ज्येष्ठ क्रीडा पत्रकार चंद्रशेखर संत यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले. मराठी क्रीडा पत्रकारितेत ऋषितुल्य मानले जाणारे वि. वि. करमरकर यांनी आपल्या या माजी सहकाऱ्याच्या जागवलेल्या आठवणी..
चंद्रशेखर संत : ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी क्रीडा-संपादक, मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अन् भारतीय क्रीडा पत्रकार संघटनेचे माजी खजिनदार. तसेच आकाशवाणी आणि टेलिव्हिजनवरील उत्साही समीक्षक व निवेदक. क्रूर काळाने पडद्याआड नेलेलं असं हे बहुरूपी व्यक्तिमत्त्व. आपखुशीनं एका रूपातून दुसऱ्या रूपात खुशीनं फुलत गेलेलं व्यक्तिमत्त्व. सुमारे चाळीस वर्षांच्या या वाटचालीत मूळ रूपापासून दुरावत जाताना सुखी-समाधानी-संतुष्ट असणारं, सदैव हसतमुख असं हे रसायन.
चंद्रशेखर संत : यापैकी आडनावाआधीचं नाव- ‘चंद्रशेखर’ केवढं लांबलचक. त्यांच्या आवडत्या जादूई स्पिनरचं नामांतरही चंद्रशेखरवरून ‘चंद्रा’ केलं गेलं. त्यांच्या आवडत्या भारतयात्री पंतप्रधान चंद्रशेखरना ‘तरुण तुर्क’ किताबानं अधिक काळ गौरवलं गेलं. मनमिळाऊ व सर्वात मिसळून जाणाऱ्या संतांच्या नावाचं संक्षिप्तीकरण, त्यांच्या विविध परिवारात झालं नसतं तरच नवल!
संतांच्या घरचे सारे त्यांना ‘शेखर’ नावानं हाक मारत; तर परिवारातील काहीजण ‘चंद्रा’ म्हणणं पसंत करत. एक क्रिकेटशौकीन गुजराती पत्रकार हेमेंद्र व्यास त्यांना सहसा ‘चिंटू, तर कधी पिंटू’ असे गमतीने संबोधत. मुंबई-पुणे सायकल शर्यतींमुळे जवळीक निर्माण झाल्यानंतर बुजुर्ग संघटक राजन गानला वडीलकीच्या थाटात त्यांचा उल्लेख ‘पिलू’ किंवा कधीमधी ‘पिल्लू’ असाही करत. बरेचसे सहकारी पत्रकार त्यांच्या नावापेक्षा सुटसुटीत आडनावाने, ‘संत’ असंच पुकारत. गोरेगावच्या प्रबोधन संस्थेतील डॉ. आदवाबकर व शिवसेना नेते त्यांचं स्वागत ‘संतवाणी’ने करत. पण फारच थोडय़ा लोकांना माहीत असेल की, विश्वविक्रमी सुनील गावसकरांनी त्यांच्यापुरतं संतांचं नाव ठेवलं होतं ‘सान्ताना’. त्या जमान्यातील नामांकित टेनिसपटू अ‍ॅन्युएल सान्ताना यांचं नाव गावसकरांनी संतांना बहाल केलं होतं, काहीशा आपुलकीनं!
अशा या चिंटू, पिलू शेखरचं पहिलं दर्शन कसं होतं, ते टाइम्स समूहाचे मिस्कील छायाचित्रकार गिरीश दीक्षित यांच्या नजरेतून सांगतो- कामगार नेते बगाराम तुळपुळे यांचे चेले व खोखोतील सेवाभावी संघटक एकनाथ साटम हे कीर्ती कॉलेजातील या विद्यार्थ्यांस माझ्याकडे घेऊन आले ते १९७५ च्या सुमारास. तिथून त्यांची अर्धवेळ (पार्ट टाइम) क्रीडा पत्रकारिता सुरू झाली. एका व्हॉलीबॉल स्पर्धेस मी त्यांना पाठवलं आणि त्यासह छायाचित्रकाराची स्लीप भरताना तळाला लिहिलं होतं : ‘क्रीडांगणावर संत यांच्याशी संपर्क साधावा’.
तीच स्लीप घेऊन छायाचित्रांसह गिरीश दीक्षित माझ्याकडे आले. नकला करण्यात त्यांचा हातखंडा. मस्करी करत म्हणाले, ‘संतांचा शोध घेत होतो. ते अखेर दिसले व पटकन नेटखालून दुसऱ्या बाजूस गेले. तिकडे जातो तोवर पुन्हा नेटखालून या बाजूस परतले होते!’ मग दीक्षित त्यांना ‘शेखर’ म्हणू लागला. संतांची गिरीशशी गट्टी जमायला वेळ लागला नाही.  दुसरी कुठली बँकेतली वा आयुर्विमा मंडळाची इ. नोकरी मिळत नाही म्हणून काही पदवीधर पत्रकारितेकडे वळलेले आहेत. राजकीय बातमीदारी वा भाषांतर विभाग याकडे अखेर स्थान मिळविण्यासाठी, क्रीडा-पत्रकारितेमार्फत व्यापक व लाभदायक पत्रकारितेचे दरवाजे खोलून घेतलेले आहेत. पण संत व त्यांच्यामागून आलेले शरद कद्रेकर यांची गोष्ट वेगळी. क्रीडा व विशेषत: क्रिकेट यांची त्यांना मनस्वी आवड. अभ्युदय सहकारी बँकेत अधिकाऱ्याची श्रेणी मिळत असूनही संत त्या मानाने कमी वेतनश्रेणीच्या पत्रकारितेत आले. (कद्रेकरांनीही एमपीएससीतून पत्रकारितेत येताना थोडा आर्थिक घाटा, हसतमुखाने स्वीकारला अशी हौस असल्यामुळेच. दौऱ्याचा सारा आर्थिक भार उचलून १९८३ मधील विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला तीन आठवडे जाण्याचे धाडस संत करू शकले आणि सुमारे दोन तपांनंतर शरद कद्रेकर इंग्लंडमधील चँपियन्स करंडक स्पर्धेस आणि ऑस्ट्रेलियातील काही कसोटी सामन्यांना स्वखर्चाने जाऊ शकले.
स्वखर्चाने इंग्लंडला
१९८० च्या सुमारास महाराष्ट्र टाइम्समध्ये पूर्णवेळ क्रीडा-पत्रकार बनलेले संत मला म्हणाले, ‘‘मला कोणतेही व्यसन नाही. दारू-सिगारेट, पान-तंबाखू हेच काय, चहा-कॉफीचंही व्यसन नाही. घरची राहणी साधी व काटकसरीची. तीन वर्षांचा पगार मी वाचवलाय. विश्वचषकाला जाण्याची माझी हीच योग्य वेळ आहे. लग्न झाल्यावर नव्या जबाबदाऱ्या अंगावर येणारच.’’ ऑफीसने त्यांना अधिकृतरीत्या पाठवावे यासाठी मी बरीच खटपट करून पाहिली. पण सारे प्रयत्न विफल ठरले. माझे मेव्हणे डॉ. पद्माकर थोरात यांचे स्नेही राजगोपाल तेव्हा लंडनमध्ये होते आणि प्रकाश थोरात मँचेस्टरला होते.  तिथे मात्र राहण्या-जेवणाची व्यवस्था करता आली. मराठी क्रीडा-पत्रकारिता तेव्हा व आजही बहुतांशी निराधारच आहे.
संत आकाशवाणीचे समालोचक बनले, हा त्यांच्या वडिलांना सुखद धक्का होता. संत फार कमी बोलत. एकदा तर मुंबई-पुणे प्रवासात ते इतके चुपचाप बसून होते की, समोरच्या बाकावरील प्रवाशाने संतांच्या वडिलांकडे सहानुभूतीने विचारपूस केली. ‘मुलगा मुका तर नाही ना?’.. सुरुवातीला आकाशवाणी कक्षातील एअर कंडिशनिंग त्यांना असह्य़ होई. सर्दी-खोकला यांचा त्रास सुरू व्हायचा. पण खेळांच्या हौशीनं त्यांना तारून नेलं. आकाशवाणीचे विजय चंद्रन व दूरदर्शनचे भोगले यांनी त्यांना नव्या प्रसार माध्यमांशी अतूट नाते जोडून दिले. लेखणीपेक्षा वाणीचा वापर संतांना भावला. चांगला आवाज, स्पष्ट उच्चार आणि दूरवरून खेळाडू ओळखणारी नजर ही त्यांची वैशिष्टय़े. समालोचक कक्षात बरोबर असताना, परस्परांवरील विश्वास महत्त्वाचा. वानखेडे स्टेडियममध्ये ग्रॅहॅम गूचच्या इंग्लंडतर्फे ग्रॅम हिकने मोठे शतक झळकवले. तेव्हा मी म्हणालो होतो की, आजचा दिवसच हिकचा आहे. आता त्याच्या हाती कर्णधाराने चेंडू ठेवला तर त्याला विकेट मिळेल. नेमकं घडलंही तसंच! तेव्हा समालोचन करणाऱ्या संतांनी लगेच मला दाद दिली.. त्यानंतर स्टिव वॉच्या कांगारूंविरुद्ध सचिन स्फोटक फलंदाजी करत होता. पण रिकी पॉन्टिंगने त्याचा अफलातून झेल टिपला, तेव्हा आवेगाच्या भरात संतांनी माझ्या माइकवरून काही सेकंदांत त्याचं चटकन वर्णन केलं व पटकन माइक माझ्या हवाली केला. ही घुसखोरी मला गैर वाटणार नाही, या विश्वासातून त्यांनी ते क्षण टिपले, सादर केले.
विविध स्पर्धाचे समीक्षण  करताना संतांसह बरेच दिवस हॉटेलातील खोलीत जोडीदार राहिलेलो आहे. सुंदर राजन,  केशव झा यांच्याप्रमाणे संत माझे पसंतीचे जोडीदार. त्यांना सवयी स्वच्छतेच्या अन् साधेपणाच्या. सकाळी हमखास लवकर उठत, त्यामुळे अलार्म क्लॉकची गरजच उरत नसे! सहकाऱ्यांची बारीकसारीक बाबतीत ते काळजी घेत. ट्रेन वा बसमध्ये खिडकीशेजारची जागा मला ते देत. पण हाताचा कोपरही खिडकीबाहेर जाऊ देऊ नये, याबाबत दक्ष असत!
अशाही वाटचाली
क्रीडा-पत्रकारितेची अनावर ओढ असणाऱ्या काही माझ्या मित्रांच्या वाटचालीची उदाहरणे आता वेगळ्या कारणास्तव सांगतो. टाइम्सचे जो क्रॅस्टो हे राष्ट्रीय दर्जाचे धावपटू स्प्रिंटर धर्मगुरू न होता क्रीडा-पत्रकार बनले. दरवर्षी अ‍ॅथलेटिक्सचे विनामूल्य शिबीर घेत, पण अ‍ॅथलेटिक्स खेळाडू व संघटना यावर लिहिण्याबाबत कच्चे.. ‘टाइम्स’चे सुंदर राजन यांचे टेबल टेनिस व टेनिसवरील लेखनात प्रभुत्व. पण क्रीडा-संपादकांना भारतात क्रिकेट लेखनावर भर द्यावाच लागतो, त्यानुसार त्यांना टेनिस व टेबल टेनिस बाजूस ठेवावे लागले.. फ्री प्रेस जर्नलमध्ये उमेदवारी करण्यासाठी, गोमंतकात घरी भांडून मुंबईत आलेला सदा कैसरे याला पेज-मेकिंगचं खेळाचं पान सजवण्याचं वेड. त्याबाबत तो काळाच्या पुढे दहा-पंधरा वर्षे होता! त्यानं सजवलेलं खेळाचं पान पाहिल्यावर न्यूझीलंड क्रिकेटपटूंची पहिली प्रतिक्रिया होती, ‘हे पान भारतीय वर्तमानपत्रातलं नाही!’ अशा या गुणी, सरळसाध्या युवकास अरब देशांचा रस्ता पकडावा लागला होता. पण या बदलानंतरही सुंदर व कैसरे पत्रकारितेवरच एकचित्त, फोकस्ड राहिले.
ही उदाहरणं देतो एवढय़ाचसाठी की क्रिकेट व विशेषत: मुंबईचं क्रिकेट हे संतांच्या आस्थेचे विषय. रमाकांत देसाईंचा रनअप, एकनाथ सोलकरचे चढउतार, पद्माकर शिवलकरचं कमनशीब हे सारं त्यांच्या निरीक्षणांचे व जिव्हाळ्याचे विषय; मुंबई क्रिकेटची घसरगुंडी हा त्यांच्या चिंतेचा विषय. पण या साऱ्याची चिकित्सा करणं आपल्या स्वभावात नाही, असे ते म्हणत. पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा हा बराचसा चंगळवाद. ही गोष्ट या निव्र्यसनी सद्गृहस्थानं उमजून घेतली नाही, याचंही मला आश्चर्य वाटतं. तरीही मी असे म्हणेन की, खेळांची व क्रीडा पत्रकारितेची आवड ही संतांची प्राथमिक बैठक पक्की होती. निव्र्यसनी संतांनी कधीही मिरवून घेतलं नाही, म्हणूनच गावसकरांचे सान्ताना अल्लाला प्यारे झाले. अभ्यासू क्रीडा-पत्रकारांच्या नवीन पिढीत संतांनी अपूर्ण ठेवलेलं कार्य आपापल्या परीनं यापुढे तडीस न्यायचं आहे!