाही ते उपस्थित राहिले ते मूलत: कर्तव्यभावनेने. तेथूनच त्यांना हॉस्पिटलात न्यावे लागले आणि २७ जानेवारी रोजी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी (जन्म : २५ जुल १९३४) त्यांचे देहावसान झाले. त्यांना आणखी काही वष्रे आयुष्य लाभते तर त्यांच्या साहित्यचच्रेने विस्तारलेली ‘समीक्षेची क्षितिजे’ साहित्यरसिकांना आणखी काही काळ खुणावत राहिली असती, परंतु तसा योग नव्हता हेच खरे!

lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
loksatta editorial income tax issue notice to congress
अग्रलेख: धनराशी जाता मूढापाशी..
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..

विलास खोले