किर्लोस्कर हे नाव महाराष्ट्रातील एक मोठे औद्योगिक घराणे म्हणून प्रसिद्ध आहेच. मात्र हेच नाव  मराठी साहित्य आणि नियतकालिकांच्या वाचकांवर कोरले गेले ते किलरेस्कर, स्त्री व मनोहर
( किस्त्रीम)  या मासिकांमुळे. मराठीतील दर्जेदार मानली गेलेली अनेक मासिके बंद पडत असताना चार दशकांहून अधिक काळ मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या संपादकत्वाखाली या मासिकांनी यशस्वी वाटचाल केली. अशा या साक्षेपी संपादकाचे नुकतेच निधन झाले. त्या निमित्त त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याचा विशेष लेख..
मुकुंदरावांना मी कधीही दुर्मुखलेलं पाह्य़लं नाही. सतत हसतमुख. सतत गडबडीत-घाईगर्दीत. प्रवासाला जाण्याच्या तयारीत. ‘लाल खुणा’ केलेल्या कागदांची चवड असलेल्या फाइल घेतलेले. चष्म्यावर पडलेल्या गॉगलच्या काचा वर करत, हसत शेकहँड करत, भरभर अखंड बोलत राहणारे उत्साहमूर्ती मुकुंदराव.
किर्लोस्कर, मनोहर, स्त्री या नियतकालिकांच्या पसाऱ्यातलं ‘मनोहर’ मासिकाचं रूपांतर ‘साप्ताहिका’ त करायचं ठरल्यावर, तेदेखील युवकांचं साप्ताहिक करायचं ठरल्यावर मी या किर्लोस्करी गोतावळ्यात सामील झालो. साल होतं १९७३. पुढची साडेसहा वर्षे मी पुण्याच्या मुकुंदनगरातील अप्रतिम वनश्रीनं नटलेल्या प्रशस्त आवारातील, जुन्या धाटणीच्या बैठय़ा बिल्डिंगमधल्या ‘संपादकीय’ कळपात मुक्कामाला होतो.
‘किर्लोस्कर’ असं उद्योगपती घराण्याचं नाव. साठ-पासष्ट वर्षांची नियतकालिकांची परंपरा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकरांपासून ज्येष्ठ लेखक या मासिकांशी जोडलेले. वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोगामी विचारांचा पाठपुरावा, अंधश्रद्धांवर घणाघाती हल्ला, बदलत्या जीवनाचा वेध या सूत्रांवर ‘शवांकिंनी’ या मासिकांचा पाया रचल्याने लिखित माध्यमात ‘दबदबा’ असलेला, सुटात वावरणारे, विमानानं प्रवास करणारे, लेखकांसाठी पाटर्य़ा आयोजित करणारे, वाचकांचे, सामाजिक प्रश्नांचे मेळावे आखणारे, अशी ‘गतिमान’ प्रतिमा असलेले, आधुनिक राहणीमानातले ‘संपादक’ मी प्रथमच पाहात होतो. तोवर मुंबईच्या एअरकंडिशण्ड चेंबरमधल्या संपादकांची भेट व्हायची होती. घरगुती कपडय़ात वावरणाऱ्या सायकल-फार तर स्कूटरवरून येणारे, पुण्यातले संपादकच पाह्य़ले होते. मासिकांचा उपक्रम तोवर ‘इव्हेन्ट’ झालेला नव्हता. पुण्याच्या टिपिकल वाडय़ात वाढलेल्या आणि छोटय़ा खोल्यातल्या पुणेरी दैनिकांची मुद्राच, त्या त्या दैनिकात उमेदवारी करताना मनात रुजलेली होती.
त्यामुळे प्रशस्त काचेचे टेबल, कोच असलेल्या मुकुंदरावांच्या भव्य रूममध्ये प्रथम शिरताना, या माणसाशी मोकळा संवाद होणार का, अशी शंका मनात होती. दत्ता सराफ या एकमेव मनमोकळ्या, उंचापुरा उमद्या माणसाचाच फक्त आशादायक, आधारवजा दिलासा होता. गालातल्या गालात हसत, हळूच मिष्कील टिप्पणी करणारे श्री. भा. महाबळ हे आपले ज्येष्ठ सहकारी गप्पा मारायला बेस्ट आहेत एवढी खूणगाठ मनाशी बांधली होती. पण प्रत्यक्षात सुटातले मुकुंदरावच एकदम दिलखुलास वागणारे, खांद्यावर हात टाकून केलेल्या चुकांवर गमतीशीर टप्पू देणारी टिप्पणी करणारे, मध्येच हातात सतत बाळगलेला ‘कॅमेरा’ उघडून, मनोहरच्या शिबिरातल्या तरुण लेखकांचा वा थेट प्रेसमध्ये डोकावलेल्या बिशनसिंग बेदीचा फोटो, मला शेजारी उभं राह्य़ला सांगून काढणारे ‘दोस्त’ च झाले. ‘मालक-संपादक’ हा आविर्भाव सात वर्षांत एकक्षणही जाणवला नाही.
मी सूत्रसंचालन-निवेदन ही करिअर स्वतंत्रपणे करायचं मनात ठरवलेलं असल्याने, नोकरीबाहेरचे माझे कार्यक्रम वाढलेले होते. गाणाऱ्या ग्रुपबरोबर गावोगावी भटकणं आरंभापासूनच सुरू झालेलं होतं. कामाची जबाबदारी मुळीच टाळत नव्हतो. साप्ताहिक मनोहरच्या पहिल्या वर्षांतच पन्नासपैकी तीस कव्हर स्टोरीज (मुख्य लेख) मीच लिहिलेल्या होत्या. लोकांना भेटून, भटकंती करून नव-नवे विषय करायचे होते. ‘तूच कर्ता आणि करवीता, शरण तुला भगवंता’ असं शीर्षक असलेली पहिली कव्हर स्टोरी करतानाच, पुण्यातल्या त्या वेळच्या सनातन वातावरणातील, जुन्या पुराण्या देवळात रंगणारी प्रेम प्रकरणं, देवदर्शनाच्या निमित्तानं देवळातल्या कोनाडय़ांमध्ये एक्स्चेंज होत असलेल्या प्रेमचिठ्ठय़ा असा त्या काळानुसार खळबळजनक विषय नमनालाच निवडलेला होता. पण किर्लोस्करवाडीच्या जुन्या पण विचारानं अत्याधुनिक वातावरणात वाढलेल्या मुकुंदरावांचा अशा विषयांना मुक्त पाठिंबा, सशक्त सहकार्य असे.
मी अशा विषयांच्या शोधाचं निमित्त करून, ऑफिसबाहेरच जास्त वेळ असे. रात्री बाहेरगावी कार्यक्रम करून रातोरात प्रवास करून ठीक ‘नऊ’ वाजताची ऑफिसची वेळ पाळत असे. मग पुढे दिवसभर एकदा बाहेर पडल्यावर, येण्याची निश्चित नसे. त्यामुळे काहीशा क्लेरिकल शिस्तीत वाढलेले सहकारी नाराज होत होते. माझ्या पाठी ‘उपस्थिती’वरून कुरकुर चालत असे. पण साप्ताहिकाला लागणारा नेमका ‘कंटेन’ जमा करत असल्याने आणि लेखाची वेळ सांभाळत असल्याने आणि सर्व क्षेत्रांतल्या माणसांच्या गाठीभेटी घेत, अफाट जनसंपर्क वाढवत असल्याने (ती हौसच होती) दत्ता सराफ माझ्या ‘वेळांकडे’ कानाडोळा करत आणि मुकुंदराव तर ‘फायनल रिझल्ट’ला महत्त्व देणे आणि पत्रकारितेत केव्हाही उत्तररात्रीही जावं लागतं, तेव्हा दुपारी सुधीर किती वाजता परतला, अशा सरकारी कार्यालयीन वेळेच्या, शिस्तीच्या आग्रहाला महत्त्व देणारे नसल्याने, ते याबाबत चुकूनही बोलत नसत. सहकाऱ्यांनी फारच तक्रार केली, तर आजोबांनी नातवाला मारावा तसा पाठीवर लाडिक फटका मारत. ‘‘काय लेका, खुळ्या काल दुपारी कुणाकडे जाऊन बसलात रे’’ असं म्हणत पुढच्या विषयाकडे वळत.
मुकुंदराव किती निखळ होते याचं एक उदाहरण देतो. मी नोकरी सोडण्याच्या पूर्ण निर्णयाप्रत (मनातून) आलो असताना एके दिवशी मला खांद्यावर प्रेमाने हात टाकून म्हणाले, अरे गाढवा, तुझ्याबरोबरचे बहुतेक जण तुला काढून टाका म्हणून सांगतायत. तेव्हा जरा ऑफिसला दुपारी पण येत जा. ऑफिस सुटेपर्यंत थांबत जा आणि मग संध्याकाळी जा कुठेही. भटकायला रिक्षा-बिक्षाला पैसे आहेत ना? यावर काय म्हणणार? कोण मालक इतका मोकळाढाकळा भेटणार? त्यांच्यामुळेच मी ‘राजीनामा’ द्यायला उशीर करत होतो.
पुढे मी कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने आख्खा महाराष्ट्र हिंडलो. त्या सर्व गावांची आणि गावातल्या नामवंतांची ओळख मला आधीच मुकुंदरावांमुळे झालेली होती. ते त्यांच्या दौऱ्यात मला बऱ्याचदा नेत. कुठल्याही गावी गेल्यावरची विशेषत: म्हणजे गावातल्या मोठय़ा माणसांकडे जायच्या आधी ते मला त्या गावच्या एस.टी. स्टँडवरच्या पेपर स्टॉलवर नेत. मला म्हणत त्या पेपरवाल्याशी गप्पा मार. नेमकं वाचकाला काय आवडतं, काय नेमकं खपतं याचा अंदाज या पेपरवाल्याइतका कुठेच मिळणार नाही. त्या काळात संपादक खात्यात काम करणाऱ्याला असं मार्केटिंगचं भान शिकवणारा दुसरा संपादक नसेल. प्रभाकर उर्ध्वरेषेंसारख्या विचारवंताकडून वेगवेगळ्या विचारधारा, राजकीय तत्त्वप्रणाल्या समजून घेण्याकरिता मुकुंदरावांनी मला फक्त उर्ध्वरेषेंशी गप्पा मारण्याकरिता ‘नागपूर’ ला पाठवलं होतं.
त्या काळात मराठी दैनिकातूनही चित्रपटविषयक मजकूर ‘परीक्षण’ वगळता इंग्रजी फिल्मी मॅगेझिन्सवरून भाषांतरित करून वापरला जाई. मुंबईचं बॉलीवूड अवघ्या चार तासांवर असताना, नट-नटय़ांच्या थेट मुलाखती, त्यांना थेट भेटून, तिथल्या पाटर्य़ा अ‍ॅटेंड करून आपल्याकडे फर्स्ट हँड रिपोर्ट यायला हवा, दैनिकांमध्ये शोभेल असा  मुकुंदरावांचा दृष्टिकोन होता. दत्ता सराफांना याच गोष्टीचं नेमकं भान असल्याने, मला थेट अशोक कुमारांची भेट घ्यायची संधी मिळाली. सराफसाहेबांमुळे हिंदी इंडस्ट्रीत दबदबा असलेली, स्टार अँड स्टाइलची देवयानी चौबळ प्रथमच मराठीत आमच्याकडे लिहू लागली. हाजीअलीसमोरच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबमधल्या तिच्या रूमवर आठवडय़ातून एक दिवस तिला भेटून, तिचा संपर्क वाढवणे, मजकुराचा पाठपुरावा करणे यासाठी मला ऑफिस खर्चाने मुंबई फेऱ्या करता आल्या. धर्मेद्र तिच्यावर एका पंचतारांकित हॉटेलात धावून गेला, त्या क्षणाचा मी साक्षीदार झालो. ‘अ पेगसाईज रीपोर्टर फ्रॉम पुणे मिस्टर गाडगीळ’ हा माझ्याबरोबर होता, असा माझा उल्लेखही स्टार अँड स्टाइलमध्ये छापून आला होता.
जाता जाता सांगतो की, देवयानीमुळे राजेश खन्नाचं लग्न, अमिताभचं लग्न याचा फोटोसकट रिपोर्ट दैनिकाआधी आमच्या साप्ताहिकात आला होता. अशा थेट वास्तव-वेचक-वेधक गोष्टींना भरभरून प्रोत्साहन देण्याचा मुकुंदरावांचा स्वभाव असल्यानेच मनोहर साप्ताहिकाचा त्या काळी खप ८० हजारांच्या घरात पोहोचला होता.
मुकुंदरावांना सामाजिक काम करणाऱ्यांबद्दल खूप आस्था होती. मी ‘मनोहर’च्या लेखकांचं मानधनाचं शीट तयार करत असे. एकदा मुकुंदराव म्हणाले, अरे तो नोकरी वगैरे करत नाही. पूर्ण वेळ सामाजिक कामाला वाहून घेतो. त्याला आपल्याकडच्या प्रथेनुसार पानाप्रमाणे पैसे न देता, भक्कम रक्कम द्या. तिथे हिशोब नको.
नामांतर, बाईंडर वाद, घाशीराम वादळ अशा वेळी मुकुंदराव मनोहरच्या माध्यमातून भक्कमपणे त्या माणसांच्या पाठी उभे राहिले.
त्यांना सतत बैठका घेण्याचा सोसच असे. बैठकीत त्यांच्या वाचनात आलेल्या अनेक नियतकालिकांमधल्या महत्त्वपूर्ण विषयांवरील लेखांवर लाल खुणा करत. ती कात्रणे आम्हाला हे विषय मराठीत यावेत म्हणून दिली जात. नरेंद्र चपळगावकरांसारख्या सामाजिक जाण असलेल्या विधिज्ञांपासून उर्ध्वरेषेपर्यंत अनेक नामवंतांना संपादकीय बैठकांना पाचारण करत. संपादक विभाग अपडेट राह्य़ला पाहिजे, हे त्या काळात मासिकांच्या दुनियेत दुर्मीळच होतं.
बोलताना अनेक संदर्भ त्यांच्या मनात डोकावत. स्वाभाविकच ते ‘नाव’ विसरत. मग त्यांची तारांबळ उडे. ते गमतीशीर बोलत. उदा. अरे सुधीर, कोण तुझा तो क्रिकेटर, पगडीवाला, दाढी आहे बघ त्याला. बोलिंग का काय ते करतो तो रे.. मग आपण म्हणायचं की, अहो बिशनसिंग बेदी. आपण नेमकं नाव उच्चारलं की वयाचं, पदाचं अंतर विसरून हसत टाळी देणार आणि विचारणार की बोलिंगच करतो ना तो?
प्रवासात खाण्याचे पदार्थ भरपूर बरोबर ठेवत. कुठे थांबून खाण्यात वेळ घालवण्यापेक्षा खाता खाता धावती मीटिंग करण्यावर त्यांचा भर असे.
एकदा ऑफिसवर एका लेखाच्या विरोधात महिलांचा मोर्चा येणार होता. मुकुंदराव गांधी टोपी घालून, सायकलवरून गेटपाशी गेले. रिक्षातून उतरणाऱ्या मोर्चेकरी महिलांना गुलाबाचं फूल देऊन स्वागत करत वेगवेगळे विषय बोलत राह्य़ले. महिला मोर्चा विसरून गेल्या.
येणाऱ्या प्रत्येक पत्राला सविस्तर उत्तर देणे आणि प्रत्येक क्षणाचा फोटो काढून तो संबंधितांना घरपोच देणे याची मुकुंदरावांना हौसच होती. ‘तुमच्या घरी खाल्लेल्या त्या पदार्थाची चव अद्याप माझ्या जिभेवर रेंगाळतीय’ अशी घरगुती भाषा पत्रामधून माणसं जोडायला उपयोगी पडे.
मी स्वतंत्र कार्यक्रम – निवेदन हा व्यवसाय करायला लागल्यावर, अनेक निवडक माझ्या टीव्ही कार्यक्रमांना ‘दाद’ देणारी त्यांच्या स्वहस्ताक्षरातली किमान २२ पत्रं तरी माझ्या संग्रही आहेत. आपल्या हाताखाली काम केलेल्या सहकाऱ्याला अगदी भरभरून स्वहस्ताक्षरात ‘दाद’ देणारा असा संपादक दुर्मीळच!

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला