01 June 2016

सर्जक स्वराधिराज

विश्वविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचे आयुष्य म्हणजे एका सर्जनशील कलावंताच्या कलोपासनेचा आणि ज्ञानोपासनेचा अभिजात

प्रतिनिधी | December 13, 2012 4:38 AM

विश्वविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचे आयुष्य म्हणजे एका सर्जनशील कलावंताच्या कलोपासनेचा आणि ज्ञानोपासनेचा अभिजात अविष्कार होते. सतारीला आणि त्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी जागतिक पातळीवर नेले. सतारीच्या बोलांइतकेच मोहक रूप लाभलेल्या रवीशंकर यांनी संगीताच्या प्रत्येक माध्यमातून विविध वाद्य, विविध संगीतप्रकार आणि विविध प्रांतातील संगीतसंस्कार यांचा मिलाफ साधण्याचाच प्रयत्न केला. प्रतिष्ठित अभिजनांना जसा त्यांच्या सतारीने आनंद दिला त्याचबरोबर चित्रपटसंगीत रसिकांच्या कानांनाही त्यांनी माधुर्याची गोडी लावली.

*  कला, ज्ञान आणि संस्कारांची नाळ / १९२० ते १९३०
रविशंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी वाराणसीत बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील श्यामशंकर चौधुरी हे संस्कृतचे पंडित होते तसेच इंग्लंडमध्ये बॅरिस्टरी शिकले होते. भारतातील विविध संस्थानांमध्ये त्यांची उठबस होती तसेच पं. मदनमोहन मालवीय आणि रवींद्रनाथ ठाकूर यांच्याशी त्यांचे मैत्र होते. ते स्वत: वेदांती होते आणि युरोप अमेरिकेत वेदांताच्या प्रचारात त्यांचे उत्तरआयुष्य व्यतीत झाले होते. त्यांचा मोठा भाऊ उदयशंकर हा जागतिक किर्तीचा नर्तक होता. यामुळे तत्त्वज्ञान आणि कलेचे बीज रविशंकर यांच्यातही उपजतच होते.

*  विश्वपरिक्रमा / १९३०
रविशंकर यांचे वडील परदेशात द्वितीय विवाह करून राहात असताना रविशंकर मात्र वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत आईबरोबर वाराणसीत राहात होते. वयाच्या १३ व्या वर्षी ते देशोदेशीच्या कलावंतांचा भरणा असलेल्या आपल्या भावाच्या नृत्यपथकासह जगभर फिरू लागले. त्याच भ्रमंतीत ते नृत्यकलेत पारंगत तर झालेच पण तबला, सतार व इतर अनेक वाद्येही लिलया वाजवू लागले. पाश्चात्य संगीत आणि जाझ यातही त्यांनी बरीच मुशाफिरी केली. बुद्धी आणि रूपाचा संगम झालेले पोरसवदा रविशंकर त्या पथकाचे ‘हीरो’च झाले.

*  सतारीचे बोल / १९३५
शंकर बंधू युरोपभर फिरत असले तरी भारतातही त्यांचं येणंजाणं होत असे. एकदा अशाच एका भारतवारीत मैहर दरबारातील सतारिये उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचे वादन त्यांनी ऐकले आणि ते भारावून गेले. मैहर संस्थानात उदय शंकर यांनी शब्द टाकला आणि अल्लाउद्दिन खाँसाहेब युरोप दौऱ्यावर या पथकासह गेले. एकदा रविशंकर थोडा थोडा वेळ विविध वाद्ये वाजवून थोडेसे विसावले आणि त्यांची नजर खोलीच्या दाराशी गेली तेव्हा तेजपुंज अल्लाउद्दिन खाँ तिथे उभे होते. ‘‘देखो बेटा एक साधे सब सीधे, सब साधे सब जाय!’’ एवढं बोलून झर्रकन खाँसाहेब निघून गेले. त्या वाक्याचा रविशंकर यांच्या मनावर खूप परिणाम झाला. कलेच्या प्रत्येक प्रांतात मुशाफिरी करण्यापेक्षा एकाच वाद्याला जीवन वाहून घ्यायचा निश्चय त्यातून जन्मला आणि रविशंकर आणि सतार यांचे नाते पक्के झाले. अल्लाउद्दिन खाँ यांचे ते शिष्य झालेच, त्यांचे पुत्र अली अकबर आणि कन्या रोशनआरा यांच्यासह सतारमयही झाले. रोशनआरांशी पुढे त्यांचा विवाह झाला आणि त्यांचे नामकरण अन्नपूर्णादेवी झाले.

*  चलो भारत.. गंडाबंधन / १९३८ ते १९४४
महायुद्धाचे सावट गडद होऊ लागले आणि आईवडीलांचेही निधन झाले त्यामुळे रविशंकर भारतात परतले. मैहर येथे जाऊन १९३८ मध्ये त्यांनी अल्लाउद्दिन खाँसाहेबांचा गंडा बांधला आणि सहा वर्षांत त्यांचे सतारीचे शिक्षण पूर्ण झाले. गुरुंकडून मिळालेल्या शैलीबद्दल एके ठिकाणी रविशंकरजी जे म्हणाले त्यातून त्यांच्या वादनाच्या शैलीचंच सूचन झालं आहे. ते म्हणतात, ‘आम्ही सतार बीन अंगाने वाजवितो. शक्य तो गायकीतली सर्व अंगं त्यात यावीत असाच रियाज बाबांनी आमच्याकडून करून घेतला. सूरसिंगार, रबाब आणि सूरबहार या सर्व वाद्यांच्या सौंदर्याचा थोडा थोड अर्क म्हणजे आमची सतार. आलापी आम्ही धृपद अंगाने करतो. ती झाली की त्यापाठून बिलंपत-जोड नंतर मध्य-जोड, त्यानंतर द्रुत-जोड, अतिद्रुत जोड, लडी, लड-लपेट, लड-गुथा, लडी झाला, साधा झाला, ठोक झाला इत्यादि बारा अंगांनी आलापी पूर्ण झाल्याशिवाय तिला आलापी म्हणताच येत नाही. त्यानंतर गत वाजवणं हे थोडय़ा वेळाचं काम असतं!’

*  पोट आणि हृदयाची हाक / १९४४ ते २०१२
पंडितजींवर गृहस्थाश्रमाची जबाबदारीही होती त्यामुळे उपजीविकेचे प्रयत्नही अटळ होते. अली अकबर यांच्यासह त्यांच्या जुगलबंदीच्या मैफली गाजत होत्याच पण त्यापलीकडेही विचार करणे भाग होते. त्यासाठी त्यांनी पहिली नोकरी केली ती आकाशवाणीचे संगीत दिग्दर्शक म्हणून १९४९ ते १९५६ अशी सात वर्षे. त्याच दरम्यान प्रख्यात पाश्चात्य व्हायोलीनवादक येहुदी मेनुहिन यांच्याशी त्यांची मैत्री झाली होती. त्यातून १९५५ मध्ये अली अकबर यांना मेनुहिन यांच्यासह संयुक्त वादनासाठी रविशंकर यांनी अमेरिकेला पाठविले. तिथे सतारीला मिळणारा अनपेक्षित प्रतिसाद पाहून, आता तुम्हीच या, असा सांगावा अली अकबर खाँ यांनी पाठविला. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन रविशंकरजी विश्वभ्रमंतीसाठी निघाले आणि १९५६ पासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सतारीने जगाचे कान एकवटून टाकले. बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसन याच्याशी सांगीतिक मैत्र जुळले आणि त्यातून सर्व भेद आणि सीमा संपुष्टात आणणाऱ्या सांगीतिक समन्वयाची परंपरा रविशंकर यांनी सुरू केली. त्यांचे असंख्य अल्बम्स कानसेनांच्या संग्रहात कायमचे दाखल आहेत.

*  चित्रपट कारकीर्द / १९४६ ते १९८२
बंगाली आणि हिंदूी चित्रपटांत संगीतकार आणि पाश्र्वसंगीतकार या नात्याने पंडितजींनी स्वतचा ठसा उमटविला आहे. १९४६ पासूनच काही किरकोळ चित्रपटांना त्यांनी पाश्र्वसंगीत दिले. १९५५ चा सत्यजीत रे यांचा ‘पाथेर पांचाली’ हा त्यांच्या संगीताचा सुवर्णस्पर्श लाभलेला पहिला चित्रपट आहे. १९५७ सालचा तपन सिन्हा यांचा ‘काबुलीवाला’ आणि १९५९ सालचा सत्यजीत रे यांचा ‘अपूर संसार’ या दोन बंगाली चित्रपटांचे संगीतही त्यांनीच केले. १९६१ मध्ये ‘अनुराधा’ या हिंदी चित्रपटातील ‘हाय रे वो दिन क्यूं ना आए’, ‘सावरे सावरे’, ‘कैसे दिन बीते कैसी बीती रतियाँ’, ‘जाने कैसे सपनों में खो गयी अखियाँ’ ही लता मंगेशकर यांनी गायलेली त्यांची सर्वच गाणी आजही रसिकप्रिय आहेत. १९६३ साली आलेल्या ‘गोदान’चे संगीतही त्यांचेच होते. त्यानंतर प्रदीर्घ काळाने गुलझार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मीरा’ (१९७९) चित्रपटाला त्यांनी संगीत दिले पण त्यावेळी रविशंकर-लता हा मधुशर्करायोग जुळून आला नाही. त्या चित्रपटात सर्व भजने वाणी जयराम यांनी गायली. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ (१९८२) हा संगीतकार म्हणून पं. रविशंकर यांचा अखेरचा महत्त्वाचा चित्रपट. पाश्चात्य दूरचित्रवाहिन्यांच्या काही मालिकांनाही त्यांच्या संगीताने सुरेल साथ केली आहे.

*  त्यांची शैली-त्यांचे योगदान
नृत्यकला जाणत असल्याने शास्त्राची कक्षा न ओलांडता आपले वाजविणे ललित्यपूर्ण व सौंदर्यपूर्ण करण्याकडे त्यांचे लक्ष असे. त्यांच्या शैलीचे वर्णन समीक्षक गोपालकृष्ण भोबे यांनी चित्रदर्शी शैलीत केले आहे ते असे- ‘रविशंकर यांचे सतारवादन ही नुसती त्यांच्या हाताची करामत नाही. त्यांच्या सतारीच्या तारेवरील प्रत्येक आघातामध्ये जबरदस्त पीळदारपणा आहे. खर्जाच्या टणत्कारांत ओतप्रोत आत्मविश्वास आहे. त्यात हवा त्या जागी नरमपणाही सहजतेने येतो. ते जेव्हा मंद सप्तकात निवास करतात तेव्हा एक एक स्वर गोलाकार होऊन बाहेर पडतो. आलापी पाकळी पाकळीने फुलत जाते. हळुहळू फुले पूर्ण उमलतात. जोड त्याचे गुच्छ तयार करतो आणि द्रुत गतीत ते गुच्छ श्रोत्यांवर भराभर फेकले जातात. त्यांच्या गांधारात कधी करुणा, कधी उदात्तपणा, कधी गांभीर्य हे सर्व भाव व्यक्त करताना तो बदल पर्यायाने त्यांच्या मुद्रेवर व अंगविक्षेपावरही होतो.. गतीचा मुखडा ज्या जागेवरून बांधला असेल ती जागा ते कधीही सोडत नाहीत. नाना तऱ्हेचे उलटसुलट तानपलटे वाजवून शेवटी ते तिहाई घेतात पण तो तिय्या नेहमी गतीच्या मुखडय़ाआधी संपतोच आणि सटकन ठरलेल्या मात्रेवरून मूळ गत सुरू होते. तिन्ही सप्तकांत सहजपणे फिरून सुंदरपणे समेवर येणे म्हणजे रविशंकर यांच्या हातचा मळ!’ पंडितजींनी पाश्चात्य संगीताशी मिलाफ साधला त्याचप्रमाणे दाक्षिणात्य संगीताशीही सुरेल संधी केली. वाचस्पती हा दाक्षिणात्य राग त्यांनीच हिंदुस्तानी संगीतात प्रचलित केला. अहिर ललित, बैरागी, तिलक श्याम, मोहन कंस हे त्यांनी निर्माण केलेले राग आहेत.

* बंध-अनुबंध / १९४० ते २०१२
रविशंकर आणि अन्नपूर्णा यांचा विवाह १९४१ मध्ये झाला आणि त्यांना १९४२मध्ये शुभेंद्र हा पुत्र झाला. शुभेंद्र अखेपर्यंत पंडितजींना जगभरातील मैफलीत साथ करीत असे. १९९२ मध्ये शुभेंद्रचे निधन झाले. अन्नपूर्णादेवींशी पंडितजींचा विवाह टिकला नाही. काही वर्षांतच ते शास्त्रोक्त नर्तिका कमला शास्त्री यांच्याशी विवाहबद्ध झाले. हे दोघेही १९८१ मध्ये विभक्त झाले. त्या आधीपासूनच अमेरिकेतील मैफलींच्या आयोजक सु जोन्स यांच्याशी रवीशंकर यांचे भावबंध जुळले होते आणि त्यातून १९७९ मध्ये कन्या नोरा जोन्स हिचा जन्म झाला. रविशंकर आणि सु यांचा विवाहही १९८६ मध्ये संपुष्टात आला. त्याआधीपासूनच त्यांच्या जीवनात आल्या होत्या सुकन्या रंजन. या दोघांनी विवाह १९८९ मध्ये केला असला तरी त्याआधीच म्हणजे १९८१ मध्ये त्यांच्या कन्येचा अनुष्का शंकर यांचा जन्म झाला होता. रविशंकर यांच्याप्रमाणेच नोरा आणि अनुष्का यांनीही संगीतक्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

* मानसन्मान
संगीत नाटक अकादमीने १९६२ मध्ये त्यांना पुरस्कार दिला. भारताचे सर्वच नागरी सन्मान त्यांना लाभले. १९६७ मध्ये पद्मभूषण, १९८१ मध्ये पद्मविभूषण आणि १९९९ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. तीन ग्रॅमी आणि युनेस्कोचा एक पुरस्कारही त्यांना लाभला. १९९२ मध्ये मॅगसेसे पुरस्काराची मुद्राही उमटली. २००१ मध्ये ब्रिटनच्या महाराणीने त्यांचा शाही किताब देऊन गौरव केला. २०१० मध्ये मेलबोर्न विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिली.

* शेवटची मैफील ‘ऑक्सिजन मास्क’च्या मदतीने    
कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथील आपल्या शेवटची मैफील रंगविताना पं. रविशंकर यांना ‘ऑक्सिजन मास्क’चा आधार घ्यावा लागला होता. गेल्या ४ नोव्हेंबरला पंडितजींनी निवडक श्रोत्यांसमोर कार्यक्रम केला होता. आपली मुलगी अनुष्का शंकरसह त्यांनी ही मैफील रंगविली होती. त्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. किंबहुना आरोग्याच्या कारणास्तव ही मैफील यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अंतिमत: या बैठकीत त्यांनी ‘ऑक्सिजन मास्क’ लावून सतारवादन केले, अशी माहिती त्यांचे माजी सचिव आणि निकटवर्तीय राबिन पाल यांनी दिली. कोणीही केलेली कार्यक्रमाची विनंती रविशंकर नाकारत नसत, असे सांगत नवनवीन कलाकारांच्या मैफलींचे आयोजन करावे म्हणून ते आपल्याजवळ आग्रह धरीत असत. शिवाय त्या मैफलींना उपस्थितही राहात असत, असे पाल यांनी सांगितले.
 
* वेरूळ लेण्यांच्या पाश्र्वभूमीवर सतार वाजविण्याची मजा काही औरच!
जगभरात भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचविणाऱ्या पं. रविशंकर यांना महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ लेण्यांनी मोहिनी घातली होती. जगभरात अनेक व्यासपीठांवर आपल्या सतारवादनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या स्वरसम्राटाला वेरूळ लेण्यांच्या पाश्र्वभूमीवर सतार वाजविण्यास प्रचंड आवडत होते आणि याची कबुली दस्तुरखुद्द पं. रविशंकरांनीच दिली होती.
औरंगाबाद येथे होणाऱ्या वेरूळ संगीत महोत्सवामध्ये एकदा हे गुपित त्यांनी स्वत: उघड केले होते. ‘मला तुमचा हेवा वाटतो. एकाच वेळी तुम्हाला कैलास मंदिराचे सौंदर्य अनुभवताही येते आणि त्याच वेळी तुम्ही माझे सतारवादनही ऐकू शकता’, असे उद्गार ९०च्या दशकांत त्यांनी वेरूळ महोत्सवासाठी जमलेल्या श्रोतृवृंदासमोर काढले होते.

First Published on December 13, 2012 4:38 am

Web Title: musicial king
टॅग Music,Ravishankar,Sitar