कुणा एका नेत्याच्या धडाडीपायी निर्णय होणे, मग अंमलबजावणीची धामधूम सुरू असताना मूळ निर्णय टीकास्पद ठरणे, या टीकेला फाटेही फुटणे आणि ‘आपला-परका’ वगैरे मुद्देसुद्धा जणू महत्त्वाचे बनणे, असे राजकारण सुरूच असताना रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाचे अर्थकारण मार्गी लागले.. त्याबद्दलचे हे तीन उतारे, त्यांच्याच शब्दांत..

दिल्लीस पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी (१७ एप्रिल १९८०) इंदिराजींनी मला भोजनास बोलावले. रात्रीचे हे भोजन अगदी अनौपचारिक होते. संजय, राजीव, त्यांच्या पत्नी आणि मुले हे सर्व जण तेथे होते. थोडय़ाफार आनंदी गप्पा झाल्यानंतर विषय अटळपणे चित्रपटावर आला, तेव्हा अल्प संभाषणातच मला असे वाटू लागले की, भारताच्या पंतप्रधानांनादेखील या चित्रपटाचा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकत नाही याबद्दल माझ्यासारखीच काहीशी हताशा वाटते आहे. त्यादेखील गेली सुमारे सतरा वर्षे या योजनेशी एक प्रकारे संबंधित होत्या. मी बऱ्याच अडचणी त्यांच्यापुढे स्पष्ट केल्याच, परंतु खरा प्रश्न अर्थसाहय़ाचा आहे, हेही त्यांना विदित केले. रुपयाखेरीज अन्य चलनांतील अर्थपुरवठा कोठून ना कोठून उभारण्याची आमची क्षमता आहे, परंतु आधी भारतातून यासाठी अर्थपुरवठा उभा राहिला तरच आमचे बाहेरून पैसा मिळवण्याचे प्रयत्न मार्गी लागतील आणि हा चित्रपट चालू वर्षांच्या अखेरीपर्यंत प्रत्यक्ष निर्मितीच्या पातळीस जाऊ शकेल.
‘रुपयांमधील निधी मिळवण्यात काय समस्या आहे?’ त्यांनी विचारले.
मी सांगितले की, बऱ्याच जणांनी- काहींनी थेट वा काहींनी कोणा मध्यस्थाकरवी, गुंतवणूक करण्याची तयारी दाखवलीही होती; पण काही ना काही कारणाने प्रत्यक्षात काहीही होऊ शकलेले नाही.
यावर त्यांनी सुचविले की चित्रपटाच्या पटकथेची एक प्रत माहिती व प्रसारण खात्याकडे जावयास हवी. वसंत साठे हे या खात्याचे मंत्री असून त्यांच्याशी त्या बोलतील आणि सरकारच ‘राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ’ (एनएफडीसी)मार्फत अर्थपुरवठा करू शकते का, याबद्दल साठे यांना विचार करण्यास सांगतील. कोणत्याही प्रकारचे आश्वासन वा हमी देण्याची मात्र त्यांची तयारी दिसली नाही; कारण असा निधी देण्यासाठी अखेर मंत्रिमंडळाला निर्णय घ्यावा लागला असता. तरीही, मी संबंधित खात्यास विचार करण्याचे सुचवीन, असे त्या म्हणाल्या.
कुटुंबीय पांगले, तरीही इंदिराजी व मी सुमारे अर्धा तास बोलत होतो. मी पटकथा सोबतच आणली होती. ती त्यांच्या सुपूर्द केल्यावर, निरोप घेताना त्या म्हणाला,
‘झोपेपूर्वी वाचण्यासाठी बरे मला हे!’

दिल्लीहून निघण्यापूर्वी पुन्हा इंदिराजींकडे गेलो. दोन रात्रींत- रात्री दीड ते तीन अशा वेळात त्यांनी पटकथा वाचलेली होती. त्यातील दृश्यात्मकतेचे त्यांनी कौतुक केले. परंतु साक्षेपी टीकेचे काही मुद्देही मांडले. गांधी आणि कस्तुरबा यांच्या नव्हाळीच्या दिवसांच्या भागाचा उल्लेख त्यांनी या संदर्भात केला. शिवाय स्वातंत्र्यलढय़ातील काही नेते चित्रपटातून गाळण्यात आले आहेत, त्यामागचे कारण प्रेक्षकांना द्यावे लागेल, असे त्या म्हणाल्या. अगदी तारीख आणि घटना असा तंतोतंत इतिहास तीन तासांच्या चित्रपटात दाखवता येणे अशक्य आहे हे त्यांनाही मान्य होते. परंतु त्यांचे असेही म्हणणे दिसले की, अखेर व्यावसायिकरीत्या तयार झालेल्या या चित्रपटाची पटकथा ‘सरकारमान्य’ असणे गरजेचे नसून सरकार या चित्रपटाच्या आशय आणि रूपरेषेबद्दल समाधानी असणे तेवढे आवश्यक आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंध असलेल्या अनेक खात्यांतील अधिकाऱ्यांना आम्ही (मी व राणी दुबे) भेटलो. माहिती व प्रसार खात्याचे सहसचिव सुरेश माथुर यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएफडीसीचे अनिल धारकर यांच्याशीही चर्चा झाली. अनिल त्या वेळी या महामंडळातील प्रशासकीय अधिकारी होते. येथे जी भरपूर चर्चा झाली, त्यात निर्मिती खर्चामध्ये कशाकशाचा अंतर्भाव आहे, एकेकाचे वेतन वा मानधन किती आहे, तंत्रज्ञांच्या वेतनातील फरक त्यांच्या कामाप्रमाणे कसकसा आहे आणि तंत्रज्ञ ब्रिटिश आहे की भारतीय यावरून त्याच्या वेतनात किती फरक पडणार आहे, एवढय़ा लोकांच्या राहण्याची सोय कोठे व किती खर्चात करणार, असे प्रश्न प्रामुख्याने होते. या चित्रपट प्रकल्पासाठीच्या अंदाजपत्रकाची चिरफाड करून तपासणी या बैठकीत झाली आणि मगच उभयपक्षी ते मान्य झाले.
आम्हा सर्वानाच हे माहीत होते की, एका व्यावसायिक चित्रपटाच्या निर्मितीत सरकारचा पैसा असण्यावरून वाद होणार आहेत, तसेच तत्त्वत: एका परकीयाला आपल्या राष्ट्रपित्यावर चित्रपट बनविण्यास सरकारने का सांगावे यावरही गदारोळ होऊ शकतो. याहीउपर, असा चित्रपट खरोखर असायलाच हवा का याबद्दलही मुळातून वाद होते. पण प्रत्यक्ष राळ उडण्यास सुरुवात झाली ती लोक दलाचे तत्कालीन नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या अचाट आरोपांमुळे. हा चित्रपट म्हणजे राष्ट्राभिमान विकावयास काढण्याचा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केलीच, परंतु त्यांनी या चित्रपटाबद्दलचे त्यांचे सारे तर्कट, ही आपली निरीक्षणे आहेत अशा आवेशाने मांडले. माहिती न घेता त्यांनी या निर्मितीच्या आर्थिक बाजूवर टीका केलीच, शिवाय त्यांनी जी कधी पाहिलीदेखील नव्हती त्या पटकथेलाही धुत्कारले. माझे मत असे की या प्रसंगाने, पुढील काही महिन्यांत या चित्रपटावर होणाऱ्या टीकेचा सूर नक्की झाला.
टीकाकारांच्या एका गटाने मात्र महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले पाहिजे, असे मलाही वाटे. हा गट म्हणजे ‘फोरम फॉर बेटर सिनेमा.’ त्यांची तक्रार अशी होती की, भारत सरकारने एवढा पैसा एका मूलत: परकीय चित्रपट-कंपनीच्या साहय़ार्थ गुंतवणे आणि त्याच वेळी भारतीय चित्रपटकारांची आर्थिक उपासमार मात्र सुरूच ठेवणे, हा विषम न्याय होय. या स्थितीबद्दल मला सहानुभवच होता आणि तोही मोठा, कारण मी स्वत:देखील एक स्वतंत्र चित्रपटकारच. याचसाठी तर मी भारताच्या माहिती व प्रसारण खात्याकडून ‘गांधी’ चित्रपटास दिल्या जाणाऱ्या निधीमुळे अन्य (भारतीय) स्वतंत्र चित्रपटकारांच्या निधीत खलोटा येणार नसल्याचे स्पष्ट निवेदन मिळविलेले होते. याखेरीज त्या खात्याच्या मंत्र्यांनी मला असे आश्वासनही दिले होते की, या चित्रपटातून जो काही आर्थिक नफा होईल तो पुन्हा एनएफडीसीकडेच वळवून भारतीय चित्रपटांमध्ये रुजविण्यात येईल.
नियोजन-प्रशासनाच्या (लॉजिस्टिक्स) दृष्टीने गांधी चित्रपट यशस्वी झाला तर भारतीय चित्रपट-तंत्रज्ञ मंडळींना त्याचा तितकाच फायदा होईल जितका आम्हा ब्रिटिश मंडळींना इंग्लंडात वा स्कॉटलंड/ वेल्समध्ये निर्मिती झालेल्या अमेरिकी चित्रपटांचे नियोजन-प्रशासन अनुभवल्याने झाला होता, असा विश्वास मला वाटे. या चित्रपटानंतर अन्य परदेशी कंपन्याही भारतीय सह-निर्मात्यांसोबत काम करू लागतील, अशी आशाही मला होती. अशी सहनिर्मिती पूर्वी अशक्यप्राय मानली जात असे, ते आमच्यामुळे केवळ शक्य होणार असे नव्हे, तर सहनिर्मितींचा ओघच लागणार, असे मला वाटे. येथे आनंदाने नमूद करावेसे वाटते की, हा विश्वास व्यर्थ ठरला नाही- किमान सहा मोठय़ा परदेशी निर्मिती वा सहनिर्मिती असलेल्या चित्रपटांची रीघ ‘गांधी’नंतर लागली.
कुणा परक्याने आमच्या नेत्यावरल्या चित्रपटास हात घालूच नये आदी आक्षेपांचा समाचार ‘फोरम फॉर बेटर सिनेमा’ने परस्पर घेतला होता, हे त्यांचे एक प्रकारचे ऋ णच. हाच आक्षेप खरा मानायचा तर महात्माजींच्या हत्येनंतर तीस वर्षे लोटली तरी एकाही भारतीय चित्रपट-निर्मात्याने राष्ट्रपित्यावरील चित्रपट निर्मिण्यासाठी पटकथेसह ठोस प्रयत्न का केले नाहीत, असा या फोरमचा सवाल होता. तरीदेखील कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट नकोच, असा विरोध करणारेही काही जण होते. ‘गांधीजी मनुष्य नहीं, एक चेतना हैं’ असा या विरोधकांचा सूर. म्हणून त्यांचे म्हणणे असे की कुणा अभिनेत्याने त्यांचे पात्र रंगवणे अशक्य ठरेल, एका देवतातुल्य महात्म्यावर व्यावसायिक चित्रपट काढणे हा अवमानही ठरेल. मला हे विचार पसंत नसणेच नैसर्गिक होते, परंतु मी याचे उत्तर न देता, पंडित नेहरूंनी मला गांधीजींबद्दल चित्रपट काढण्यासाठी ज्या शब्दांत प्रोत्साहन दिले होते ते महत्त्वाचे मानत आलो. या महान पुरुषाचे शब्द आणि त्यांमागचा विश्वास जगापर्यंत पोहोचवणे हे अनंतमोलाचे काम होय, असा माझा विश्वास आहे.

हे सर्व उतारे अ‍ॅटनबरो यांच्या ‘इन सर्च ऑफ गांधी’ या आत्मकथनातून (भाग पहिला : पृ. १७८, भाग दुसरा- पृ. १८१ आणि भाग तिसरा पृ. १९४ ते १९६) साभार अनुवादित. मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक : बी. आय. पब्लिकेशन्स, नवी दिल्ली आणि द बोडली हेड, लंडन.  प्रथमावृत्ती : १९८२)